Friday, January 27, 2023

‘धर्मांतर’ हा मानव विकास साधण्याचा मार्ग

 

मानवी विकास साधण्याचे अनेक दुवे असतात. आर्थिक सुबत्ता प्राप्त होणे, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात समता प्रस्थापित होणे, सर्वांना सारखे शिक्षण मिळणे, धर्माच्या माध्यमातून मानसिक शांती स्थापित होणे व एकमेकासोबत परोपकाराने वागणे ह्या मानवी विकास साधण्याच्या पायऱ्या आहेत. धर्म ह्या बाबी पुरवीत असतो. परंतु एखादा धर्मच जेव्हा आपल्याच धर्मातील बहुसंख्य लोकांच्या विरोधात जात असेल तेव्हा त्या धर्मास कंटाळून पिडीत जनता दुसऱ्या धर्मात प्रवेश करीत असते. 

भारतात अनेक धर्म व विचारधारा सहवास करतात. त्यामुळे भारत एक धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देश म्हणून जगात आदराच्या स्थानी आहे. भारतात मुख्यत: वैदिक (हिंदू), बौध्द, जैन, इस्लाम व ख्रिश्चन हे धर्म आहेत. भारताच्या संविधानाने (कलम २५) प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्याने एखाद्याला आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म व त्याची तत्वे योग्य  वाटल्यास तो धर्म स्वीकारू शकतो. आणि त्या प्रमाणे आपले जीवन जगू शकतो. भारतात अनेक धर्मांतरे झाली आहेत. परंतु आता अशा धर्मांतरावर काही राज्यांनी बंदी आणली आहे. तरीही काही ठिकाणी धर्मांतरे होत आहेत. मुख्य प्रश्न असा निर्माण होत आहे कि, अशी धर्मांतरे का होताहेत? त्यामागची कारणे काय आहेत?. हे शोधण्यासाठी पाठीमागच्या इतिहासात जावे लागते.

उच्चवर्णीयांचे धर्मांतर

भारतात हिंदू धर्मातून इतर धर्मात जाण्याचा इतिहास आहे. परंतु इतर धर्मातून हिंदू धर्मात येण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. हिंदू धर्मातून केवळ खालच्या जातीच धर्मांतर करतात असे नाही. एकोणीसाव्या शतकात जाती व धर्माच्या चिरेबंदी होत्या. कोणीही  दुसरा धर्म स्वीकारण्याचे धाडस करीत नव्हते कारण धर्मद्रोह हे भयानक पाप मानले जाई. तरीही १८४३ मध्ये आंबेजोगाईच्या शेषांद्री गोविंद नामक ब्राम्हणांच्या नारायण व श्रीपत या मुलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होताबाबा पदमनजी, बाळ गोपाळ जोशी, निलकंठशात्री जोशी, रामकृष्ण मोडक, रेव्हरंड टिळक,गोविंद काणे, पंडिता रमाबाई (रमाबाई डोंगरे; १८८३ ) या  ब्राम्हण जातीतील लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ख्रिस्ती मिशनरीचा मानवतावाद, दया, क्षमा व शांतीची शिकवण याचा प्रभाव या लोकावर पडला होता. काहींनी हिंदू धर्मात राहून  मानवतावादी  व समतावादी सुधारणा करणे महाकठीण असल्याने धर्माचा त्याग करणे सोयीस्कर मानले. प्रार्थना समाजी पंडिता रमाबाईना उपनिषद व वेद वाचल्यानंतर हिंदू धर्माचा उद्वेग व तिटकारा वाटू लागला होता. वेद, पुराणे व धर्मज्ञ असलेल्या मनु सहिंतेचे ठोस पुरावे देवून त्यांनी उच्चवर्णीय महिलांचे दास्य व हुंदके द हाय कास्ट- हिंदू वूमनया पुस्तकात विदित केले आहे. काहींनी ग्रंथ प्रामाण्याचा धिक्कार करून निखळ बुद्धिवादी विचाराचा प्रसार केला तर काहींनी मानवी सुधारांच्या अंमलबजावणी साठी कायदे  करण्याचे प्रयत्न केले.

समाज परिवर्तनाचा विचार

भारतात पाश्चात्य ज्ञानाचा उगम होईपर्यंत सनातनी व मनुवादाची चलती होती. मनुस्मृती नुसारच समाजाचे नियोजन होत होते. वैदिक धर्माचे निर्वचन करणार्या मनुने स्त्रियांना व खालच्या जातींना अजिबात स्वातंत्र्य अनुज्ञेय  नाही, अशी आज्ञा देवून ठेवली होती. संतानीही येथील वर्णव्यवस्था व जातीभेदाची चौकट प्रमाण मानून सामाजिक दुष्कर्मावर उपाय योजून संघटीत प्रयत्न केले नाहीत. भारतात ब्रिटीशाच्या प्रवेशानंतर त्यांनी आणलेले कायद्याचे राज्य,आधुनिक शिक्षण व विचारप्रणाली बरोबरच व्यक्तीस्वातंत्र्य आणि बुद्धीनिष्ठा या संकल्पना भारतात रुजायला लागल्या. त्यानंतर शिक्षित तरुणांचा विवेक जागृत झाल्याने त्यांनी धर्म, धर्मग्रंथ व वर्णव्यवस्था हि मानवनिर्मित असून ती परिवर्तनीय आहे असा विचार त्यांनी पुढे आणला.

अँशबर्नर या ब्रिटीश नोकरशहाने हिंदू महिलांना chartered libertines म्हणजे सनदी स्वेच्छाचारिणी म्हणून हिणवले होते. याचे नवशिक्षित तरुणांना वाईट वाटून हि परिस्थिती हिंदू धर्मशास्त्रामुळे ओढवली असून इंग्रजांनी केलेल्या हेटाळणीस उत्तर म्हणून आपल्या धर्माअंतर्गत परंपरामध्ये मानवतावादी परिवर्तन करणे गरजेचे आहे असे लोकहितवादी, फुले, रानडे, आगरकर, नाना शंकरशेट यांना वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्र व सनातनी परंपरावर टीका करणे सुरु केले होते.  लोकाहीतवादिनी म्हटले होते, जुन्या विद्या निरुपयोगी झाल्या असून, मनुची वचने कालबाह्य झाली आहेत. वर्णव्यवस्था व त्यात ब्राम्हणाचे स्थान नाकारताना लोकहितवादीनी म्हटले, अशा प्रकारची वर्णव्यवस्था दुसऱ्या देशात का नाही? वर्णश्रेष्ठत्व, दैववाद व अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि ब्राम्हणांची मिरासदारी हि भारताच्या अध:पतनाची मुख्य कारणे होत.  आगरकर  म्हणतात, आमच्यातील शुद्र-अतिशूद्र लोकास आम्ही दूर टाकल्यामुळे त्यांची एकसारखी ख्रिस्ती धर्माकडे धाव चालू आहे. जातिभेदाच्या दाहकतेमुळे बंधुभाव,दया,क्षमा,शांती व परोपकारी मूल्यांना आपला समाज मुकून तो संकुचित झाला. ते म्हणाले होते कि, विद्येचा जसजसा अधिक प्रसार होत जाईल, तसतसे शुद्रादी वर्गास आपल्या मागासलेपणाचे कारण समजून ते तुमच्या भू देवत्वाविरुध्द बंड केल्यावाचून राहणार नाहीत.

सनातन्यांचा नवविचारांना विरोध

सुधारक तरुणांनी समाज परिवर्तनाचा विचार दिला असला तरी सनातनवाद्यांनी नवसमाज निर्मितीचे नवे चिंतन व नवी विचाराधारा प्रस्थापित करून पोथ्यांचे महत्व झुगारून देण्याच्या त्यांच्या आव्हानाचा विरोध केला. येथे अनिष्ठ धार्मिक रूढी, उचनीच, वर्णविद्वेष व महिलांच्या दास्यात्वाचा पुरस्कार करणारे प्रस्थापित कर्मठ आपल्या भूमिकेवर ठाम होते. यातून मग सुधारक विरुद्ध दुर्धारक असा संघर्ष सुरु झाला होता . कर्मठांनी सुधारकांच्या विचाराने होणाऱ्या सुधारणा रोखण्यासाठी नवनवे संगठन निर्माण केले. आजच्या काळात या संगठनानी सबंध देशाला विळखा घालून वैचारीक प्रबोधन करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचा कडेलोट करण्याचा विडा उचलला असून देश विनाश हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम दिसतो.

हिंदू धर्मात जातीविषमतेमुळे शुद्र (ओबीसी)-अतिशूद्र (अनु.जाती) लोक दैन्यदिनी बाबीतील सामान्य सन्मानास पात्र नाहीत असे धर्मशास्त्रे सांगते. त्यामुळे अशा पुस्तकातील मजकुराचा वापर करून सांस्कृतिक व धार्मिक अधिकारात दुजाभाव केल्या जातो. संविधानानी दिलेले अधिकार व स्व-सन्मान जागृत होवून प्रचलित परंपराच्या विरोधात वागल्यास उच्चवर्णीय सनातनी लोक शारीरिक हल्ले (मारपीट करणे, जिवंत मारणे,बेअब्रू करणे) करून आर्थिक नुकसान (घरदारे पेटविणे, उभी शेती जाळणे) करतात. हिंदू धर्मव्यवस्थेमुळे  आर्थिक असमानता निर्माण होवून शुद्र (ओबीसी)-अतिशूद्र (अनु.जाती) शिक्षण, रोजगार व व्यवसायापासून वंचित झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याच स्वतंत्र देशात  त्यांची अवस्था उपरेपणाची झाली आहे. एकूण आपल्याच धर्मात आपण गुलाम आहोत याची जाणीव होवून ते आपल्या सर्वांगीण विकासाठी अन्य धर्माचे पर्याय शोधू लागले आहेत.

अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या धर्माने मदतीचा व मायेचा हात दिल्यास ओबीसी, अनु.जाती व जमातीच्या लोकांनी तो धर्म स्वीकारल्यास त्या धर्मांतरास पूर्वीचा धर्मच मुख्य कारणीभूत ठरतो. कारण धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या व्यवहारात व तत्वात बदल करून हमी दिलेली नसते. हिंदू धर्मातील काही जातींनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांची अधिक उन्नती झाली. तर जे कुटुंब धर्मांतर न करता हिंदूच बनून राहिले त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थीती दयनीय असून ते सांस्कृतिक अन्यायाचे आजही बळी आहेत. समाजात अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. ज्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला त्यांच्यावरील जातीचा कलंक पुसला जावून ते मशिदीत सर्वासोबत नमाज पडू लागले. मानवाच्या जीवनउत्क्रांतात विकास हा महत्वाचा भाग असून धर्म हा दुय्यम ठरत असतो. त्यामुळे गर्व से कहोहा शब्द दांभिक व पाखंडी असून जैसे थे स्थिती ठेवू इच्छिणारा आहे. 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक हाकेला समर्थन देवून अनु.जातीतील ज्या समूहांनी हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्वीकारला आज त्यांची वैचारिक प्रगल्भता व शैक्षणिक उन्नती वाखाणण्यासारखी आहे. डॉक्टर आंबेडकरांचा विवेकवादी विचार व गौतम बुध्दाच्या सोप्या, समानतेच्या व मानवी विकासाच्या उत्क्रांत धर्म तत्वज्ञानाने त्यांच्यात आमुलाग्र बदल झाला. तर अनु.जातीतील जे समूह बौध्द धर्मांतर न करता हिंदुच बनून राहिले त्यांनी त्यांच्या मागासलेपणाची कारणे कशात आहेत याचा शोध घेतला पाहिजे. हिंदू धर्मातील ज्यांनी जातीय मानसिकता व  वर्णव्यवस्थेचा भार सोडला नाही त्या सर्व ब्राम्हणेत्तर जाती मागे पडल्या आहेत. 

धर्मांतर्गत सुधारणा आवश्यक

हिंदू धर्माचे संरक्षण म्हणजे काय? वर्णव्यवस्था कायम टिकवून ठेवणे, जातीविषमता अव्याहत चालू ठेवणे, उचनीच भावना तेवत ठेवणे, ब्राम्हणांना उच्च स्थान देणेस्त्री व  शुद्र समुहाने मनुस्मृतीचे पालन करणे. हे जर हिंदू धर्माच्या रक्षणाचे कवच असेल तर सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाचे, समानतेचे, आर्थिक उन्नतीचे व मानवी अधिकाराचे काय ? या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. धर्मांतराच्या कायद्यांनी ‘मानवी विकासाला’ कैद करून फार तर वेठबिगार समाज निर्माण करता येईल. 

हिंदूचे धर्मांतर रोखायचे असेल तर हिंदू धर्मात आमुलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे. अनिष्ठ धार्मिक रूढी, उचनीच, वर्णविद्वेष व महिलांच्या दास्यात्वाचा पुरस्कार करणारे ग्रंथ बाद करून भोंदू बाबा व रूढीवादी संस्थांची पिलावळ नष्ट करावी लागेल. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष संविधानिक  कृतीने ते सिद्ध करीत मानवी विकासाच्या समान संधी उपलब्ध्द करून द्याव्या लागतील. गौतम बुद्ध, महावीर, नानक, नामदेव, तुकाराम व गाडगे महाराज या संत महात्म्याच्या विवेकवादी विचारांच्या प्रबोधनाचे नवे पर्व सुरु करावे लागेल.  

लेखक: बापू राऊत

6 comments:

  1. Absolutely right

    ReplyDelete
    Replies
    1. धर्मांतर हे देशांतर नसून द्वेष, अन्याय व सापन्तक वागणूक यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.

      Delete
  2. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्विकारताना २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. त्याबर हुकुम आजकाल कोणी चालत नाही. त्यामुळे धर्मांतरीत बौद्ध समुह पुन्हा वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्थेच्या जात्यात जात आहे. सर्व क्षेत्रात अधोगती चालू आहे.

    ReplyDelete
  3. आपले भाष्य निश्चितच आजच्या परीस्थितीवरील निदर्शक आहे. त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

    ReplyDelete