Wednesday, October 2, 2019

बेडसे लेणी: निसर्गाच्या कुशीतील प्रेक्षणीय स्थान


पवना नदीच्या जवळ व पठारी मैदानातील ३०० फुट उंचीच्या डोंगरमाथ्यावर लेण्याचा समूह असून त्यांना बेडसे लेणी असे संबोधले जाते. बेडसे लेण्यांमध्ये चैत्यगृह, एक मोनास्ट्री, दोन स्वतंत्र गुहा असून काही अपूर्ण गुहा आहेत. या अपूर्ण गुहा म्हणजे दगडाच्या कडकपणामुळे आकार येत नसल्याकारणाने सोडून दिलेला अर्धवट भाग. गुहेच्या समोर काही कुंड असून त्यापैकी एका कुंडाच्या समोर “पाणी पिण्यासाठी” असे ब्राम्हीलिपीत लिहलेले आढळते. लेण्याच्या वरच्या बाजूस पत्र्यासारखे दिसणारे दगडी छत असून स्थापत्य कलेचा तो अप्रतिम नमूना आहे. ह्या बेडसे लेणी, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असून भाजे लेणी पासून ९ कि.मी. अंतरावर आहेत. लोकांना कार्ला आणि भाजे लेण्यांविषयी बरीच माहिती आहे. वास्तविकता मावळ प्रदेशातील ह्या लेण्यांचा त्रिकोण (कार्ला-भाजे-बेडसे) बेडसे लेण्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. बेडसे लेण्या जवळच पवना धरणाला लागून लोहगड,
विसापूर, तुंग आणि तिकोना किल्ले डौलात उभे असताना दिसतात. डोंगरात दगडाला विशिष्ट आकार देवून बनविलेल्या ह्या लेण्याचा इतिहास इ.स.पू. पहिल्या शतकातील सातवाहन काळात सापडतो. बेडसे लेण्यावर जाण्यासाठी प्रशस्त पायर्‍या असल्यामुळे वयस्क व्यक्तींना सुध्दा अत्यंत सुलभपने चढत जाता येते.

बेडसे लेण्याची तोंडे ही पूर्वेकडे आहेत. त्यामुळे लेण्यांना सकाळी लवकर भेट दिली तर सकाळच्या सूर्यप्रकाशात लेणीचे अप्रतिम सौंदर्य बघायला मिळते. सकाळच्या सुर्यप्रकाशात ती सोन्याच्या रंगात पूर्ण रंगलेली दिसते. लेण्याच्या आतील प्रत्येक भाग जनुकाही सोन्यानीच मढवला की काय असे भासु लागते.  

बेडसे लेणींना भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्याचा. या मौसमात पूर्ण हिरव्यागार हिरवळीने व्यापलेले दृश्य मोहित करणारे असून पाण्याचे खळखळणारे धबधबे बघायला मिळून चांगला आनंद लुटता येतो. रंगीबेरंगी फुलानी आच्छादलेले गालीचे बघितले की मनाला तिथून परतावेसे वाटत नाही. णारे्याचे खलखल लीच ला मिलबेडसे लेणी अनेकाना ज्ञात नसल्यामुळे तेथे सहसा गर्दी बघायला मिळत नाही. मात्र त्याचा एक फायदा असा होतो की, आपल्याला तेथील दृश्यांचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

बेडसे लेणी ह्या छोट्या असल्या तरी त्याची स्वतंत्र वैशिष्टे आहेत. यात एक मुख्य चैत्य असून त्यात एकूण 22 मोठे दगडी खांब आहेत. त्या काळी ते ध्यान साधनेचे स्थान असावे. मुख्य चैत्याच्या बाजूस एक स्वतंत्र विहार असून श्रमणासाठी स्वतंत्र राहण्याच्या कुटी आहेत. तेथे मोठ्या आकाराचा हॉल असून तो उपदेशना व धम्मचर्चेसाठी वापरण्यात येत असावा. पावसाळ्यात ओथंडुन वाहणार्‍या नद्या व भरलेल्या धरणामुळे बुध्दाचे समता व मानवतावादी विचार लोकापर्यंत पोहोचविण्यात येत असलेल्या अडथळ्यामुळे श्रमण (भिक्खू) वर्ग या लेण्यात वास्तव्य करत असायचा. त्यांच्या या वास्तव्याला वर्षावास असेही म्हणतात.

या लेण्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच सलग दगडाला कट करून निर्माण केलेले शिल्प असून  चैत्यगृहाच्या समोरील व्हरांड्यात चार मोठे स्तंभ असून त्यावर घोडे व बैलाच्या जोड़ी सोबत जोडप्यांचे  (महिला व पुरुष)  शिल्प आहे. छताला 26 अष्टकोनी खांब आहेत. लेण्याची उत्तम सजावट म्हणजे चैत्याच्या कमानी. त्या पिंपळाच्या पाणाच्या आकृतिबंधात चिन्हांकित केल्यामुळे आकर्षक वाटतात. ही लेणी म्हणजे स्थापत्य कलेचा मोठा आविष्कार वाटतो. चैत्यांमध्ये लाकडी आर्किटेक्चरची प्रतिकृती बनविणारे दगड आहेत परंतु त्यातील वास्तविक लाकडी साधने चोरली गेलेली असावीत.  
चैत्य आणि विहाराच्या छप्पराच्या आतल्या बाजूस असलेली नक्षीकामे व भित्तिचित्रे नष्ट झालेली आहेत. या संदर्भात असे सांगितले जाते की, लेण्याची पाहणी करण्यास येणार्‍या ब्रिटिश अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी स्थानिक अधिकार्‍यानी केलेल्या रंगरंगोटीमुळे ती नष्ट झालेली आहेत. ह्या लेणीची देखरेख करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे होत असून एक कर्मचारी कंत्राटी पध्दतीवर ठेवलेला आहे. मात्र लेणी बघण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. चैत्याच्या व्हरांड्यातील दोन्ही टोकांवर पेशी आहेत. त्यापैकी एकावर नाशिकच्या देणगीदाराने दिलेली भेट असे ब्राम्ही लिपीत कोरले असून त्यावर त्याचे नाव कोरलेले आहे. अपूर्ण लेण्याच्या बाजूला वर चढण्यासाठी पायर्‍या बनविलेल्या असून त्याद्वारे लेण्याच्या माथ्यावरील डोंगरावर चढता येते तर दुसर्‍या बाजूस पाण्याचा मोठा कुंड असून ते बंद ठेवलेले आहे.  

बेडसे लेणी ही बौध्द धर्मातील हिनयान स्कूलचे दर्शनस्थळ असून तेथे गौतम बुध्दाच्या प्रतिकृती आढळत नाहीत. याचे कारण म्हणजे हिनयान तत्वज्ञानाने नाकारलेली मूर्तिपूजा होय. हिनयान तत्वज्ञानात चैत्याला अधिक महत्व दिले गेलेले दिसते. हिनयानाचे सर्व ग्रंथ पाली भाषेत लिहलेली आहेत. हिनयान तत्वज्ञानाचा प्रसार मुख्यत: दक्षिण भारत, श्रीलंका, कम्बोडिया, वियतनाम, थाईलैंड, लाओस, म्यानमार आणि जावा या ठिकाणी झालेला दिसतो. हीनयानाला थेरवाद असेही म्हटल्या जाते.

महाराष्ट्राला हजारो वर्षाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात बौध्द जनजीवन स्थापित होते हे विविध पुराव्यावरून सिध्द होते. महाराष्ट्रात एकूण ८०० च्यावर बुध्दस्थळे असून आजही जमिनीच्या खाली व जमिनीच्या वर बौध्द संस्कृतीचे (हिनयान व महायान) अवशेष बघायला मिळतात. कोंकण प्रदेशात तर अनेक लेणी अस्तीत्वात आहेत. ज्याअर्थी भारतात एवढ्या प्रमाणात बौध्द संस्कृति फोफावली असताना त्या संस्कृतीला मानणारा लोकसमूह मग गेला कुठे? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण लोकाशिवाय व त्यांच्या सहभागाशीवाय कोणतीही संस्कृती उदयास येत नाही व ती मोठ्या प्रमाणात फोफावतही नाही हा सामाजिक सिध्दांतच आहे. महाराष्ट्रात सम्राट अशोकाच्या अगोदरही म्हणजे ई. स. पूर्व ४८० मध्ये बौध्द संस्कृती अस्तीत्वात होती हे विदर्भातील पौनी येथे झालेल्या उत्खननातून सिध्द झाले आहे. तथागताच्या महानिर्वाणापूर्वी महाराष्ट्रा सकट आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ व कर्नाटकापर्यन्त तिचा विस्तार झालेला होता.

ते काहीही असो, बौध्द संस्कृतीने भारतास दिलेल्या वास्तु, लेण्या व तत्वज्ञानाचे संवर्धन होणे फार गरजेचे आहे. रमणीय स्थानी असलेली ही स्थळे केवळ पर्यटनास चालना देणारी नसून भूतकाळाचा वेध घेत भविष्यकाळातील वाटचाल करणारी ठरू शकतात. त्यामुळेच बेडसे लेण्या सारख्या स्थळांना आवर्जून भेटी दिल्या पाहिजेत. सरकारनेही हजारो वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक लेण्यांचे संवर्धन करून पर्यटनाच्या स्वरुपात लोकापर्यंत पोहोचवली पाहिजे.

लेखक: बापू राऊत
9224343464


14 comments:

  1. खूप छान माहिती मिळाली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर, एकदा तरी बेडसे लेण्याना आवर्जुन भेट द्यावी.

      Delete
    2. धन्यवाद सर, एकदा तरी बेडसे लेण्याना आवर्जुन भेट द्यावी.

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद सर, एकदा तरी बेडसे लेण्याना आवर्जुन भेट द्यावी.

      Delete
  3. Replies
    1. धन्यवाद सर, आपण एकदा तरी बेडसे लेण्याना आवर्जुन भेट द्यावी.

      Delete
  4. Thanks. Please let us know how to reach there. Please arrange one tour to the place.

    ReplyDelete