Thursday, May 5, 2016

"सैराट" च्या निमित्ताने

वेगवेगळ्या माध्यमात “सैराट” बद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे नागराज मंजुळेकृत “सैराट” लवकरात लवकर बघितलाच पाहिजे असे झाले होते. खरे तर नागराज मंजुळेने “सैराट”च्या माध्यमातून समाजातील ‘वास्तव चित्र’ रेखाटले आहे. देशाच्या ग्रामीण भागात जातीय मानसिकता कशी कार्यरत आहे हे वास्तव समोर तर येतेच पण त्याही पेक्षा ग्रामीण भागातील ‘आर्थिक विषमतेचे’ भयानक चित्र उभे राहते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या जातीय घटनांचा अनुबंध असल्याची अनुभूती सैराटचे कथानक बघितल्यानंतर येते.
नातेसंबंध प्रस्थापित करताना आर्थिक सज्जडता व एकमेकांचा समाजातील मानमरातब बघितला जातो. राजकारणी असेल तर ते आपली मुलगी एखाद्या प्रस्थापित राजकारण्याच्या मुलाला किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकार्याना देतील. हा आजच्या लग्नबाजारात घडत असलेला पारंपारिक व्यवहार आहे. परंतु प्रेम म्हटले कि प्रेमाला जात, धर्म व पैशाला काहीही अर्थ उरत नसते. कारण ते एक  निखळ प्रेम असते. प्रोंगडावस्थेत झालेले प्रेम म्हणजे अजाणता व आकर्षण हा त्याचा केंद्रबिंदू असला तरी प्रेमिकांच्या मनाच्या कप्प्यात जीवाभावाचे व घनिष्टतेचे नाते प्रस्थापित झालेले असते. हे नाते अतूट असते. प्रेमात अडचणी व दुजाभाव निर्माण झाला तरी त्यावर उत्तर मिळत असते. दोघांच्याही सहमतीने आर्थिक चनचणीचे कोडे सुटून संसाराचा गाडा स्थिरावत असतो. सैराट मधील दुसऱ्या भागात याचा प्रत्यय येतो.
आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांना अभिनयाचा कोणताही वारसा नसतानाही त्यांनी आपल्या अप्रतिम भूमिका साकार केल्या आहेत. रिंकू राजगुरू हिची देहबोली व शरीरयष्टी आणि तिने साकार केलेला अभिनय बघितल्यावर हि नववीत शिकणारी मुलगी असावी यावर विश्वासच बसत नाही. तर ती प्रस्थापित हिरोईनना टक्कर देवू शकणारी एक मुरलेली कलाकार वाटते. सैराटमधील तिचे हावभाव  मनाला भावून जातात. आकाश ठोसर हा महाराष्ट्राला मिळालेला एक उदयोन्मुख कलाकार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक व युवतीमध्ये असलेल्या कलेची व बुद्धिमत्तेची पारख करण्याचे सामर्थ्य मंजुळे यांचेकडे नक्कीच आहे.
गरिबीत वाढलेला, प्रस्थापित जातीय विषमतेचे चटके सहन केलेल्या नागराज मंजुळेने प्रस्थापित मराठी चित्रपट सृष्टीत एक दिग्दर्शक म्हणून आपले एक स्थान निर्माण केले आहे. कला व बुद्धिमत्ता ही केवळ कोणा एका प्रस्थापित वर्गाची मक्तेदारी नसून कलेचा रग गावकुसाबाहेरच्या तरुणाईत सुध्दा ठासून भरलेला आहे हे नागराज मंजुळेने सिद्ध करून दाखविले. पिस्तुल्या, फड्री व सैराट या त्याच्या कलाकृतींना मिळालेले अवार्ड व लोकांची मिळत असलेली पसंती आणि सोशल मिडीयावर होत असलेले कौतुक बघितल्यास देशाच्या विषमतावादी वास्तवतेचे चित्र बघणारा, जाणणारा व त्यावर विचार करणारा एक वर्ग निर्माण केलाय हे नागराज मंजुळे यांचे मोठे यश आहे.
सैराटचा शेवट हा “दु:खदायी” आहे. सैराट मधील परशा व आर्चीचे हत्याकांड बघितले की सोनई, खर्डा, पाथर्डी आणि खैरलांजी येथील हत्याकांडाची आठवण ताजी होते. नितीन आगे या युवकास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हत्या करून त्याचे शरीर झाडाला लटकाविन्यात आले होते. तर सोनई गावात प्रेमप्रकरणातूनच तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तरीही आमच्यासारख्या परिवर्तनवाद्यांना वाटते की, चित्रपटाचा शेवट हा दोन कुटुंबाच्या मिलापाचा झाला असता तर समाजात एक सकारात्मक मेसेज गेला असता. व्यवस्थेने पछाडलेल्या एका दलित कुटुंबाचे व मालगुजारशाही जीवन जगणारे मराठा कुटुंब यांचे नातेसबंधात रुपांतर झाले असते तर समाजातील विषमतेची दरी कमी होण्यास मदत झाली असती. परंतु समाजातील प्रखर वास्तव व व्यवहारात प्रत्यक्ष घडत असलेले अनुभव आणि सत्य घटना ह्या लोकामध्ये जायलाच हव्या, काल्पनिक मांडणीवर समाज केवळ स्वप्नाच्या दुनियेत वावरत असतो, त्याने सत्यच बघून विचार केला पाहिजे ह्या नागराज मंजुळेच्या वास्तववादी भूमिकेने सैराटचा शेवट झालाय.
नागराज मंजुळे यांना बाहेरच्या विषमतावादी व्यवस्थेशी संघर्ष करण्याबरोबरच स्वत:च्या घरी सुध्दा वैचारिक संघर्षाला सामोरे जावे लागले. आपला मुक्तिदाता असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी घरी लावताच वडिलाकडून फोटो लावण्यास विरोध झाला. त्यामुळे बाबासाहेबांचा फोटो घरून काढल्यास घरातील सर्व देवदेवतांचे फोटो बाहेर फेकून देण्याची भाषा नागराज मंजुळेना करावी लागली. बाबासाहेबांच्या विचारांचा एक अनुयायी म्हणून नागराज मंजुळेना अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात सहभागी होत असलेल्या “सैराट” ला तिथेही यश मिळो ही एक आशा.

बापू राऊत
९२२४३४३४६४

ई मेल: bapumraut@gmail.com

10 comments:

  1. Absolute analysis about Sairat movie. really appreciable views.
    .
    Thnx for posting this.

    ReplyDelete
  2. Absolute analysis about Sairat movie. really appreciable views.
    .
    Thnx for posting this.

    ReplyDelete
  3. राउत साहेव,
    खुप उत्कृष्ट पने आपण सैराट या चित्रपटाचे विश्लेषण केले आहे। चित्रपट सृष्टीत स्वताची वेगळी अशी छाप सोडणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा आंबेडकरी विचारांनी प्रभावित आहे हे जाणून खुप आनंद वाटला।
    जयभीम।
    प्रितम भांगे

    ReplyDelete
  4. राउत साहेव,
    खुप उत्कृष्ट पने आपण सैराट या चित्रपटाचे विश्लेषण केले आहे। चित्रपट सृष्टीत स्वताची वेगळी अशी छाप सोडणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा आंबेडकरी विचारांनी प्रभावित आहे हे जाणून खुप आनंद वाटला।
    जयभीम।
    प्रितम भांगे

    ReplyDelete
    Replies
    1. जगात जे जे शोषित आहेत त्यांना प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचार फार गरजेचा आहे. कारण आंबेडकरी विचार हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरू शकतो.

      Delete
  5. aaj surya pashimekadun kasa ugavla,
    manuvadi, hindu dharma yanna shivya na ghalta lekh lihaly rau tu, bagh ha acidity hoil tula nahitar.

    ReplyDelete