इंटरनेट वरील आउटलुक या मासिकाच्या वेबसाईटवर १४ जुलै २०१४ चा अंक
बघितला. त्या अंकामध्ये डाक्टर नरेंद्र
दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा लेखाजोगा श्री आशिष खेतान या शोधकरिता पत्रकाराने मांडला. लेखातील मजकूर खेदजनक व धक्कादायक
होता. तो लेख वाचताना मन सुन्न होत पोलीस व त्यांच्या मानसिकतेवर अनेक प्रश्न
चिन्ह उभे राहत होते. हेच का ते तल्लख व सदसदविवेक बुद्धीचे महाराष्ट्रीयन पोलीस?.
कसली यांची तल्लख बुद्धी व सदसदविवेक? हे तर अंधश्रद्धेचे महाबळी आहेत. असे लेख
वाचताना राहून राहून वाटत होते. पोलिसांच्या मानसिक कुवतीची कीव येत होती.
ज्या नरेंद्र दाभोळकरांनी आपले आयुष्य अंधश्रध्देच्या नायनाटासाठी घालविल
त्यांच्या मृत्यूची चौकशी पोलीस खात्याने अंधश्रद्धेच्या मार्गाने
तंत्रमंत्राद्वारे करावी? चौकशीसाठी त्यांच्या भूतालाच पाचारण करावे? हा तर
पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा फार मोठा पुरावा आहे. श्रीयुत आशिष खेतान
यांनी लिहिलेल्या लेखानुसार, पुण्याचे तत्कालीन आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे
डाक्टर दाभोळकरांच्या हत्येची चौकशी करण्याचे अधिकार होते. त्यांनी एक पथक तयार
केल होत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस आयुक्त रणजित
पांडुरंग अभ्यंकर आणि निवृत्त काँन्स्टेबल मनीष ठाकुर यांची मदत घेतली. यापैकी मनीष
ठाकुर हे स्वत: भानामती व जादूटोना करतात हे त्यांनी खेतानजवळ मान्य केले आहे. गुलाबराव पोळ व रणजीत अभ्यंकर हे या मनिष ठाकूर यांचे शिष्य बनूनच त्याचे मार्गदर्शन घेत होते. त्यांनी
मग दाभोळकरांच्या आत्म्याशी संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली. गुलाबराव पोळ
यांच्या कार्यालयातच हा खेळ चालू होता. त्यांनी प्लॅचेटचे दृश्य
त्यांनी निर्माण केले होते. थोड्याच वेळात ठाकूर याच शरीर थरथरू लागल. म्हणजे दाभोळकराचा
आत्मा ठाकूरच्या अंगात प्रवेश केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ
यांनी मनिष ठाकूर यांच्या शरीरात शिरलेल्या
दाभोळकरांच्या आत्म्याशी संवाद साधला. यामध्ये हत्या होण्याच्या आदल्या
दिवशी दाभोळकर कुठे होते? सोबत कोण कोण होते? याचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न
करीत होते. याच आधारावर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरत होती. सत्य जाणून घेण्यासाठी
आशिष खेतान यांनी मनिष ठाकूर यांना स्वत:समोर दाभोळकरांच्या आत्म्यासी संवाद
साधण्याची विनंती ठाकूर यांना केली. ठाकूर ने मग स्वत:च्या दौड येथील घरीच दाभोळकराच्या
आत्म्याला पाचारण केल. तेव्हा खेतान यांनी अंगात दाभोळकरांचा आत्मा आणलेल्या ठाकुरला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले.
दाभोळकर हे इंग्रजीमध्येही बोलत असत. परंतु
ठाकूरच्या शरीरातील आत्म्याने इंग्रजीमध्ये बोलण्यास नकार दिला. आपण फक्त
मराठीतच बोलतो असे सांगितले. कारण मनिष ठाकूर यांना इंग्रजी बोलता येत नसावे. आउटलुक
मासिकाच्या माध्यमातून मनिष ठाकूर यांची बाहेर आलेली बनावट भानामती व पोलीस
खात्यांनी तंत्रमंत्र व जादूटोना याच्या आहारी जात विज्ञानवादी दाभोळकर यांच्या
हत्येच्या तपासावर अंधश्रध्देचा कसा फवारा मारला? हे आता देशाच्या व महाराष्ट्रीयन
जनतेच्या पुरते लक्षात आले आहे. पोलिसांच्या या दृष्टीमुळेच अजूनपर्यंत दाभोळकरांच्या
मारेक-यांचा पत्ता लागलेला नाही.
महाराष्ट्रीयन पोलिसांच्या मानसिकतेचा विचार केल्यास पोलीस खातेच
अंधश्रध्दाळू व मानसिक रोगी असल्याचे दिसते. भारतीय घटनेनुसार कोणत्याही धर्माच्या
पूजा अर्चना ह्या सरकारी कार्यालयात घेण्यास बंदी आहे. परंतु या नियमाचे पालन पोलीस
खातेच करताना दिसत नाही. पोलीस मुख्यालय वा कोणतेही पोलीस ठाण्यामध्ये जावून
बघितल्यास याची प्रचीती येते. पोलीस अधिका-यांच्या टेबलाच्या काचेखाली अनेक देवी
देवतांचे फोटो लावलेले असतात. पोलीस ठाण्यात देव्हारेही बघायला मिळतात. प्रत्येक
पोलीस ठाण्यात दरवर्षी सत्यनारायणाच्या महापूजा नित्यनेमाने होत असतात. धर्मनिरपेक्षता
ज्या ठिकाणी रुजायला पाहिजे असे एकमेव खाते म्हणजे पोलीस खाते. परंतु एका विशिष्ठ
धर्माची पूजापाठ व पाठराखण करणारे पोलीस खाते दुस-या धर्माच्या लोकांचा विश्वास
कसा संपादन करणार? अलीकडेच एका रिपोर्टनुसार देशांच्या अल्पसंख्यांक समाजाचा
पोलीसावर विश्वास नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच पोलिसाची विश्वासार्हता
समाजातून कमी होत आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. असे होण्याला पोलिसांची धर्मवादी
कृतीच जबाबदार आहे.
प्रशासकीय कार्यालयात विज्ञाननिष्ठा कशी जपली पाहिजे? तर्कनिष्ठ विचार
कसा केला पाहिजे? धर्मनिरपेक्षता कशी राखली पाहिजे? याचे धडे कर्मचा-यांना दिले
पाहिजे. स्वत:च्या घरी देवांचे कितीही फोटो लावा व कधीही पूजा करा याला कोणाचीच आडकाठी
नसते. कारण घटनेनेच व्यक्तीच्या धर्म स्वातंत्र्याचा हक्क बहाल केला आहे.
त्यानुसार आपल्या घरी तो धार्मिक कार्य करू शकतो. परंतु शासनाने नेमून दिलेले
कामाचे तास शासकीय कार्यालयात पूजेसाठी खर्च करने हे आपल्या कामाशी केलेली प्रतारणाच
ठरते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वा केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी वर्गात विज्ञानवादी
विचार रुजावा म्हणून प्रबोधन करने व राज्यघटनेच्या तत्वाचे पालन करण्याची सक्ती
केल्यास डाक्टर नरेंद्र दाभोळकरा सारख्यांच्या हत्येचा छडा लावण्यास तंत्रमंत्र व
भानामाती चा सहारा घेण्याची कुबुद्धी कोणासही सुचणार नाही.
बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment