Friday, July 17, 2020

तुर्कस्थानातील इस्लामी मूलतत्ववाद: चर्च, मस्जिद व म्युझियम ते मस्जिद


जगात सध्या एक नवीन विषय चर्चिला जात आहे. त्यावर जगातून विरोधी प्रतिक्रिया सुध्दा उमटत आहेत.  तो विषय म्हणजे हागिया सोफिया. हागिया सोफिया हे नाव आहे एका कॅथेड्रल्सचे (चर्चचे ), जी  चर्च इ.स. ५३२ मध्ये तुर्कस्थानच्या पूर्वीच्या कॉन्स्टँटिनोपल या शहराच्या मध्यभागी बांधल्या गेली होती. हे कॅथेड्रल्स (चर्च) जगातील सर्वात जुन्या आणि भव्य कॅथेड्रल्स पैकी एक होती. हागिया सोफियाचा अर्थ होतो "पवित्र विवेक". या कॅथेड्रलचा प्रवास म्हणजे प्रथम तिचे कॅथेड्रल चर्च म्हणून झालेले बांधकाम, नंतरच्या काळात तिचे मस्जिद मध्ये परिवर्तन. त्याच मस्जिदीचे एका वास्तु संग्रहालयात रूपांतरण तर आता परत एर्दोगनच्या तुर्की सरकारकडून मस्जिद मध्ये परिवर्तीत करण्याची झालेली घोषणा. भारतात मंदिरासाठी जनक्षोभ भडकावून केलेले आंदोलन. त्यातून बाबरी मस्जिदीचा झालेला विध्वंस व न्यायालयाचा निकाल ह्या बाजू बघितल्या की तुर्कस्थानामध्ये होत असलेले हाजिया सोफिया प्रकरण व अयोध्या विवाद यात अधिक साम्यता बघायला मिळते.
 
महाभव्य असे हे हागिया सोफिया प्रथम बिजान्टिन सम्राट जस्टिनियन यांचे आदेशानुसार ५३७ मध्ये बांधून पूर्ण झाले. जेव्हा कॅथेड्रल (चर्च) बांधले गेले तेव्हा कॉन्स्टँटिनोपल ही बिजान्टिन रोमन साम्राज्याची राजधानी होती. हे शहर पूर्व रोमन साम्राज्यातील महत्वाचे व्यापारी व दळणवळणाचे केंद्र होते. भारतीय अभ्यासक्रमात सुध्दा कॉन्स्टँटिनोपल बाबत शिकविले जाते. हे कॅथेड्रल सुमारे ९०० वर्ष  ईस्टर्न आर्थोडॉक्स चर्चचे मुख्यालय होते. 

१४५३ मध्ये मेहमेद दूसरा या ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानाने काँन्स्टटिनोपाल जिंकून स्थिरावल्यानंतर त्याने काँन्स्टटिनोपाल या शहराचे नाव बदलून इस्तंबूल असे ठेवले. आणि कॅथेड्रल चर्चला  मशिदीमध्ये परिवर्तीत केले गेले. जवळजवळ ५०० वर्षे ते ऑटोमन साम्राज्याचे केंद्र राहिले. पहिल्या महायुध्दानंतर ऑटोमन साम्राज्य १९२३ मध्ये विभाजित झाले. दोस्त राष्ट्रांनी पहिल्या महायुध्दाच्या विजयानंतर ऑटोमन साम्राजाच्या काही भाग वाटून घेतला होता. कमाल पाशा या यंग तुर्कने दोस्त राष्ट्रांच्या सैन्याविरुध्द लढा दिला. २९ ऑक्टोबर १९२३ च्या संधिवरील सह्यानंतर कमाल पाशाने स्वतंत्र तुर्की गणराज्याची स्थापना केली. आणि स्वतंत्र तुर्कस्तानचे ते प्रथम राष्ट्राध्यक्ष बनले. 

कमाल पाशा हे हुकुमशहा असले तरी त्यांचे धोरण लोकशाही, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. देशाचे औद्योगिकरण करीत देशभरात सरकारी मालकीचे कारखाने तसेच रेल्वेचे जाळे उभारले. नवीन कायद्यांनी स्त्री व पुरूषामध्ये समानता स्थापित केली. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्यालाअतातुर्कम्हणजेतुर्कीचा पिताअसे संबोधते. कमाल पाशा यांनी तुर्कस्तानला जगातील असे एकमेव राज्य बनविले की, जे मुस्लिम बहुल असूनही कोणत्याही शासकीय कार्यक्रमात मुस्लिम प्रतिकाना कसलेही स्थान देण्यात आले नाही. जगातील दुसरे लोकशाही देश जसे की अमेरिका आणि भारत स्वत:स धर्मनिरपेक्ष व लोकशाही देश मानत असूनही त्यांनी देशातील मुख्य धर्म व त्याच्या प्रतिकांचा  सरकारी कार्यक्रमात व प्रशासनातील  शिरकाव रोखू शकले नाही. कमाल पाशाने त्याही काळात स्त्रियांवरील धार्मिक बंधनाचे कायदे हटवून त्यांना मतदानाचा अधिकार दिला. मुस्लिम महिलाना पाश्चात्य कपडे घालण्यास प्रोत्साहित केले गेले. तर याउलट त्याच काळात अमेरिका व भारतात स्त्रियावर विविध धार्मिक बंधने होती. त्यांच्या शिक्षणाच्या विरोधासह बालविवाह, केशवपण, सतीप्रथा व विधवा विवाहास निर्बंध असे धार्मिक शोषण चालत होते. 
१९३४ मध्ये मुस्तफा कमाल पाशा यांनी महत्वाचा निर्णय घेत "हागिया सोफिया" या चर्च रूपांतरित मस्जिदीला धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक म्हणून एका "वास्तू संग्रहालयात" परिवर्तीत केले. नव्या कायद्यानुसार हागिया सोफिया मध्ये नमाज पठणावर बंदी आणून ते सर्व धर्माच्या जनतेसाठी खुले केले. जगभरातील पर्यटकासाठी ते मोठे आकर्षणाचे केंद्र झाले होते. या वास्तु संग्रहालयास यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली. अशा एका लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष नेत्याचे १९३८ साली निधन झाले. 
 अगदी काल परवा पर्यंत कमाल पाशाच्या धर्मनिरपेक्ष व मानवतावादी तत्वावर चालणार्‍या तुर्कस्थान सरकारने या वास्तु संग्रहालयाचे मसजीद मध्ये परिवर्तीत करण्याचा घाट घातला. तुर्कीच्या उच्च न्यायालयाने या सहाव्या शतकातील बिजान्टिन हागिया सोफियाचा "म्युझियम" चा दर्जा काढून घेतला. सरकारच्या निर्णयास संमतीचे हे केवळ न्यायालयीन सोपस्कार होते. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयीप एर्दोगन यांनी हागिया सोफिया या "सांस्कृतिक भवनात" मुसलमानांना नमाज पठण करण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. तुर्कस्थानच्या या निर्णयावर आंतरराष्ट्रीय स्तरातून कडव्या टीका होत आहेत. 
जगातील ख्रिस्ती लोक सुद्धा हागिया सोफियाची स्थिती बदलण्याच्या कल्पनेने एर्दोगन यांचेवर नाराज आहेत. इस्लाम विरुध्द ख्रिश्चन असे स्वरूप यात येण्याचा धोका आहे. रशियन ऑर्थोडॉक्स चर्च सकट जगभरातील चर्चनी यास विरोध दर्शवून "संपूर्ण ख्रिश्चन सभ्यतेसाठी धोका" असल्याचे म्हटले आहे. यूनेस्कोने या घटनेचे "खेदजनक" असे वर्णन  करून पुढील अधिवेशनात जागतिक वारसा समितीद्वारे त्यांचे पुनरावलोकन केले जाईल असे म्हटले आहे. यूरोपियन युनियन, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व रशियाने सुद्धा "हागिया सोफियाची स्थिति बदलण्याच्या तुर्की सरकारने घेतलेल्या निर्णयाला खेदजनक असे म्हटले आहे. ग्रीसने तुर्कीच्या या निर्णयाला हे एक "सुसंस्कृत जगासाठी खुले आव्हान" असल्याचे म्हटले. तुर्की सरकारच्या निर्णयावर टीका होत असली तरी काही मुस्लिम देश आणि संघटना या  निर्णयाचे स्वागत करीत आहेत. पॅलेस्टाईन मधील हमासने याचे स्वागत केले असून मुसलमानासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. 

जगासाठी सध्याचा काळ हा "आतंकवादी राष्ट्रवादाचा" आहे. देशाची सत्तासूत्रे आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आणि सत्तास्पर्धा मध्ये सतत टिकून राहण्यासाठी धर्माचा व त्याच्या श्रध्दांचा राजकारणात अफूसारखा वापर करून देशात असलेली बेरोजगारी, महागाई व असंतोष दडपून टाकण्यासाठी  होत आहे. दुसर्‍यांच्या धर्मस्थळाला आपल्या धर्मस्थळात रूपांतरण करून मूलतत्ववाद जोपासत धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. तुर्कस्तानमध्ये राष्ट्रपती एर्दोगन यांना बेरोजगारी, महागाई व असंतोषामुळे आपली सत्ता जाण्याचे भय वाटू लागल्यामुळे त्यांनी देशात इस्लामी मूलतत्ववाद वाढीस लावला आहे. याच भावनेतून त्यांनी हागिया सोफियाचे रूपांतरण परत मस्जिद मध्ये करण्याचा घेतलेला निर्णय आहे. हातून सत्ता जाण्याच्या भयातून घेतलेले असे निर्णय देशाला गृहयुध्दात ढकलत असतात. तुर्कस्थानचे पुढे आलेले हे उदाहरण आजच्या काळात जगापुढे आलेल्या "नव्या आतंकीत राष्ट्रवादाचा व कट्टर मूलतत्ववादाचा एक नमूना आहे" असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अतातुर्क कमाल पाशाच्या मानवतावाद व धर्मनिरपेक्ष मूल्यांचा पराभव त्याच्याच देशात होत आहे. हे एक दुर्भाग्यच होय.  

लेखक: बापू राऊत

2 comments:

  1. छान लेख लिहिला आहे बापू.... तुर्कस्थानात डाव्या पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते... त्याच्यावर लिहायला हवे होते....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साहेब. लेखाची लांबी अधिक होईल म्हणून बर्‍याच बाबी राहून गेल्या.

      Delete