Thursday, March 27, 2014

सत्य हे कटू असते तेच खरे .......... हिंदुइझम :अॅन आल्टरनेटिव हिस्टरी

वेडी डॅनिजर या लेखिकेचा हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी  हा ग्रंथ पेंग्विन पब्लिशर्स ने प्रकाशित केला. सदर पुस्तक म्हणजे वैदिक संस्कृत ग्रंथात लिहिल्या गेलेल्या वस्तुस्थितीदर्शक  विविध बाबीची चर्चा व त्याचे विश्लेषण होय. भारतातील ९९.९९ टक्के जनतेला संस्कृत भाषा कळत नाही. त्यामुळे सामान्य जणांना वैदिक संस्कृत ग्रंथात काय लिहिले आहे याचा थांगपत्ता लागणे कठीणच आहे. आतापर्यत संस्कृत ग्रंथातील ब्राम्हण समाजाच्या सोईचा भागच बाहेर येत असे. कारण भारतात प्रकाशक व लेखक हे त्याच समुहाचे असल्यामुळे ते संस्कृत ग्रंथातील वादग्रस्त भाग
प्रकाशित करीत नसत. त्यामुळे भारतीय समाजाला संस्कृत ग्रंथातील अंतरंग समजने कठीणच होते. जे कोणी संस्कृत ग्रंथातील खोटारडेपणा ओरडून सांगत होते त्यांचे म्हणने कोणीही ऐकत नव्हते. वेडी डॅनिजर या अमेरिकन लेखिकेने संस्कृत ग्रंथातील सत्य आपल्या अनेक पुस्तकातून बाहेर काढले. हा सत्यालाप बाहेर आल्याबरोबर संघप्रणीत संघटनांनी वेंडी  डॅनिजर व पेंग्विन विरोधात दंड थोपटले.
कोण आहेत ह्या वेंडी डॅनिजर? वेंडी डॅनिजर यांनी हावर्ड व ऑक्सफर्ड विद्यापीठातून संस्कृतमध्ये दोन डॉक्टरेट मिळविल्या असून त्या शिकागो विद्यापीठात संस्कृत साहित्य, हिंदू धर्म, भारतीय संस्कृती व इतिहास शिकवितात. त्यांनी हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी  हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर बंदी आणण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रणित शिक्षा बचाव आंदोलन समितीने आंदोलन केले. शिक्षा बचाव आदोलन समितीच्या उग्र आंदोलनामुळे पेंग्विनला सदर पुस्तक बाजारातून मागे घेण्यास भाग पडले. आजपर्यंत विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सनातन संस्था ह्या संघटना विरोध करीत असत परंतु या आंदोलनाने जनतेला संघाच्या आणखी एका नव्या संघटनेचे नाव कळले. या संघटनेचे प्रमुख आहेत दिनानाथ बात्रा.  या दिनानाथ बात्रांनी “आता आपल्यासाठी चांगले दिवस येत आहेत” असे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणने सत्य बाबी मांडना-या लेखक व प्रकाशकासाठी धमकीवजा घंटाच आहे. आमच्या संस्कृत ग्रंथातील सत्य बाहेर काढल्यास तुमचीही अवस्था वेंडी डॅनिजर, ए.के.रामानुजन व पेंग्विन सारखी करू याचा हा गर्भित इशारा आहे.
विचाराला विचारांनी जिंकायचे असते. वादविवादात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करीत आपले म्हणणे खरे ठरवून प्रतिस्पर्ध्याचा खोटारडेपणा दाखवायचा असतो. प्रतिस्पर्ध्यावर हल्ला वा नासधूस करून विचार मरत नसतात. उलट वाचकात त्या विचाराविषयीची अधिक आसक्ती वा उत्कंठता वाढत असते. वेंडी डॅनिजर यांचे हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी  हे पुस्तक संघप्रणीत समितीच्या दबावाद्वारे बाजारातून मागे घेतले गेले असले तरी इंटरनेटच्या दुनियेत ते अस्तित्वात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सदर पुस्तक न वाचलेल्यांनीही उत्सुकतेपोटी वाचले आहे. याला राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्याची शिक्षा बचाव आंदोलन समिती कशी रोखणार?
वैदिक धर्माची पुराणे, वेद , महाभारत, रामायण, भगवतगीता व मनुसंस्कृती या ग्रंथात बहुजन समाज व स्त्रिसंबंधात पूर्णत: अवहेलनातमक विधाने आहेत. दबाव व भीतीयुक्त विचार पसरवून या संस्कृत ग्रंथावर बहुजन समाज व स्त्रियांनी मुकपणे विश्वास ठेवावा व त्याचे पालन करावे असा संघ व त्याच्या संघटनाचा होरा आहे. परंतु संघाच्या या भ्रमाचा भोपळा कधीतरी फुटेलच?. बहुजन समाज जसजसा जागृत होईल तसतसी संघीय धारा नष्ट होईल. संघ व त्याच्या विविध शाखा ह्या कोणाचे प्रतिनिधित्व करतात?. विशाल हिंदू बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही भारतातील अल्पसंख्यांक ब्राम्हण जातीची संघटना आहे. ती समस्त बहुजन हिंदूची संघटना कशी होवू शकेल? राष्ट्रीय स्वंयसेवक संघ देशातील जनतेला अंधश्रद्धा व धार्मिकतेच्या गुंगीत ठेवून त्यांच्यावर अधिकार गाजवू पाहते आहे. बहुजन समाजाचा दुबळेपणा, विघटीतपणा व अंधश्रध्दाळू पणाचा संघ फायदा घेत प्रसार माध्यमाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा समस्त हिंदू समाजाचा आहे असे भासविण्यात यशस्वी होत आहे. संघाचे हे गोबेल्स तंत्र आहे.
वेंडी डॅनिजरच्या लिखाणामुळे कोणत्याही बहुजनांच्या भावना दुखाविल्या गेल्या नाहीत. उलट तिच्या लीखानामुळेच वैदिक संस्कृत ग्रंथ जे हिंदूचे म्हणून मिरविण्यात येत आहेत ते कसे बहुजन व स्त्रि विरोधी हे बहुजनांना माहीत झाले. नागपुरात काही वर्षापूर्वी संस्कृतच्या प्राध्यापिका डॉ. रुपा कुलकर्णीने रामायण हे कसे स्त्रि व बहुजन विरोधी आहे याचे प्रमाणसिद्ध वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिध्द केले तेव्हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्यांच्या संघटनांनी डॉ. रुपा कुलकर्णी विरुध्द मोर्चे काढून नागपुरात दशहत निर्माण केली होती.
संघाला सत्य कधीच आवडत नाही. ते विविध माध्यमातून बहुजन समाजाला काल्पनिक दुनियेच्या जगात वावरायला लावते. सत्य हे कटू असते. संस्कृत ग्रंथातील हे कटूसत्य बाहेर आल्यास राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ध्येय व त्याच्या मनुवादी चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या गुप्तसंरचनेला धक्का लागून ते बेचिराख होवू शकते. संघाला ही भीती नेहमी अस्वस्थ करीत असते. त्यामुळे संघ नेहमी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून त्याला आवडत नसणारे विचार व विरोधकांना नष्ट करण्यासाठी बहुजनातील पेड (पगारी) कार्यकर्त्यांचा वापर करीत असतो.
शिक्षा बचाव आंदोलन समितीचे कार्य संस्कृत ग्रंथातील बहुजन विरोधी बाबी बाहेर आणणा-या लेखकांचा व प्रकाशकाचा विरोध करने, नासधूस करने व त्याना कोर्ट केसेस मध्ये अडकविणे तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमातील संस्कृत ग्रंथातील उतारे/भाषांतरे व त्याचे केलेले विश्लेषण/चिकित्सा जर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारधारेविरुध्द गेल्यास सरकारवर दबाव आणून ते बदलविणे हे त्यांचे कार्य आहे ह्या संघिय संस्थाच्या दबावामुळेच  एन. सी. आर टी च्या इयत्ता ६ ते १२ विच्या इतिहासाच्या पुस्तकातून  एकूण ७५ मजकूर वगळण्यात आले.  मानव विकास मंत्रालयाकडून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हिंदू देवाच्या संदर्भातील भाग वगळण्यात आला. ऋग्वेद मध्ये स्त्री संबंधातील अपमानकारक मजकूर अनेकदा आले आहेत. हा उल्लेख असलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या बि. ए. समाजशास्त्र भाग १ मधून हा भाग वगळण्यात आला. ‘मेनी रामायण’ हे रामानुजन लिखित पुस्तक दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आले तसेच संस्कृत शिक्षकांच्या योग्यते संदर्भातील अटी शिथिल करून घेण्यात आल्या.
वास्तविकता रामायण व महाभारतातील पात्रे हे बहुजन समाजाचे नायक आहेत. राम हा क्षत्रियांचा नायक, कृष्ण हा यादवांचा नेता तर शिव हे आदिवासींचे दैवत परंतु बहुजनांच्या या दैवतावर त्यांचा अधिकार राहिलेला नसून भट-पुजा-यांनी त्यावर कब्जा केला असून त्यांच्या अर्थकारणांचे ते साधन झालेले आहे. रामाने सीतेवर(स्त्रीवर) व शंबुकावर अन्याय केला, महाभारतात निरपराध एकलव्व्याचा अंगठा कापला, कृष्णाने स्वत:च्याच यादव कुळाचा नायनाट केला, त्याने अनेक स्त्रियासोबत रासक्रीडा केल्या हे संस्कृत  ग्रंथातील सत्य लिहिले तर ती चूक लेखकाची कशी? त्यांच्या पुस्तकावर बंदी कशासाठी? बंदी आणायचीच असेल तर त्या अवमानजनक संस्कृत ग्रंथावर बंदी का आणू नये? त्यासाठी कोणी का आंदोलने करीत नाहीत?. फायद्याचे असेल तर चूप राहायचे व जर कोणी सत्य सांगून आपले नुकसान करीत असेल तर कांगावा व आंदोलने करायची हि दुहेरी नीती नव्हे काय? यात कसला आला सोज्वळपणा व नितीमत्ता?.
मेघनाथ देसाई यांनी गीता हि सेक्युलर व अहिंसावादी नसून तिच्या लेखकाचा थांगपत्ता लागत नसल्याचे म्हटले आहे. स्वामी विवेकानंद सुध्दा भगवतगीते संदर्भात सांशक होते. इतिहासकाराच्या मते भगवत गीता हि 3-या शतकात लिहिल्या गेली. इतिहासकारांचे हे मत मानायला संघीय ढाचा तयार होईल? श्रद्धा ह्या ऐतिहासिक सत्यावर आधारित नसतात तर  अंध भक्तीतून श्रद्धेचा उगम होत असतो. परंतु इतिहास हा अंध व श्रध्दावान नसतो. तो वास्तविक घटनांचे मुल्यांकन करीत असतो. कल्पनाविलास हा इतिहास नसतो. याच कल्पनाविलासाचे काही काळानंतर मिथ (Myth) मध्ये रूपांतरण होते. मग अडाणी व चलाख लोक त्याला इतिहासाचे रूप देतात. भारतीयांच्या बाबतीतही हेच झाले आहे.
वेडी डॅनिजर या लेखिकेचे हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी हे पुस्तक संस्कृत ग्रंथातील घटनांचे व त्यातील पात्राचे वैज्ञानिक कसोट्या लावून विश्लेषण करते व त्यातील सत्य ते बाहेर आणते. हे सत्य स्वीकारून आपली मानसिकता बदलली पाहिजे. भारत सरकार धर्माच्या संदर्भात कमकुवत व लेचीपेची भूमिका घेताना दिसते. सरकार धर्मनिरपेक्षतेचे तत्वच विसरलेले कि काय? अशी शंका यायला लागली आहे. चलनी नाण्यावर माता वैष्णव देवीचे चित्र रेखाटण्यात आले हे त्याचेच द्योतक आहे. भारत देश तालिबानी धर्मवादाकडे वाटचाल करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अधिक ताकदीने उफाळला आहे. संघाच्या फॅसिस्टवादाला अडविण्याची ताकद आता कोणातच उरली नाही.
बापू राऊत
९२२४३४३४६४
E-mail: bapumraut@gmail.com  

No comments:

Post a Comment