Sunday, August 25, 2024

पेशवाईचे पतन: हिंदुच्या मुक्तीसाठी खुले झालेले द्वार!


ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा शेवटचा टप्पा होता.

पेशवाई हि मराठेशाही नव्हती. थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या १७४९ मध्ये झालेल्या निधनानंतरच मराठेशाही संपली होती. कारण त्यानंतर पेशव्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शाहुच्या वंशजांच्या मध्यवर्ती सत्तेला पेशवानीच झिडकारून देत त्यांनाच आपले अंकित बनवून ठेवले होते. तर दुसरीकडे शिंदे, होळकर व नागपूरकर भोसले हे जरी मराठा सरदार असले तरी ते पेशव्यांच्या दबावाखाली होते. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात उरलेले मराठा सरदार व बाजीराव यांचे सख्य कधीही जमले नाही. शेतकरी कामगार वर्गाचे शोषण, वर्णश्रेष्ठत्वाचा टेंभा, कर्मकांड व भोगाविलासी वृत्ती आणि दुसऱ्या सरदाराना मिळत असलेल्या दुय्यम वागणूकीमुळे त्यांनी सोडलेली स्वामीनिष्ठा ही पेशवाईच्या अंतकाळाची मुख्य कारणे ठरतात. 

पेशवाई हि मराठेशाही नव्हती. थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या १७४९ मध्ये झालेल्या निधनानंतरच मराठेशाही संपली होती. कारण त्यानंतर पेशव्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शाहुच्या वंशजांच्या मध्यवर्ती सत्तेला पेशवानीच झिडकारून देत त्यांनाच आपले अंकित बनवून ठेवले होते. तर दुसरीकडे शिंदे, होळकर व नागपूरकर भोसले हे जरी मराठा सरदार असले तरी ते पेशव्यांच्या दबावाखाली होते. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात उरलेले मराठा सरदार व बाजीराव यांचे सख्य कधीही जमले नाही. शेतकरी कामगार वर्गाचे शोषण, वर्णश्रेष्ठत्वाचा टेंभा, कर्मकांड व भोगाविलासी वृत्ती आणि दुसऱ्या सरदाराना मिळत असलेल्या दुय्यम वागणूकीमुळे त्यांनी सोडलेली स्वामीनिष्ठा ही पेशवाईच्या अंतकाळाची मुख्य कारणे ठरतात.

दुसऱ्या बाजीरावाला एकूण ११ बायका होत्या. त्यापैकी बनारसजवळील विठुर येथे विजनवासात असताना त्यांनी ५ बायका केल्या. या बायका पासून त्याला दोन मुले व एक मुलगी झाली. बाजीरावासामोरच त्याची दोन्ही मुले मरण पावल्यामुळे त्यास धोंडू नावाच्या मुलास दत्तक (७ जून १८२७) घ्यावे लागले. पुढे हा धोंडू नानासाहेब पेशवा या नावाने प्रसिध्द झाला. इंग्रजांच्या लुटीच्या भीतीने १२ जून १८१७ रोजी पेशव्यांचा खजिना व जडजवाहीर सिंहगड येथून रायगड येथे एक हजार मुसलमान सैनिकाच्या देखरेखीखाली हलविण्यात आला होता. खजिन्याची सुरक्षा सुभेदार शेख अबुद व त्याच्या मुस्लीम सैनिकाकडे होती. मुसलमान द्वेष शिकविणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे.

सुरुवातीला सनातनी व वर्णश्रेष्ठत्वाच्या ब्राम्हणी वृत्तीला ओळखून एलफिस्टनने सनातन्यांच्या पारंपारिक रूढी  व धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप  करणार नाही असे घोषित केले. कारण धर्म व सांस्कृतिकतेच्या माध्यमातून सामान्य जनतेवर त्यांचा ताबा आहे हे त्याने ओळखले होते. या कर्मठ ब्राम्हणांचे वाई हे धार्मिक केंद्र होते. येथे त्याने धर्मपंडित व पुरोहितांची सभा बोलाऊन शालजोड्या, दक्षिणा व देणग्या दिल्या. एलफिस्टनने ब्राम्हणांचा अनुनय करण्यात कसलीही कुचराई केली नाही. त्यामुळे दक्षिणाप्रिय ब्राम्हण पुरोहितांनी एलफिस्टनवर स्तुतीसुमने उधळून त्याच्यासाठी पूजाअर्चना केल्या. असे प्रयोग पुण्यासकट अनेक ठिकाणी झाले. ब्राम्हण पुरोहितांनी असाच एक प्रयोग राजे शिवाजी यांचे विरोधात मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंगासी पूजा अर्चना करण्यात घालविला होता. एकप्रकारे ब्रिटीशांनी आपल्या राजवटीची भक्कम बांधणी करण्यासाठी ब्राम्हणांचा अनुनय करून त्यांना आपल्या सत्तेचा आधारस्तंभ बनविला.

छत्रपती प्रतापसिंह भोसले यांना लहानपणापासूनच पेशव्यांनी नजरकैदेत ठेवले होते. मात्र १८१८ च्या बाजीरावाच्या पराभवानंतर प्रतापसिंह हे स्वतंत्ररूपाने मुक्त झाले. ब्रिटीशांनी त्यांना त्यांचे सातारा हे राज्य परत देण्याचे मान्य केले. ११ फेब्रुवारी १८१८ च्या जाहीरनाम्यात एलीफिस्टनने म्हटले, बाजीराव पेशव्यांच्या कैदेत असलेल्या सातारच्या महाराजांना आम्ही मुक्त करणार आहोत आणि त्यांना सुखाने  व वैभवाने राहण्यासाठी मोठ्या विस्ताराचे स्वतंत्र राज्य निर्माण करून देणार आहोत. प्रतापसिंहाना स्वतंत्र राज्य मिळाल्यानंतर राज्यात ब्राम्हण ब्राम्हणेत्तरवाद उफाळून आला. पेशवाईचे पुढे ब्राम्हणीकरण असे नामकरण झाले. पुढे बाळाजीपंत नातू व गंगाधर शास्त्री यांच्या कटकारस्थानाला बळी पडून ब्रिटीशांनी प्रतापसिंहना पदच्युत केले. ५ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना कैद करून काशीला नेण्यात आले. तेथेच त्यांचे १८ ऑक्टोबर १८४७ रोजी निधन झाले. त्याचेनंतर गादीवर बसविण्यासाठी राजास औरस पुत्र नसल्याने १६ मे १८४९ रोजी सातारा राज्य खालसा केले. येथेच शिवाजी महाराजाच्या वांशिकी कुलाचे अवशेष समाप्त झाले.  

पेशवाईच्या काळात जातीभेद व वर्णभेद शिंगेला पोहोचला होता. सैनिकात जातवार तुकड्या असायच्या. पेशवेकाळात ब्राह्मणाव्यतिरिक्त इतरांना वेदोक्त पद्धतीने पूजा करण्याचा अधिकार नव्हता. शेतकर्यांचे शोषण पराकोटीला पोहोचले होते. अशा स्थितीमध्ये इंग्रजाची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर इंग्रजी भाषा, पाश्च्यात्य ज्ञान व विज्ञान येथे आले. नवी विचारसरणी आल्यानंतर महाराष्ट्रात विचारवंताची पहिली पिढी निर्माण झाली. या पिढीने आधुनिक विचारधारेचा स्वीकार करीत शिक्षण व समाजपरिवर्तन यावर विचारमीमांसा केली. पेशवाईतील अंधाधुंदी व सरंजामशाहिचा जाच कमी झाल्याने शेतकरीसुध्दा सुटकेचा उसासा घेवू लागले होते. हिंदू कायदा हा ब्रिटीशपूर्व   भारतात अस्तित्वात नव्हता. ती ब्रिटीशांची निर्मिती होती. त्यांनी येथे कायदा व सुव्यवस्थेची निर्मिती केली. त्यामुळे वैदिकांना आपला वैदिक (सनातन) धर्म धोक्यात आल्याचे भासू लागले.

नव्या व्यवस्थेमध्ये इतर जातीनी स्वत:च वैदिक संस्कार करण्याचा अधिकार घोषित केला. जगन्नाथ शंकरसेठ यांच्या वेदोक्तास विरोध झाला तेव्हा सातार्याच्या प्रतापसिंह भोसले कडून मोडून काढण्यात आला. यातून महाराष्ट्रात नव्या सांस्कृतीकरणाला सुरुवात झाली. वर्णव्यवस्थेच्या चौकटीत राहून ब्राम्हणाच्या बरोबरीचा सामाजिक दर्जा प्राप्त करता येईल हा या सांस्कृतीकरणाचा उद्देश होता. या सांस्कृतीकरणात जन्माधिष्ठित सामाजिक दर्जा नाकारणे हे तत्व असले तरी त्यात समतावादी आचार नव्हता. अनुकरणप्रिय अनेक जातींनी ब्राम्हणामधील बालविवाह, विधवाविवाह वर्ज्य, सतीप्रथा सारख्या वाईट रीतीचे अनुकरण केले. पुराणातील वंशासी आपला सबंध जोडण्यासाठी खोट्या, अनैतिहासिक व मौखिक माहितीवर कथा व इतिहास लिहिण्यात आला. पेशव्यांच्या पतनामुळे बेकार झालेल्या पुरोहित ब्राम्हणानी ओसाड पडलेल्या बुध्दलेण्या व मंदिरावर अतिक्रमण करून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविला.

अशा सांस्कृतीकरणाच्या प्रक्रियेवर पहिला आघात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला. या सांस्कृतीकरणाच्या मर्यादा, दोष व विसंगती ओळखून त्यांनी संपूर्ण वर्णव्यवस्था व जाती अधिक्रम नाकारला. त्यांनी संस्कृतीकरणाऐवजी सामाजिक समता आणि व्यापक मानवतावादी चळवळ उभारून पुरोहितशाही व कर्मठपणाविरोधात लढा दिला. पेशवाई व त्यापूर्वीहीपूर्वी बंदी असलेले शिक्षण सर्वासाठी खुले करण्यात आले. उदयास आलेल्या नव्या सुधारक वर्गाने बालविवाह, विधवाविवाह, विषमविवाह, केशवपन व जरठविवाह यावर बोलण्याबरोबरच सतीच्या बुरख्याखाली जिवंत बायकांना जाळण्याच्या अधमपणाचा धिक्कार करण्यात आला. जातीचा अभिमान बाळगणार्यांना मूर्ख संबोधण्यात येवून भारतासारखी वर्णव्यवस्था व देवीदेवता दुसऱ्या देशात का नाहीत? असे प्रश्न विचारल्या गेले. जीर्ण धर्मकल्पना, रूढी व अंधश्रद्धेवर हल्ले होवू लागले. या सार्या बाबीचा विचार करता हे सुधारणापर्व पेशवेकाळात सुरु करता आले नसते. ज्यांनी असे कार्य करण्याची हिंमत दाखविली असती तर त्यांचा मृत्युकाळ त्याक्षणीच अवतरला असता. म्हणूनच महाराष्ट्रातील पेशवाईचे पतन हे हिंदू जनतेसाठी त्यांचे स्वातंत्र्य व मुक्तीसाठी खुले झालेले द्वार असून सामाजिक ऋणानुबंधाच्या वाढीसाठी घडलेली घटना होती. ह्या कटूसत्यास समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे.   

लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment