नुकताच नांदेड महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात कांग्रेसने
इतरापेक्षा चांगलीच बाजी मारली. निवडणुकांच्या निकाल बघितल्यानंतर मला एका हताश
झालेल्या तरुणाचा फोन आला. म्हणाला, नांदेड हा आंबेडकरवाद्यांचा बऱ्यापैकी बालेकिल्ला
आहे. तिथे नेहमी प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात. कोपर्डी प्रकरणानंतर लाखोच्या
प्रमाणात बहुजन क्रांती मोर्चे निघाले. त्या मोर्च्याच्या संख्येवरून नांदेड च्या आगामी
राजकारणात बदल होईल असे वाटले होते. परंतु महानगरपालिकेचा निकाल लागला आणि माझा भ्रमनिराश
झाला. असे का झाले असावे? असा त्यांनी मला प्रश्न केला. प्रश्न महत्वाचा तसाच
गंभीर होता. मी त्याला उत्तरादाखल म्हणालो, महापालिकेच्या एकेका वार्डात
तथाकथित
आंबेडकरी पक्षांचे किती उमेदवार उभे होते? त्यांनी सांगितले एकाच वार्डात फुले
आंबेडकरवादी अपक्षासह पक्षाचे एकूण ७ ते आठ उमेदवार उभे होते ( बहुजन समाज पक्ष, भारिप
बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती पार्टी, रिपब्लिकन पक्ष (अ ब क ड...), भारतीय दलित
पैन्थर, बीआरएसपी ). मी त्याला म्हणालो, एकाच वार्डात एकाच जाती समुहाचे व्होट
घेण्यासाठी एवढ्या संख्येने जर उमेदवार उभे असतील तर ते कसे काय निवडून येतील? लोक
म्हणतीलच यांना आपले किमती मत देवून वाया का घालवायचे? त्यापेक्षा आपले मत कांग्रेसलाच
दिलेले बरे या न्यायाने आंबेडकरी जनतेनी कांग्रेसला मत देवून त्यांच्या
उमेदवारांना निवडून दिले. जे कट्टर बहुजनवादी / आंबेडकरवादी मतदार होते त्यांनी
आपल्या समर्थक गटातटाला मत दिले असेल परंतु त्याने काहीही फरक पडत नसतो कारण अशा
बोटावर मोजता येणाऱ्या मतावर कोणत्याही गटाचा उमेदवार कधीही निवडून येणे शक्य
नाही. त्यानंतर त्याचा तिसरा प्रश्न होता. सर, असे हे किती दिवस चालायचे? आणि याला
कोण जबाबदार आहे? मी त्याला म्हणालो जोपर्यंत लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत असेच
चालत राहणार. यात अनेक पिढया नष्ट होतील परंतु विजय प्राप्त होणे शक्य नाही. आणि
जबाबदारी संदर्भात बोलायचे झाल्यास आंबेडकरी राजकारणाच्या पराभवास जेवढे गटातटाचे
नेते जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्याहून अधिक आंबेडकरी जनताच जबाबदार आहे. कारण
ती नेत्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस करीत नाही. ती नेत्यांना धडा शिकविण्याचा इशारा
देत नाही.
आजकालचे कोणतेच आंबेडकरवादी नेते तत्ववादी राहिलेले नाहीत. संधीसाधू झालेले हे
नेते केवळ संधीची वाट पहात असतात. नेता बनण्यापर्यंत ते मोर्चावादी असतात. एकदा
नेते पदाचे लेबल लागले की कोणत्यातरी पक्षाच्या आमंत्रणाची वाट पाहत राहतात. जो
पक्ष चांगली संधी देईल त्या पक्षाकडे स्वत:सोबत समर्थक व्होटबँक घेवून जातात. आणि
जे पक्षाची स्वतंत्र बिऱ्हाड करून राहतात ते अहंगडाने पछाडलेले असतात. नेतेपदाची हौस, मी
त्याच्यापेक्षा काही कमी आहे का? ह्या खोट्या भ्रमात ते वावरतात. जनतेमध्ये
त्यांना काही किंमत नसते परंतु चमचे कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीमुळे मी सर्व
गटवाल्यापेक्षा मोठा आहे असे लायक नसलेल्या नेत्यांना वाटत असते. निवडणुकांच्या
हंगामात अशा नेत्यांना चांगलाच भाव मिळत असतो. त्यामुळे कोणताच नेता एकी करण्यास
तयार नसतो. कारण प्रत्येकाला आपापले नेतेपद जाण्याची भीती वाटत असते. एकदा नेतेपद
गेले की कमाईचे साधनच निघून गेल्यासारखे होते. त्यामुळे आंबेडकरी पक्षाची आजची
अवकळा ही भविष्यातही असीच कायम चालत राहणार. हे समजण्यासाठी कोणत्याही
भविष्यवेत्त्याची गरज नाही.
आता खरा प्रश्न आहे तो आंबेडकरी जनतेचा. गटातटाच्या नेत्यामध्ये विभागलेली
जनता नेत्यांचे आर्थिक सूत्र हळूहळू समजू लागली आहे. जनताच आता नेत्यांचे अनुकरण
करीत एक हजार ते दोन हजारापर्यंत आपली मत (व्होट) विकू लागली आहे. पाच वर्षात चार
निवडणुका येतात. बऱ्यापैकी तात्पुरती गरज पूर्ण होते या विचाराने तो आपले मत विकतो.
आंबेडकरी जनता आता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची अजिबात राहिलेली नाही. नेत्यांनीच
नैतिकता विकली तर मग जनतेला तरी दोष का द्यावा? कारण जनता ही सजग व विचारांनी
तेवढी प्रगल्भ नसते. ती केवळ नेत्यांचे अनुकरण करीत असते. वाळलेल्या गवतासारखी
त्यांची मन असतात. हवेच्या दिशेनी ती पेट घेत असतात. कोण कशी आग लावतो यावर सारे
अवलंबून असते.
केडरबेस कार्यकर्ते व केडबेस जनता हा आंबेडकरी चळवळीचा कणा कधी मोडून पडला हे
कळले सुध्दा नाही. माझाच खरा गट, मीच सच्चा आंबेडकरी अनुयायी, मीच जास्त हुशार असी
डिंग आजकाल काही अर्धवट नेते मारू लागले आहेत. एकमेकाच्या गटाना कसे संपविता येईल?
यातच काही अर्धवट नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांची हयात निघून जावू लागली आहे. एकमेकावर
टीका करण्याची संधी ते शोधत असतात. परंतु येथे कोणीही, कधीही संपणारा नसतो. कारण
त्या त्या संघटनेतच नवा नेता निर्माण होत असतो. आणि असा नवा नेता जुन्या नेत्याला
मागे टाकून स्वत:ची नवीनच संघटना काढून आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्न
करीत असतो. आंबेडकरी चळवळीचे नेमके हेच झाले आहे. ती दिशाहीन झाली असून अंधारात
चाचपडत आहे. दर वर्षाला नव्या संघटनांचा व पक्षाचा जन्म होत जुन्या यादीत नव्याची
भर पडत आहे.
स्वबळावर राजकीय सत्ताधारी होता न येणे हे तथाकथित नेते व आंबेडकरी जनतेच्या
नाकर्तेपणाचे लक्षण आहे. ती डावपेच न लढवता आपसात लढण्यात शक्ती खर्च करीत असते. शह
आणि काटशह देवून एकमेकांना पंगु बनविण्याची संधी ते शोधतच असतात. आंबेडकरी लोकांची
राजकीय चळवळ ही भारतात अस्तित्वात असलेल्या मुर्ख चळवळी पैकी अग्रस्थानावर असलेली
पहिली चळवळ असावी. ध्येय नसलेली व एकमेकाच्या थडग्यावर टिकू पाहणारी चळवळ यशस्वी
तरी कशी होईल? उलट ति नष्ट होण्याच्या प्रक्रीयेमध्ये प्रवेश झालेली असते. जगाच्या
इतिहासात चिमुकल्या जातीच्या गटाच्या समुहाने एखाद्या राष्ट्राची संपूर्ण यंत्रणा
आपल्या हातात घेणारा भारत हा एकमेव देश आहे. ब्राम्हण या चिमुकल्या जातीचे संपूर्ण
भारतावर नियंत्रण आहे. त्यासाठी ब्राम्हणांनी धर्माला अफूची गोळी बनविली आहे.
हिंदुत्वाच्या नशेने त्यांनी भारतातील ८५ टक्के जनतेचे वशीकरण करून नियंत्रण प्राप्त
केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक माध्यमे, क्लुप्त्या व साधने वापरली आहेत.
फुले, आंबेडकर, पेरियार, लोहिया व शाहू महाराज अशा नायकांचा आदर्श असलेल्या समूहांना
भारताच्या सगळ्या यंत्रणेवर वर्चस्व साधण्यासाठी खोट्या व अतिरंजित बाता मारण्याची
गरज नाही. धर्माच्या अफुचीही गरज नाही. खरी गरज आहे ती बहुजनांना सत्य सांगण्याची.
वैदिक ब्राम्हण व त्यांच्या शास्त्रांचा खोटारडेपणा सांगू शकणारे प्रतिभावान बोलके पोपट
निर्माण करणे आवश्यक आहेत. परंतु त्याहीपेक्षा खरी गरज आहे ती एकत्र येण्याची,
नेते व जनतेने स्वत:ची केडरबेस मानसिकता निर्माण करण्याची, महापुरुषांच्या
तत्वज्ञानासोबतच समस्त बहुजनांना एका धाग्यात बांधण्यासाठी नव्या तत्वज्ञानाच्या निर्मितीची,
शिस्तप्रिय बाणा निर्माण करून व्यक्तीसदृश्य दृष्टीकोन न बाळगता संघटन ह्या संघ शक्तीवर
विश्वास ठेवण्याची. इतिहासात गटातटात विस्कळीत राहणाऱ्या वज्जीचे राज्य अजातशत्रूने
नष्ट करून टाकले होते. त्यामुळे गटातटाच्या धारकांनी आपला वज्जी होवू नये याची
काळजी घेवून रसायनाचे नवे सूत्र निर्माण केले पाहिजे.
नांदेडच्या महापालिका निवडणुकांच्या निकालाने आंबेडकरी गटातटाच्या पक्षांना लोकांनी
संपूर्णपणे झिडकारले आहे. एकाच वार्डात आपापले उमेदवार उभे करून हे तथाकथित नेते
स्वत:ची व कार्यकर्त्यांची शक्ती वाया घालवीत आहेत. युवकांना या संधीसाधू
नेत्यांचे राजकारण समजू लागले आहे. त्यामुळे हे युवक प्रश्न विचारू लागले आहेत. त्यांचे
समाधान गटातटाच्या नेत्यांनी केले पाहिजे. अन्यथा हाच युवक उद्या या गटातटांच्या
नेत्याविरोधात बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणालाही अधिक काळ भ्रमित
ठेवता येणार नाही. तरुणांच्या मानसिकतेची अवस्था ही सोशल मिडीयाच्या माध्यमातील
प्रतिक्रियेतून उग्रपणे समोर येत आहे. कांग्रेस
व भाजपा हे पक्ष बहुजनांचे व भारतीय मुलनिवासी लोकांचे तारणहार नाहीत हे तो समजू
लागला आहे. त्यामुळे पर्यायी पक्ष शोधणाऱ्या युवकांना गटातटाचा नव्हे तर केवळ एक
आणि एकच पक्ष पर्याय म्हणून समोर ठेवावा लागेल. अन्यथा युवकांच्या झंझावात तथाकथित नेते व त्यांच्या पक्ष संघटना
विसर्जनाच्या वावटळात सापडल्याशिवाय राहणार नाहीत.
बापू राऊत
९२२४३४३४६४
No comments:
Post a Comment