Monday, July 27, 2020

अरुणाचल प्रदेशातील बदलती लोकसंख्या वाढ आणि धर्मांतरे

अरुणाचल प्रदेश हे भारतातील उत्तर पूर्व साखळीतील एक राज्य असून १९७२ पर्यंत या राज्याला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजंसी (नेफा) असे संबोधल्या जात असे. अरुणाचलच्या दक्षिणेस आसाम आणि नागालँड राज्यांच्या सीमा आहेत तर पश्चिमेकडे भूतान, पूर्वेस म्यानमार आणि उत्तरेस चीन (तिबेट) यांच्या भूभागानी वेढलेले आहे. मॅकमोहन लाइन ही भारत व चीन मधील
सीमा रेषा असून यावर अधिकाधिक विवाद होत आहेत. हे वाद अलीकडच्या काळात दोन्ही देशासाठी अधिक तनातणीचे झालेले आहेत. या विवादाप्रमाणेच अरुणाचल प्रदेशात प्रत्येक जनगणनेनुसार धर्मांची बदलत जाणारी लोकसंख्या वाढ यावरही चर्चा व विवाद होत असतात. 
  

वर्ष  विविध धर्मातील लोकसंख्येची टक्केवारी (%) 
ख्रिश्चन हिंदू  बुद्धिस्ट दोनो प्योलो मुस्लिम इतर 
(आदिवासी)
१९७१  ०.७९  २२. १३.१३ ६३.४६ ०.१८ ०.४४
१९८१  ४.३२  २९.२४ १३.६९ ५१.६ ०.८ ०.३६
१९९१  १०.०३ ३७.०४ १२.८८ ३६.२२ १.३८ २.१९
२००१  १८.७२ ३४.६ १३. ३०.७ १.९ १.०४
२०११  ३०.२६ २९.०४ ११.७६ २६.२ १.७ ०.७७

१९७१ सालची जनगणना ही अरुणाचल प्रदेशासाठी अधिकृत मानली जाते. १९६० पर्यंत अरुणाचल प्रदेशची ६० टक्के जनता ही बुद्धिज्म परंपरेनुसार वागणारी होती.  तर उर्वरित जनता ही दोन्यी पोलो या आदिम धर्माशी (अनिमिस्ट) सबंधित होती. (संदर्भ: द वीक मार्च १, २०२०, पान.न.५५). याचा अर्थ राज्यात १९६० पर्यंत अन्य धर्मियांचे स्थान नगण्य होते. १९६२ चे  भारत चीन युध्द आणि तिबेटला चीनने गिळंकृत केल्यानंतर अरुणाचल मध्ये बौध्द लोकसंख्या तीव्र वेगाने इतकी कमी झाली की १९७१ च्या जनगणने प्रमाणे १३.१३ टक्के एवढीच नोंद झाली. ही समस्या अरुणाचल प्रदेश पर्यंतच शिल्लक नाही तर संपूर्ण उत्तर पूर्व राज्यातील बुद्धिस्टसाठी तो धोक्याचा इशारा आहे. आदिम जमाती (अनिमिस्ट) ज्या निसर्गपूजक होत्या व ज्यांचे प्रचलित धर्माशी काही देणे नव्हते अशा आदिम जमातीची लोकसंख्या १९७१ नंतर झपाट्याने कमी होत गेली.

१८७२ पासून  ते १९५१ पर्यंतच्या जनगणनेच्या फार्म (५ ब) मध्ये आदिवासीसाठी अनिमिस्ट (ट्रायबल) असी धर्माची वेगळी चौकट होती. नंतरच्या काळात ती काढण्यात आली. त्यामुळे आदिवासीना त्यांच्या स्वतंत्र ओळखीची चौकटच उपलब्ध नसल्यामुळे द्योनी पोलो या आदिम धर्माचे अनुयायी पर्याया अभावी जनगणनेमध्ये धर्म म्हणून 'हिंदू' अशी नोंद करू लागले. ज्यांनी द्योनी पोलो या आदिम धर्माची ओळख जपण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली नोंद "इतर" या रकाण्यात करून घेतली. 
राज्यात गेल्या चार दशकांत धार्मिक लोकसंख्याशास्त्राच्या बाबतीत मोठे बदल झालेले दिसतात.  ख्रिश्चन लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढलेली दिसते. तर आदिवासी आणि बौध्द लोकसंख्या कमी झालेली आहे. सन १९७१-८१ आणि १९८१-९१ या दशकात हिंदूची लोकसंख्या अनुक्रमे २९.२४ आणि ३७.०४ टक्के होती. त्याच्याच समांतर १९७१-८१ ते १९८१-९१ या दशकातील आकडेवारीनुसार आदिम जमातींनी मोठ्या प्रमाणात स्वत:ची हिंदू धर्म म्हणून नोंद केली असल्यामुळे हिंदू लोकसंख्येत या दोन दशकात उसळी आलेली आहे. १९९१ च्या दशकानंतर ख्रिश्चन लोकसंख्या सलग वाढत गेली तर हिंदू, आदिवासीं आणि बौध्दाचे प्रमाण कमी होत गेले. या वाढीमध्ये ख्रिश्चन मिशनरींच्या मुख्य भूमिकेला नाकारता येत नाही. 
आकृती क्रं.१ नुसार २०११ च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्म हा अरुणाचल मधील मुख्य धर्म बनला असून इतर धर्माच्या तुलनेत त्यांची सर्वोच्च लोकसंख्या ३०.२६ टक्के एवढी आहे. १९७१ मध्ये ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रमाण हे ०.७९ टक्के होते. लोकसंख्या वाढीचे हे प्रमाण १९८१, १९९१, २००१ आणि २०११ पर्यंत अनुक्रमे ४.३२%, १०.०३%, १८.७२% आणि ३०.२६% इतके होते. २०११ ला ख्रिश्चन संख्या हिंदू संख्येचा भेद करीत पुढे निघालेली आहे. याचा अर्थ २०२१ पर्यन्त ख्रिश्चन लोकसंख्या अंदाजे ३५ टक्के पर्यंत वाढू शकते. हिंदू धर्माच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण १९७१ पासून १९९१ पर्यंत सरासरी ७.५२ टक्के होते. परंतु १९९१ च्या जनगणने पासून २०११ पर्यंतच्या दोन दशकात २.४४ व ५.५६ टक्के पर्यंत खाली घसरल्याचे दिसते. तर तिसरा घटक असलेल्या मुस्लिम धर्मियांची संख्या १९७१ च्या जनगणनेतील ०.१८ % वरुण २०११ मध्ये १.७% इतकी झाली.  

आकृती क्रं.२ नुसार पन्नास आणि साठच्या दशकात आदिवासींचे बहुमत असले तरी आदिवासींच्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण सत्तरच्या दशकानंतर झपाट्याने कमी झाले आहे. १९७१ ला आदिवासीची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या ६३.४६ टक्के होती. २०११ च्या जनगणने पर्यंत २६.२० टक्के एवढी खाली आली. लोकसंख्या घसरणीचा हा वेग १९७१-८१ ते १९८१-९१ या दशकात अनुक्रमे ११.८६ आणि १५.३८ टक्के इतका होता. तर १९९१-०१ ते २००१-११ या दशकात तो मंदावल्याचे दिसते.

समाजजीवन व संस्कृती पध्दती मध्ये बदल होण्याची गरज:  आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत. त्यांच्या रूढी प्रथा आणि खाण्याच्या पध्दती ह्या हिंदू व ख्रिश्चन धर्माशी कसल्याही प्रकारे साम्यता दाखवीत नाहीत. सणवार साजरे करणे आणि भुताकटी काढण्यासाठी ते जनावरांचे बलिदान देतात. मद्यपान हे आदिवासी साठी एक जडलेले व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्यात शिक्षणाचा मागासलेपणा व गरीबी आलेली आहे. त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेवून त्यांच्यावर इतर धर्म थोपविणे हे मानवतेच्या विरोधी आहे. खरे तर त्यांच्या जीवनात बादल घडविण्याची गरज आहे. मान्यताप्राप्त १०० जनजाती पैकी ३७ जमातींनी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखले आहे. तर उर्वरित जमातींपैकी २३ जनजातीनी ख्रिस्ती धर्म, १५ जनजातींनी हिंदू धर्म, १७ जनजाती बौध्द धर्मातील आहेत तर ८ जनजातीचा कोणताही धर्म नसून ते बहूश्रवणीय आहेत.
ख्रिश्चन धर्मांतरण होण्याची कारणे: गरीबी, मागासलेपन, पैशाचा अभाव आणि अशिक्षितपणाने वेढलेले आदिवासी ख्रिश्चन धर्माकडे वळण्याचे मुख्य कारणे त्यांना चर्चेसकडून मिळणार्‍या मदतीमध्ये आहे. चर्चनिर्मित दवाखान्यामध्ये त्यांचेवर उपचार होत असून त्यांना चर्चकडून मुफ्त शिक्षण मिळत असते. स्थानिक चर्चचे पदाधिकारी रोग्यासोबतच ते बरे व्हावे म्हणून प्रार्थना करीत असतात. याचा एक मोठा मनोवैज्ञानिक प्रभाव व्यक्तीवर पडत असतो. बर्‍या होणार्‍या रुग्णास आपण येशूच्या कृपेने बरे झालात अशी पुष्टीही जोडल्या जाते. त्यामुळे आदिवासी व्यक्ती धर्मांतरास उद्युक्त होतात. शाळांचा पाया आणि  दवाखान्यांचे जाळे आदिवासी बहुल भागात विणले आहे. प्राथमिक गरजा ह्या मानवाच्या दैनदीन जीवन जगण्यासी निगडीत असतात. ह्या गरजा चर्चनी पूर्ण केल्या. दुसरे जसे जीवन जगतात तसेच जीवन आपल्या वाट्याला यावेत असे प्रत्येक मनुष्याला वाटत असते. ती आधुनिकता शिक्षणाने प्राप्त होत असते. त्यामुळे अनेक आदिवासींनी आधुनिक होण्याच्या इच्छेने धर्मांतर केले असावे. बौध्द धर्मीय इतर धर्माकडे का वळली? त्याची कारणे आदिवासी सारखीच असून अशक्त बौध्द मिशनरीज आणि सीमावर्तीय तिबेटी लोकासोबत सांस्कृतिक सबंध तुटणे हा होय.
संघाची भूमिका व सहभागीता : एका बाजूला चर्चे धर्मपरिवर्तनाच्या कार्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यात तसूभरही मागे नाही. अरुणाचल विकास परिषद हि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी सबंधित शाखा असून ती आदिवासी आणि बौद्धाना हिंदू धर्माच्या व्यवस्थेमध्ये बसविण्याचा प्रयत्न करते. आदिवासींच्या निसर्ग देवतांना हिंदू देवतांचे स्वरूप देण्यात येवून हिंदू पध्दतीच्या पुजा करण्यास प्रोत्साहित करण्यात येते. द्योनी पोलो, बौध्द आणि हिंदु हे सारखेच असून ते सनातन धर्माचा भाग असल्याचे अरुणाचली जमातींना सांगण्यात येते.

लोकसंख्या विद्वकांची मते: लोकसंख्या वाढीची कारणे विवादास्पद असली तरी काहीच्या मते लोकसंख्या वाढीस केवळ धर्मांतर जबाबदार नसून बाहेरील राज्यातून होणारे स्थलांतर सुध्दा तेवढेच कारणीभूत आहे. राज्यातील शासकीय कार्यालये, संस्था व उद्योगांच्या आस्थापना मध्ये देशभरातून येणार्‍या कर्मचार्‍यामुळे सुध्दा धर्म सबंधित लोकसंख्या वाढ शक्य आहे. स्वइच्छेने होणारे धर्मांतर मानवी अधिकाराचा व चांगले जीवन जगण्याच्या उत्तरासी जोडलेला आहे. भारतात धर्मांतरासी निगडीत सामाजिक विषमता हे सुध्दा एक कारण आहे.

लेखक: बापू राऊत



No comments:

Post a Comment