Sunday, September 8, 2024

टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?


 भारत हा देव व धर्माचा देश आहे, भारतात ३२ कोटी देव असल्याचा दावा काही दैववादी लोक करीत असतात. त्यासाठी वैदिक साहित्याचे दाखले देण्यात येतात. ज्या काळात या देशाची एकूण लोकसंख्या ३२ कोटी नव्हती, त्या काळात येथे ३२ कोटी देव वावरत होते. तरीही भारत गुलामीच्या व आक्रमणकर्त्यांच्या छायेत वावरत होता. जनतेने आपले रक्त सांडवून आक्रमणकर्त्यांना हरवून त्यांना पळवून लावले. त्यावेळेस देव काय करीत होते ? त्यांचे कार्य काय, केवळ मंदिरात निर्जीव पडून राहण्याचे होते? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. यातून दुसरा एक प्रश्न निर्माण  होतो, तो म्हणजे देवाची निर्मिती  चतुर लोकांनी आपल्या फायद्यासाठी केली तर नाही ना !  देशात असलेली विषमता, मंदिरात होणाऱ्या चोऱ्या, मंदिरात पुजार्याकडून होत असलेले बलात्कार, त्यांच्याकडून होणारी भक्तांची फसवणूक,  देवांच्या कार्यक्रमात होणारी चेंगराचेंगरी व मृत्यू, मंदिरात पूजा केल्यानानंतर प्रवासात होणारे अपघात. हे सारे बघितले कि, एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होते, ते म्हणजे देव व मंदिर नावाचा बागुलबुवा हा  षडयंत्रकारी, चतुर, भीती दाखविणारी  टोळी व स्वत:ला सर्वश्रेष्ठ बनविण्याचा कार्यकलाप करणाऱ्या स्वार्थी चरांनी उभा केल्याचे स्पष्ट सिद्ध होते. आजतागायत हे स्वार्थी गौडबंगाल सुरूच असून अनेकजन त्यास बळी जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे “ जे लोक बळी पडत आहेत, ते याबाबत तसूभरही  विचार करण्यास तयार नाहीत”. त्यामुळे फसवेगिरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

असो, भारतात पूर्वी कधीही सार्वजनिक स्वरूपात साजरा न होणाऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात कधी, कशी व कोणी केली यावर चर्चा होत असतेच. त्या सबंधातीलच आजचा हा विषय. भारतात हिंदू मुसलमान सलोख्यास १८९० पासून बाधा येवू लागली होती. पेशव्यांचे हैदर अली व टिपू सुलतान यांचेसोबत राजकीय दृष्ट्या  सलोख्याचे सबंध नसले तरी मोगलासोबत मित्रत्वाचे सबंध होते.  मात्र ब्रिटीश काळात गोरक्षणावरून काही ठिकाणी झालेल्या धार्मिक दंग्यामुळे हिंदू-मुसलमान एकतेस बाधा पोहोचू लागली होती. भारतात नोंद घेण्यासारखा पहिला हिंदू - मुसलमान दंगा १८९० मध्ये बेळगाव येथे तर दूसरा सन १८९१-९२ ला गुजरातेतील सौराष्ट्रात झाला होता. ऑगस्ट १८९३ मध्ये मुंबईत हिंदू-मुस्लिम समाजाच्या वैमन्यस्वाचा स्फोट झाला. या दंग्याचे दोन्ही समाजावर खोलवर दुष्परिणाम झाले. या दंग्यातूनच टिळकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना साकारली आणि पुण्यात त्यांनी  १८९३ साली पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. हिंदू मुस्लीम दंग्यासाबंधी जाहीर सभा भरविण्याची बैठक पुणे येथे बाबा महाराजाच्या वाड्यात भरविण्यात आली होती. या बैठकीत नामजोशी सोबत झालेल्या चर्चेत गणेश उत्सव विशिष्ट प्रकारच्या सामुदायिक रीतीने साजरा करण्याची, विसर्जनाची आणि सार्वजनिक मिरवणुकीची कल्पना बाळ गंगाधर टिळकांची होती. त्यांची हि क्लुप्ती किती अद्वितीय होती हे आजच्या गणपती उत्सवाचे स्वरूप बघितल्यास लक्षात  येते. म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सवाचे उगमस्थान हे मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंग्याकडे तर त्याचे जनकत्व टिळकांकडे जाते. गणेशोत्सवावरील सुधारकांच्या प्रश्नाना नजरेआड करण्यासाठी त्यांनी एक नवी शक्कल लढवित हा सण नवा नसून जुनाच असल्याचे सांगू लागले. केसरीमध्ये लेख लिहून पेशवे व दुसर्‍या संस्थानाचे दाखले नमूद करू लागले. सत्य झाकण्यासाठी असे कितीतरी खटाटोप टिळकांना करावे लागत. शाहू महाराजाच्या मते गणेशोत्सव हि मोहर्रमची नवी हिंदू आवृत्ती होती. गणेशोत्सवाच्या विरोधात जे सभ्य नागरिक टिळकांकडे तक्रार करीत त्यांनाच तुम्ही उत्सवाच्या वाटेला जाऊ नये असे बजावीत असत. या उत्सवामुळे दोन धर्मात तेढ निर्माण झाल्याचे अनेक दाखले मिळतात.

सत्यशोधक व सुधारक विचारांचे लोक अशा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विरोधात होते. कारण या उत्सवात समाजसुधारकांची टिंगलटवाळी व निंदानालस्ती करण्यात येत असे. टिळकांच्या विरोधकांचा उपहास केला जाई. या उत्सवातील दोष टिळकांनाही माहित होते पण जहाल समर्थकांना टोकण्याची त्यांना हिंमत होत नव्हती. जे लोक नव्याने गणेशोत्सव साजरा करीत त्यांना नवे भूषण वाटत असे. नंतरच्या काळात टिळकसमर्थक बुद्धिवाद्यांनी नवीन मिथक तयार केले. ते मिथक होते, “गणेशोत्सवाची स्थापना ही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटीशांच्या विरोधात लोकजागृती निर्माण करण्यासाठी करण्यात आली हे होय.” या मिथकांचा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणाप्रचार व प्रसार करण्यात आला. वास्तविकता गणेशोत्सवाची सुरुवात व स्वातंत्र्य चळवळ याचा काहीही सबंध नसून समाजसुधारकांवर मात देण्यासाठी टिळकांना गवसलेल्या नव्या प्रभावी हत्याराचा तो एक आविष्कार होता. नंतरच्या काळात या हत्याराचा टिळकांनी आपल्या विरोधकांना चित करण्यासाठी खुबीने वापर केला. गणेश उत्सवामुळे टिळकांचे कार्यक्षेत्र विस्तारले.  गणेशोत्सवाची लोकप्रियता हि बहुतांश ब्राह्मण समाजापर्यतच मर्यादित असल्याचे शल्य टिळकांना होते. ज्योतीराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव हा शहरी व ग्रामीण भागात पसरल्यामुळे ब्राह्मणेत्तर समाजाने गणेशोत्सवाकडे पूर्ण पाठ फिरविली होती. गणेशोत्सवातून आपला राजकीय हेतू सिद्ध होत नसल्याचे पाहून शि. म. परांजपे यांच्या सूचनेवरून १८९५ साली टिळकांनी रायगडावरील शिवरायाच्या समाधीचा जिर्णोद्वार करण्याची मोहीम हाती घेतली. परंतु टिळकांनी सुरु केलेल्या त्याच गणपती उत्सवाला आज मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. टिळकांनी सुरु केलेला हा  उत्सव त्यांच्या शिष्यगणांनी सातत्याने जोपासत तो वाढविला परंतु ज्योतीराव फुले व शाहू महाराजांनी रुजविलेली सत्यशोधकी चळवळ त्यांच्या शिष्यांना (ओबीसी व मराठा बुध्दिवंताना व नेत्यांना) वाढवायची सोडाच, ती त्यांना टिकवता आली नाही. त्यामुळे टिळकांच्या विचारांनी म.फुले –शाहूंच्या विचारावर मात केली असे म्हणता येते. परंतु हा पराभव म.फुले –शाहूंच्या विचारांचा नसून त्यांना आदर्श  मानणाऱ्या ओबीसी व मराठा बुध्दिवंत व नेत्यांचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. 

1 comment:

  1. बरोबर आहे. गणपती उत्सव मोहरम मध्ये बहुतांश लोक सहभाग होत त्याचा राग टिळकाला होता

    ReplyDelete