Monday, March 25, 2013

बाबासाहेब आंबेडकर व म.गांधी: वाद प्रतिवाद


डाक्टर बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांपैकी अनिहीलेशन  ऑफ कास्ट(जाती निर्मुलन),  मुक्ति कोन पथे व कास्टस इन इंडिया हे गाजलेले प्रबंध होत. वरील तीनही प्रबंध म्हणजे वादविवादपटूता, तर्कसंगत युक्तिवाद, ज्ञान, पांडित्य व संभाव्य बौद्धिक हल्ल्याची आकलन शक्ती व त्याच ताकदीने दिलेले प्रतिउत्तर यांचा मिलाप असलेले अप्रतिम ग्रंथ होत. जागतिक दर्जाचे हे ग्रंथ बहुजन समाजातील बुद्धिवाद्यांनी अभ्यासले की नाही हे माहीत नाही परंतु जो अभ्यासेल तो पेटून उठल्याशिवाय राहणार हे मात्र निसंदिग्धपणे सांगता येते. हे तीनही प्रबंध क्रांती घडवू शकणा-या ज्वाला ठरू शकतात.
याभितीपोटीच  भारताच्या कोणत्याही विद्यापीठाच्या समाजशास्त्र, तत्वज्ञान तसेच इतर शास्त्राच्या अभ्यासक्रमाला (आंबेडकर विचारधारा विभाग सोडून) वरील प्रबंध लावलेले दिसत नाही. यावरून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही भारतीय विद्वानांना व बहुजन विद्यार्थ्यांना अस्पर्शच आहेत. यामुळेच बहुजन समाजातील कोणताही लेखक वा विद्वानाच्या साहित्यकृतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे खरेखुरे विश्लेषण व प्रतिपादन उमटलेले दिसत नाही. उलट बाबासाहेबांचे विचार तोडून मांडल्या जातात आणि हेच तोडून मांडलेले विचार सवर्णातील लेखकाच्या साहित्यकृतीतून बहुजन समाजात व ग्रंथप्रदर्शनात पोहोचत असतात. त्यामुळेच निसंकोचपणे  बहुजन वा सवर्ण वाचकाच्या मनात विरोधात्मक प्रतिमा तयार होवून बाबासाहेब आंबेडकर विषयी विरोधी मत तयार होत असते. आंबेडकरी समाजानेही या कृत्याची साधी दखलही घेतली नाही. अँकेडमिक, सामाजिक  राजकीय चळवळीकर्त्यांनी कोणत्याही विद्यापीठाला वा सरकारला याबाबत प्रश्न केला नाही हे एक वास्तव आहे.
हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम लाहोर येथील ‘जात-पात-तोडक’ मंडळ करीत असे. या जात-पात-तोडक मंडळाच्या लाहोर येथे होणा-या वार्षिक अधिवेशना करिता बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करण्याकरिता प्रकृती ठीक नसतानाही बाबासाहेबांनी भाषण लिहून काढले व ते मंडळाच्या सभासदांना दाखविण्यात आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील विचार परिषदेमध्ये येना-या श्रोत्यांना असह्य होतील या कारणावरून मंडळाच्या स्वागत समितीने परिषदच रद्द करून टाकली होती. या प्रसंगानंतरच्या अंतर्गत वादातून जात-पात-तोडक मंडळच बरखास्त करण्यात आले. जात-पात-तोडक मंडळासाठीच्या वार्षिक अधिवेशनासाठी विस्तृतपणे लिहिलेले भाषण हेच नंतर ‘अनिहीलेशन  ऑफ कास्ट’ या प्रबंधाच्या स्वरुपात बाबासाहेबांनी प्रकाशित केले.
सदर अधिवेशन रद्द का करण्यात येत आहे? या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर व जातपात-तोडक-मंडळाच्या सदस्यांमध्ये पत्रव्यवहार झाला. १२ डिसेंबर १९३५ रोजी बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्रात मंडळाचे सचिव श्री संतराम म्हणतात, आपण मोठे विचारवंत आहात, आपल्या इतका अन्य कोणीही  जातीव्यवस्थेचा सखोल अभ्यास केलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. ‘जातीव्यवस्था ज्या धार्मिक श्रध्दावर उभारलेली आहे, त्या श्रद्धा उध्वस्थ केल्याशिवाय जातीव्यवस्था नष्ट होणे अशक्य आहे’ हा आपला सिद्धांत ऐकून घेण्यास फारच उत्सुक आहे. २७ मार्च १९३६ पत्रात मंडळ लिहिते, तुम्हाला अधिवेशनात बोलाविल्यामुळे सर्व हिंदूचा आम्हास विरोध होत असून शिव्यांचा भडीमार व कठोर टीकेला समोर जावे लागत आहे. हिंदू पुढा-यांनी मंडळासी सबंध तोडले आहेत. आपल्या  भाषणामुळे मंडळाचे अनेकजन नाराज आहेत, त्यामुळे आपण लांबलचक भाषण न करता ते संक्षिप्त स्वरुपात करावे अशी आमची सूचना आहे. जात-पात-तोडक मंडळाच्या पत्रावर बाबासाहेबानी २७ एप्रिल १९३६ रोजी प्रतिक्रिया दिली. ते लिहितात, जर माझ्या भाषणाची परीस्थितीनुरूप कात्री लावण्याचा मंडळाचा आग्रह असेल तर परिषदच रद्द झालेली मला चालेल. हिंदू धर्म नष्ट करण्याचे बोलल्याबरोबर तुमचे मंडळ एवढे घाबरेल, अशी मला कल्पना नव्हती. शब्दांना केवळ मूर्खच घाबरत असतात. तुमच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे मी व माझ्या समाजाचे धर्मांतरासबंधीचे विचार मी सोडून देईल असे वाटते काय? असे बाबासाहेबांनी मंडळास प्रतिउत्तर दिले होते. बाबासाहेबाच्या भाषणात असे काय दडले होते की, ज्यामुळे परिषदच रद्द करावी लागली?. भाषणात असे काय होते की, म.गांधीजीलाही आपल्या हरिजन या पत्रातून बाबासाहेबावर टीकेची झोड उठवावी लागली?.

बाबासाहेबांनी जात-पात-तोडक मंडळाच्या अधिवेशनाच्या भाषणात मुख्यत: १. जातीसंस्थेने हिंदूचा कसा नाश केला?. २. चातुर्वर्ण्याच्या आधारावर हिंदू समाजाचे पुनर्गठन करणे कसे अशक्य आहे?. ३. हिंदू समाजाची पुनर्रचना चातुर्वर्ण्याधीष्ठीत करणे हानिकारक कसे आहे? ४. समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या त्रयीवर आधारित हिंदू धर्माची बांधणी व पुनर्गठन करायला हवे ५. हे हेतू साध्य करण्यासाठी जाती व वर्ण यामागे असलेला धार्मिक आधार नष्ट करायला हवा ६. जाती व वर्ण यांना असलेला धार्मिक आधार नष्ट करण्यासाठी धर्मशास्त्राचा दैवी आधार उध्वस्थ करायला हवा  ७. जातीसंस्थेचे कसे निर्दालन करता येईल व त्यावरील उपाय काय? याचा उहापोह केला होता. परंतु अधिवेशनच रद्द केल्यामुळे “अनिहीलेशन  ऑफ कास्ट” या पुस्तकमाध्यमातून ते प्रकाशित करावे लागले.

गांधीजीनी हरिजन पत्रात या भाषणाची दखल घेताना काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यापैकी १. एखाद्या धर्मग्रंथाचा  मतितार्थ समाजावून सांगण्याकरिता आंबेडकरा सारख्या विद्वानाची गरज नसून साधू व संतपुरुषाच्या जीवन व त्याच्या वचनावर धर्म जगात असतो. २. आपण आपल्या पूर्वजांचा परंपरागत धंदा चालवून आपला उदरनिर्वाह करावा असे वर्णाश्रम धर्म सांगत असतो. ३.आंबेडकरांनी धर्मग्रंथातील जे श्लोक आधारभूत धरले ते संदेहास्पद आहेत व ज्या धर्माचा ज्ञानेश्वर, तुकाराम, राजा राममोहन राय व विवेकानंदानी पुरस्कार केला तो धर्म आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे दोषपूर्ण कसा राहू शकतो?.
गांधीजीच्या वरील मुद्यावर बाबासाहेब आंबेडकर हल्ला चढवत म्हणतात, संतांनी जातीयता व अस्पृशता यावर कधीही मोहीम काढली नसून संताना मानवामानवातील संघर्षाची पर्वा नव्हती. हिंदू माणूस संत महात्म्याची केवळ पूजा करतो त्याच्या शिकवणुकीप्रमाणे तो चालता नसतो तर ते केवळ धर्मशास्त्राप्रमाणे चालत असतात. गांधीजी आपल्या पूर्वजांच्या धंद्यावर जोर द्यायला सांगतात. यावर बाबासाहेब म्हणतात, गांधीजी हे बनिया जातीचे परंतु त्यांनी आपल्या पूर्वजांचा धर्म जो व्यापार कधी केलाच नाही त्यामुळे गांधीजी स्वत:च वर्णाश्रम धर्माचे पालन करताना दिसत नाही मात्र दुस-यांनी तो करावा असा ते आग्रह करतात. याचा अर्थ भडवेगिरी करणा-याच्या वारसांनी भडवेगिरी व वेश्यांच्या मुलीनी वेश्याव्यवसायच करायला सांगणे होय. गांधीजीचा या सिद्धांताचे कोन समर्थन करील?. संताचा धर्म हा दोषपूर्ण राहू शकत नाही या गांधीजीच्या तत्वावर पलटवार करताना बाबासाहेब म्हणतात कोणत्याही संताने जातीयतेवर हल्ला केला नाही या उलट सर्व संत हे जातीव्यवस्थेचे समर्थक होते. संत ज्ञानेश्वर हे आपल्या स्व:जातीचे अभिमानी होते. ब्राम्हण जातीत प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी आकाशपाताळ एक केले होते तर संत एकनाथाचा अस्पृश्यतेला विरोध होता असे नाही तर त्याला वाटत असे की अस्पृश्यांच्या संगतीने झालेला विटाळ हा गंगेत स्नान केल्याने धुतला जातो व पुन्हा आपणास शुध्द होता येते. यावरून गांधीजीचे आदर्श हे किती फसवे होते  व गांधीजी स्वत:च आपल्या कृतीने वर्णाश्रम धर्माचे पालन करीत नव्हते तरीही दुस-याला उपदेश देण्यात किती  पटाईत असत याची कल्पना येते.
जात-पात-तोडक मंडळाचे सचिव श्री संतराम यांनी गांधीना पत्र लिहिले, ते पत्रात म्हणतात, “या युगात तुमचा वर्णव्यवस्थेचा सिद्धांत अव्यवहार्य आहे. हिंदू समाज हा जातीसंस्थेचा गुलाम आहे आणि त्याला जातीसंस्था नष्ट करायची इच्छा नाही. जेव्हा आपण कपोलकल्पित वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करता तेव्हा हिंदू लोकांना आपल्या जातीना चिकटून राहण्यास आपल्या सिद्धांताचा आधारच मिळतो. तुमचा सिद्धांत हा समाजसुधारणेची फार मोठी हानी करीत आहे. वर्णव्यवस्थेच्या मुळावर आघात न करता अस्पृश्यता नष्ट करणे व अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता धर्मशास्त्राची मदत घेणे म्हणजे चिखलानेच चिखल धुन्यासारखे होय”. संतरामजीच्या या आरोपाने गांधीजीचा पूर्ण वैचारिक गोंधळ उडतो व चिडून संतराम यांना म्हणतात की  वर्ण हा हिंदू धर्मशास्त्राचा अविभाज्य भाग असेल तर वर्ण न मानणारी व्यक्ती स्वत:ला हिंदू कशी काय म्हणू शकते?.
बाबासाहेब आंबेडकरासारखा विद्वान व हिंदू धर्मपंडितांना हिंदू धर्माशास्त्रातील जातीयता स्पष्टपणे दिसत असून व तसे ते अधिकार वाणीने सांगत त्याचे दाखले देत असतानाही गांधीजीचे “जर हिंदू धर्मशास्त्रे जातीयतेचे समर्थन करीत असतील तर मी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणार नाही” असे म्हणणे हे पूर्णपणे फसवणुकीचे तंत्र आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गांधीजी पूर्णत: गोंधळलेले आहेत. त्यांना दुहेरी भूमिका वठवायची आहे. एक महात्मा व दुसरी राजकारणी म्हणून. गांधीजीनी राजकारणाचे पूर्णत: व्यापारीकरण केलेले आहे. गांधीजी जात व वर्णव्यस्थेस पाठिंबा देतात कारण जर त्यांनी या हिंदू व्यवस्थेस विरोध दर्शविला तर राजकारणातील आपले स्थान धोक्यात येईल व परिणामत: स्वातंत्र्य चळवळतील आपले स्थानच धोक्यात येईल याची भीती गांधीजीना वाटते. त्यामुळे या गोंधळलेल्या गांधीजीना कोणीतरी सांगायला हवे की, ते स्वत:ची फसवणूक करीत तर आहेतच परंतु वर्णव्यस्थेच्या नावाखाली जाती व्यवस्थेचे समर्थन करून जनतेचीही फसवणूक करीत आहेत.
बाबासाहेब आंबेडकर गांधीना उद्देशून म्हणतात की, जेव्हा गांधीजी विचार करतात तेव्हा ते आपल्या बुद्धीचा व्यवसाय करीत असतात कारण ते विचाराच्या विवंचनेत हिंदुच्या जातीव्यस्थेकरिता समर्थन शोधण्याचा मार्ग धुंडाळीत  असतात. जातीसंस्थेचे कट्टर समर्थक हिंदू व ब्राम्हण  दररोज जात व शास्त्राचे नियम पायदळी तुडवीत असतात परंतु बहुजन समाजाने मात्र ते तोडता कामा नये असे त्यांना वाटते कारण जनतेला जर जातीच्या बंधनातून मुक्त केले तर ते ब्राम्हण वर्गाच्या धर्मश्रेष्ठत्वाला व अधिसत्तेला सुरुंग लावल्यावाचून  राहणार नाहीत. बहुजन समाजाला विचारप्रक्रीयेद्वारा लाभणा-या फळापासून वंचित करणारी बुद्धिमान वर्गाची अप्रामानिकता अत्यंत शरमेची बाब होय व त्याला गांधीजीचा सुप्त पाठिंबा असणे हे दुर्दव्यच आहे.
जनतेला जेव्हा वळण लावण्याची पाळी येते तेव्हा गांधीजी एकतर अलिप्त होवून जात असतात किवा आपल्याच तत्वाशी अप्रामाणिक राहतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे केरळ येथील गुरुवायुर मंदिर प्रवेश होय. गुरुवायुर येथे केल्ल्पण व त्यांच्या सहका-यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी चळवळ सुरु केली. मंदिराचे विश्वस्त झोमोरीन यांनी हिंदू धार्मिक नेमणूक कायदा, उपकलम ४० चा आधार घेत मंदिराची प्रथा व रिवाज याविरुध्द ते काहीही करू शकत नसल्यामुळे मंदिर प्रवेश नाकारला. झामोरीन ची बाजू विचारात घेता गांधीजीनी केल्ल्पण यांना तीन महिने उपोषण स्थगित करण्याची सूचना केली. १ जानेवारी १९३२ पर्यंत मंदिर खुले न केल्यास मी स्वत: उपोषणात सामील होण्याचे अभिवचन गांधीनी केलप्पन याना दिले होते. तीन महिन्यानंतरही मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेश नाकारला. परंतु यावेळेस गांधीजीनी केलप्पन यांना दिलेले अभिवचन मोडत नवा डाव खेळला. केल्लपन यांनी चालवलेली चळवळ ही अकाली असून त्यात सक्तीचा वास असल्याने त्यांनी आपले उपोषण स्थगित करावे असे केल्ल्पण यांना कळविले. त्यानंतर गांधीनी मंदिर प्रवेशासाठी दोन बाबी समोर केल्या, पहिली बाब हिंदूचे सार्वमत तर दुसरे कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी व्हाईसरायची संमती. पुढे सार्वमताचा निकाल मंदिर प्रवेशाच्या बाजूने लागला व व्हाईसरायची संमतीही मिळाली तरीही गांधीजीनी अस्पृश्याच्या मंदिर प्रवेशासाठी उपोषण केले नाही. यातच गांधीजीचे खरे गुपित उघड होते. त्यामुळे आजही अस्पृश्य समाज गांधीजीचा विरोध करतो तो गांधीजीच्या या विश्वासघातकी दोगलेपनामुळेच.
पुणे कराराच्या वेळेसही गांधीनी हे विश्वासघातकी दोगलेपण कायम ठेवले. राजकीय प्रश्नावरून अस्पृश्य समाजाच्या विरोधात गांधीजीने केलेले उपोषण हे अस्पृश्यावर जुलूम करणारे व त्यांच्या भावनाची हिंसा करणारे होते. अस्पृशाच्या न्यायोचित मागण्याचे दमन झाले तरी ते गांधीजीसाठी अनैतिक नव्हते. अस्पृशाच्या सामाजिक प्रश्नावरून असे हजारो गांधी मेले तरी त्याची सवर्ण हिंदुना यत्किंचितही खंत वाटणार नाही याचे भान गांधीना होते. त्यामुळेच प्रस्थापित समाजव्यवस्थेत सर्वच स्तरावर सवर्ण हिंदूचे हितसंबंध गुंतलेले असल्याने, त्यांच्या हितसबंधाच्या विरुद्ध जावून गांधीना ही व्यवस्था बदलून ती समानतेवर आधारित निर्माण करावयाची नव्हती. १९३५ च्या कायद्यानुसार १९३७ साली घेतलेल्या प्रांतीय निवडणुकीत ७८ कांग्रेसचे अस्पुश्य उमेदवार निवडून आले परंतु त्यापैकी एकालाही गांधीने मंत्रिमंडळात प्रवेश दिला नाही. व्यक्तीची गुणवत्ता व लोकप्रियता हा निकष गांधी व कांग्रेसने लावला. यावर  बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ब्रिटीश सरकारने अस्पृश्यांना दिलेल्या प्रातिनिधिक घटनात्मक सुरक्षिततेचा त्याग करून सवर्ण हिंदुच्या दयेवर अस्पृश्यांना निर्भर ठेवण्याची पुणे कराराची योजना ही गांधीजीच्या दमनकारी उपोषण व त्याच्या कूटनीतीचा भाग होता. गांधीजीनी अस्पृश्यांची घोर फसवणूक केली. अस्पृश्यांच्या मनात ज्या राजकीय आकांक्षा निर्माण होवू लागल्या होत्या त्यांची भीती गांधीजीना होती. गांधीजीच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि हिंदू पुढा-याच्या आश्वासनावर विसंबून गांधीजीचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आपल्या हक्काचा बळी दिला. त्याचे परिणाम आपल्यासमोर दिसतच आहे. पुणे करार हा विश्वासघाताची आणि कपटीपनाची  एक दु:खद कथा आहे असे बाबासाहेब म्हणाले.  
बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही गांधीजीच्या परस्परविरोधी होती. वेद आणि स्मृतीमध्ये सांगितलेला हिंदू धर्म हा इतर काही नसून कर्मकांडे, याज्ञिक सामाजिक, राजकीय व सोवळ्याओवळ्याचे नियम व बंधने याचे कडबोळे आहे. हिंदू धर्माच्या सनातन नियमांनी समाज पंगु झाला वा त्याची वाढ खुंटली तर त्याचा दोषारोप केवळ धर्मावर होतो. त्यामुळे असा धर्म नष्ट केला पाहिजे. विवेक व नीतीचा घास घेतलेल्या वेद व शास्त्रांना सुरुंग लावीत श्रुती स्मृतीच्या धर्माचा विध्वंस केल्याशिवाय दुसरा मार्गाच नाही. धर्मशास्त्रानुसार शक्य असेल तेवढी जातीयता पाळावी व जेथे शक्य नसेल तेथे प्रायश्चित घ्यावे अशा शास्त्राच्या सोयीमुळे जातीना कायमचे जीवदान आणि क्रांतीकारी विचारांना मुठमाती मिळाली. आणि हीच प्रक्रिया अधिक वेगाने आजच्या विज्ञानयुगात चालू असून मंदिरे व सत्संगाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येत आहे.


लेखक:                    बापू राऊत
                                  ९२२४३४३४६४


No comments:

Post a Comment