महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकानंतर केवळ महाराष्ट्रातील
जनतेचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे होते. महाराष्ट्राच्या
विधानसभेचे निकाल हाती येवू लागताच व या निकालात आपल्या हातामध्ये काहीच लागणार
नाही याची जाणीव होताच चाणाक्ष शरद पवाराने आपली राजकीय खेळी खेळत भाजपाने पाठिंबा
न मागताच व काहीही अटी न लावताच बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा शरद पवारांचा
धूर्तपणा केवळ आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना वाचविण्याचा केविलवाणा केलेला
प्रयत्न होता. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या एकूण जागा बघता व
निवडणूकपूर्व
परिस्थिती लक्षात घेता निवडणूक निकालानंतरच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षात बसण्याची
घोषणा करायला पाहिजे होती. असे झाले असते तर भाजपाला तुमच्याकडे मदतीची याचना करत
यावे लागले असते.
जसजसा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय कुटनितीचा संपूर्ण
अभाव दिसू लागला तसतसा भाजपाच्या नेत्यांनी गुगली टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेवटपर्यंत
भाजापा नेत्यांनी झुलत ठेवले. या तू-तू मै-मै च्या खेळात भाजपा यशस्वी झाली परंतु
यात उद्धव ठाकरे व शिवसेनेचा पूर्णत: भाजीपाला झाला. बाळ ठाकरेच्या व्यक्तिमत्वाला
साजेल असा वारसा मिळाला नाही असे लोकही कुजबुजू लागले. केविलवाण्या परिस्थितीत
उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांच्या दिल्लीवारी करीत राहिले. दिल्लीत पोहोचल्यावर
शिवसेनेच्या नेत्यांना भाजपाचा कोणताही नेता भेट देत नव्हता. तसे शिवसेनेचे नेते
माघारी मुंबईमध्ये परत येत होते. हा सारा तमाशा महाराष्ट्रातील मराठी माणूस पहात
होता. हे सारे कशासाठी होत होते?. सत्तेची हाव, सत्तेची मदलालसा व सत्तेतून
मिळणारा अतोनात पैसा यासाठी हा सगळा खेळ होता. हे एव्हाना लोकांनाही कळून चुकले
होते. म्हणून शिवसेना व त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर विनोद व चुटकुल्यांचा वर्षाव
होत होता. सत्तेसाठीच्या या बावळटपणामुळे उद्धव ठाकरे यांचा राजकीय कमकुवतपणा मात्र
उघड झाला हे निश्चित.
सामान्य शिवसैनिकांना नेत्यांच्या अशा बावळटपणाची सवय
नव्हती. कारण आजपर्यंतचा त्यांचा नेता असलेला बाळासाहेब ठाकरे हा कोणाला शरण
जाणारा नेता नव्हता. बाळासाहेब ठाकरे खंबीर नेते होते (बाळासाहेब ठाकरेचे विचार
पटत नसले तरी). एकदा त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला कि तो त्यांचा शेवटचा
शब्द असायचा व त्यानंतर होणा-या परिणामाची ते पर्वा करीत नसत. हा ठाकरीबाणा उद्धव
ठाकरेंना जपता आला नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा व संघ यांना देशातील प्रादेशिक
पक्ष संपवायचे असून देशात द्विदल पध्दती म्हणजे देशात दोनच राष्ट्रीय पक्ष ठेवायचे
आहे. त्या दिशेने वाटचाल चालू असून कांग्रेसलाही ते हवेच आहे. असे झाले तर या
देशाची सत्ता हि नेहमी आलटून पालटून उच्च वर्णीय ब्राम्हण व भांडवलदार बनियाकडेच राहील.
हे दोन्ही पक्ष बहुजन समाजात आपले दलाल व पिट्टू तयार करतील व त्यांच्याद्वारे
बहुजन समाजाला काबूत ठेवतील. येणा-या काळात हे अधिक स्पष्ट होईल.
बाळ ठाकरे नंतर शिवसेना संपेल असे म्हणणारे विचारवंत शरद
पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी पक्ष जमीनदोस्त होईल असे भाकीत करणार नाहीत. कारण
जातीवादी राजकारणात मराठ्यांचा पक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रात तरी त्याचे
अस्तित्व कायम असेल. आता उद्धव ठाकरेंची खरी कसरत आहे ती मुंबईच्या महापालिकेवर
शिवसेनाचा झेंडा कायम ठेवण्याची. विधानसभेचा निकाल बघता शिवसेनेला ते शक्य होणार
नाही असेच चित्र दिसते. आजपर्यंत शिवसेनेला मिळणारी गुजराती, मारवाडी व उत्तर
भारतीय मते हि भाजपकडे वळतील. त्यातच मराठी मते हि मनसे, शिवसेना व राष्ट्रवादी अशा
सर्व पक्षात विभाजित होतील. त्यामुळे भाजपाचा भगवा जय श्रीरामाच्या घोषणेत मुंबई
महापालिकेवर फडकण्याची अधिक शक्यता आहे. अशा परिस्थिती मध्ये उध्दव ठाकरे यांची
परत कसोटी लागणार आहे. कारण भाजप हा पक्ष कोणाशीही युती करणार नाही व स्वतंत्रपणे
लढेल व त्यासाठी ते कामालाही लागलेले दिसतात.
आज राजकीय सत्तेशिवाय कोणीही जगू शकू नाही कारण
राजकीय सत्ता हि आजची महाशक्ती झाली आहे. राजकीय विचारधारेची सगळ्यांनीच ऐसितैसी
केली आहे. कांग्रेसकडे कोणतीच अशी विचारधारा नाही. त्यांच्या राज्यात जशी तालिबानी
हिंदू धर्मांधता वाढली व संघाच्या कार्याला आश्रय मिळतो तसाच ते मुस्लीम मुलतत्ववादाला अभय देतात. कांग्रेसवाले फुले
आंबेडकराचे नाव घेतात परंतु त्यांची कृती हि या महापुरुषांच्या विचाराविरोधीच
असते. दलित जनतेच्या अज्ञानाचा व त्यांच्या भावभावनेचा जसा दलित नेते व संघटना
गैरफायदा घेतात तसाच फायदा आता इतर सर्व पक्ष घ्यायला लागले आहेत.
ओबीसींची शिवसेनेने आतापर्यंत फसवणूकच केली. मंडल
आयोग अंमलबजावणी व जातीगत जनगणना ह्या ओबीसीच्या मुख्य मागण्या होत्या. जनगणनेच्या
आधारावरच मंडलची टक्केवारी ठरायची होती. ओबीसीच्या ग्राह्य मागण्यांचा त्यांनी कधी
विचारच केला नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेने ओबीसीची पूर्णत: फसवणूक केली.
उद्धव ठाकरे हे ओबीसींच्या मागण्याची आतातरी दख्खल घेतील कि नाही? कि नवा मुद्दा
शोधून परत ओबीसींची फरफड करतील हे येणारा काळच सांगेल. लेख संपविताना एका मुद्याची
दखल घेणे फार गरजेचे आहे, तो म्हणजे या देशात साधू, संत-समागम व सत्संग, मंदिरे यांचा
झालेला सुळसुळाट. या साधू संतांनीच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून देण्यात
सिहाचा वाटा घेतला आहे. रामदेव, आसाराम, श्री श्री रविशंकर, रामपाल, डेरा सच्चा
सौदा, नरेंद्र महाराज अशा अनेक साधूंचे करोडो भक्त या देशात विखुरले आहेत. या
साधूंच्या आदेशाबाहेर हे भक्त कधीच जात नाहीत. हे साधू ज्याला पाठिंबा देतील ते या
देशात सत्ताधारी होतील. संत व सत्संग हि संघाची निर्मिती आहे. त्यामुळे लोकशाहीला
नवा धोका निर्माण झाला आहे. दुसरा धोका हा मिडिया ( वर्तमानपत्रे व टीव्ही) कडून
आहे. निवडणुका ह्या मीडियासाठी पैसा कमाविण्याचा धंदा झाला आहे. खोटी माहिती
सांगण्यात व सत्य लपविण्यात हा मिडिया तरबेज झाला आहे. मीडियाची नैतिकता लयाला
गेली असून तो भांडवलवादी व संघवादी झाला आहे. त्यामुळे तो आता लोकशाहीचा चौथा खांब
राहिला नाही याची दखल घेणे गरजेचे आहे.
लेख संपविताना ब्रेकिंग न्यूज आली, महाराष्ट्राच्या
विधानसभेत भाजपाने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. नाईलाजास्त्व शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून बसावे लागत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत भाजापाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेनी केला. मोडेन
पण वाकणार नाही, अफझल खानाला व त्याच्या फौजेला धडा शिकवूच अशा वल्गना करणा-या
उद्धव ठाकरेचे आज पूर्णत: हसू झाले. त्यामुळेच म्हणावेसे वाटते उध्दव ठाकरे तुम्ही
चुकलातच !
बापू राऊत
९२२४३४३४६४