मनुस्मृतीमध्ये दडले आहे तरी काय?
मनु हा स्त्रियांच्या अवनितीचा जनक असल्याचे त्याने स्त्रियांबाबत
केलेल्या नियमांचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट जाणवते. मनुने केलेल्या नियमामुळे
स्त्रियांच्या असलेल्या दर्जाचे कमालीचे अध:पतन झाले असे स्पष्टपणे जाणवते. स्त्रिया
ह्या पापमय असल्यामुळे त्या वेद मंत्राचा उच्चार करु शकत नाही असे मनुने म्हटले
आहे (अध्याय ९.१८). मनुने स्त्रियांचा आध्यात्मिक
शक्तीची अनुभूती घेण्याचा केवळ हक्कच नाकारला नाही तर तिच्यात आध्यात्मिक शक्तीचा
पूर्णपणे अभाव आहे असे जाहीर केले. मनूच्या मतानुसार स्त्रियांनी दैनंदिनी
यज्ञयागादी करू नयेत. तिने तसे केल्यास ती पापयोनीत जाते (अध्याय ४.२०५.-२०६). पुरुषांना आकृष्ठ करून भ्रष्ट करणे, हे
स्त्रियांचे वैशिष्ठ होय (२.२१३ ).स्त्रियांना कितीही ताब्यात ठेवले तरी त्यांना
पुरुषाबद्दलच्या असलेल्या आसक्तीमुळे त्या निर्दयपणे पतीचा विश्वासघात करतात (९.१५
). निर्मात्याने तिची रचनाच अशी केली आहे कि तिला ताब्यात ठेवण्यासाठी पुरुषाने
पराकाष्ठेचे प्रयत्न करावयास पाहिजे. (९.१६). मनुने स्त्रियांना कामवसानेची तीव्र
इच्छा असलेली, शृंगार, अपवित्र वासना, क्रोध, अप्रामानिकपणा, मत्सर आणि
दुर्वर्तन बहाल केले. मनूच्या दृष्टीने स्त्री किती नीच आहे हे यावरून दिसते.
कुठल्याही परिस्थितीत स्त्रिया स्वतंत्र असून नयेत असे मनुचे कायदे सांगताहेत. स्त्री
तिच्या पापमय प्रवृत्तीमुळे कुटुंबावर दु:ख ओढवीत असते. (९.५). स्त्रीला घटस्फोट
घेण्याचा अधिकार नसून पती कसाही असला तरी तिने पतीसोबत राहणे बंधनकारक होते. मात्र
पुरुषाने पत्नीला सोडून देण्यावर कोणतेही बंधन घातले नाही. म्हणजेच मनु पतीला
पत्नीचा त्याग करण्याची व तिला विकण्याची मुक्त परवानगी देतो. याउपरही पत्नीला विकल्यानंतर सुध्दा ती पतीच्या
बंधनातून मुक्त होत नाही. याचा अर्थ तिचा पूर्व पती शारीरिक उपभोग घेवू शकतो. केवढे
हे क्रूर कायदे! संपत्तीच्या बाबतीमध्ये
सुध्दा मनुने स्त्रीला गुलामीच्या स्तरावर आणून ठेवले. पतीच्या संपतीवरील तिच्या
भागीदारीला मनुचे कायदे संमत्ती देत नाही. तिने जिवंत असेपर्यंत पतीच्या आज्ञेत
राहावे असे सांगतो. (५.१५५). स्त्री हत्या हा क्षुल्लक गुन्हा असल्याचा मनूचा
कायदा सांगतो. याचा अर्थ मनूच्या दृष्टीकोनातून स्त्री हि कवडीचीही किंमत नसलेली बाब
होती. स्त्रीला जखडणारे असे अनेक कायदे मनुस्मृतीमध्ये आलेले आहेत. मनूच्या (भृगुच्या) ब्राम्हणवादाने
देशात कायद्याचे स्वरूप घेवून स्त्रियांचे पूर्णत: निर्बलीकरण केले होते.
दुसरीकडे मनुने शुद्र समाजावर अनेक बंधने घातली होती. पूर्वीचे शुद्र
कोण ? तर आजचे ब्राम्हणेत्तर ओबीसी, मराठा, जाट व गुर्जर यांचा शुद्र समूहा मध्ये समावेश
होतो. या समाजावर मनुने मोठ्या अन्यायकारक अटी लादल्या होत्या. ब्राम्हणा
व्यतिरिक्त क्षत्रिय व वैश्य यांनी वेद वाचून ते दुसऱ्यांना सांगू नये. हे कार्य
केवळ ब्राम्हणाचे असून ब्राम्हण हा तिन्ही वर्णाचा स्वामी आहे (अध्याय १०.१,१०.२,१०.३).
मनुने ब्राम्हणांना राजापेक्षा श्रेष्ठ ठरवून राजाने ब्राम्हणाशिवाय कारभार करू
नये असे म्हटले (७.३८...७.४२). मनु हा
जातिव्यवस्थेचा जनक होता. वर्णसंकरातून उत्पन्न झालेल्या नवजात बालकांना कोणत्या
जातीमध्ये ठेवले पाहिजे याचे नियम त्याने घालून दिले. (१०.७,१०.८).
वर्णसंकरातून निर्माण झालेल्या जातीतील पुरुष व स्त्रिया यांच्यात परत कामांधतेमुळे
वर्णजातीसंकर झाल्यानंतर मनुने त्यातून पोटजाती निर्माण केल्या.(१०.१४,१०.१५...१०.१८).
एवढेच नव्हे तर या जातींचा कोणता व्यवसाय असावा याचे नियम त्याने घालून दिले. कोणत्या
जातींनी गावात राहाव्या व कोणत्या जाती गावाच्या बाहेर राहतील याचे बस्थान त्याने
बसविले. शूद्रांना त्याने मर्यादा घालून दिल्या होत्या. (१०.५३,१०.५४).
एकूनच मनु हा समतेचा शत्रू व विषमतेचा कट्टर समर्थक होता. शुद्रांनी ब्राम्हणांची
सेवा केली पाहिजे. (१०.१२०). शूद्रांना जरी यज्ञ करायचा असल्यास त्याला वेदमंत्राचे
उच्चारण करण्याचा अधिकार नाही. (१०.१२४). शुद्र समर्थ जरी झाला असला तरी त्याला
धनसंचय करता येणार नाही (१०.१२६). धनिकांनी यज्ञासाठी ब्राह्मण व पुरोहित यांना रत्न
व धन दिले पाहिजे.(११.४) असे केल्यास धनदात्यास स्वर्ग लाभाची संधी मिळते.(११.६)
शुद्राकडून यज्ञ करण्यास धनद्रव्य घेतले पाहिजे. परंतु त्यास यज्ञाच्या आसपास येवू
देता कामा नये.(११.१३). राजाने ब्राम्हणास आर्थिक दंड न आकारता त्याची कुटुंबासहित
आजीविकेची व्यवस्था केली पाहिजे.(११.२२).
एकूणच मनुस्मृतीचा लेखक मनु हा वैफल्यग्रस्त दिसतो. तो समाजात असमानता
पसरवितो. त्याने जातीची निर्मिती करून लोकात उच व नीच अशी दरी निर्माण केली. तो
एकास ऐतखाऊ बनवितो व दुसर्याकडून कष्ट करून घेतो. तो लोकांना कल्पित गोष्टीची भीती
दाखवून ब्राम्हणी वर्चस्व समाजावर व देशावर लादतो. मनुने असमानतेच्या नियमात लोकांना
गुंतवून पंगु बनविले असून त्याचे हे कृत्य जनतेशी केलेला द्रोह मानला पाहिजे. एक
कुठीत मानसिकता व रोगाने पछाडलेला व्यक्तीच मनुस्मृती सारखे पुस्तक लिहू शकतो.
लोकांना काल्पनिक गोष्टींची भीती दाखवून लोकांना अंधार कोठडीत ढकलतो. मनु हा स्वत:
ब्राम्हण असल्यामुळे ब्राम्हण जातीला सृष्टीच्या निर्मितीसी जोडून ते ब्रम्हाचे प्रतिनिधी
असल्याचे सांगतो (११.८४)
भारतीय स्त्री व ओबीसी मनुस्मृती विरोधात का लढत
नाही?
मनुस्मृतीमध्ये स्त्रिसंदर्भात अत्यंत घाणेरडे, किळसवाणे व स्त्रीचे
अधिकार काढून घेणारे कायदे आहेत. तो स्त्रियांना शिक्षणापासून दूर करीत तिला चूल व
मुलापर्यंत सीमित ठेवून नवर्याची दासी बनवितो, तिला संपत्ती अधिकारापासून दूर ठेवतो तरी भारतीय
स्त्री मनुस्मृती विरोधात पेटून उठत नाही. भारतात संख्येने सर्वात मोठा असलेला
ओबीसी - मराठा सामाज यांना मनुने सगळ्या अधिकारापासून वंचित करून ब्राम्हणी
संस्कृतीचे गुलाम बनवून ठेवले आहे. मनूने त्यांना संस्कृत व वेदांचा अभ्यास करण्यापासून
रोखले. त्यांनी केवळ सेवक बनून राहावे अशी अपेक्षा करतो. तरीही अशा बहुजन विरोधी व्यक्तीस हद्दपार करण्यास का तयार
नाहीत याच्या कारणमीमांसा जाणून घेणे आवश्यक आहे.
बहुजनातील सृजनानी मनुस्मृतीचे अंतरंग जाणून घेणे आवश्यक होते.
मनुस्मृतीचा वापर करून वर्णव्यवस्थेतील वरचा वर्ग आपली शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक
व सांस्कृतिक कशी पिळवणूक करतोय हे स्त्री पुरुषांना सांगायला हवे होते. असे कार्य
न झाल्यामुळे मनुस्मृतीतील भ्रामक कायदे नियम व त्यात दाखविलेल्या भीतीला बळी पडून
वर्णत्वाची गुलामी मान्य करण्यात आली. काहीना मनुस्मृतीमधील भयानकता दिसत असली तरी, मनु हा
आपल्या जातीचा वाटत असल्यामुळे ते मनु विरोधात आवाज उठवित नाही. ओबीसी समाजाने
मनुस्मृती विरोधात आवाज न उठविण्याचे दुसरे कारण म्हणजे अनु.जाती समुहाने
मनुस्मृती विरोधात आवाज उठविणे हे होय. अनु.जातीचा समूह ज्या ब्राम्हणवादी सामाजिक
व धार्मिक व्यवस्थेविरोधात आवाज उठवितो, त्याच्या एकदम विरोधी भूमिका ओबीसी व इतर समाज
घेत असतो. वरच्या वर्गाकडून ओबीसी समाजाची तशी मानसिकताच निर्माण करण्यात आली आहे.
याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, अनु.जाती समुहाने ज्या महात्मा बुध्द,
ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले व शाहू महाराज सारख्यांना
स्वीकारले त्यांना त्यांच्याच जातीनी वाळीत टाकलेले दिसते. या महापुरुषांच्या
विचारांना धुत्कारत त्यांच्या प्रतिमा सुध्दा ते आपल्या घरात ठेवीत नाही. यावरून शिवाजी
महाराजाचे कार्य हे कसे ब्राम्हण्यविरोधी व समतावादी होते हे सांगून त्यांची जयंती
जर अनु.जाती समुहाने सुरु केल्यास ते शिवाजी महाराजांना सुध्दा वाळीत टाकतील. याचे
कारण जातीयता व धर्मांधतेचे झालेले क्रांकीटीकरण हे होय. त्यामुळेच भारतीय स्त्री
व ओबीसी मनुस्मृती विरोधात लढा देण्यास कुचकामी ठरतो.
बनारस विद्यापीठात मनुस्मृती दहनानिमित्त
विद्यार्थ्यांना अटक
विद्यापीठ हे वैचारिक चळवळीचे केंद्र असते. विद्यापीठात जुने ग्रंथ,
त्याची अपरिहार्यता व त्यातील अतिरंजक बाबींना वैज्ञानिक कसोटी लावून सत्यता
पडताळून पाहिली जाते. त्यातूनच वैचारिक संघर्ष व नव्या विचारधारेची मांडणी होत असते.
अशा वेळेस जेव्हा विद्यार्थी पोथ्यातील विचार व धर्मतत्वाच्या विचाराची फलश्रुती काय
? याबाबत विचारणा करतात तेव्हा ते बंड करून उठतात. उत्तर प्रदेशमध्ये बनारस हिंदू
विद्यापीठाच्या परिसरात काही विद्यार्थ्यांनी २५ डिसेंबरला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यातील विचारांचा विरोध
दर्शविला. परंतु धर्मांध विचारांच्या संघटनांनी विद्यार्थ्याविरोधात तक्रार करून
आठ विद्यार्थ्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. विद्यार्थ्यांना अटक होणे हे बुरसटलेल्या
विचारांचा विजय असून देशातील मतप्रवाह कोणत्या दिशेने जात आहे याचे स्पष्टतया होत
असलेले प्रगटीकरण होय.
मनुस्मृतीचे समर्थक भीतीच्या सावटात
मनुस्मृतीच्या समर्थकांना एका नव्या भयावह
रोगाने ग्रासले आहे. आपला मनु व ब्राम्हणी धर्म अस्तित्वात राहील कि नाही हि ती
भयग्रस्त अवस्था होय. बहुजन समाजाला आपल्या काबूत
ठेवण्यासाठी धर्मशास्त्राचा व त्यातील काल्पनिक अवडंबराचा आधार घेतला जातो.
ओबीसी व ब्राम्हणेत्तर समाज
विचारप्रवर्तक नसल्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. अन्यायाचे
नियम सांगणारी मनुस्मृती हि जगातील पहिलीच पुस्तिका असावी. चीकीत्सेमुळे ज्ञानाचा
आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. परंतु या मनुस्मृतीची चिकित्सा मनुस्मृतीच्या
समर्थकांना होवू द्यायची नाही. असे केल्यास त्यांचे धार्मिक व सामाजीक वर्चस्व लोप
पावेल अशी भीती वरच्या वर्णाला वाटत असते. म्हणून आपले वर्चस्व प्रस्थापित
करण्यासाठी आजकाल राजकीय सत्तेचा वापर करण्यात येतो.
मनुस्मृतीचे दहन
परंतु पुढे काय?
बहुजन समाजाकडून
मनुस्मृतीवर कितीही कडवी टीका व तिच्या दहनाचे आयोजन होत असले तरी मनुस्मृतीच्या
समर्थकावर त्याचा कोणताही परिणाम होत नाहीये. उलट मनुस्मृतीचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ठ
करण्याचे धारिष्ट करीत आहेत. याचा अर्थ मनुस्मृतीचे विरोधक निष्प्रभ असून समर्थक
अधिक प्रबळ आहेत. यावर मनुस्मृतीच्या विरोधकांनी चिंतन करून कृती योजना आखली
पाहिजे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियासंदर्भात जे
मनुने लिहिले आहे, ते स्त्रियांना मान्य आहे का?
ज्यांना मनुचे म्हणणे मान्य नसेल, त्यांनी मनुस्मृतीमुक्ती चळवळ उभी करायला हवी. शुद्र
म्हणजेच आजचे ओबीसी व इतर ब्राम्हणेत्तर जातीं कि ज्यांना मनुस्मृतीने सतत
गुलामाची वागणूक देत त्यांना शिक्षण, आर्थिक, सामाजिक व
सांस्कृतिक समानता नाकारली. आता परतफेड म्हणून ब्राम्हणेत्तरानी मनुला नाकारून ब्राम्हणरहीत
सण व संस्कृतीकडे झेप घेतली पाहिजे. पूर्वजांनी निर्माण केलेल्या शेतीसंस्कृती
आधारित सण साजरे केले पाहिजे. आधुनिक काळातील महापुरुषांनी सांगितलेल्या विचारावर
मार्गक्रमण करीत राष्ट्रवादाची फेरमांडणी केली पाहिजे. अनु.जाती समूहांनी महात्मा
ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले व शाहू महाराज या
महापुरुषांच्या विचारांचे उत्सव आयोजित न करता त्याची जबाबदारी ओबीसी व
ब्राम्हणेत्तर समूहाकडे दिली पाहिजे. मनुस्मृतीच्या समर्थकाच्या विचारांना
पराभूत करण्यासाठी आपले तर्कशास्त्र मजबूत करून त्यांच्या काल्पनिक जुमल्यावर वार
करण्यासाठी वास्तव इतिहास व वैज्ञानिक तंत्राचा वापर व्हावयास हवा. शोषणाधीष्ठीत
जुलमी परंपरा व काल्पनिक शास्त्राचा प्रचार व प्रसार करणारे सत्संग व भोंदू महाराज
यांच्याकडे पाठ फिरविली पाहिजे. बहुजन समाजाला धर्मांधता व अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी
यंत्रणा उभी व्हावयास हवी. अन्यथा बहुजन समाजाची शास्त्रोक्त पिळवणूक हजारो वर्षे
अशीच अव्याहत चालू राहतील. याचा विचार समतावादी धुरिणांनी केला पाहिजे.
लेखक:बापू राऊत
No comments:
Post a Comment