गांधीजीला अनेकांनी वेगवेगळया भिंगाच्या
चष्म्यातून बघितले आहे. महात्मा गांधी
यांना कांग्रेस पक्ष, सर्वोदयी व सोईच्या व्यवस्थापुरक मनसबदारानी विश्वपुरुष केले आहे. गांधींच्या महान
अशा अहिंसक सत्याग्रहाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा सर्वोदयी,
काग्रेस व त्यांच्या विचाराचा ज्या संस्कृतीला फायदा पोहोचत होता अशांनी
गांधीजींची अधिकच स्तुती केली. परंतु बदलेली जागतिक परिस्थिती, दुसऱ्या
महायुद्धानंतर कमकुवत झालेला ब्रिटन, अॅटली या
उदारमतवाद्याचे आलेले सरकार व स्वातंत्र्यविरांमुळे हादरलेले ब्रिटीश या मुद्यांचा
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मोठे योगदान होते याचाही विचार व्हायला हवा. समाजवाद्याबरोबर आता मोदीही गांधींच्या रंगात रंगू लागले आहेत.
अमेरिकेमध्ये रंगभेद विरोधात लढलेले मार्टीन ल्युथर
किंग व दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रिटोरिया सरकार विरुध्द लढलेले नेल्सन मंडेला
यांच्या गुरुस्थानी गांधीना बसविण्यात कोणीच कसर बाकी ठेवलेली दिसत नाही.
वास्तविकता मार्टीन ल्युथर किंग व नेल्सन मंडेला यांनी ज्या रंग व वंशभेद कारणासाठी
लढा दिला त्या कारणाच्या आसपासही गांधी फिरकले नाहीत. रंग भेद व वंशभेद याहूनही
भयानक असा “जातीभेद” भारतात होता. गांधीजी एका बाजूला अस्पृश्यांच्या प्रती सवर्ण
हिंदुनी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे असे आवाहन करीत तर दुसऱ्या बाजूला सवर्ण
हिंदुच्या दृष्टीकोनात बदल होईपर्यंत अस्पृश्यांना संयम पाळण्यास सांगत होते. जातीभेदाविरोधात
लढा देण्याऐवजी त्यांनी हिंदूंच्या मनपरीवर्तनावर भर दिला. देशात वर्ण व
जातीव्यवस्था कायम राहावी या मताचे गांधीजी होते. आजही सवर्ण हिंदूचे “अंतस्थ व
बाह्यस्थ” मनपरिवर्तन झालेले दिसत नाही.
गांधीजीचा हटवाद कधीही लपून राहिलेला नाही. माझ्या
विचाराविरोधी एखादी कृती घडणे म्हणजे ते मोठे आव्हान समजत. त्यात ते मग लोकशाहीची मुल्येही
विसरून जात. लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना गांधीच्या
हटवादामुळेच निवड झाल्यानंतरही माघार घ्यावी लागली. भगतसिंग यांना फासावर
लटकावन्यापासून ते ब्रिटीशांना परावृत्त करू शकले असते. पण त्यातही त्यांचा
हेकेखोरपणा आड आला. भारतीय अस्पृश्यांच्या राजकीय हक्काच्या विरोधात गांधी इतके
खवळले की त्याविरोधात येरवडा जेल मध्ये प्राणांतिक उपोषण करुन आपल्या मताप्रमाणे करार करण्यास डाक्टर आंबेडकरास भाग पाडले.
आज गांधी हे सरकारी समारंभापुरते मर्यादित झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर गांधीजीच्या नावे कांग्रेसच्या लोकांनी सर्वसत्ता उपभोगल्या. मात्र हळूहळू गांधीविचाराना ते उखडून फेकतही राहिले. गांधीजीच्या नावाची माल जपत
सरकारी मलाई खात अनेक कांग्रेसी नेते सरंजामदार, शिक्षणसम्राट व भांडवलदार/ठेकेदार बनले आहेत. तर कार्यकर्ते सत्तेतील व खाजगी
क्षेत्रातील मोठे दलाल. नरसिहराव व मनमोहन या दुग्गलीने उच्च वर्गाला खाजगीकरणाचे
फायदे मिळवून दिले. अशाप्रकारे गांधीजींच्या संपूर्ण स्वराजच्या संकल्पनेला केराची
टोपली दाखविली. उरलेल्या गांधीना आता नरेंद्र मोदी व त्यांचा संघ पूर्णता दफन
करण्यास सिद्ध झाला आहे. देशात नथुराम गोडसे याचे पुतळे तयार आहेत. ते कोणत्याही
क्षणी चौकाचौकात लागतील. एका राष्ट्रपित्याचा खुण करने म्हणजे देवत्व प्राप्त करने
आहे का? नथुराम घोडसेचे मंदिर उभे करून भाजपा व संघ परत दुसऱ्यांदा गांधींची हत्या
करीत आहेत. तर दुसरीकडे गांधीजीचे गोडवे गाणारे नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वंयसेवक
संघ व त्यांच्या शाखांना गांधीविरोधी कृत्यासाठी रोखतही नाही. हे नरेंद्र मोदीचे
कोणते डावपेच आहेत हे अजून देशाला कळलेले नाही.
योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे मागासवर्ग
समाजातील युवक गांधीविरुध्द चिडून उठतो याचे कारण म्हणजे त्यांनी निर्माण केलेली
हरिजन नावाची नवी जात, वर्णव्यवस्थेचा कट्टर पुरस्कर्ता, गोलमेज परिषदेमध्ये
मागासांना मिळालेल्या राखीव जागाना केलेला विरोध व जातीनिर्मुलनासंदर्भात त्यांची
बोटचेपी भूमिका ही कारणे तर आहेतच त्यातही मागासांच्या मंदिर प्रवेशासाठी केलेले आंदोलन
अर्धवट सोडून ते सवर्णाच्या मानसिकतेवर ढकलुन दिले होते. चर्चिल यांनीही म्हटले
होते की भारतात हरिजन हे सवर्ण हिंदुच्या दयेवर आश्रित आहेत. गांधीनी कधीही
स्त्रियांच्या मानसिकतेचा व त्यांच्यात सुधारलेपण आणण्याचा प्रयत्न केला नाही.
गांधींची असमान न्यायाची भूमिका कांग्रेस आजही पुढे
रेटत आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मभाव व गरिबी हटाव हे कांग्रेसच्या तोंडी
लोणच्यासारखे केवळ चवीचे शब्द आहेत. गरिबांची गरिबी हटविणे तर दूरच उलट आदिवासीच्या व मागासाच्या जमिनी
खाजगीकरणाच्या नव्या धोरणाद्वारे कंपन्याच्या नावाखाली हजारो एकर जमिनी कांग्रेसच्या नेत्यांनी
स्वत:च्या कंपन्या बनवून लाटल्या. इतरांची भीती दाखवीत मुसलमानांना बेरोजगार ठेवले
परंतु त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध्द नाही केल्यात. केवळ त्या त्या
जातीमध्ये होयबा नेते निर्माण करून ठेवले. गांधीजीचे नाव घेणा-या कांग्रेसचे हेच कारनामे
आहेत. भाजपा याहून दुसरे काय करणार? मंदिर व मुस्लीम विरोधाच्या नावे ते बहुसंख्य
हिंदू समाजाला धर्मांधतेमध्ये गुंतवून ठेवून उद्योगपती व भाजपा नेत्यांच्या
कंपन्यांना देशात मोकळे रान सोडतील. यात बहुंसंख्य हिंदूंचा कुठला आलाय विकास?
धर्म, हिंदुत्व, राष्ट्रवाद व मुस्लीम विरोध याचे तुणतुणे वाजवीत बहुजन हिंदू
विरुद्ध अल्पसंख्य असा खेळ करीत देश सतत अस्थिर ठेवतील. नाव गांधीचे परंतु नीती
गोळवळकर गुरुजीची असा मोदी न्याय दिसतो.
गांधीना नव्या प्रतिकात आणण्याची भाषा योगेंद्र
यादव करीत आहेत. पण नवे प्रतिक कसे असतील हे सांगत नाहीत. खरे तर या देशातील
समाजवादी आता भीतीयुक्त वातावरणात वावरत आहेत. देशाचा इतिहास बदलायल्या निघालेल्या
मोदी व संघाविरोधात ते “ब्र” सुध्दा काढत नाहीत. गरीब शेतकरी, आदिवासी, मागासविरोधात
कायदे बनण्याची प्रक्रिया सुरु झाली तरीही विरोधाचा आवाज कुठूनही ऐकू येत नाही. आम आदमी पक्षाचे संयोजक केजरीवाल
यांनी स्वराज नावाची पुस्तिका काढून ग्रामसभेच्या माध्यमातून गांधीविचाराला
राबविणार आहेत. हा एक धुर्तपणाच आहे कारण वर्णव्यवस्था, उच नीचपणा व
जातीव्यवस्थेनी खच्चून भरलेली ग्रामसभा या देशातील लाखो आदिवासींना व अस्पृश्यांना
कसा व कोणता न्याय देतील ? आदिवासी व दलित समाजातील लोकांना सरपंचही बनू दिले जात
नाही. बनविलेच तर जमिनीवर खाली बसायला लावतात. सगळा कारभार स्वत:च सांभाळून
त्यांना हीन वागणूक देतात. अशा परिस्थितीमध्ये केजरीवाल व योगेंद्र यादव यांचा
ग्रामस्वराज कसा यशस्वी होईल?.
कांग्रेस, भाजपा/संघ व समाजवादी गांधीविचाराला
हत्तीचे वर्णन करणा-या पाच आंधळ्यासारखे घेवू लागले आहेत. पाच आंधळ्यांचा
कोणताही हत्ती खरा नसतो. या सर्वानी गांधीजीला पाच आंधळ्याचा हत्ती बनवून
रस्सीखेच करीत आहेत. रामभक्त गांधीचे गोडवे गात भाजपा व संघ सावरकर, दीनदयाल,
शामाप्रसाद व नथुराम गोडसेला प्रस्थापित करू पाहते. कांग्रेस गांधीला समोर करून
केवळ स्वत:च्या मौजेची सत्ता राबविते तर समाजवादी व सर्वोदयी गांधीजीच्या
चातुर्ण्यव्यवस्था समर्थनाला, स्त्रि दुर्लक्षिततेला व धार्मिक आचरनाला योग्य
ठरविण्यासाठी गीता व उपनिषदेचा अन्वयार्थ लावून देतात. या रस्सीखेचात गांधीजींचे
दुर्लक्षित राहिलेले पहलू बाहेर येत आहेत व ते गांधीजीसाठी हानिकारक आहे याचे
कोणासही भान नाही.
बापू राऊत
मोबाईल न. ९२२४३४३४६४
ई मेल:bapumraut@gmail.com
Blog: www.bapuraut.com
|
No comments:
Post a Comment