Wednesday, June 1, 2022

डॉ. आंबेडकरांचा द्वेष हि एक रोगट मानसिकता

 

भारताच्या सार्वभौम उभारणीमध्ये ज्यांचे मोठे योगदान आहे, ज्यांनी या देशाला सूत्रबध्द ठेवण्यासाठी राज्यघटना लिहिली, ज्याने “मी प्रथमत: भारतीय व अंतिमत: भारतीयच” अशी घोषणा करून या मातीत जन्मास आलेला बौध्द धर्म स्वीकारला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष काही घटक करताना दिसतात. याच द्वेषातून त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याच्या घटना आणि काही संस्था वा जिल्ह्यांना त्यांचे नावे देण्यास होत असलेल्या विरोधाच्या घटना घडताना दिसताहेत. डॉ. आंबेडकरांचे पुतळे उभारणे व संस्थांचे नामकरण करणे हे सरकार आणि सामाजिक संस्थाकडून होत असते.  स्वातंत्र्यानंतर भारत संविधानाच्या माध्यमातून मुलत: प्रोग्रेसिव्ह विचाराचा देश म्हणून उदयास आला असला तरी त्याच्या गर्भसंस्कृतीमध्ये जातीयवाद, वर्णव्यवस्था व उचनीचपणाचे उदात्तीकरण आतल्या आत होत आल्याचे दिसून येते. बौध्द-जैन व लोकशाहीवादी पाश्च्यात्य संस्कृतींनी दिलेली सहिष्णुता, समानता व मानवतावादाला तिलांजली देण्यात येवून त्याऐवजी दंडेलशाहीचा उदय झाला असल्याचे दिसते

डॉ. आंबेडकरांनी न्याय हक्काची मागणी करीत विषमता, अन्याय, जुलूम व जबरदस्ती या विरोधात आवाज उठविला. त्यांना तथागतीत समाजाने छळले तरीही त्यांनी गांधीचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या लाखो बांधवाचे नुकसान करीत पुणे करारावर सही केली. व्हॉइसरॉयच्या "एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिल‘चे सदस्य असतानाच्या काळात सिंचन व ऊर्जा धोरणाचा पाया घातला. डॉ. आंबेडकरांच्या नियोजन व दूरदृष्टीमुळंच तत्कालीन महत्त्वाचे मोठे जलप्रकल्प (दामोदर, हिराकुड, सोने, कोसी) कार्यवाहीत आले. ऊर्जावाटपासाठी ग्रिड पद्धतीचा विचार, भारतीय स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल, महिलांना बाळंतपणाची रजा व सवलती, समान कामाला समान वेतन (पुरुष व स्त्रिया), अ‍ॅप्रंटिसशिप कायदा, फॅक्टरी कायदा, बोनस, पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादींचा समावेश करून ते कामगारांच्या बाजूने उभे राहिले. भारतीय रिझर्व बँकची स्थापना, संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाजवाद व धर्मनिरपेक्षता रुजविण्यात व  ओबीसी, मागासवर्ग आणि आदिवासी यांच्या उत्कर्षात त्यांचा मोठा सहभाग होता.

स्वाभिमान, मानवी हक्क व समानतेचे प्रतिक म्हणून बाबासाहेब आंबेडकराकडे बघितले जाते. त्यांच्या या कार्यकर्तुत्वाचा आदर व्यक्त करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी त्यांच्या नावे संस्था, जिल्हे निर्माण करीत त्यांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु असंतुलित विचाराच्या काही लोकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना व त्यांच्या नावाला विरोध करण्याचा घाट घातल्या गेला आहे. यामागे निश्चितच एका विचारधारेचा प्रभाव व आंबेडकरांच्या भूतकालीन कार्यामुळे त्यांच्या अढळ स्थानाला पोहोचत असलेली असुरक्षिततेची भावना आहे. वाढीस लागलेल्या या द्वेषभावनेतून  त्यांच्या पुतळ्यांची तोडफोड होत आहे. तोडफोडीच्या घटना ह्या मुख्यत: उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यात अधिक संख्येने झालेल्या आहेत. मे, २०२२ मध्ये आंध्र प्रदेशातील कोनासिमा या जिल्ह्याचे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोनासिमा” जिल्हा असे नामांतर करण्यात आले. या नामांतराचा विरोध करीत मागास व सवर्ण जातिकडून अमालपुरम गावामध्ये जाळपोळ व हिंसा करण्यात आली. त्यात आमदार व मंत्र्याच्या घराला लक्ष्य करण्यात आले. अशाच प्रकारचा विरोध महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरन “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे करण्यासाठी झाला होता. मराठा महासंघ, शशिकांत पवार, गोविंदभाई श्राफ व शिवसेना या चौकडीने तेव्हा अख्खा मराठवाडा पेटविला होता.  उत्तर प्रदेशातील सहारनपुर जवळील शब्बीरपूर येथे ठाकूर व दलित यांच्यात २०१७ मध्ये संघर्ष झाला. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंतीला उत्सवाचा भाग म्हणून शब्बीरपूर येथे आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापणा करण्यात आली. पुतळा व मिरवणूकीवर ठाकूर समाजाकडून आक्षेप घेण्यात आला. ठाकुरांनी जेव्हा राणा प्रताप यांची मिरवणूक काढली त्यावर वंचित जातींनीही समान आक्षेप घेतला. यातून दंगे होत ठाकूरानी दलिता विरोधात हिंसाचार केला. घरे जाळण्यात येवून हत्याही करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दंगलीतून उत्तर प्रदेश पोलिसांची दलितविरोधी मानसिकता दिसून आली. पोलिसांनी दलितांच्या वाहनाची व घरांची नासधूस केल्याच्या चित्रफिती बघावयास मिळाल्या.

या व्यतिरिक्त डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांना दगड मारणे, काळे फासणे व उखडून फेकणे यासारख्या घटना घडत आहेत. त्यापैकी काही ठळक घटनामध्ये गुजरात येथील भावनगर जिल्ह्यातील सिहोर गावात पुतळ्याला बादलीने झाकण्यात येवून भोवताल दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या. महाराष्ट्रात मोर्शी तालुक्यातील रीद्दपूर गावात व त्रिपुरातील विधानसभेच्या विजयानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील मवाना गावामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तामिळनाडूमध्ये नागाय वेदरम्यण येथे भर दिवसा अनेकांच्या उपस्थितीमध्ये झुंडीने चक्क तलवारीने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली गेली. देशात पुतळा विटंबनेच्या अनेक अज्ञात घटना घडताहेत कि ज्यांची कधीच रिपोर्टिंग होत नाही किंवा उच्च जातींच्या भीतीमुळे वंचित गटाकडून तक्रारी करण्यात येत नाहीत. यास भूमिहीनतेतून आलेले आर्थिक अवलंबित्व कारणीभूत असून भूदान व पडीक जमिनीच्या  पट्टेवाटपाची थांबवलेली प्रक्रिया सुरु होणे अगत्याचे आहे.   

खरे तर, आंबेडकरांचे पुतळे हे मूर्तीपूजेचे स्तोम नसून ते स्वाभिमान जागृत ठेवण्याची जाणीव करून देतात. राजकारणात आपले स्थान शोधणे आणि सामाजिक व धार्मिक अधिकाराप्रती सजग राहण्याची दृष्टी देत असतात. वंचित वर्ग त्यातून आपला उत्कर्ष, अधिकार, सन्मान व विकासाच्या गुरुकिल्लीचा विचार शोधत असतात. ज्या जातींनी वर्षानुवर्षे धर्मनियमांच्या आडून वर्णव्यवस्थेनुसार इतर समाज घटकावर वर्चस्व गाजविले, त्या जातीमध्ये वंचित वर्गाच्या समानतेच्या मागणीमुळे आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वर्चस्वाला धक्का पोहोचत असल्याची जाणीव निर्माण झाली आहे. हि भीती केवळ ब्राम्हण वर्गालाच नाही तर जातीच्या उच-नीच अशा ज्या शिड्या आहेत त्या जातशिडयाना सुध्दा आपल्या स्थानाची प्रतिष्ठा जाईल कि काय? याची भीती वाटू लागली आहे. त्यातूनच आंबेडकरावरील द्वेषभावनेचे प्रसूतीकरन झाल्याचे दिसते.

वंचीताना इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या हेतूने संविधानामध्ये आरक्षणाची करण्यात आलेली तरतूद किंवा जातीव्यवस्थेतील उच-नीचता यामुळे कोणी डॉ. आंबेडकरांचा द्वेष व त्यांच्या पुतळ्यांची विटंबना विरोध करीत असतील तर असे लोक रोगट व क्रूर मानसिकतेचे बळी आहेत असेच म्हणता येईल. कारण अशा लोकांनी इतिहास व समाजाच्या वास्तव परिस्थितीकडे डोळेझाक केलेली असते. लोकसंख्येची जातीनिहाय संख्या बघता  सरकारी नोकऱ्या, धर्माच्या क्षेत्रात असलेले प्राबल्य, खाजगी व उद्योग क्षेत्रातील मक्तेदारी यातील जातीनिहाय प्रमाण शोधून त्याची वंचित वर्गासोबत तुलना केल्यास कोणत्याही विरोधाला जागा उरणार नाही. उलट देशावर एकाच सवर्ण  जातीचे प्राबल्य असल्याचे उघड होईल. 

आपले अधिकार व समतेचा विचार करणार्यांची संख्या आता एका जातीपुरती मर्यादित राहिली नसून ती अमर्याद होत आहे. त्यामुळे मानवी हक्क व अधिकाराची जाणीव करून देणाऱ्या आंबेडकरांचा विरोध करण्याची कृती सामाजिक विस्फोट घडविणारी ठरू शकते. म्हणूनच समता व मानवी हक्क विरोधी व्यक्ती व संस्थांनी आपले रोगट मन बदलविणे व परिवर्तनवादी भूमिकेचा स्वीकार करणे फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात होणार्या  फेरबदलाच्या झळीचे चटके त्यांनाच अधिक बसू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. 

 

लेखक: बापू राऊत


1 comment: