Monday, January 15, 2024

श्रीलंकेतील प्रसिध्द पर्यटन स्थान सिगिरिया व कल्पित पुर्वाग्रह


काही प्रसारमाध्यमे व युट्युबर श्रीलंकेच्या जगप्रसिध्द सिगिरिया या ऐतिहासिक पुरातत्व स्थानाचे विविध व्हिडिओच्या माध्यमातुन रावणाची राजधानी म्हणून प्रचार करीत असल्याचे दिसते. काही प्रसारमाध्यमे आवेशपूर्ण विधाने करून सत्य वस्तुस्थिती पासून दूर नेत आहेत. काही गोष्टी आपल्या खास हातोटीने सांगण्याची कला काही लोकांना लाभलेली आहे. परंतु चांगले करण्याऐवजी ते या कलेचा काल्पनिक व खोट्या  गोष्टी सांगण्यात वापर करतात. त्यातूनच मग भारतीयांच्या मनात अधिक गूढता निर्माण करण्यात होते. याच प्रवृत्तींनी भारतीयांना वास्तव स्थिती व स्वतंत्र विचार करण्याच्या क्रियेपासून हजारो वर्षे दूर ठेवले. आजही भारतीयांना भ्रामक अशा काल्पनिक इतिहासात रममाण होण्यास मजबूर करण्यात येत आहे. त्यासाठी खास यंत्रणा व त्यांचे प्रवक्ते  हे काम हिरहिरीने करीत आहेत. 

सिगीरीयातील अदभूत स्मारक व तेथे असणारी उद्याने, जल तलाव, बगीचे यास ते रावणाची खास स्थाने असल्याचे दाखवितात. वास्तविकता श्रीलंका व  तेथील जनतेचा रावणाशी काहीच सबंध प्रस्थापित नाही. श्रीलंकेतील जनतेला रावणाविषयी माहिती विचारल्यास त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. श्रीलंकेतील कोणत्याही पौराणिक वा पुरातात्विक साहित्यात रावणाविषयी काहीही लिहिले गेले नाही. त्यामुळे रावण व त्यासबंधित पात्राचे ऐतिहासिक पुरावे व कालावधीची साक्ष कोठेही मिळत नाहीत.यावरून रामायणातील रावणकथा ह्या भारताच्या काही लोकांच्या सुपीक डोक्याची  उत्पत्ती आहे हे दृष्टीस पडते.

सिगीरीयाचा पूर्वइतिहास

सिगीरीयाला स्वत:चा एक वास्तव इतिहास आहे. सिगिरियातील ऐतिहासिक काळ ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात खडकाच्या पायथ्याभोवती विखुरलेल्या पश्चिम आणि उत्तरेकडील उतारांवर बौद्ध मठांच्या स्थापनेपासून सुरू होतो. सिगिरियामध्ये एकूण ३० आश्रयस्थाने आहेत. खडकात कोरलेल्या देणगी शिलालेखांवरून त्याचा काळ ख्रिस्तपूर्व तिसऱ्या ते पहिल्या शतकातील आहे. खडकातील लेण्या बौद्ध मठांना निवासस्थान म्हणून वापरण्यासाठी दिल्या जात असल्याचा उल्लेख शिलालेखांमध्ये आहे. इ.स.पूर्व पहिले शतक हे रॉक-आश्रयस्थानांच्या आसपास विकसित झाले आहेत, जेथे बौद्ध मठांच्या व्यवस्थेसाठी देणग्याची  नोंद आढळते. सिगिरियाच्या आजूबाजूच्या भागात मानवी वस्ती होती. नैसर्गिक आणि मानवी क्रियाकलापांमुळे हजारो वर्षांपासून यात अनेक बदल झाले आहेत. सिगिरिया खडकाचा भूगर्भीय उगम 3500 ते 2000 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मध्यपूर्व-कॅम्ब्रियन काळातील असल्याचे शास्त्रीय विवेचनातून दिसते.

 सिगीरीयाचा आधुनिक इतिहास

 सिगिरिया ही मूलत: कश्यप (ई.स. ४७७-४९५) आणि त्याच्या मास्टर-बिल्डर्सची निर्मिती होती. इतिहासाच्या नोंदीनुसार, त्याने आपली राजधानी अनुराधापुरा या प्राचीन शहरातून सिगिरियाला येथे हलवली आणि शिखरावर मोठा राजवाडा बांधला. ते एक तटबंदी असलेले शहर असून खडकावर कश्यपपूर्व आणि कश्यपोत्तर इतिहासाच्या नोंदी आहेत.

पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात राजा धातुसेना (४५९-४७७) हा श्रीलंकेचा राजा होता. प्राचीन अनुराधापुरा हि त्याची राजधानी. प्रत्येक राजकीय व्यवस्थेत काहीतरी अनपेक्षित घडत असते. तसेच येथे घडले. राजा धातुसेनाचा राजघराण्याशी सबंधित नसलेल्या पत्नीच्या कश्यप या मुलाकडून षडयंत्र रचून राजा धातुसेनाचा खून करण्यात आला आणि त्याची राजसत्ता ताब्यात घेतली. पितृहत्येसाठी कुप्रसिद्ध झालेल्या कश्यपने आपली राजधानी अनुराधापुर ऐवजी सिगिरियाला नव्या राजधानीचे शहर बनविले. इतिहासात कश्यपच्या (ई.स. ४७७-४९५) कारकिर्दीचा कालावधी १८ वर्षांचा असल्याची नोंद आहे. तर धातुसेनाचा दुसरा मुलगा मोग्गलाना भारतात पळून आला. काही वर्षांनी मोग्गलाना भारतातून परतला आणि त्याने कश्यपशी युद्ध पुकारले. या युद्धात कश्यपचा पराभव झाला आणि सिगिरियाने राजधानी म्हणून आपला दर्जा गमावला.

सिगिरिया इतके प्रसिद्ध का आहे?

आशियातील प्रमुख पुरातत्व स्थळांपैकी सिगिरिया हे एक जागतिक वारसा शहर आहे. सिगिरियाला १९८२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्कोने जागतिक व ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. सिगिरिया हे अप्रतिम  असून किल्ल्यावर मोठा प्रशस्त राजवाडा, उद्यान, जलाशय आणि इतर संरचनांच्या विस्तृत अवशेषांनी युक्त असून ते ६०० मीटर उंच खडकाच्या शिखरावर बांधलेले आहे. याशिवाय तेथे सिंह गेट, बागा,  खंदक, मिरर वॉल आणि अनेक सुंदर भित्तिचित्रे (भिंतींवर ओल्या प्लास्टरमध्ये बनवलेली चित्रे) यांचे अवशेष आहेत. येथे असलेली स्मरणिका शिल्पे व शिलालेख हे इतिहासाचे साधन बनलेली आहेत. आहेत. . सिगीरीया किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सिंहाच्या नखांची प्रतिकृती कोरलेली आहे. हे शिखर एका मोठ्या ज्वालामुखीच्या लाव्यातून निर्माण झाले. ५ व्या शतकात बांधलेला हा अप्रतिम राजवाडा नियोजन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, हायड्रॉलिक, बाग डिझाइन, चित्रकला आणि शिल्पकला यांचे एक अद्वितीय संयोजन आहे. सिगीरीयाने १९ व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच आधुनिक पुरातत्वशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते. सिगिरिया आणि आजूबाजूच्या परिसरात पूर्वकाळापासूनचे दगड, मानव आणि प्राण्याचे अवशेष मिळाले आहेत. इसापूर्व ९०० पर्यंत श्रीलंका लोह उत्पादनाशी संबंधित होती.  जंगलांनी वेढलेले हे शहर नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. सामरिक दृष्टिकोनातून ते एक बचावात्मक शहर होते. कश्यप काळ हा सिगिरियाचा सुवर्णकाळ होता. सिगिरियाचे राजेशाही संकुल, त्याचे उध्वस्त राजवाडे आणि चित्रे आजही त्याची साक्ष देतात. १७ व्या आणि १८ व्या शतकात ते कॅंडी या श्रीलंकेच्या राजधानीची दुर्गम चौकी आणि लष्करी केंद्र बनले. सिगिरिया हे विदेशी पर्यटकांचे श्रीलंकेतील पहिले आवडते केंद्र बनले आहे. म्हणून प्रसार माध्यमांनी व युट्युबरनी इतिहास व वास्तव स्थितीचे भान ठेवून काल्पनिक गोष्टीना थारा न देता वस्तूनिष्ठता आपल्या प्रेक्षकांना सांगितली पाहिजे. 

बापू राऊत 

5 comments:

  1. Very important information

    ReplyDelete
  2. Buddhapriy gaikwad mo.9764538108/9763643705

    ReplyDelete
  3. thank you for giving such a important information .
    hope this information will help many of us to know cylone's ancient history.

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर आहे बापू जी

    ReplyDelete