Tuesday, November 14, 2023

संस्कृत भाषा भारताच्या पाली प्राकृत पेक्षा जुनी कशी ठरेल?


भारताची मूळ भाषा कोणती? यावर बरेच वादविवाद झडत असतात. भारतात प्राकृत, द्रविड, मुंडा, संस्कृत आणि अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत. यापैकी मूळ भाषा कोणती? या वादामध्ये काही तथाकथित धर्मवादी व संघीय विचारधारेचे लोक संस्कृत हीच या देशाची मूळ भाषा असून इतर भाषांची निर्मिती संस्कृत पासून झाली असा सूर लावीत असतात. यामध्ये तथ्यात्मक पुराव्यावर लक्ष न देता भावनात्मक पुळका आणून आपल्या “इतिहासकार” या पेशासी इमान न राखणाऱ्या काही तथाकथित इतिहासकारांचा समावेश आहे. “आम्हाला पुराव्यांचे व तथ्यात्मक वस्तुस्थितीसी काही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तोच इतिहास, आम्ही जे म्हणतो तेच खरे” असे सांगणारा एक समूह भारतात आहे. वास्तविकता असे लोक ठग, भांड, षडयंत्रकारी, विभाजनकारी व  वर्चस्ववादी मनोवृत्तीचे असतात. त्यांच्यावर अनेक लोक विश्वास टाकून तेच सत्य आहे असे मानायला लागतात परंतु तो एक “असत्य व कुटनीतीचा”  मोठा ढिगारा असतो. यातून देशाचे समाजस्वास्थ्य बिघडण्याचे मोठे धोके असतात

भारतात १३ व्या शतकात अरेबियन लोकांच्या आगमनानंतर उर्दूचा पाया घातला गेला. त्याच प्रकारे इ.स.पूर्व ६ व्या शतकाच्या  काळापर्यंत इराण मधून आलेल्या लोकांचे साम्राज्य उत्तर-पश्चिम भारतात (गांधार व पंजाब प्रांत) स्थापन झाले. इराणी साम्राज्यातून आलेल्या लोकांची भाषा संस्कृत होती. तर त्या प्रदेशातील स्थानिक लोकांमध्ये प्राकृत पाली भाषा प्रचलित होती. अनेक अडथळे व वर्षांच्या घुसळनीतून भाषेचा विकास होत जात त्यातून अभिजात साहित्याची निर्मिती होत जाते. म्हणून आजची संस्कृत हि इराणी संस्कृत व प्राकृत पाली भाषा यां दोघांची मिश्र भाषा असल्याची अनिवार्यता स्वीकारावी लागते. परंतु काही मंडळी हे स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांचा स्वप्नातच घोडे मारण्याचा प्रयत्न आजतागायत चालू आहे. त्यांना तसे करावेच लागते. कारण ज्या भारतात संस्कृतचा ठराविक कालखंडात जन्मच झाला नसल्यामुळे त्यापूर्वीचे ठरविले गेलेले व प्राचीन साहित्य असल्याचा उठाठेवपणा करणार्यांचे बिंग बाहेर येवू शकते. त्यांचे साहित्य फार पुरातन नसून अलीकडचे अर्वाचीन आहे हे सिद्ध होते. म्हणूनच त्यांचे  साहित्य अर्वाचीन असल्यामुळे आणि त्यातील घटनांचा वास्तव स्थितीसी कुठलीही साम्यता जुळत नसल्यामुळे आपोआपच ते काल्पनिक ठरून त्यांनी येथील पुरातन वास्तूवर केलेले कब्जे अवैध ठरतात.  

वेदांची भाषा संस्कृत ही इराण मधील अवेस्ता ग्रंथाच्या भाषेशी इतकी मिळतीजुळती आहे की, अवेस्तातील अनेक श्लोक थोड्याफार बदलांनी वेदांचे श्लोक बनतात. जसे अवेस्ताचे   भाग आहेत, तसेच  वेदाचेही ४ भाग आहेत. म्हणजेच अवेस्ता म्हणजे वेद आणि वेद म्हणजे अवेस्ता. अशी स्थिती दिसून येतेआजचे युग हे  आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचे आहे. पूर्वीच्या काळात कल्पनेत व झोपेतील स्तवप्नात सुचलेल्या कथाना लिहून  समाजात खऱ्या गोष्टी म्हणून प्रसारित करणार्यांचे व त्यालाच इतिहास म्हणवून घेणाऱ्या संस्थांचे बिंग नवीन तंत्रज्ञान बाहेर काढून सत्य सांगण्याचे काम करीत आहे. भारतीय इतिहासकार व भाषा वैज्ञानिकानी धर्ममार्तंडाच्या सोंगाना बळी पडून संस्कृत भाषेला सत्ययुगाची  सर्वोत्तम प्राचीन भाषा असल्याचे घोषित केले. खरे तर हा एक फार मोठा बौद्धिक भ्रष्टाचार आहे. भाषा चांगली असली कि तिचा विकास होत ती सर्वांची भाषा बनत असते. परंतु येथे उलट झाले असून संस्कृत ही केवळ जुन्या पुस्तकापुरती मर्यादित असून दुसर्याच भाषा प्रगत होत त्या भाषांनी जनतेला आपल्याकडे आकृष्ठ केले आहे. यावरून संस्कृत ही कोणत्याही काळात महत्वाची व जनसागराची भाषा नव्हती. जे परकीय लोक भारतात येवून स्थाईक झाले त्यांनी आपल्या संस्कृत भाषेत पुस्तके लिहली. वेद, पुराणे व उपनिषदे या पुस्तकांची उत्पत्ती यातूनच झाली. 

काही लोक संस्कृतला देवभाषा ठरविताना दिसतात. परंतु फारसी भाषेत असलेले जुने पुस्तकशाहानामा”(१०१० ई.) मध्ये फिरदौसी यांनी देव कोण होते?  हे सांगितले आहे. ते म्हणतात, देव हे एका काबिल्याचे नाव असून ते घोड्यावर स्वारी करीत असत. ते आक्रमक वृत्तीचे असून मुलींचे अपहरण करीत.  आजही फारसी शब्दकोशात देव शब्दाचा अर्थ राक्षस, लंबाचौडा माणूस आणि नरभक्षी असल्याचे नमूद आहे. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात अनेक लोक व भाषा अस्तित्वात होत्या. त्यामुळे आर्यांबरोबर आलेली संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा कशी होईल? याचा लोकांनी विचार करावयास हवा. यावरून असे म्हणता येते कि, तथाकथित सतयुग हे काल्पनिक कथा रचण्याचा काळ होता तर आजचे कलियुग हे त्या काल्पनिक कथांचे विच्छेदन करून सत्य शोधण्याचे आहे. 

ज्या इतिहासकार व भाषाज्ञानवंतानी संस्कृत भाषेसंदर्भात खोटे सांगितले, ते सिध्द करण्यासाठी परत त्यांना वारंवार खोटे बोलावे लागत आहे. काही देशी व विदेशी भाषा वैज्ञानिकानी मान्य केले आहे कि, भारतीय भूभागाना जी नावे दिलेली आहेत, ती निषाद, मुंडा व कोलो  या समूहांनी दिली आहेत. कारण प्राचीन काळात या भूभागावर त्यांचाच कब्जा होता. भाषेला स्थलवाचक दृष्टिकोनातूनही बघता येते. जसे गुजराती गुजरातची भाषा, तमिळ तामिळनाडूची, मराठी महाराष्ट्राची  तशी संस्कृत कोणत्या प्रदेशाची ठरते? पाली प्राकृतला बुद्धकालपूर्व ते मार्यकाळ-सातवाहन पर्यंतचा भूगोल आहे. संस्कृत गौरवशाली व लोकप्रिय भाषा असती तर तिचाही भूगोल व काळ ठरला असता. ती राजभाषा व लोकभाषा होवून संस्कृतमध्ये वर्तमानपत्रे, मासिके, टीव्ही सिरियल्स व सिनेमे निघाले असते. संस्कृत भाषेत चर्चासत्र झाडली असती. 

संस्कृत हि सामान्य जनतेची बोलण्याची भाषा नव्हती. भारतात संस्कृत भाषेवरून कोणत्याही, जिल्ह्याची, गावाची व कसब्यांची नावे ठेवलेली दिसत नाहीत. काही मोजके ई.सना नंतरचे शिलालेख सोडले तर ई.सना पूर्वीच्या कोणत्याही शिलालेखावर संस्कृत भाषा आढळत नाही. काही ब्राम्हण आचार्यांनी संस्कृत वरून पालीचा उदय, पालीवरून प्राकृत तर प्राकृत वरून आजच्या तत्सम भाषा अशी क्रम विभागणी केली आहे. परंतु पालीमध्ये संस्कृतचा कोणताही शब्द नाही. प्राकृत मध्ये सुध्दा संस्कृतचे शब्द आढळत नाहीत. जर संस्कृत पाली पूर्वीची स्थानिक भाषा असती तर संस्कृतचे शब्द हे पाली व प्राकृत मध्ये आले असते. परंतु तसे दिसत तर नाहीच, या उलट आजच्या काही प्रचलित भाषामध्ये संस्कृतचे शब्द आलेले दिसतात. सम्राट अशोकाचे वास्तविक नाव असोक आहे, परंतु संस्कृत साहित्यात अशोक लिहिलेले आहे. म्हणजेच असोक हा मूळ शब्द तर अशोक हा नंतरचा परिवर्तीत शब्द आहे. म्हणूनच पाली प्राकृत आत्मसात करून किंवा भ्रष्ट करून संस्कृतची निर्मिती झाली असे म्हणता येते. यावरून काय निष्कर्ष निघतो? तो हाच कि संस्कृत हि आधुनिक भाषा असून पाली व प्राकृत पुरातन  भाषा आहे.  भाषावैज्ञानिकानी चुकून किंवा धर्म मार्तंडाना भिवून भाषेचा खोटा क्रम लावला. तो त्यांनी सुधारला पाहिजे. त्यांनी आजी (Grandmother) ला माता (Mother) व माते ( Mother) ला आजी (Grandmother)  संबोधणे बंद करून तथ्यात्मक व ठोस आधारावर भाषेचा क्रम लावला पाहिजे.  

मध्ययुगीन काळात सम्राट अशोकाची लिपी एक कोडेच राहिली. फिरोजशहा तुघलकने अशोकाचे दोन मोठे स्तंभ दिल्लीत आणले होते. पण एकही विद्वान तो वाचू शकला नाही. सम्राट अकबरालाही त्या स्तंभावर लिहिलेला अर्थ जाणून घ्यायचा होता. त्यानेही काही संस्कृत आचार्यांना बोलावले परंतु कोणालाही तो शिलालेख वाचता आला नाही. ब्रिटीशर्स विल्यम जोन्सने अशोकाच्या लिपींची प्रत बनारसच्या पंडिताकडून वाचावयास सांगितली. कारण त्या काळात बनारस हे विद्वानांचे शहर म्हणून प्रसिध्द होते. परंतु त्याने हे युधिष्ठराच्या चरित्राचे  वर्णन आहे असे चुकीचे सांगितले. शेवटी जेम्स प्रिन्सेपनी अशोकाचे शिलालेख वाचलेत आणि त्याबरोबरच सम्राट अशोकाचा इतिहास जगासमोर आला. अन्यथा सम्राट अशोक व गौतम बुध्द हे सुध्दा रामायण महाभारतासारख्या काल्पनिक कहाण्यातील पात्र ठरले असते. एच ब्रूनहाफर च्या आधारावर, इतिहासकार जी. ह्यू सिंगने म्हटले आहे की, ऋग्वेदात ज्या राजा कनिता पृथुश्रवांचा उल्लेख केला आहे तो प्रत्यक्षात राजा कनिष्क आहे. स्टॅन कोनोच्या आधारे कंदहार मधून गांधारची निर्मिती झाली आणि गांधारी ऋग्वेदात आहे. कंदहार हे शक-कुशाण कालखंडातील  नाव आहे.यावरून ऋग्वेदाची रचना मौर्य काळानंतर झाली असे म्हणता येते.

राहुल सांकृत्यायन यांनी त्यांच्या 'वोल्गा टू गंगा' या पुस्तकात पुष्यमित्र शुंग किंवा अग्निमित्र यांची रामाच्या रूपात स्तुती केल्याचे लिहिले आहे. जर पुष्यमित्र शुंग राम आहे तर मौर्य वंशाचे बृहदत्त पर्यंत दहा राजे होते. याचा अर्थ पाटलीपुत्र म्हणजेच लंका आहे असे निश्चित होते. कारण पुष्यमित्र शुंग आणि मौर्य राजे यांच्यातील कपटपूर्ण युद्ध पाटलीपुत्रातच झाले होते. मेगास्थेनिसने सोन्याने मढवलेल्या मौर्य राजवाड्याचे कौतुक केलेले आढळते. अशोकवाटिका म्हणजे  पाटलीपुत्र स्थित अशोकराम आहे. पाटलीपुत्रात अनेक चैत्य होते याचा इतिहास साक्षी आहे. रावण हा द्रविडीयन शब्द नाही.  म्हणजेच रावण उत्तर भारतातील परंपरेचे उत्पादन आहे. म्हणजेच रामायण शुंग साम्राज्यानंतर इसवी सनापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात संस्कृतमध्ये लिहिल्या गेले.

.त्याकाळचा गांधार प्रदेश म्हणजेच अफगाणिस्थान व पाकिस्तानचा प्रांत. याच प्रदेशात सम्राट अशोकाचा शाहबाजगढी शिलालेख अस्तित्वात होता. या शिलालेखात धम हा शब्द वापरला असून उत्तर भारतातील सम्राट अशोकाच्या शिलालेखांवर 'धम्म' लिहिलेला आहे. हाच धम्म पुढे ई.सना नंतर रुद्रदमनच्या शिलालेखात संस्कृतमध्ये 'धर्म' बनला आहे. दुसऱ्या उदाहरणात, उत्तर भारतातील सम्राट अशोकाच्या शिलालेखांवर जी 'पियादसि' लिहिले आहे, तेच शाहबाजगढ़ी शिलालेखात 'प्रियद्रशी' लिहिले आहे, वाल्मिकीं रामायणातील संस्कृत ग्रंथात 'प्रियदर्शी असे लिहिले आहे. याचा अर्थ पाली प्राकृतमध्ये 'पियादसी', मिश्रित संस्कृत मध्ये 'प्रियद्रशी' तर शुध्द संस्कृत मध्येसुध्दा 'प्रियद्रशी'. यावरून प्राकृत मधील धम्म व  पियदसी हा पहला तर संस्कृतमधील हे शब्द नंतरचे ठरतात.

ज्याला थोडीफार सामान्य माहिती असेल तो तर म्हणेलच कि, सातवाहानाचे शिलालेख हे इसवी सन पूर्वीचे असून ते प्राकृत मध्ये लिहिले आहेत. परंतु मथुरेतील शक आणि कुशाणांचे शिलालेख हे ख्रिस्तानंतरचे असून मिश्रित संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत. रुद्रदामन आणि समुद्रगुप्ताचे शिलालेख ख्रिस्तानंतरचे असून संस्कृतमध्ये भाषेमध्ये आहेत. संस्कृत जोपर्यंत शुद्ध नव्हती तोपर्यंत ती संमिश्र संस्कृत होती व तिचे व्याकरण प्राकृत होते. म्हणून प्राकृतच्या आधी संस्कृत अस्तित्त्वात असती, तर संस्कृत ही पुरातत्व आणि साहित्य या दोन्हींमध्ये ख्रिस्ताभोवती नव्हे तर ख्रिस्तपूर्व शेकडो वर्षांपूर्वी प्रचलित असती. ख्रिस्तापूर्वी संस्कृत हि अभिजात भाषा नव्हती. म्हणूनच संमिश्र संस्कृत हि पुरातत्व आणि साहित्य या दोन्हींमध्ये ख्रिस्ताच्या काळाच्या आसपास प्रचलित असलेली दिसते. तुम्हाला संस्कृतमधून पाली प्राकृतात जावे लागणार नाही तर पाली प्राकृतातून संस्कृतमध्ये जावे लागेल. म्हणून भाषेच्या संदर्भात एवढी स्पष्टता असूनही संस्कृतला भारताची सर्वात जुनी भाषा म्हणून पुढे आणण्याचा खटाटोप हा एका षडयंत्राचा भाग असून वेद, पुराणे, स्मुर्त्या, रामायण, महाभारत यांचा कालखंड लपविण्याचा धूर्तपणा आहे. कल्पनेतून साकारलेल्या  त्यांच्या साहित्याची  इभ्रत वाचविण्याचा अस्लाघ्य प्रयत्न आहे. तरी, कितीही प्रयत्न केले तरी सूर्याला झाकता येत नाही. त्याच प्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सत्य लपविता येणार नाही. मोहेंजोदारो आणि हडप्पा येथे सापडलेली लिपी अद्याप कोणीही  यशस्वीरित्या वाचू शकले नाही, तर राखीगढ़ीमधील उत्खननात सापडलेल्या महिलेचा डीएनए ५०००-७००० वर्षांपूर्वीचा असल्याचे दर्शवितो. त्यांचीही वेगळी भाषा असू शकते. तरीही संस्कृतला सर्वात प्राचीन भाषा ठरविणे हे एक हास्यास्पदच आहे.

लेखक:बापू राऊत 

No comments:

Post a Comment