Friday, November 6, 2015

असहिष्णुतेचे विषाणू

इतिहासकार इरफान हबीब यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या भाजपाच्या मातृसंघटनेची तुलना इसीस/तालिबानी अशा आंतकवादी संघटनेसी केली असल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकली. त्यावर भाजप व संघीय नेत्यांचे तोल सुटलेले वक्तव्य व आगपाखड झालेले त्यांचे चेहरेही जनतेसमोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या कार्यपध्दतीची तुलना सुध्दा निरपेक्ष पध्दतीने होणे आवश्यक आहे. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्यात बरेच साम्य बघायला मिळते. ते दोघेही कट्टर धर्मवादी असून आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपविन्याच्या बाजूचे आहेत. इसीस/तालिबानी स्त्रियांवर बंधने आणू इच्छितात तर स्त्रियांवर बंधने घालणारा मनुस्मृती हा संघासाठी प्रिय ग्रंथ आहे. इसीस/तालिबानी आपल्या विचाराविरोधी कृत्यासाठी खुणसूत्र घडवून आणतात तर संघीय कार्यकर्तेही गाई व मंदिरासाठी माणसांचे मुर्दे पाडतात. बम्बस्फोट प्रकरणात संघीय समर्थक तुरुंगाची हवा खात आहेत. त्यामुळे भारताची साख कायम ठेवण्यासाठी संघाला कोणत्या मापदंडात मोजायचे याचा विचार भारतीय जनतेला व विचारवंतांना करावा लागेल.

 

खरे तर भारतात असहिष्णुता हि आजची गोष्ट नाही. हजारो वर्षापासून ती या देशात अस्तित्वात आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्था व उच्च /कनिष्ठ जातीयवाद हीच असहिष्णुतेची मुख्य जडे आहेत. ह्या व्यवस्थेने हजारो वर्षे समाजाच्या एका घटकावर अन्याय व अत्याचार केला आहे. शंबुकाला विद्या घेण्यापासून रोकन्यात आले. एकलव्याला धनुर्धनधारी बनू न देण्यासाठी अंगठा कापण्यात आला. सीता व द्रौपदीला कठीण दिव्यातून जावे लागले. अशा अनेक घटना इतिहासजमा आहेत. परंतु देशात राज्यघटना लागू झाल्यानंतरच असहिष्णुतेचे स्वरूप बदलले गेले. मात्र २०१४ च्या निवडणुकानंतर देशात परत असहिष्णुता हावी होत असल्याचे जाणवते. कायद्याचा धाक समाजकंटकाना मुळीच वाटत नाही. त्यामुळे आपण काहीही केले तरी सांभाळून घेणारे आपली माणसे सत्तेत आहेत ना! अशा थाटात ते वावरत आहेत.

वाढत्या असहिष्णुतेला विरोध म्हणून शब्दांनी संघर्ष करणारे, बुद्धिमत्तेला जोर देवून शोध लावणारे, जीवनाचे वास्तव पडद्यावर दाखविणारे व आपल्या कलेने दुसऱ्यांचे मनोरंजन करणारे व शांतपणे आपले वयक्तिक जीवन जगणारे लेखक, वैज्ञानिक, फिल्ममेकर व कलाकार आज उद्विग्नपणे राजसत्तेच्या निष्क्रियतेचा विरोध म्हणून आपापले पुरस्कार परत करीत आहेत. पुरस्कार परत करणाऱ्या लेखकानंतर जुबीन मेहता, रिझर्व बॅकेचे गव्हर्नर रघुराम राजन, शहारुख खान, अमजद अलीखान, नारायण मूर्ती, किरण मुजुमदार, पी.एम.भार्गव, अरुंधती राय व मेघनाद देसाई यांनी सुध्दा देशात वाढत्या असहिष्णूतेबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत. इरफान हबीब, रोमिला थापर व कृष्णा सोबती यांनी वाढत्या असहिष्णुते बाबत सरकारला इशारा दिला, बुध्दिवंताच्या या विरोधाला कांग्रेसी वा वामपंथी  समर्थक समजून चूक करू नका. आज केवळ बुद्धिवंत लोक बाहेर येवून विरोध करताहेत कदाचित उद्या जनता रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करु लागेल. परंतु असे इशारे सरकारला व संघीय लोकांना हास्यास्पद व थट्टामस्करीचे विषय वाटत असल्याचे त्यांच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यावरून वाटू लागले आहे.

गोमांस घरी ठेवण्याचा ठपका ठेवून ठेचून मारण्याचा प्रकार, गाईचे सांगाडे सापडण्याच्या प्रसंगात ट्रकवर पेट्रोल बाम्ब हल्ला करून मारण्याचा प्रकार,   अल्पसंख्याकांवरील हल्ले, विचारवंतांच्या हत्या, लेखक व अभ्यासकांना देण्यात येणाऱ्या धमक्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा ह्या साऱ्या घटना अमानवीय व असहिष्णू नाहीत काय? परंतु त्याहूनही बिशाद म्हणजे ज्यांना ते हिंदू म्हणवून संबोधतात त्या हिंदू वंचितावरही (अनु.जाती व जमाती) ते हल्ले करू लागले आहेत. असहिष्णुतेपेक्षाही मोठी भयंकर असहिष्णुता या देशात  वाढू लागली आहे. हिंदू परंपरेबाबत तुम्ही काही बोलल्यास तुमची जीभ कापून टाकू असे टोकाचे संदेश देण्यात येत आहेत. आमचे व्हा नाहीतर मरा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला तर तुम्ही बीफ खावूनच दाखवा, आम्ही तुमचे भरचौकात मुंडके उडवून देवू अशी भाजपा कार्यकर्त्याने आव्हानात्मक भाषा वापरली आहे. एका राज्याचा मुख्यमंत्रीच गोमास खाणाऱ्यांना या देशात थारा नाही असे म्हणतो. हे कोणत्या सहिष्णुतेचे लक्षण आहे?

देशात वाढत असलेली असहिष्णुता ही एका रात्रीतून वा २०१४ च्या निवडनुकानंतरच जन्मास आली असे नाही. तिचे पालनपोषण करण्यासाठी एक विचारधारा सतत राबत होती. द्वेषावर व असमानतेवर आधारलेली हि विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या विविध संघटनाच्या (बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गावाहिनी, हिंदू जागरण मंच, सनातन संस्था इत्यादी) माध्यमातून लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या मनात रुजवीत होती. आज याच विचारधारेने उग्र रूप धारण केले आहे.

देशात वाढत असलेला हिंसाचार, असहिष्णूता, भारत सरकारचे काही निर्णय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेत्यांच्या बोलण्यावर जे जे लोक आक्षेप घेतात त्यांना सरळ राष्ट्रद्रोही म्हणण्याची फॅशनच रूढ केली आहे. तुमची जागा भारतात नाही तर पाकीस्तानात आहे असे निर्ढावून टीव्हीच्या कॅमेरा समोर येवून सांगतात. आम्ही सांगू ते खायचे, आम्ही सांगू तेच कपडे घालायचे, आम्ही सांगू तोच इतिहास व त्याच परंपरा समजायच्या, सर्व मुकाट्याने सहन करायचे असा धाकटपशा या देशात चालू झाला आहे. कनिष्ठ जातीवर अत्याचार होतात, होवू द्या, शुद्र, ढोर, गवार, नारी ये सब ताडन के अधिकारी हे धर्मशास्त्रातच सांगितले आहे. त्याला विरोध करायची गरज नाही. जुनाट रुढी परंपरा व आपल्या समुहावर होणारा अन्याय शब्दबध्द करण्यासही अशासकीय बंदी घालण्यात येत आहे. वंचित समाजातील लेखक आपल्या समुहावर अनन्वित अत्याचार होत आलेत, विषमतेणी बरबटलेल्या समाजाची सुटका व्हावी व ते अत्याचार कसे आहेत, त्याला कोण जबाबदार आहे? हे सांगण्यासाठी पुस्तके लिहू लागली तर अशा लेखकानाच ठार मारण्याची धमकी देवून त्याच्यातील लेखक मारून टाकण्यात येत आहे. हि केवढी मोठी भयानक घटना. पण त्यावर कोणीच बोलत नाही. सयुंक्त राष्ट्र संघाची मानवाधिकार शाखा सुध्दा गप्प बसते. तुम्ही फक्त गुलाम म्हणूनच जगायचे येवढेच आता या कंटकांनी सांगायचे बाकी राहिले आहे.

संघीय लोक “बहुसंख्याक हिंदू समाज” हा आपलाच पाठीराखा आहे असी गोड समजूत करून घेत आहेत. वास्तविकत: व जमिनी तथ्य याच्या अगदी उलट आहे.  देशातील ८० टक्के लोक संघाला मानतच नाहीत. संघ हा हिंदुतील अल्पसंख्यांक परंतु उच्च समूहाची संघटना आहे. परंतु ती बहुसंख्यांक हिंदुना कंट्रोल करू पहात आहे. यासाठी संघाचा मुख्य आधार हा धर्म, देव व परंपरा असून बहुसंख्यांक हिंदुना इतर धर्माचा द्वेष करायला उद्युक्त करणे हा आहे. कधी हिंदू विरुद्ध मुस्लीम, हिंदू विरुध्द इसाई तर कधी हिंदू विरुध्द दलित असा हलता संघर्ष सतत तेवत ठेवण्याचे कारस्थान चालू आहे. गाईना कापनार्यांना सरकारच काय नरेंद्र मोदीसुध्दा वाचवू शकणार नाही असे विहिपचे प्रवीण तोकडीया दरडावून सांगतात. असहिष्णुतेच्या  अशा विषानुना वेळीच रोखले नाही तर देश कोणत्या थराला जाईल हे सांगणे आज फार कठीण आहे.

सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी व समाजकंटकासी असणारे त्यांचे नाते देशाला हादरवून सोडणारे आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत असे वाटतच नाही. ते केवळ एका तबक्याचे प्रधानमंत्री असल्यासारखे वागतात. बोलघेवडे व ट्विटर मास्टर असे बिरूद लागलेले प्रधानमंत्री मात्र देशात होत असलेला हिंसाचार व असहिष्णुता सारख्या गंभीर विषयावर बोलतच नाहीत. त्यामुळे जिनको काटना है काटो, जिनको मारना है मारो असी निशब्द सहमती तर ते देत नाही ना! असी शंका सुध्दा मनाला चाटून जाते.

लेखक: बापू राऊत

मो.न.९२२४३४३४६४

ई मेल: bapumraut@gmail.com

1 comment: