Saturday, January 27, 2024

शिवधर्माच्या यशस्वीतेचे काय झाले ?

 


१२ जानेवारी २००५ रोजी, सिंदखेडराजा येथे असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म या नव्या धर्माची स्थापना करण्यात आली होती. शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जीजाबाईना प्रेरणास्त्रोत मानून मानवतेची मुल्ये व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि महिलांचा आदर करणार्या या शिवधर्माचे प्रकटन प्रातिनिधिक स्वरूपात होत असल्याचे सांगून या धर्माची संहिता सुध्दा असेल असे डॉ. आ.ह.साळुंखे व मा.पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केले होते. शिवधर्माच्या स्थापनेत श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा पुढाकार होता. तर डॉ. आ.ह.साळुंखे यांचे या शिवधर्मास अध्ययनशील अधिष्ठान लाभले होते. या धर्माची भूमिका सार्वजनिक हिताची व विधायक राहण्याची ग्वाही साळुंखे उपस्थित जमावास दिली होती. शिवाय “हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांच्या काळजावर विखारी घाव घातले गेले. त्यांना ते समजले नाही. तरीही तोच आमचा धर्म असे ते समजत राहिले. आता धर्माचा अर्थ कळू लागला आहे. म्हणून संताप वाढतो आहे. परंतु या संतापाच्या उर्जेचा वापर नवनिर्मितीसाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवधर्म स्थापनेच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. शिवधर्मास आता १९ वर्ष पूर्ण होत आहेत. या १९ वर्षात शिवधर्म किती वाढला व त्यास धर्माचे स्वरूप प्राप्त होवून विधिवत कार्य होत आहेत का, लोक अधिकाधिक स्वरूपात धर्म बदल करून शिवधर्म स्वीकारताहेत का? या धर्माच्या   निर्मितीचे फलित काय?  या दृष्टीकोनातून धर्म स्थापनेच्या घटनेचे विवेचन व्हावयास हवे.

शिवधर्माची स्थापना हि एक ऐतिहासिक घटना होती. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखादा धोरणी नेता धर्माची स्थापना करीत असतो. अशा धर्मासाठी तत्वज्ञान, व्यवहाराचे नियम, चालीरीती, लग्नपद्धती याचीही मांडणी करावी लागत असते.  मा. खेडेकरानी  शिवधर्माची केलेली  स्थापना हि बहुजनांची बौद्धिक, धार्मिक, मानसिक व सांस्कृतिक गुलामगिरी संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेतील हे एक महत्वाचे पाऊल असून हा धर्म जाती, पोटजाती, कर्मकांड, अंधश्रद्धा यापासून दूर राहील असे म्हटले होते. २१ व्या शतकातील बहुजनांच्या सगळ्या गरजा भागविणारा हा धर्म असेल. आता कोणताही ग्रह आमचे वाकडे करणार नाही तर आमची मुले ग्रहावर जातील. यापुढे कोणीही वामन कपटाने बळीराजाला मारू शकणार नाही. कोण्या एकलव्याला त्याचा अंगठा द्रोणाचार्याला द्यावा लागणार नाही. लढायला व मरायला बहुजन हे यापुढे चालणार नसून आमची दैवते आम्ही आमच्या पध्दतीने मांडू आणि आम्हीच आमच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू असे खेडेकरांनी जाहीररीत्या म्हटले होते. पुरुषोत्तम खेडेकराचे हे विचार तंत्रमंत्र व पोथी पुराणातून आधुनिक युगात घेवून जाण्याच्या धारणेचे आहेत. 

वेगळा धर्म स्थापण्याची गरज का भासली

महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुख्यत्वे हिंदू धर्माचा भाग आहे. तरीही त्यांना वेगळा धर्म स्थापण्याची गरज का भासली यावर विचार  होण्याची गरज आहे. मराठा समाज हा नव्या शिवधर्माचा मुख्य केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण यात मराठा समाजाचा मोठा दबदबा आहे. धर्मकारणात मराठा समाजाचे स्थान नगण्य असले तरी धर्माचा संरक्षक व पुरवठादार म्हणून तोच सर्वात पुढे आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात तेच सत्ताधारी असून शिक्षण संस्था, उद्योगधंदे व आर्थिक संस्था ह्या त्यांच्याच ताब्यात आहेत. महाराष्ट्राच्या समाजकरणात दुसरे फार गरीब असे समाजघटक आहेत. आदिवासी, बलुतेदार, अलुतेदार आणि  दलित यांची आर्थिक स्थिती जेमतेम असून आर्थिकदृष्ट्या ते मराठा समाजाच्या कार्याकलापावरच अवलंबून आहेत. दुसर्या शब्दात गावगाड्यात ते निर्वाहक व शोषक या दोन्ही भूमिकेत असतात. हिंदू धर्मात धर्मकारणांची  सारी सूत्रे हि ब्राम्हण समाजाकडे असून  मराठा समाजाचे स्थान नगण्य असते. ब्राम्हण हाच  हिंदू धर्माचा मालक व चालक आहे. मंदिराची दानपेटी  व धर्मांतर्गत सोहळ्यावर त्यांचाच हक्क असतो. धार्मिक निर्णय घेण्याचा सर्वाधिकार हा ब्राम्हणाकडेच असतो. मराठा समाजाच्या कुटुंबातील सर्व धार्मिक कृत्ये हि ब्राम्हणहस्ते होत असतात. या धार्मिक कार्यात मोठ्यात मोठ्या मराठ्यांना लहानात लहान भट पुजार्यासमोर वाकावेच लागते. याचे शल्य पुरुषोत्तम खेडेकाराना वाटणे स्वाभाविक होते. राजकारण व अर्थकारणात सक्षम असणारा व भिकेत दान देणारा मराठा धर्मकरणात मागे का? हा प्रश्न त्यांच्यासमोर असावा. पुरुषोत्तम  खेडेकर हे इतिहासाचे जाणकार, लेखक व डोळस असल्यामुळे मराठा सत्ताधार्यांची (शिवाजी महाराज ते शाहू महाराज ) धर्म व वर्णव्यवस्थेच्या नावाखाली ब्राम्हणांनी केलेल्या पिळवणूकीच्या इतिहासाचे क्षण खेडेकर व डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या नजरेखालून गेले असणारच. त्यातूनच हिंदू धर्माच्या चालकांना आम्ही तुमच्यापेक्षा काय कमी आहोत? हे दाखवून देण्यासाठी व मराठ्यांना ब्राम्हण्यवादी चिखलातून बाहेर काढण्यासाठी शिवधर्माच्या  स्थापनेचे गणित पुरुषोत्तम खेडेकराकडून मांडले गेले. हे खेडेकर व डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या अनेक भाषणातून हे प्रतिपादित होत होते. 

शिवधर्म यशस्वी होत आहे का? 

खेडेकरांनी शिवधर्माचे धनुष्यबाण सोडले असले तरी त्यांना मराठ्यांच्या मानसिक व धर्माच्या वैचारिक गुंतागुंतीच्या स्थितीचा तसेच परंपरागत धर्माच्या पगड्याचा अंदाज चुकला असावा. ब्राम्हणी व्यवस्थेमध्ये (वर्ण, वर्चस्वता व जातीव्यवस्था ) वाढलेला मराठा हा काही अपवाद सोडता आत्यंतिक जातीयवादी आहे. ते आपल्या पूर्वजांवर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाबाबतच्या घटनाबाबत अनभिज्ञ असावेत किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करीत असावेत. बहुसंख्य मराठ्यांच्या वाचनसंस्कृतीमध्ये धर्म,पुराणे,आरत्या,देवधर्म संबंधातील कथा अधिक येत असाव्यात. सत्संगप्रियतेमुळे केवळ श्रावक बनण्याची प्रक्रिया आणि ग्रामीण राजकारण व समाजव्यवस्थेमध्ये त्यांचा अधिक दबदबा असल्यामुळे तो समतावादी मूल्यामध्ये सहभागी होत नाही. कारण समानतावादी मूल्यामध्ये आपली वर्चस्वता संपण्याची त्याला भीती वाटत असावी. असे असले तरी आपल्यावरील ब्राम्हणी वर्चस्व त्याला पूर्णत: मान्य आहे. त्यामुळेच तो ब्राम्हणी आरक्षणावर (EWS reservation, Temple priest, priest salary, lateral entry) आक्षेप न घेता ओबीसी, अनु.जाती व जनजातीच्या आरक्षणावर आक्षेप घेत आम्हालाही ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी दबावतंत्र वापरतो. त्यांच्या मोर्चात केवळ शिवाजी महाराज दिसतात परंतु आरक्षणवादी शाहू महाराज दिसत नाही. त्यामुळे मराठ्यांवर असलेला ब्राम्ह्ण्याचा प्रभाव आणि भटशाहीचे त्यावरील वर्चस्व या गोष्टी आजही स्पष्टपणे जाणवत असतात. ब्राम्हणांच्या सहभागाशिवाय त्यांचे कोणतेही धार्मिक अनुष्ठान पूर्ण होत नाही. मराठ्यातील कोणतीही  व्यक्ती कितीही मोठा पुरोगामीत्वाचा व विद्वत्तेचा टेंभा मारीत असली तरी ते आपल्या घरचे धार्मिक अनुष्ठान ब्राम्हणाकरवीच करतात. याच मानसिकतेमुळे शिवधर्माचे गणित फसलेले दिसते.

शिवधर्म हा शिवाजी महाराज, जिजाबाई व संभाजी राजे यांना आपले प्रेरणास्थान मानतो. त्याचप्रकारे मराठा समाजसुध्दा या तिघानाही आपले आदर्श व प्रेरणास्त्रोत मानत असतो. तरीही मराठा समाज शिवधर्माकडे वळलेला दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा हे मराठ्यांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रात शिवधर्म प्रत्येक मराठ्यांच्या घरात जावयास हवा होता. परंतु तसे न होता या क्षेत्रातला मराठा समाज शिवधर्माकडे न जाता संभाजी भिडेचा धारकरी बनलेला दिसतो. तो सत्संगाचा आयोजक व मंदिर निर्मात्याच्या भूमिकेत दिसतो परंतु संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत नाही. यावरून पुरुषोत्तम खेडेकर व डॉ. आ.ह. साळुंखे यांची मराठ्यांना शिवधर्माकडे घेवून जाण्याच्या प्रबोधन प्रक्रियेतील कमतरता कारणीभूत असावी किंवा शिवधर्मकारकांची हिंदू धर्मापासून मुळ नाळ तुटलेली नसतानाच शिवधर्माच्या आत्मसंतुष्टीचा प्रयोग करून बघितला तर नाही ना !. अशा शंकेस वाव दिसतो. 

हिंदुत्ववादी शिवधर्मास पुढे जाऊ देतील काय

या सगळ्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची भूमिका फार महत्वाची असते. संघ हा अदृश्यपणे सगळीकडे काम करीत असतो. संघाला वा हिंदुत्वाला विरोध करणार्यांच्या  समाजामधीलच माणसे पकडून त्यांचा वापर विरोध करणार्याच्या विरोधात केल्या जातो. संघाच्या स्लीपर सेल यासाठी कार्यरत असतात. वर्णव्यवस्था व जातीची उतरंड हि संघासाठी सदैव संजीवनीचे काम करीत असते. महात्मा फुले व सावित्रीबाई  माळी समाजाचे. दलितांनी त्यांना आपला आदर्श म्हणून स्वीकारल्या बरोबर माळी समाजाने फुले दांपत्यांनाच आपल्यातून बहिष्कृत करून टाकले. तीच परिस्थिती शाहू महाराज, गौतम बुध्द व संविधानाबाबत आहे. आरक्षणवादी शाहू महाराजांच्या विचारांकडे  मराठा समाज पूर्णता: पाठ फिरवून आहे. परंतु शिवाजी महाराजाबाबत तसे नाही. शिवाजी महाराज हे राजे म्हणून  योद्धा व शूरवीर असले तरी धर्मांतर्गत अन्याय सहन करणारे होते परंतु कोल्हापूरच्या शाहू महाराजांचे तसे नव्हते. आजच्या मराठा समाजाने केवळ शिवाजी महाराजांचे तत्व उचलून धरलेले दिसते. यावरून मराठ्यासकट बहुजन समाजाची मानसिक स्थिती व त्यांच्यातील वैचारिक द्वंदाचा अंदाज घेता येतो. शिवधर्माच्या अपयशाचे एक कारण यात शोधता येते. 

टीकाटिप्पणी शिवाय हिंदू धर्म मराठ्यासकट बहुजनावर कसा अन्याय करणारा आहे,  हिंदू धर्माच्या चालकांनी आपल्या पूर्वजांचा कसा छळ केला हे समजावून सांगण्याच्या कलेची व साधनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शिवधर्माच्या स्थापणेनंतर २०११ ची लोकसंख्या जनगणना येवून गेली तर २०२१ ला होणारी जनगणना पुढे कधीतरी होईलच, परंतु  शिवधर्मकारांनी सरकार समोर जनगणनेच्या फार्ममधील धर्माच्या रकान्यात शिवधर्माचे नाव समाविष्ठ करण्याची मागणी केल्याचे वाचनात आले नाही. किंवा धर्माच्या रकान्यात मराठ्यांना हिंदू धर्मा ऐवजी शिवधर्म लिहिण्याचे आवाहनही केलेले दिसत  नाही. हे खरे आहे कि, कोणत्याही धर्माच्या वाढीस शतके जावी लागतात, शिवधर्मास तर जेमतेम १९ वर्षे पूर्ण झालीत. परंतु अडथळ्यांची प्रक्रिया पूर्ण करीत भविष्यात होणार्या दीर्घ बदलाची वाट बघताना वर्तमानकाळात किमान त्यासबंधातील कार्यकलापाच्या हालचाली दिसायला हव्यात अशी अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे.  

लेखक: बापू राऊत 

2 comments:

  1. सन्माननीय बापू राउत साहेब आपण खूप अभ्यासपूर्ण हा लेख लिहिलेला आहे या मध्ये कुठल्याही विचारी माणसाला आपण आणि आपल्या लेखनावर शंका येणार नाही. परंतु तुमच्या लेखामुळे शीवधर्मा मध्ये फार मोठा बदल होईल अशी शक्यता वाटत नाही कारण गेल्या 19 वर्षांमध्ये शिवधर्माचे संस्थापक खेळकर सर व साळुंखे सर यांच्याकडूनही शीवधर्माचा पाठपुरावा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही आपण जे म्हणता की आजचा मराठा अजूनही कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे ते शंभर टक्के खरे आहे व आत्ताच मराठ्यांचे आरक्षणासाठी जेआंदोलन झाले त्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त अग्रक्रम देऊन छत्रपती शाहू महाराजांना चवीपुरते ठेवलेले आहे यावरून त्या समाजाची मानसिकता काय हे समजते कदाचित खेडकर सर कींवा साळुंखे सर यावर काही प्रतिक्रिया देतील पण ते दोघेही वयोमानाने म्हातारे झाल्यामुळे शिवधर्मासाठी तरुणांचा ओघ व्हायला पाहिजे होता तेवढा त्यांनी केला नाही हे मान्य करावेच लागेल. मराठा समाजाने जर शिवधर्म समजून घेतला तर इतर हिंदू धर्मीय मागासवर्गीय समाजही त्यांच्या पालावर पाऊल ठेवल्याशिवाय राहणार नाही पण तसे कुठे होताना दिसत नाही ही एक खंत आहे.
    आपण ह्या मृतपाय होत असलेल्या विषयाला चालण्या दिल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक स्वागत.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद साहेब. शिवधर्माच्या वाढीस मा.पुरुषोत्तम खेडेकर व मा. आ.ह.साळुंखे यांचे प्रयत्न कमी पडताहेत. हे सत्य असले तरी बहुसंख्य मराठा समाजाची मानसिकता पूर्वपरंपरावादी व ब्राम्हणधार्जिनी आहे. ते ब्राम्हण धर्माचे काटेकोरपणे पालन करीत असून त्यांना ते आपला गुरु मानतात. मराठा युवा तरुणांमध्ये हिंदू धर्म गौरवाची मानसिकता संभाजी भिडे सारख्या अनेकांनी रुजवली आहे.सध्याचा काळ हा पुरोगामित्व व सुधारणा याचा नसून प्रतिगामित्व व धर्मांधतेचा आहे. त्यामुळे शिवधर्म हा पुढे वाढेल कि नाही हि शंका आहेच परंतु शिवधर्म स्थापनकर्त्यांनीच आपली पाउले मागे घेतली कि काय असेही वाटू लागते.

      Delete