Saturday, December 29, 2012

भीमा कोरेगावचा रणसंग्राम: पेशव्याच्या दंडेलशाहीला महारांचे प्रतिउत्तर


महार ही जमात मुळात क्षात्रवृत्तीची असून ती शूरवीर, कर्तबगार व पराक्रमी होती. शिवकाळात महारानी अनेक पराक्रम करीत स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे कार्य केले होते. रायनाक महार हा रायगडाचा किल्लेदार होता तर कालनाक व सोंडकर महार यांच्याकडे रोहीडा किल्ल्याची नाईकी होती. संभाजी राजेच्या वधानंतर झालेल्या संग्रामात नागेवाडीच्या महारानी व मौजे वेलंग
येथील सिदनाक महाराने मोगलांना जेरीस आणले होते. मराठे व पेशव्यांचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी महार हे मुघल व ब्रिटीश सैन्याविरुध्द इमानदारीने व प्राणपणाने लढले. त्यांनी पेशव्यांना अनेक विजय मिळवून दिले. परंतु या महार सैनिकांना सत्ताधिका-यांच्या (ब्राम्हण सैनिक) अवहेलना व अपमानाशिवाय काही मिळत नव्हते. खर्ड्याच्या लढाईत शिदनाक महाराने पराक्रम करून माधवराव पेशव्यास विजय मिळवून दिला होता. परंतु लढाईच्या मैदानातच शिदनाकसह महार सैनिकांचा ब्राम्हणाकडून अपमान करण्यात आला होता.

पेशव्यांनी अतिशूद्र जातीतील मांग व चांभार यांना आपले लक्ष केले नव्हते. केवळ महाराना ते पाण्यात पहात असत. एकंदरीत महारांची पेशव्यांना भीती वाटत असावी. रणांगनावर महार लोक करीत असलेले पराक्रम व त्यांना मिळत असलेले नेत्रदीपक यश बघून मराठे व पेशवे राज्यकर्त्यांच्या मनात धडकी व दशहत बसली असावी. महारांच्या या वाढत्या पराक्रमाला योग्यवेळी पायबंद घातला नाही तर महार शिरजोर बनतील व ते शत्रूस मिळून मराठा वा पेशवेशाही बुडवतील किंवा स्वत:च राज्यकर्ते बनतील अशी शंका व धास्ती नेहमी पेशव्यांच्या मनात असे. महार लोक हे जरब महात्वाकांक्षी दिसतात हे पेशव्यांना कळून चुकले होते. त्यामुळेच सत्ता व धर्माच्या माध्यमातून महारांना बंधनात अडकविण्याचे षडयंत्र रचण्यात आले. आजही महाराष्ट्रात केवळ महारांचीच सत्ताधा-यांना भीती वाटत असते. त्यामुळेच महारात फुट पाडा व राज्य करा असे सत्ताधा-यांचे धोरण असते. मांग व चांभार ह्या जाती कालही मारक नव्हत्या व आजही नाहीत.
अस्पृश्य समाजातील विशेषत: महारांचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक हक्क हिरावून घेण्यासाठी मांग, चांभार व महार यांची अतीशुद्र व अस्पृश्य म्हणून गणना करण्यात आली व त्यांना गावकुसाबाहेरच्या वस्तीत राहण्यास बाध्य करण्यात आले. या अतिशुद्रांनी आचरण कशा पध्दतीने करावेत व त्यांची कर्तव्ये काय असावीत याची संहिता तयार करण्यात आली. मनुस्मृती मध्ये या संहितेला कायद्याचे स्वरूप देण्यात आले. मनुस्मृतीच्या कायद्याचे पालन न करण्यारास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. मनुस्मृतीच्या या परंपरेला शिवाजी राजेंनी बदलण्याचे कार्य केले नाही असे खेदाने म्हणावे लागते. जसे आतापर्यंत चालत आले त्याप्रमाणे वागावे असा त्यांचा एकप्रकारे आदेशच होता. एक राजा म्हणून त्यांनी रुढी परंपरा झिडकारली असती व आपल्या सर्व रयतेस समान वागणूक दिली असती तर ते एक महान राजा ठरले असते. शिवाजी महाराजांनी जातीजातीमध्ये केवळ समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येते. अस्पृश्यांच्या पराक्रमाचा व शौर्याचा उपयोग शिवाजी राज्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी करून घेतला परंतु सांस्कृतिक व धार्मिक अस्पृश्यता घालविण्यासाठी ब्राम्हनीव्यवस्थेला त्यांनी चोप दिला नाही उलट ठरवून दिलेल्या मार्गाखेरीज, महाराजांच्या आदेशानुसार एका महाराने रायगडावर जाऊन निशान लावले तर त्याचे हातपाय तोडण्यात आले हा शिवाजी राजेंनी  अस्पृश्यावर केलेला अन्याय नव्हे काय?. त्यामुळे शिवाजी राजेंनी केवळ स्वराज्य स्थापनेत महारांच्या शौर्याचा वापर करून घेतला असे खेदाने म्हणावे लागते.  

शिवशाहीची सत्ता जेव्हा पेशव्यांच्या हातात गेली तेव्हा तर त्यांनी अस्पृश्यावर कहरच केला होता. पेशवे स्वत:च कोकणस्थ ब्राम्हण असल्यामुळे मनुस्मृती तंतोतंत लागू करण्याचा आपला जन्मसिध्द हक्कच आहे या अविर्भावात वागत असत. त्यामुळे शिवाजी राजेंच्या काळातील थोडयाफार सामाजिक संतुलनाचा पेशव्यांनी बळी घेतला. अस्पृश्यांना ठरवून दिलेल्या वेळेशिवाय सार्वजनिक रस्ते सुध्दा वापरता येत नव्हते. शारदा देशमुख यांच्या मतान्वये पेशवाईत आचारधर्माचे नुसते स्तोम माजाविल्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य पेशव्याकडून होत असे. अत्यंज वर्गाला स्पर्श करणे हे पाप असून त्यांची सावली अंगावर पडता कामा नये. अस्पृश्यांना देवळात, पाणवठे व शिक्षणास मज्जाव करण्यात आला. पेशवाईच्या काळात अस्पृश्य समाजाच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडके व पायाखालिल रस्ता साफ करण्यासाठी कमरेला झाडू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती. अस्पृश्यांनी तीर्थास जाऊन मंदिर प्रवेश करू नये. असे कोणी केल्यास त्याचे परिपत्य  करावे असे पेशवा सरकारचे सक्त आदेश होते.
ब्राम्हण रस्त्यात भेटला तर अस्पृश्यांनी लगलेच खाली बसावे व पालथे पडावे असा दंडक होता. दुस-या बाजीरावाच्या काळात एखादा महार वा मांग तालीमाखान्यापुढून गेल्यास गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळल्या जात असे असा महाभयानक अत्याचार अस्पृशावर होत असे. अस्पृश्यावरील हा अत्याचार बघून  ब्रिटीश निरीक्षकाचे मन हेलावत असे. सेनापती फोर्बेस लिहितो, त्या गरीब व जातीबाहेर फेकण्यात आलेल्या चांडाळाच्या स्थितीचे वर्णन मी कशा प्रकारे करू?. त्यांना शहरात वास्तव्य करण्याची मुभा नव्हती. गावात त्यांना सकाळी नव वाजन्याच्या अगोदर व दुपारी तीन नंतर फिरण्याची सक्त मनाई असे. त्यांना वेशीबाहेर दूर अंतरावर गलिच् व दरिद्री राहून झोपड्या बांधून राहण्यास भाग पाडल्या जात होते. त्यांची दारुण अवस्था बघितली की माझे अश्रू आवरणेही मला कठीण होत असे. मी माझ्या क्षेत्रात या अस्पृश्यांची सुधारना करण्याचे प्रयत्न केले पण वरिष्ठ जातीच्या मनात अस्पृश्याबद्दल इतके खोलवर रुजलेले गैरसमज आहेत की माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. बॉम्बे गझेटियर ई.स.१८८४-८५ प्रकाशित झालेल्या महार जातीच्या संदर्भात लिहिल्या गेले की, केवळ महाराच्या शरीराचाच स्पर्श नव्हे तर शरीराच्या सावलीचा देखील स्पर्श होऊ नये म्हणून खेड्यातील विहिरीजवळून महार जात असताना त्याने गुडघ्यावर रांगत गेले पाहिजे. नाही तर त्याची सावली पाणी भरणा-यावर पडेल व सावली पडली म्हणजे विटाळ होईल, असे पाहण्यात आले” असे लिहिले गेले.

लढाईच्या रणांगणावरील महाराच्या शौर्याचे किस्से राजवाड्यातील ब्राम्हण बायकांच्या कानावर जात असत. त्यामुळे राजवाड्यातील काही स्त्रिया महारावर खुश असत. महारासोबतची त्यांची प्रेमप्रकरणे उघडकीस आल्यास महारांना ठार करण्यात येई. गणपत महाराचा अशाच प्रकारे खून करण्यात आला होता. पण ब्राम्हणांच्या बाबतीत हे उलट असे. ब्राम्हणाने अस्पृश्य स्त्रिशी व्यभिचार केला तर तो त्यांना चालत असे. तेव्हा विटाळ बिटाळ याची ते परवा करीत नसत. ब्राम्हणांची अशी प्रकरणे बाहेर आल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नसे तर केवळ प्रायश्चित घेत असत. त्यामुळे गुन्हे करणे व प्रायश्चित घेऊन परत गुन्हा करणे हा ब्राम्हणांचा धंदाच झाला होता.
महार-मांगावर कोणीही अत्याचार करावा व त्यांनी तो निपुटपणे सहन करावा अशी प्रथाच रूढ झाली होती. त्यामुळे महार-मांगाना बळी देण्याची क्रूर प्रथा सुरु झाली. इमारतीच्या पायात, किल्ला, किल्ल्याचा बुरुज, पूल, तळे व बांधकामात अस्पृश्यांचा बळी दिल्या जात असे. “मांग-महारांना पायभरणीत पुरले” असे शब्दोल्लेख अनेक लोककथेत आढळतात. 

अशा अस्पृश्यतेच्या नावाखाली पेशव्यांनी अस्पृश्यांना दिलेली वागणूक अन्यायकारक व क्लेशदायक होती. हा अन्याय व अपमान सहन करण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु संधी मिळताच महारानी त्याचा बदला घेतला. १ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज व दुसरे बाजीराव पेशवे यांच्यात भिमा नदीच्या कोरेगाव येथे युध्द झाले. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार इंग्रजांच्या बाजूने लढले. केवळ ५०० महार सैनिकांनी हिमतीने लढून  पेशव्याच्या फौजेचा दणदणीत पराभव केला. या लढाईत २२ शूर महार सैनिक ठार झाले. याच सैनिकांची नावे पुणे जवळील कोरेगाव येथे उभारलेल्या विजयस्तंभावर कोरलेली आहेत. उरलेल्या पेशव्यांच्या सैनिकांचा महार सैनिकानी सोलापूर व आष्टीच्या लढाईत पुन्हा धुव्वा उडविला व संपूर्ण पेशवाई संपुष्टात आणून आजपर्यंत अस्पृश्य समाजावर पेशव्यांनी केलेल्या संपूर्ण अन्यायाचा बदला घेतला. अशा या महार शूरवीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी डाक्टर बाबासाहेब नेहमी १ जानेवारीस भीमा कोरेगावला जात असत.

पेशव्यांची सत्ता लयास गेली व ती इंग्रजांच्या हातात आली. इथूनच अस्पृश्य समाजाच्या विकासाचे दरवाजे उघडत गेले. एका अर्थाने ब्रिटीश भारत ही अस्पृश्यांसाठी संजीवनी होती. भारत स्वतंत्र झाला परंतु आजही उच्चवर्णीयांच्या मानसिकतेत फारसा बदल घडल्याचे दिसत नाही. केवळ कायद्याने अस्पृश्यता गेली परंतु सवर्णाच्या मनातील अस्पृश्यता नष्ट करता आली नाही. आजही देशाच्या काही भागात दलितांना मंदिर प्रवेश नाकारण्यात येतो. दलित स्त्रियांना आपली मालमत्ता समजून त्यांचे शारीरिक शोषण करण्यात येते. दक्षिणेत दलितांना चहा पिण्यासाठी  वेगळा कप ठेवण्यात येतो. सवर्णाच्या वस्तीतून जाताना चप्पल हातात घेऊन अनवाणी चालावे लागते. अस्पृश्यांच्या नवरदेवास घोड्यावर बसण्यास बंदी केली जाते. दलितांवरील सामुहिक बहिष्काराच्या बातम्या तर रोजच येत असतात.
महारांचा एवढा दैदिप्तमान व जाजवल्य इतिहास आणि अशा शूरवीरांचे आम्ही वंशज आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो. असे असूनसुद्धा खरेच आम्ही आमच्या वंशजांच्या लायकीचे आहोत काय?. असे प्रश्न निर्माण होतात. आम्ही इतिहास सांगतो पण वर्तमानकाळात नव्या इतिहासाची निर्मिती करू शकत नाही हे एक मोठे दुर्दव्य आहे. केवळ दुस-याच्या अनुदानावर व दयेवर आम्ही आमच्या चळवळी उभ्या करीत आहोत. अशा चळवळीचे अस्तित्व हे क्षणभंगुर असते. केवळ दुस-यांना मोठे करण्यात व त्यांचे चाकर बनून राहण्यातच आजच्या अस्पृश्यांना धन्यता वाटत असेल तर आम्ही शूरवीरांचे वशंज आहोत या म्हणण्यात तरी काय हाशील?. केवळ देखाव्यासाठी भीमा कोरेगावला जाऊन माथा टेकत असू व त्यातून काहीही शिकत नसू तर हा आमच्या वंशजानी निर्माण केलेल्या आकांक्षाचा पराभवच नाही का?. ज्या बाबासाहेबांनी भिमाकोरेगाच्या विजयस्थंभाला वंदन करीत इतिहास निर्माण केला त्या बाबासाहेबांच्या विचाराचा वापर दुधारी तलवारीसारखा करीत आजच्या सत्तास्थानांची प्रतीके असलेल्या ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत घुमणारे बुलंद असे स्वाभिमानी आवाज निर्माण झाले पाहिजे. असे झाले तरच आमच्या महापुरुषांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू शकू.
------------------------------------लेखक: बापू राऊत


4 comments:

  1. बापु राउत साहेब जयभिम आपल्या ब्लॉग ला भेट दिली खुप अभ्यासपूर्ण लेख आहेत हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  2. विश्वास जावळेJuly 27, 2015 at 4:23 AM

    राउत जी आपला लेख खरच आवडला पण शिवाजी महाराजांविषयी जे अक्षेप आहेत त्यांचे काही ऐतिहासिक पुरावे उप्लब्ध आहेत का

    ReplyDelete
  3. vadapav khanar ka

    ReplyDelete