देशात व विशेषत:
महाराष्ट्रात शिवाजी महाराजानंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी राहिली
असेल तर ती म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजे “राजश्री शाहू महाराज” होत. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या कार्यामध्ये काही मुलभूत फरक
दिसतात. ब्राम्हणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राम्हणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड
तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची
कर्तव्यकठोरता तपासली तर शाहू महाराज हे शिवाजी महाराजापेक्षा उजवे ठरताना दिसतात.
आदिल व निजामशाही बरोबरच मोगलसाम्राटाकडून राज्य हिसकावून घेणे व ते टिकवून ठेवणे
या संघर्षात शिवाजी महाराजांचा
अधिक काळ व्यतीत झाला. शिवराज्यभिषेक संदर्भात
ब्राम्हणांनी निर्माण केलेले संकट व ह्या संकटावर मात करण्यासाठी महाराजांची
कर्तव्यकठोरता तुटपुंजी पडल्याचे दिसते. ब्राम्हण व ते राबवत असलेली धर्म साहिन्ता
यावर आघात करणे शिवाजी महाराजांना जमले नाही. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मात्र
यात कसलीही कसर बाकी ठेवलेली दिसत नाही. शिवाजी महाराजांनी मोगलाकडून झालेल्या
अपमानाचा समाचार घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्वकीयप्रवृत्तीकडून झालेला
अपमान त्यांनी धर्म सहितेच्या नावाखाली पचवून टाकला. त्यामुळेच धार्मिक व सामाजिक
सुधारणाचे कोणतेही श्रेय शिवाजी महाराजांना देता येत नाही. अस्पृश्यता व जातिभेद
निवारणाचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कोणताही डाग लागू नये
म्हणून पुरोगामी व फुले आंबेडकरवादी लेखक एक बाजू नेहमी झाकून ठेवतात नव्हे तर ते झाकण्याची
पुरेपूर काळजी घेतात. तरीही शिवाजी महाराजांच्या शून्यातून निर्माण केलेल्या
राष्ट्रनिर्माणापुढे ते सारे फिके पडते.
कोणताही इतिहास
पुरुष हा परिपूर्ण नसतो परंतु त्या इतिहास पुरुषाचे राहिलेले अपूर्ण कार्य पुढे
नेण्यासाठी पुढे कोणीतरी प्रासंगिक परिस्थितून निर्माण होत असतो. शिवाजी
महाराजानंतर त्यांचे अनेक वारसदार सत्तेवर आले. त्यांच्या अनेक वारसदारांना
ब्राम्हणी धर्माचे चटके व अपमान सहन करावे लागले होते. परंतु त्यापैकी कोणीही
प्रस्थापित धर्म व सांस्कृतिक व्यवस्थेविरुध्द बंड करू शकले नाही. अशा परिस्थितीवर
मात करण्यासाठी सन्मानजनक जीवन जगण्याच्या विचारधारेची गरज असावी लागते. कोल्हापूर
संस्थानाची राज्यवस्त्रे धारण करण्यापूर्वी व नंतरही शाहू महाराजांचे मन हे
सन्मानाने जीवन जगण्याच्या विचाराने मोहित झाले असावे. पाश्चिमात्य विचारवंत,
आर्यसमाजी विचार व म. फुलेंच्या सत्यशोधकी विचाराचा पगडा हा महाराजावर असावा आणि
त्यामुळेच त्यांचे मन धर्माच्या नावावर अधार्मिक कृत्ये व सामाजिक विषमता याविरुद्ध
बंड करण्यास प्रवृत्त झाले.
शाहू महाराजांच्या जीवन
कार्यातील महत्वाचे प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण (१८९९) होय. कोल्हापुरातील
ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हणत त्यांचा वेदमंत्राचा
अधिकार नाकारला होता. शूद्रांना पुराणोक्त पद्धतीचा अनुग्रह असल्यामुळे मला स्नान
करण्याचीही गरज नाही अशी दर्पोक्ती ब्राम्हण पूजा-याने महाराजावर मारली. आपल्या
तुकड्यावर जगणा-या भटाने आपणास शुद्र म्हणावे हे महाराजाच्या फार जिव्हारी लागले
होते. त्यामुळे वेदोक्त पद्धतीनेच मंत्रोपचार करण्यास ते अडून बसले होते. वेदोक्त प्रकरणात महाराज वाकत नाही असे दिसताच ब्राम्हणांनी आपल्या भात्यातील शेवटचे मंत्रतंत्राचे अस्त्र बाहेर काढले. “ देवाच्या स्वाधीन सर्व जग आहे व देव हे मंत्राच्या अधीन आहेत तर मंत्र हे ब्राम्हणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राम्हण हे माझे दैवतच आहे असे दस्तरखुद्द परमेश्वरच बोलून गेला. ब्राम्हणांचे शाप भयंकर असतात. त्यांच्या शापाने राज्ये नष्ट होतात”. असा प्रचार ते करू लागले. यावरही महाराज आपल्या हट्टास कायम आहेत असे दिसताच त्यांना भिवविण्यासाठी ब्राम्हण हे रक्ताने माखलेल्या हाताची बोटे त्यांच्या घराच्या भिंतीवर उमटवीत असत. ब्राम्हणांच्या या क्लुप्तीवर महाराज म्हणत, मरणाची कोणतीही आपत्ती माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आली तरी मी डगमगणार नाही. परंतु असी आपत्ती आम्हा कोणावरही आली तर हा आमच्या शापाचा परिणाम आहे असे सांगण्यास ब्राम्हण मोकळे होतील व परत त्यांना लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेण्याची संधी मिळेल. ब्राम्हणाला हि संधी मिळू नये व ब्राम्हणांचे वर्चस्व नष्ट होईपर्यंत असे प्रसंग आपल्या कुटुंबावर येवू नयेत असे महाराजांना वाटत असे.
ब्राम्हणांना त्यांची खरी जागा
दाखवून देण्यासाठी महाराजांनी आपली पावले उचलन्यास सुरुवात केली. प्रथम वेदोक्ताचा
अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने त्यांनी जप्त केली.
कुलकर्णी-वतन बरखास्तीचा कायदा केला. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह
देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री
शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू'
पद
निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). शाहू
महाराजाने हि ब्राम्हणी व्यवस्थेला दिलेली चपराक होती.
शाहु महाराजांची दृष्टी ब्राम्हन्य
व ब्राम्हनावादाला शरण जाणा-या शिवाजी महाराजाच्या दृष्टीहून फार भिन्न होती. शाहू
महाराज हे जाणते व दूरदृष्टी असलेले राजे होते. भटाब्राम्हनाच्या विचाराने व
त्यांचा सल्ला घेवून आपल्या राज्याचे धोरण त्यांनी कधीही आखले नव्हते. ब्राम्हणशाहीच्या
जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय ब्राम्हणांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही अशी शाहू
महाराजांची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे
आकृष्ट झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे
पुनरुज्जीवन झाले. सत्यशोधक जलशांना पाठिंबा देवून त्यांनी
ब्राम्हनेत्तर चळवळीची धार अधिक मजबूत केली होती.
शाहू महाजारांची शिक्षणविषयक धारणा
आजच्या राज्यकार्त्याहूनही भिन्न होती. आजचे राज्यकर्ते बहुजन समाजाबद्दलचा केवळ
पुळका दाखवितात परंतु त्यांचे प्रत्यक्ष धोरण हे बहुजन समाज विरोधी व भांडवली
धार्जिणे असते. महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षणावर अधिक भर दिला
होता. बहुजन समाज शिकला तरच त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होतील. म्हणून
त्यांनी आपल्या राज्यात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांनी प्रत्येक
खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी
मिळाव्यात म्हणून कोल्हापुरात सर्व जाती धर्माच्या विध्यार्थ्यासाठी वसतिगृहे
बांधली.
कोल्हापूर
संस्थानात सर्व मागास समाजाला नोक-यामध्ये प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाराजांनी
पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय २६ जुलै १९०२ रोजी घेतला होता.
ब्राम्हणांनी ब्राम्हनेतरांच्या या राखीव जागास विरोध केला परंतु महाराजापुढे
त्यांचे काहीही चालले नाही. आरक्षणास विरोध कारणा-या ब्राम्हनाना महाराज घोड्याच्या
पागेत घेवून गेले. त्या पागेत शरीरयष्टीने धष्टपुष्ट व दणकट तसेच रोडावलेले अशक्त
असे दोन प्रकारचे घोडे होते. त्या सर्व घोड्यांना खाण्यासाठी त्यांनी खाद्य ठेवले.
ते खाद्य खाण्यासाठी सर्व घोड्यांना मोकळे सोडण्यात आले. धष्टपुष्ट व दणकट असणा-या
घोड्यांनी ते खाद्य खावून फस्त केले. अशक्त घोड्यास त्यांनी आपल्या आसपासही येवू
दिले नाही. त्यामुळे अशक्त घोडे केवळ खाद्याकडे बघत राहिले. कारण त्यांच्यात धष्टपुष्ट
घोड्यासी मुकाबला करण्यात ताकद नव्हती. या प्रसंगातून महाराजांनी मागासवर्ग
समाजाला आरक्षणाची गरज का आहे? हे ब्राम्हणांना दाखवून देवून त्यांचा विरोध कायमचा
बंद केला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू महाराज हे भारतातील पहिले
राज्यकर्ते ठरले. या आरक्षणाला जेव्हा शंभर वर्षे पूर्ण झालीत तेव्हा आरक्षण
शताब्धी साजरी करण्याची उमज भारतातील कोणत्याही शासन कर्त्याला आली नाही. परंतु
मान्यवर काशिरामजीने उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या हस्ते
महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात “आरक्षण शताब्धी” सोहळा साजरा केला.
शाहू
महाराजांच्या काळातच कोल्हापूर संस्थानाला अधिक महत्व प्राप्त झाले. त्यांच्या
प्रागतिक सामाजिक कार्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘राजर्षि’ ही पदवी बहाल केली. कोल्हापूर
संस्थानातील अस्पृश्यांची त्यांनी माणगाव येथे परिषद घेतली होती. स्पृश्य-अस्पृश्यांच्या
सहभोजनांचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले होते. नागपूर येथे मे १९२० मध्ये छत्रपती
शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. याच
परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत या महर्षी शिंद्यांच्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ च्या धोरणाचा निषेध केला होता. डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा व्यक्ती अस्पृश्य वर्गास मिळाला याचा आनंद
शाहू महाराजांना होता. माणगाव येथे झालेल्या “अस्पृश्यता निवारण” परिषदेमध्ये बाबासाहेबांकडे
बघत आता कुठे अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाला असे
गौरवोदगार काढले. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्चशिक्षणास शाहू महाराजांनी सर्वोपरी
मदत केली होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
विचाराचा खरा वारसा शाहू महाराजांनी चालविला. म.फुलेंच्या विचारांनी भारावलेल्या
महाराजांनी भारताच्या भूमीवर सामाजिक व सांस्कृतिक क्रांती करून देशासमोर नवा
आदर्श निर्माण केला. त्यांनी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित न करता स्वत: त्याची
अंमलबजावणी केली. त्यांनी कोल्हापूर संस्थानातील शाळा,
पाणवठे,
विहिरी,
दवाखाने,
कचेऱ्या या
ठिकाणी जातीभेद पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला. अस्पृश्यांसाठी राजवाडा खुला
केला. एका अस्पृशास उपहारगृह काढून देवून त्या उपहारगृहात ते स्वत: चहा पिण्यासाठी
जात असत. स्वत:चे मोटारचालक म्हणून त्यांनी एका अस्पृशाची नेमणूक केली होती. दत्तोबा पवार या अस्पृशाची कोल्हापूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. महारवतनाच्या
गुलामीतून मुक्तता करीत त्यांनी १९१८ साली महारांची बलुतेदारी बंद करून जमिनी
त्यांच्या नावावर करून दिल्या आणि
गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. महाराजांनी जोगिणी व
देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा १९२० साली जारी केला. स्वातंत्र्याच्या ६६
वर्षानंतरही फासेपारधी, माकडवाले, डोंबारी व भटक्या जमातीतील लोकांच्या जीवनमानात
फारसा फरक पडलेला दिसत नाही. जीवन जगण्यासाठी त्यांना गावोगाव फिरावे लागत असते.
त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांना स्थिर होण्यासाठी खाली शेतजमिनी देण्याचे आताच्या राज्यकर्त्यांना सुचत नाही
परंतु हेच काम शाहू महाराजांनी १९१८ साली केले. त्यांना केवळ जमिनी देवून स्थिर
केले नाही तर काहीना त्यांनी आपले अंगरक्षकही नेमले. आजचे राज्यकर्ते हे शाहू महाराजाचे
जीवन चरित्र व त्यांचे लोकोपयोगी कार्याचे सिहावलोकन करीत नाहीत तर ते धर्म व
कुटील निंदेच्या आहारी जावून केवळ सत्तेमध्ये गुरफुटलेले दिसतात. त्यामुळे असे
शासनकर्ते कधी येतात व जातात याचे स्मरणही जनता ठेवीत नसते.
शाहू महाराज हे केवळ
अस्पृश्योद्वार व सामाजिक सुधारणा तसेच ब्राम्हणवादविवाद यातच
अडकून बसले नव्हते. त्यांनी आपल्या युरोपियन प्रवासात युरोपचा जो विकास बघितला तसा
विकास आपल्या राज्यात करण्याचे त्यांचे ध्येय होते. अर्थात त्यांना ब्रीटीशाकडून
काही बंधने होती. तरीही त्यांनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन देत अनेक कृषी
व औद्योगिक विकासाला चालना दिली. त्यांनी आपल्या संस्थानात चहा,
कॉफी,
रबर यांच्या
लागवडींचे प्रयोग केले. कृषीमालासाठी शाहूपुरी सारखी मोठी बाजारपेठ वसविली. कोल्हापूर
ही तर गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. संस्थानात कारखानदारीचा
पाया रचत ‘शाहू मिल' ची स्थापना करून वस्त्रोद्योगास चालना दिली. त्यांचे
राधानगरीचे धरण म्हणजे कृषी क्षेत्राला मिळालेली मोठी संजीवनी होती.
महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे श्रेय
महाराजाकडेच जाते. शाहूंनी संगीत,
नाट्य,
चित्रकला,
मल्लविद्या
आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली.
संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर बांधले
होते. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी'
बनली
होती.
ख-या अर्थाने शाहू महाराज हे
रयतेचे राजे होते. जनतेच्या सुखदुखासी ते समरस होत. वेदकाळापासून स्त्री हा शोषणाचा
विषय होता. तिचा संपत्ती वाटपात सहभाग नसे. महाराजाना स्त्रियांवरील अन्यायाच्या कैफियतिची जाणीव
होती. म्हणून त्यांनी घटस्फोट व विधवापुनर्विवाहास व कुटुंबात होणा-या
शारीरिक व मानसिक छळांपासून संरक्षण देणारा कायदा (१९१९) केला. महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह घडवून
आणले तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला.
शाहू महाराज यांचे केवळ अठ्ठेचाळीसाव्या
वर्षी निर्वाण झाले. ते अधिक काळ जगले असते तर देशाच्या सामाजिक
व सांस्कृतिक बदलाबरोबरच आर्थिक बदल झालेले देशाला पहावयास मिळाले असते. रयतेच्या
या राजाला लोक प्रेमाने ‘राजर्षी' म्हणत असत.
महाराजांना हि पदवी कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने बहाल केली होती. महाराज हे अखेरच्या
क्षणापर्यंत सत्यशोधक होते. त्यांच्या या महान कार्याची पावती म्हणून बहुजन समाज
त्यांच्या मरणोपरांत दशकोनदशके व शतकानुशतके त्यांना वंदन करीत राहतील यात शंकाच
नाही.
बापू राऊत
tumhala koni pratikriya det nahit ,yatach surwa ale.
ReplyDelete