निवडणुका
कोणत्याही असोत, प्रत्येक पक्षाचे एक वेगळे प्रचारतंत्र असते. आता पारंपारिक
प्रचार तंत्राची जागा हायटेक प्रचार तंत्राने घेतली एवढाच काय तो फरक. २०१४ च्या
लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पध्दतीने जिंकण्याच्या व्युव्हरचना
केल्या व यशस्वी झाल्या, तेव्हा पासून इतर पक्षांनीही आपापल्या प्रचाराच्या पध्दती मध्ये बदल केला. २०१४ च्या
निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीनी न भूतो न भविष्यती अशी विजयश्री खेचून आणली. मोदी
खोटे बोलतात परंतु रेटून बोलतात. मोदींनी मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची विकासपुरुषाची
प्रतिमा निर्माण केली. साथीला सोशल मिडिया व चाय पे चर्चा असे स्वरूप होते.
मोदीच्या गुजरात विकासाचे स्वरूप भारतातील जनतेला आजही कळले नाही. मोदीचा गुजरात
आज असंतोषाच्या सीमेवर आहे. एकूण परिस्थिती बघता पुढच्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये
मोदीचा चेहरा पाहणे जनता पसंत करेल की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेतच.
मोदी हे
तात्कालिक आहेत. कारण त्यांच्या आश्वासनांची आज उत्तरेच मिळणे कठीण झाले आहे. मोदी
व भाजपापासून धडा शिकून इतर पक्ष विशेषत: बहुजन समाज पक्षाचे निवडणूक प्रचारतंत्र
कसे आहे? ते बघणे मनोरंजक ठरेल. सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या
काही फेऱ्या संपल्या तर बाकी जागासाठी विविध पक्षाचा झंझावात जोमात सुरु आहे.
इतराप्रमाने नव्या निवडणूक तंत्राचे आत्मभान बहुजन समाज पक्षाने अंगिकारले. तसी या
पक्षाची निवडणूक प्रचार पद्ध्ती ही वेगळी आहे. हा पक्ष केडरबेस असल्यामुळे पक्षाचे
केडर आपापल्या तंत्राने पक्ष प्रचार करीत असतात. बहुजन पक्षाचा जाहीरनामा कधीच
प्रसिध्द होत नाही. विविध चॅनेल्सवर
बहुजन समाज पक्षाला कोणीही बोलवीत नसत. परंतु केवळ जातीचे व हितचिंतक म्हणून विवेक
कुमार, कांचा इलय्या, चंद्रभानप्रसाद व बद्री नारायण या बुध्दिवाद्याना
वादविवादासाठी हिंदी व इंग्रजी चॅनेल्सवर बोलविल्या जाई. लोकांना
यांच्या मार्फत बहुजन समाज पक्षाची विचाराधारा व स्थितीचे अपडेट मिळत असत. २०१६
पर्यंत तर सोशल मिडिया या पक्षाच्या नावीही नव्हता. पक्षाचे संस्थापक माननीय
कांशीराम तर मिडीयावर “मनुवादी मिडिया” म्हणून बोचरी टीका करीत असत.
इतर पक्षासोबत
स्पर्धा करायची म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची सोबत घ्यायला पाहिजे हे बहुजन समाज
पक्षाला मात्र आज पुरते कळलेले दिसते. मायावती ह्या रोजच प्रेस ब्रीफिंग करताना
दिसतात. तर दुसरीकडे पक्ष प्रवक्ता म्हणून सुधींद्र भडोदिया हे विविध प्रसार
माध्यमावर विरोधी पक्ष प्रवक्त्यांना व चॅनेल्स ॲकर्सना
उत्तरे देताना दिसतात. दुसरीकडे सोशल मिडीयाचा वापर अधिक गतीने सुरु आहे. त्यात
व्हाटसअप, ट्विटर, यू ट्यूब याचा सक्रीय वापर दिसतो. मतदारांना आकृष्ट करून
घेण्यासाठी जमिनी वर्क करण्यात येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन स्लोगन
तयार करण्याबरोबरच ब्राम्हण शंक बजाएगा हाथी चाल चलेगा, ये हाथी नही, ब्रम्हा
विष्णू महेश है’ या सारख्या नाऱ्याना मूठमाती दिली आहे. याला पक्षाची ब्राम्हणासोबतची
सोशल इंजिनियरिंग संपल्याची सरहद्द म्हणता
येईल का?. तर पक्षाच्या नव्या नाऱ्यात गाव खुशहाल बनानेको, बहेनजीको आने दो, आणि उपेक्षाओ
को जाणे दो बहेनजीको आने दो अशा प्रकारच्या नार्यांची भर पडली.
.
एकीकडे बहुजन
समाज पक्षाने राज्याची कायदा व सुव्यवस्था परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राज्यातील
शिक्षण आणि रोजगाराच्या संधी विस्तृत करू शकणारा एकमेव नेता म्हणजे मायावती असे म्हटले.
तर दुसरीकडे यापुढे महापुरुषांच्या पुतळ्याऐवजी त्यांच्या विचारावर लक्ष केंद्रित
करण्यात येईल अशी घोषणा मायावातीकडून करण्यात आली. ह्या घोषणा म्हणजे २०१४ च्या
निवडणुकीत राहिलेल्या त्रूटी विधानसभा निवडणुकामध्ये भरून काढण्यासाठी आटोकाट
केलेला प्रयत्न आहे. आजपर्यंत बहुजन समाज पक्षाने कधीही निवडणूक जाहीरनामे काढले
नाहीत. याही निवडणुकीमध्ये तोच पायंडा कायम राहिला. परंतु मायावतीच्या भाषणामध्ये
जाहीरनाम्याची झलक मात्र बघायला मिळते. तिने कायद्याचे व विकासाचे राज्य
प्रस्थापित करण्याचे अभिवचन जनतेला दिले आहे. पक्ष सत्तेवर आल्यास राज्यात दंगली न
होण्याचे व दंगलखोर गुंडाचा सफाया करण्याचे आश्वासन ती जनतेला देते आहे.
बहुजन समाज
पक्षामध्ये तिकीट वाटपाचे धोरण अनाकलनीय आहे. मुख्यत: जाती आधारित तिकिटे देण्यात
येतात. हेच सूत्र इतर सारे पक्ष पाळतात परंतु याचा दोष केवळ मायावाती व बसपवर
टाकून भारतीय प्रसार माध्यमे चांगुलपणा करतात. ते जातीराजकारणाचे खापर केवळ बहुजन
समाज पक्षावर फोडतात तर इतर पक्षाच्या जाती व धर्मवादी राजकारणाकडे डोळेझाक करतात.
खरे तर हा प्रसारमाध्यमांचा मायावतीविरुध्दचा जातीय प्रचार आहे. बहुजन समाज
पक्षाने दिलेला “सर्वजन सुखाय सर्वजन हिताय” हा नारा सुरुवातीच्या काळात पक्षाच्या
केडरबेस कार्यकर्त्यांना अडखळल्या सारखा वाटत होता. परंतु या नार्याने एका नव्या
सोशल इंजिनियरिंगला जन्म दिला. पक्षाच्या कोअर व्होट बँकेला मजबूत करीत इतर जाती
समूहाला आकर्षित करीत २००७ ला राज्याच्या सत्तेत पूर्ण बहुमत प्राप्त केले. परंतु भारतीय
जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने या सोशल इंजिनियरिंगचे कंबरडे २०१४ च्या लोकसभा
निवडणुकीमध्येच तोडले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकाना सामोरे जाताना केवळ
स्वत:च्या व्होटबँकेने सत्तेमध्ये जाता येत नाही. तर त्याला मित्र समुहाची
आवश्यकता असते. अखलाख हत्याकांड, गोहत्या कानून, घरवापसी आणि मुझफ्फरनगर
हत्याकांडाने मुस्लीम समुह अगोदरच भयभीत होता. त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये
त्यांना मजबूत नेता हवा होता. भाजप व संघाची भीती आणि समाजवादी पक्षाचा कमकुवतपणा
हे घटक मुस्लीम समाजाला बहुजन समाज पक्षाकडे आकृष्ठ करणारे होते.
“एक दिवस उपाशी
रहा परंतु मतदान करा किंवा “प्रथम मतदान नंतर भोजनदान” करण्याचे मायावतीचे हृदयस्पर्शी आवाहन अनेक शोषितांना (दलितांचा) भावनिक
करून जात असते. बहुजन समाज पक्ष आपल्या उमेदवाराची निवड निवडणुकांच्या खूप
आधीपासूनच करीत असते. त्यामुळे उमेदवाराला आपली भूमिका मजबूत करण्यात व
प्रचाराच्या बांधणीसाठी अधिक वाव मिळतो. अशी रचना सध्यातरी बहुजन समाज पक्षा
व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाकडे आढळत नाही. बहुजन समाज पक्षाने जवळ जवळ सर्व
महत्वाच्या जातींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. ती जाती आधारित गणिते
असतात. बहुजन समाज पक्षाच्या हितचिंतकांची एकगठ्ठा मते व दुसऱ्या प्रभावशाली जातीसमुहाची
मते अशा अंकगणिताचा तो खेळ असतो. पक्षाच्या नव्या सोशल इंजिनियरिंग नुसार मुस्लीम
समाजाला अधिक झुकते माप देत बसपाने एकूण ९७ मुस्लीम उमेदवाराना पक्षाचे तिकीट दिले
आहे. इतर कोणत्याही पक्षाने मुस्लीम समाजाला एवढ्या जागा दिल्या नाहीत. त्यामुळे
२०१९ ची मायावतीची सोशल इंजिनियरिंग हि “दलित आणि मुस्लीम” समीकरणाची ठरू शकते.
ज्याप्रकारे प्रचारसभा मधून मायावती मुस्लीम समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न
करते व त्या साऱ्या प्रश्नांची परिपूर्तता झाल्यास उत्तर प्रदेशमध्ये दलित व
मुस्लीम हे राजकीय समीकरण कायमचे टिकू शकते.
बसपाच्या दलित -
मुस्लीम समीकरणाला भेद देण्यासाठी कांग्रेस व भाजपा / संघ यांच्याकडून प्रयत्न
करण्यात येतील. कधी महाराष्ट्रातून पत घसरलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याला
हाताशी धरून दलित मतदार फोडण्याचा प्रयत्न होईल तर कधी मुस्लीम नेत्याला घेवून सोशल
इंजिनियरिंग मध्ये बेबनाव निर्माण करण्यात येईल. ते काहीही असो वा होवो, परंतु
सध्याच्या उत्तर प्रदेश विधानसभेचा प्रचार व मायावतीच्या सभांची गर्दी बघितल्यास
प्रसार माध्यमांचा विरोधी प्रसार व निवडणूकपूर्व सर्वेच्या नकारात्मकतानंतरही
बहुजनांचा बहुजन समाज पक्षाने राजकीय
सत्तेच्या किल्ल्या प्रस्थापिताकडून हिसकावून घेतल्यास तो बहुजन समाज पक्ष व
मायावतीच्या बदलत्या प्रचारतंत्राचा विजय मात्र नक्कीच असेल.
बापू राऊत
9224343464
No comments:
Post a Comment