Sunday, September 8, 2024

टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?


 भारत हा देव व धर्माचा देश आहे, भारतात ३२ कोटी देव असल्याचा दावा काही दैववादी लोक करीत असतात. त्यासाठी वैदिक साहित्याचे दाखले देण्यात येतात. ज्या काळात या देशाची एकूण लोकसंख्या ३२ कोटी नव्हती, त्या काळात येथे ३२ कोटी देव वावरत होते. तरीही भारत गुलामीच्या व आक्रमणकर्त्यांच्या छायेत वावरत होता. जनतेने आपले रक्त सांडवून आक्रमणकर्त्यांना हरवून त्यांना पळवून लावले. त्यावेळेस देव काय करीत होते ? त्यांचे कार्य काय, केवळ मंदिरात निर्जीव पडून राहण्याचे होते? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. यातून दुसरा एक प्रश्न निर्माण  होतो, तो म्हणजे देवाची निर्मिती  चतुर लोकांनी आपल्या फायद्यासाठी केली तर नाही ना !  देशात असलेली विषमता, मंदिरात होणाऱ्या चोऱ्या, मंदिरात पुजार्याकडून होत असलेले बलात्कार, त्यांच्याकडून होणारी भक्तांची फसवणूक,  देवांच्या कार्यक्रमात होणारी चेंगराचेंगरी व मृत्यू, मंदिरात पूजा केल्यानानंतर प्रवासात होणारे अपघात. हे सारे बघितले कि, एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होते, ते म्हणजे देव व मंदिर नावाचा बागुलबुवा हा  षडयंत्रकारी, चतुर, भीती दाखविणारी  टोळी व स्वत:ला सर्वश्रेष्ठ बनविण्याचा कार्यकलाप करणाऱ्या स्वार्थी चरांनी उभा केल्याचे स्पष्ट सिद्ध होते. आजतागायत हे स्वार्थी गौडबंगाल सुरूच असून अनेकजन त्यास बळी जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे “ जे लोक बळी पडत आहेत, ते याबाबत तसूभरही  विचार करण्यास तयार नाहीत”. त्यामुळे फसवेगिरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.