भारताच्या सार्वभौम उभारणीमध्ये ज्यांचे मोठे योगदान आहे, ज्यांनी या देशाला सूत्रबध्द ठेवण्यासाठी राज्यघटना लिहिली, ज्याने “मी प्रथमत: भारतीय व अंतिमत: भारतीयच” अशी घोषणा करून या मातीत जन्मास आलेला बौध्द धर्म स्वीकारला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष काही घटक करताना दिसतात. याच द्वेषातून त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याच्या घटना आणि काही संस्था वा जिल्ह्यांना त्यांचे नावे देण्यास होत असलेल्या विरोधाच्या घटना घडताना दिसताहेत. डॉ. आंबेडकरांचे पुतळे उभारणे व संस्थांचे नामकरण करणे हे सरकार आणि सामाजिक संस्थाकडून होत असते. स्वातंत्र्यानंतर भारत संविधानाच्या माध्यमातून मुलत: प्रोग्रेसिव्ह विचाराचा देश म्हणून उदयास आला असला तरी त्याच्या गर्भसंस्कृतीमध्ये जातीयवाद, वर्णव्यवस्था व उचनीचपणाचे उदात्तीकरण आतल्या आत होत आल्याचे दिसून येते. बौध्द-जैन व लोकशाहीवादी पाश्च्यात्य संस्कृतींनी दिलेली सहिष्णुता, समानता व मानवतावादाला तिलांजली देण्यात येवून त्याऐवजी दंडेलशाहीचा उदय झाला असल्याचे दिसते.