Friday, November 1, 2024

विधानसभा निवडणुकामध्ये बहुजन-आंबेडकरी राजकारणाची स्थिती काय?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने राजकारण करणारा प्रत्येक पक्ष कामी लागला असून तिकीट नाकारलेले नेते पक्षनिष्ठा व विचार सोडून आमदारकीच्या तिकिटासाठी इकडून तिकडे पळापळ करू लागले आहेत. दुसऱ्या मोठ्या पक्षात तिकीट न मिळाल्यास त्यांचा ओढा वंचित बहुजन आघाडी व  बहुजन समाज पक्षाकडे असतो. या पक्षांचे पारंपारिक व्होट व स्वत:च्या प्रभावातील मतदान मिळवून निवडणुक जिंकू असे या आयारामांना वाटत असते. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढेल हे गृहीत धरून हे पक्षही त्यांना तिकीट देत असते. होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा व वंचित आघाडीने अनुक्रमे २८८ व २०८ जागावर उमेदवार दिले असून अन्य बहुजन आंबेडकरी पक्षसुध्दा स्वतंत्ररीत्या व आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यात नवीन असे काही नसून यशाची पर्वा न करता प्रत्येक निवडणुकांमध्ये हे घडत असते. बहुजन आंबेडकरी राजकारणावरील हि खिपलने गळून पडावीत याची सामान्य जनता अनेक वर्षापासून वाट पाहते.  परंतु प्रत्यक्षात हे घडणे नाही याची रेघ व मेख जनतेनी ओळखून घेतली पाहिजे.