देव, अल्ला आणि गॉड कुठे
आहेत? ते कसे आहेत? दिसतात कसे? यांना
कोणीही पाहिले नसते, परंतु माझी ती आस्था (भावना) आहे आणि माझा
त्यावर विश्वास आहे. असे देवाला मानणारी व्यक्ती म्हणत असते. भावनेवर
विश्वास असणे म्हणजे
नक्की काय? याचे उत्तरही कोणाकडे नसते. अभ्यास न करता केवळ
देवावरच्या आस्थेने आयएएस ची परीक्षा पास झालेला व्यक्ती न सापडण्यासारखी भावनेची
स्थिती असते. खोटं बोलणं सोपं असतं, पण
खरं बोलायला हिंमत लागते. जगातील प्रत्येक धर्म ईश्वराशी संबंधित आहे. परंतु जगात
असे काही धर्म आणि लोक आहेत, कि ज्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास
नाही. तोच देव आज कुणाची वैयक्तिक मालमत्ता बनला आहे.
स्वार्थासाठी त्याला कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनवले गेले आहे.
श्रद्धेची हि स्थाने "बार्गेनिंग आणि
लुटमारीची" केंद्रे बनली आहेत. पण पुण्य आणि पापाच्या
भीतीने लोक गप्प बसतात. येथे चिकित्सक व तर्कवान बुद्धीची उपज होवूच देवू नये याची
खबरदारी धर्माच्या ठेकेदारांनी घेतलेली आहे.
जुन्या काळी लोक सामाजिक व धार्मिक गुलामगिरीचे
जीवन जगत होते. राजा आणि प्रजेला भय, ब्रह्मांड आणि स्वर्ग-नरकाच्या
गोष्टी सांगून देवाच्या नावाने एका वर्गाने आपले
वर्चस्व प्रस्थापित केले. विधीप्रथा प्रस्थापित झाल्या. राजा आणि प्रजा धर्माचे
गुलाम झाले. देवाचे पुजारी व स्वत:स उच्च समजणारे लोक धर्मनियम व अंधश्रद्धेचा
फायदा घेऊन अज्ञानी लोकांची लूट करत असत. त्यांना धर्म शास्त्राचा धाक
दाखवून कडक नियमात बंदिस्त करून टाकले होते. अशावेळी गौतम
नावाचा एक तरुण आशेचे केंद्र बनतो. नंतर त्यालाच “तथागत गौतम
बुद्ध” म्हटले गेले. हा तोच
राजपुत्र होता, ज्याने
"सत्याचा शोध" घेण्यासाठी आपली वैयक्तिक संपत्ती आणि
राजेशाहीचा त्याग केला
सनातनी परंपरा, दैववाद आणि कर्मकांडांच्या चढत्या कार्यकाळात बुद्धाने आपले विचार आणि कार्येप्रणाली राजा आणि जनतेसमोर ठेवली. त्याने आपल्या भौतिकवादी विचारांनी विश्वाची निर्मिती आणि ईश्वराचे अस्तित्व नाकारले. आत्मा
आणि पदार्थ यांचे संदर्भ समजून घेण्यासाठी बुध्दाला कोणत्याही दैवी शक्तीच्या
हस्तक्षेपाची गरज दिसली नाही. तथागत बुद्ध हे ईश्वर व स्वर्ग-नरक यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवर शांत राहून देव, आत्मा आणि इतर जगाचे अस्तित्व नाकारत होते. देव व आत्मा या प्रश्नावर बुध्द
मौन का राहतात? यातून बुद्धाला काय सांगायचे होते? बुद्धाच्या विचारांवरून त्यांचा उद्देश अलौकिकता आणि ईश्वराच्या अस्तित्वावर अविश्वास व्यक्त करण्याचा होता. त्यांनी आपल्या शिष्यांना आवाहन
केले की, अशा अनिश्चित प्रश्नांशी स्वत:ला जोडले जाणे म्हणजे स्वत:च्या
आत्मशक्तीचा छळ करणे होय. बुद्धांचा असा विश्वास होता की, असे प्रश्न एकतर आत्मनिर्भरतेच्या मजबूत भावनाना कमकुवत करतात किंवा नष्ट करतात. देवाचे
भय हे मनाच्या उत्साहाला निराशेत रुपांतरीत करते.
बुद्धाने मध्यम मार्गाचा संदेश दिला. त्याने देवाच्या
अस्तित्वाविरुद्ध अनेक तर्क मांडले. बुद्ध हे नास्तिक नव्हते. तर ते आस्तिक होते कारण त्यांचा भौतिकतेच्या अस्तित्वावर विश्वास होता.
नास्तिक ते आहेत, जे भौतिकवाद नाकारतात आणि कल्पनेच्या
स्वप्नांमध्ये वास्तव शोधतात. बुध्द हे कल्पना व भावनांना पुरावा न मानता कोणतेही ठोस पुरावे व वास्तव वस्तुस्थिती शिवाय कोणत्याही व
कोणाच्याही अस्तित्वाचा दावा मान्य करत नाहीत. म्हणूनच बुद्धाला भौतिकवादाचा जनक
म्हटले जाते. "सत्याचा शोध" ही त्यांच्या विचारांची निर्मिती आहे.
त्यांचा आस्तिकवाद हा भौतिक तत्त्वज्ञानाचा आरसा होता.
बुद्ध म्हणायचे, देवावर विश्वास ठेवणे अप्रस्तुत आहे. बुद्धाने नेहमीच
दुःखापासून मुक्तीच्या व्यावहारिक समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला
आणि आत्मविश्वासपूर्ण चर्चांवर भर दिला. त्यांनी व्यावहारिक कार्यक्रमासाठी किमान
सैद्धांतिक आधार तयार केला होता. देवाला त्यांच्या सिद्धांतात स्थान नव्हते. साहजिकच, त्यांच्या अनुपस्थितीत शिष्यांनी आणि जनतेने आपली वेळ आणि शक्ती वाया घालवावी हि त्यांची कधीच इच्छा
नव्हती.
"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
ही बुद्धाची घोषणा सर्वश्रुत आहे. कोणत्या परिस्थितीत त्यांनी हा नारा दिला असेल? विचार करा, त्यावेळी समाजातील एका मोठ्या
वर्गाचे शोषण करणारी संस्था जिवंत असेल आणि बहुसंख्य त्यांचे गुलाम झाले असतील.
शोषणाच्या या परिस्थितीसाठी तथागतांनी "अविद्या" ला दोष दिला. आणि
त्यावेळच्या बलाढ्य धर्मशास्त्रीय संस्थेच्या विरोधात एक शक्तिशाली चळवळ उभारून
त्यांनी बहुजनांना मुक्तीचा मार्ग दाखवला.
थेरीगाथामध्ये सुनीता नावाची एक स्त्री म्हणते, मी एका धार्मिक व नम्रशील कुटुंबातील होते, मी धर्म पाळत असे, पण लोक माझा तिरस्कार करीत असत, एके दिवशी बुध्द भिक्खू संघासोबत मगधला जात होते, मी धाडसाने त्यांच्या मागून धावत गेले आणि बुद्धाला नमस्कार करीत संघात सामील करण्याची विनंती केली. त्यांनी नम्रपणे विचारपूस केली आणि संघात सामील करून घेतले. आता मला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. दुसरीकडे
कोसलची ब्राह्मण कन्या मुट्टा, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर
म्हणते, "आज मी पुनर्जन्म, भय आणि मृत्यूच्या विचारांपासून मुक्त आहे. तीच सुमंगलमत्ता म्हणते, मी आता माझ्या स्वातंत्र्याचे
गाणे गात आहे. मी सनातनी परंपरेपासून मुक्त झाली आहे. मी माझ्या क्रूर
माणसापेक्षाही चांगल्या ठिकाणी आहे. ह्या सर्व गोष्टी काय सांगून जातात, तर त्याकाळी दडपशाहीची उंची किती भयानक वाढली होती हे दर्शवितात. जग हृदयहीन झाले होते. . बुद्धाच्या विचाराने लोकांमध्ये समानतेची बीजे पेरून सत्य व वास्तव वस्तुस्थितीचा प्रसार केला.
बुद्धाने दुःखाची कारणे शोधून काढली. ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आणि लोकांना
मुक्तीचा मार्ग सांगितला. बुद्धाने दुःखाचे मूळ "अविद्या" असे वर्णन
केले आहे, जे केवळ ज्ञानच दूर करण्यास
सक्षम आहे. यासाठी त्यांनी चार अलौकिक सत्ये सांगितली आहेत, त्यातील पहिले सत्य आहे "सर्वत्र दु:ख आहे".
दु:खाची कारणे शोधल्यावरच कोणतेही दु:ख दूर होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांनी
दुसरे सत्य सांगितले आहे, ते म्हणजे ‘दु:खाचेही कारण आहे’. त्यांनी "तृष्णा" हे दुःखाचे मुख्य कारण
सांगितले. बुद्धाने
तिसरे सत्य सांगितले, "दु:ख नष्ट होऊ शकते".
बुद्ध दु:खाच्या मुक्तीसाठी सुलभ आणि व्यावहारिक मार्ग सुचवतात, ज्याचे पालन केल्याने दुःखातून मुक्ती मिळू शकते. म्हणूनच
बुद्धाने चौथ्या मूलभूत सत्याला "दुःखांच्या समाप्तीचा अष्टमार्गी मार्ग" म्हटले आहे. त्यात सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति आणि सम्यक समाधी अशा आठ
मार्गाचा समावेश आहे. अशा प्रकारे बुद्ध लोकांना
आशावादी होण्याचा मार्ग दाखवतात. इतकेच नव्हे तर तथागत शिल, समाधी आणि प्रज्ञा देखील देतात आणि सांगतात की पापापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे शीलेचे जतन होय, चिंतनाची एकाग्रता ही समाधी पासून मिळते तर प्रज्ञा (बुद्धी) ही सकारात्मक आणि नकारात्मक यांच्यातील समानतेची हाक देते. तथागताच्या या तत्वामध्ये
सहिष्णुता आणि त्यावरील अंमलबजावणी दिसून येते, जिथे ईश्वराचे स्थान पूर्णपणे शून्य आहे.
बुद्धाची शिकवण ही साधी जीवनपद्धती आहे. जिथे चमत्कारांना
स्थान नाही. बुद्ध म्हणतात की, मोक्ष व चांगले जीवन मंत्रांनी मिळत
नाही. पूजन केल्याने कोणीही धनवान आणि संकटांपासून मुक्त होऊ शकत नाही. देवाच्या
अनुपस्थितीचे पुरावे अजूनही आहेत. फरक एवढाच आहे की त्याकडे उघड्या डोळ्यांनी आणि शून्यातून बघितले पाहिजे. विचार केला पाहिजे, देव आहे तर मंदिरांच्या चेंगराचेंगरीत माणसे का चिरडली
जातात? देवाची मंदिरे, चर्च आणि मशिदींमध्ये चोरी का होते? देवासमोर बलात्कार का होतो? जर देव विघ्नहर्ता असेल तर लोकांच्या पाठीमागे विघ्न का
आहेत? जर पूजेने समृद्धी येते, तर लोक गरीब आणि उपाशी का आहेत? देव सर्वांना समानतेने पाहतो तर मग समाजात द्वेष का? बुद्ध एका ब्राह्मणाला म्हणाले, जर मंत्र आणि उपासनेत एवढी ताकद आहे तर मी नदीच्या या काठावर बसलो आहे, तुमच्या मंत्रांनी मला आपोआपच नदीच्या दुसऱ्या काठावर घेऊन जावे. मग तो ब्राह्मण उत्तर न देता बुद्धाचा
शिष्य बनला.
तथागत गौतम बुद्धांनी निर्माण केलेले “विचार आणि नियम" यांनाच "बुद्धाचा धर्म" असे म्हटले जाते. बुध्द हे जगातील पहिले शास्त्रज्ञ आणि प्रशासन गुरू होते. देव, धर्मांधता, धर्मशास्त्रे, कल्पना, कर्मकांड, सनातनी परंपरा आणि शोषण यापासून मुक्त होण्यासाठी आणि ईश्वराला बाजूला सारून
जगात समता व मानवता रुजविण्यासाठी बुद्धाच्या विचारांचा अंगीकार करण्याची आज नितांत गरज आहे. अत्त दीप भव म्हणजे
स्वत:च्या विकासासाठी ज्ञानाने स्वत: लाच स्वयंप्रकाशित केले
पाहिजे.
लेखक: बापू राऊत, मुंबई
Very nice.👍👌✌️❤️🌹🙏🏻
ReplyDeleteVery very nice thought 🙏
ReplyDeleteThanks for appreciation
Deleteअगदी बरोबर आहे 🙏
ReplyDeleteThanks for appreciation
DeleteTrue, Let us try our best to influence at least our family & friends to get rid of notion of superficial concept of God
ReplyDeleteThanks, yes, I am trying my best level to influence my surrounding people as well
Deleteशेवटी अत्त दिप भव .स्वतः च्या ज्ञानाणे स्वतः चा विकास केला पाहिजे. कोण काय करते,कोणी काय केले. इतिहास हा बदल घडलेल्या विचारांचा असतो.आणि इतिहासामध्ये भर घालण्यासाठी महापुरुषांच्या विचारावर चालण्याचे धाडस आंगीकारावे लागते. ते आपल्या विचारातून दिसते आहे.कोण काय करते ह्यापेक्षा आपण काय केले पाहिजे.की ज्या पासून समाजाचे हित होईल..हे आपण जर प्रत्येकाने समजून घेतले तर आपल्या भावी पिढ्या सुखाने व आनंदाने जगू शकतात.एवढी ताकत आहे बुद्ध विचारात.योग्य संदर्भासह मांडणी केली. राऊत सर अभिनंदन 👍👍
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteछान लेख
ReplyDeleteआज मी पुर्नजन्म आणि भय या पासून मुक्त आहे असे एक त्थेरी म्हणते. याचा अर्थ काय? पंचशिल अष्टशिल पालन का करायचे? शिल समाधी पञ्ञा याचा दैनदिन जीवनात काय संबंध आहे?
ReplyDelete