आज देश कधी नव्हे एवढा धोक्याच्या वळणावर उभा आहे.
देशाला अनेक समस्यांनी ग्रासले असून एक नागरिक दुसर्या नागरिकाकडे संशयित
भावनेतून बघायला लागला आहे. रोजचे मोर्चे
व आंदोलनानी रस्ते आणि चौक गजबजलेले दिसताहेत. मागण्यांचे फलक हातामध्ये धरून मार्च निघताहेत.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात जिला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव
प्राप्त झाला आहे. त्या देशात धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढाव्यात हे देशास हीन करणार्या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त
मंडळी धर्म व जुने इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम
यांच्यात दरी निर्माण करण्याचे कारस्थान रचनार्यानी एकदा तरी शिवरायाच्या
राज्यरचनेचा व जनतेचा सांभाळ करण्याच्या वृत्तीचा अभ्यास करायला पाहिजे.
शिवराय कधीही मुस्लीम विरोधी
नव्हते. त्यांनी माझ्या जातीचा व धर्माचा म्हणून कोणाकडेही बघितले नाही. त्यांच्या
राज्यकारभाराची तर्हाच फार न्यारी होती. शिवरायांच्या पदरी मोठमोठ्या हुद्द्यावर
अनेक मुसलमान सरदार व वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खान
होता. आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता. त्यांचा अंगरक्षक विश्वासू
मदारी मेहतर होता. शिवराय मुस्लिमद्रेष्टा असता तर असे घडले असते का? यावर जनतेनी विचार करावयास हवा. याउलट अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी
भास्कर कुलकर्णी हा व्यक्ती होता. शिवरायाचा वकील काजी हैदर होता. सिद्दी हिलाल तर आपल्या पुत्रासकट शिवरायासाठी मुसलमानाविरोधात लढला.हिंदू मिर्झा राजे जयसिंग
हा औरंगजेबाच्या पदरी होता. यावरून त्याकाळात संपूर्ण समाजाची
फाळणी ही हिंदू विरुध्द मुसलमान अशी नव्हती. धर्म व देव हे त्याकाळात संघर्षाचे
मुळात कारणच नव्हते. शिवरायांचे जे मुस्लीम सैन्य होते ते मोगलाविरुध्द लढायचे तर मुसलमान राजाच्या पदरी असेलेले
हिंदू सैनिक शिवरायाविरुध्द लढत असत. धर्मनिष्ठे पेक्षा स्वामीनिष्ठा श्रेष्ठ होती. यावर
राज्यकर्त्यांनी वस्तुनिष्ठ चिंतन केले पाहिजे.
शिवराय सर्व धर्माचा आदर
करीत असत. याविषयी इतिहासकार काफी खान म्हणतो, शिवराय आपल्या सैनिकांना मशीद, कुराण
व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसत. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले
तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यातील मुस्लीम व ख्रिश्चनाना देत असत. महाराजांच्या
गुरूंच्या यादीमध्ये याकुबबाबा हे मुस्लीम संतही होते. हे पाहता खरे तर शिवराय आज सामाजिक परिवर्तनाचे
प्रतिक बनायला हवे होते. परंतु त्यांना हिंदुत्ववादाच्या हातातील मुस्लीम विरोधी
अमोघ हत्यार म्हणून वापरण्यात येत आहे. आपल्या धर्माइतकाच दुसर्याचा धर्मही
श्रेष्ठ व उच्च आहे असे मानणार्या शिवरायाचा केवढा मोठा हा अपमान?.
शिवरायांचा कालखंड हा तसा
पुरुषप्रधान होता. स्त्रियांना पाहिजे तो मानमरातब मिळत नव्हता. सरंजामदारीत गोरगरिबांच्या
स्त्रियांच्या अब्रूला तर काही किंमत नव्हती. सरदार, वतनदार, देशमुख यांच्यासाठी गरिबांच्या लेकीसुना हव्या तेव्हा उपभोगाच्या वस्तु
झाल्या होत्या. दाद कुणाकडे मागता येत नव्हती. मात्र शिवाजीचा दृष्टीकोण वेगळा
होता. त्यांनी या भोगी सरंजाम व वतनदारावर वाचक बसविण्यास सुरू केले. रांझ्याच्या
पाटलाने जेव्हा दिवसाढवळ्या शेतकर्याच्या मुलीचा उपभोग घेतला व आपली अब्रू गेली
म्हणून तिने आपला जीव दिला. ही बातमी जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा त्या पाटलाला
मुसक्या बांधून दरबारात आणल्या गेले. ज्या हातापायांनी त्याने कुकर्म केले त्याचा
हातापायांना तोडण्याचा हुकूम शिवरायांनी दिला होता. सखूजी गायकवाड यांनी बेळवाडीचा
किल्ला सर केल्यानंतर सवित्रिबाई देसाई या किल्लेदारीवर बलात्कार केला तेव्हा
शिवरायांनी सखूजी गायकवाडाचे डोळे काढून मरेपर्यंत जेल मध्ये ठेवले. त्यांनी आपला
सरदार व नातेवाईक म्हणून कोणाचीच गय केली नाही. स्त्रियांच्या इज्जत कायम राहिली
पाहिजे ही त्यांची भूमिका होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून “आपलीही आई
एवढी सुंदर असती तर किती बरे झाले असते” असे उद्गार काढणारे शिवराय
चारित्र्यसंपन्न व निरोगी दृष्टीचे होते याची कल्पना येते. आजचे राज्यकर्ते
बलात्कार्यांना वाचविण्याचा व त्यांना सन्मान
देण्याचा जेव्हा प्रयत्न करतात आणि तेच शिवरायांचे
नाव घेत घोषणा देतात तेव्हा ते कीती लबाड आहेत याची प्रचिती येते.
शिवरायांनी
आपल्या रयतेची फार काळजी घेतल्याचे बघायला मिळते. स्वराज्य रक्षणाच्या कार्यासाठी
सुध्दा रयतेला त्रास होवू नये याची सक्त ताकीद दिल्याच्या सूचना त्यांच्या
आज्ञापत्रात बघायला मिळतात. गुलामांच्या व्यापारास बंदी घालून त्यांनी शेतकर्यांच्या
संपतीची व शेतीची काळजी घेण्याच्या सूचना आपल्या सैन्याला दिल्या होत्या. त्यांनी
भुदासावरील अमर्याद हुकमत बंद करून
प्रत्येकाला कसायाला जमीन, कुळाला स्थिरता, प्रत्यक्ष पैदा केलेल्या पिकावरच कर आकारणी, शेतकर्यांच्या
उत्पन्नावर वतनदाराचे हक्क त्यांनी त्यांनी नष्ट केले होते. शिवरायाचे असे हे शेतकरीविषयक
राज्यधोरण होते.
शिवराय इतर मराठा
सरदाराप्रमाने मोगल सेनेचे कधीही मांडलिक बनले नाहीत. वारसा हक्काने ते राजे बनले
नव्हते तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये
व कुशल संघटक होते. पण आज शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास सांगून शिवरायाच्या
प्रखर बुद्धीला व पराक्रमाला नाकारीत आहेत. शिवरायद्रोह करणारी ही दांभिक माणसे
शिवरायाच्या यशाचे श्रेय अध्यात्म, तथाकथित भवानी देवी व भवानी तलवारीला देत आहेत.
शिवाजी महाराजाना भवानी प्रसन्न झाली म्हणून ते यशस्वी झाले असे म्हणू लागले
आहेत. शिवरायाबद्दलचा हा किती खोटा विपर्यास? वस्तुस्थिती
अशी आहे की, भवानी तलवार म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार परदेशी व पोर्तुगीज
बनावटीची होती.
युध्दाचे सावट ओसरून
राज्यभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती देण्याचे पर्व सुरु केले
होते. पण सनातनी लोककडून विरोध झाला. तेव्हा
महाराजांनी “ब्राम्हण म्हणोनी कोण मुलाहिजा करणार नाही” अशी त्यांना सक्त ताकीद
दिली होती. हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवरायांना मिरवू पहाणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये
की, याच हिंदू धर्माने व त्यांच्या रक्षकांनी शिवरायांना शुद्र मानून त्यांच्या
राज्यभिषेकाला विरोध केला होता. शिवरायांवर विजय
कसा मिळवावा? या चिंतेत मिर्झा राजे जयसिंग असताना इथल्या शिवराज्यद्रोहीनी त्याला देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता.
एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्यूघंटा वाजवीत होते तर दुसरीकडे
महाराष्ट्रातील भिक्षुकशाही शिवरायांना बेजार करून मोगलशाहीचे मरण लांबणीवर टाकण्यास
षडयंत्र रचित होती. ज्यांच्याकडे तलवारीची, सत्तेची व भिक देण्याची
ताकद असायची त्याच्याकडे लोक वळत असत.
शिवरायांच्या चारित्र्यात धार्मिक संघर्षाला
कोणतेही स्थान नव्हते. त्यांना आयुष्यभर ज्या वतनदाराविरुध्द लढावे लागले ती नुसती
केवळ त्यांच्या धर्माचीच नव्हे तर सगेसोयरेसंबंधातील होती. औरंगजेबाच्या फौजेत
लाखाने हिंदू सैनिक होते. ते सैनिक जर धर्मप्रेमी असते तर त्यांनी शिवरायाच्या
विरुद्ध औरंगजेबाला साथ दिली असती का? औरंगजेबाने मराठ्याबरोबरच मुस्लीम असलेल्या
आदिलशहा व कुतुबशहा यांचे राज्यसुध्दा नष्ट केले. येथे औरंगजेबाचे सुध्दा मुस्लीमप्रेम
दिसत नाही. त्यामुळे शिवरायांच्या
संघर्षाला धर्माचा आधार देवून त्यांच्या नावाने दुसऱ्या धर्माच्या विरोधात द्वेष
पसरविणे चुकीचे आहे. सामान्य लोकांनी बेजबाबदार लोकांचा हा कावा ओळखला पाहिजे. आज अनेक संस्था आणि सत्संगबाबा शिवरायांना आपल्या विचाराचे शस्त्र म्हणून वापरण्यास सज्ज झाले आहेत. शिवरायांच्या
मावळ्यांनी वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांना शिवरायाच्या
प्रतापाची व त्यांच्या कार्याची सतत आठवण ठेवावी लागेल.
बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment