ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ
पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने
ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील
अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत
नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला
पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा
कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने
स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा
युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती
पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर
बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा
शेवटचा टप्पा होता.