Wednesday, August 9, 2023

गोंजारलेला नागरी ‘अति’रेकी

 एखाद्या व्यक्तीला अधिक लाडावून ठेवले कि, ती व्यक्ती अगदी बिनधास्तपणे चौखूर उधळायला लागत असते. अशा लोकांना माहित असते कि, मी काहीही बडबडले तरी माझे कोणी वाकडे करू शकत नाही. असे निर्ढावलेपण येण्यासाठी डोक्यावर कोणाचा तरी मोठा वरदहस्त असावा लागतो. पाठीवर सत्तेचा हात व भक्तांचा मोठा जमावडा सोबत असला कि फार मोठी हिंमत निर्माण होते. त्यातूनच मग बेतालपणा व अतिरेकी वृत्तीचा जन्म होतो. अशा वृत्ती मग समाजस्वास्थ्य बिघडविणे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करीत फिरत असतात. यातूनच मग धार्मिक व जातीय दंगलींची पार्श्वभूमी बनत जाते. हातात बंदूक घेत रस्त्यावर निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यापेक्षा पांढरे कपडे घातलेलेनागरी अतिरेकीहे त्यांचेही  बाप असतात. कारण नागरी व कल्चर्ड अतिरेक्यांकडून घडवून आणलेल्या दंगलीत घरेदारे व वाहने जाळून खाक तर होतातच परंतु माणसेही हकनाक मारली जातात. 

नागरी अतिरेक्यांकडून होत असलेली भडकावू भाषणे व त्यांच्या संघटनाकडून निघत असलेल्या प्रभात फेऱ्या ह्या विशिष्ठ हेतू व योजनाबध्द मंथनातून होत असतात. अशा माथेफिरू प्रसंगातून जे काही पडसाद उमटतात त्याचा जे ते राजकीय पक्ष लाभ घेत असतात, परंतु हे सारे घडण्याचे कारण म्हणजे समाज व व्यक्तीमधून नैतिकता व मानवी मुल्ये नष्ट झाल्याचे लक्षण होय. 

धर्म ही अफूची गोळी आहे असे एका तत्ववेत्त्याने म्हटले आहे. त्यानुसार आजकाल धर्माचा व देवस्थानाचा वापर लोकांच्या धार्मिक भावना भडकविण्यासाठी व त्यातून आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी होतो. एखाद्या महापुरुषावर टीका व त्यांच्या प्रतिमा मलीन करून आसुरी आनंद घेणारे खरे तर मानसिक पंगु व बुद्धीभ्रष्ट असतात.

अलीकडे महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी व महात्मा गांधीवर टीका करून समाजात वैमनस्य निर्माण करणारेही वरील वर्गवारीत चपलख बसतात. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी नावाचे गृहस्थ अशीच काही उटांगपटांग व बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्रातील समाजस्वास्थ्याला हानी पोहोचू पाहताहेत. त्यासाठी शिवाजी महाराजाच्या नावाचा वापर करणे हे महाराजाच्या चरीत्रासी प्रतारणा करण्यासारखेच आहे. .

संभाजी भिडे यांनी महात्मा फुले व लोकहितवादी या क्रांतीकारक सुधारकांना भडव्याच्या यादीतील असे म्हटले. महात्मा फुले व लोकहितवादी फार मोठे परिवर्तनकारी सुधारक होते. महात्मा फुलेनी ब्राम्हणांच्या वर्चस्वाविरोधात आवाज उठविला होता म्हणून संभाजी भिडे म.फुलेचा द्वेष करीत असावेत, परंतु  महात्मा फुलेंचे   कार्य बहुसंख्य हिंदू पुरुष व महिलांसाठी समान न्याय, त्यांचे शैक्षणिक व धार्मिक हक्क मिळवून देण्यासाठी होते. त्यांनी विधवा ब्राम्हण महिलांचे केशवपन राखण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. तर त्यांनी स्वत: एका ब्राम्हण महिलेच्या अनौरस मुलाला दत्तक घेवून डॉक्टर बनविले होते. हे करताना त्यांनी जात व धर्म बघितला नव्हता. फुलेंचा  विरोध हा ब्राम्हण्याला होता.  शेतकरी वर्गाविषयी बोलताना फुले म्हणाले होते कि, शेतकऱ्याच्या अज्ञानाचा  गैरफायदा घेवून धर्माचे लिंगाड, मूर्तीपूजा व ग्रहराशीचे स्तोम त्यांच्या पाठीमागे लावून पुरोहित वर्ग त्यांची सफाईने फसवणूक करीत असतो. फुलेंनी सांगितलेला बहुजन समाजाच्या प्रगतीचा मार्ग हा ब्राम्हण्य विरोधी होता. त्यामुळे संभाजी भिडे सारखे सनातनी लोक फुलेंच्या सुधारकी चळवळीला रोखण्याचे प्रयत्न करताना दिसतात. 

बहुजन समाजातील तरुण मंडळी संभाजी भिडेचा जयकारा करू लागले आहेत. ही अत्यंत दुर्दैव्याची गोष्ट आहे. संभाजी भिडे जे बोलतोय त्याला काही आधार आहे का? याचा या तरुणांनी विचार करावयास हवा. म. फुलेंच्या सत्यशोधण्याने विकासाची दृष्टी मिळालेले ओबीसी आज शांत आहेत, तर काही राजकीय नेते केवळ निषेधाचा सूर लावतात. सत्तेचे संपूर्ण ब्रम्हांड पाठीशी असताना संभाजी भिडे अशा निषेधाच्या सुरांना कसे काय भिक घालतील ! 

अमरावती जिल्ह्यातील बडनेर येथील कार्यक्रमात बोलताना  संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीं विषयी अवमानजनक वक्तव्य करताना महात्मा गांधीचे  वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असं संभाजी भिडे म्हणाले होते. भिडेचे हे म्हणणे इतिहासाचे ज्ञान असलेला कोणता सुजाण भारतीय नागरिक मान्य करील बरे ! परंतु हे सारे ऐकून घ्यायला भारतात एक अज्ञानी भक्तवर्ग निर्माण झाला. धर्माच्या अफूचा हा परिणामच म्हणावा लागेल कि, जो पुढील काळात माणसाचे व माणुसकीचे मुडदे पाडायला  कमी करणार नाही. संभाजी भिडेच्या बेताल वक्त्यावर कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर व पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अटकेच्या मागणीवर, भिडेच्या विरोधात जास्‍त बोललात, तर तुमचा दाभोळकर करू अशा प्रकारची धमकी भिडे समर्थकाकडून देण्यात येते. भाजप नेते अनिल बोंडे यांनी भिडे यांच्यावरची टीका सहन करणार नाही असे म्हटले. महाराष्ट्रात भिडे यांचेकडे संघसमर्थित हिंदू संघटना व भाजप असा पाठीराख्यांचा मोठा समूह आहे. याचा अर्थ संभाजी भिडे हे गोंजारलेले लेकरू असून  त्यांना सपूर्ण संरक्षणात बेताल बोलण्याची हमी प्राप्त झालेली आहे. 

संभाजी भिडे सारखेच वक्तव्य जर एखाद्या मुस्लीम व्यक्तीने केले असते तर काय झाले असते, यावर विचार करणे हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. भाजप व आरएसएस समर्थित संगठना  पेटून उठल्या असत्या. देशद्रोहाचा ठपका ठेवीत त्यांच्या घरावर बुलडोझर चढविल्या गेला असता. गोदी मिडीयामध्ये २४ तास चर्चा झडल्या असत्या. परंतु संभाजी भिडेच्या बाबतीमध्ये यातले काहीही होत नाहीये. याचा अर्थ देशात  न्यायसंगत असमानता किती पराकोटीला पोहोचली, याचा अंदाज येवू शकतो. एकाच  कृत्यासाठी एका व्यक्तीला एक न्याय तर दुसर्याला भलताच हे समानतेच्या विरोधी आहे. परंतु आता हे देशात प्रस्थापित झाल्यासारखी स्थिती आहे. हे वास्तव लोकही स्वीकारू लागले आहेत.  

संघ परिवार नेहमीच म.गांधीचा द्वेष करीत आला आहे. म्हणून रेटून खोटे बोलणाऱ्या कुळातील संभाजी भिडेचे  वक्तव्य म्हणजे वास्तवतेचा विपर्यास होय. महात्मा गांधी मुळेच देशाची फाळणी व पैशाच्या देवान घेवाणीचा व्यवहार झाला अशा प्रकारची मानसिकता स्वातंत्र्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी निर्माण केली. यातूनच नथुराम गोडसेद्वारा महात्मा गांधीचा खून झाला. खरे तर, स्वातंत्र्यानंतर अचानक उद्भवलेली परीस्थिती व त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गांधीजी कडून केले गेलेले ते उपाय होते हे लक्षात घ्यावयास हवे. भारतात केवळ १९ टक्के मुस्लीम आहेत तरी संघपरिवार थयथयाट करतो. परंतु भारताची फाळणीच झाली नसती हे गृहीत धरले आणि  पाकिस्तान व बांगला देश भारतातच विलीन असते तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी काय केले असते?. म.गांधी व मुसलमानाचा मुद्दा हा हिंदुना भ्रमित करून राजकीय सत्ता हातात ठेवण्यासाठी केलेले केवळ खेळ आहेत.  

खरे तर गुन्हेगाराला गुन्हेगार समजूनच शिक्षा द्यायला हवी, मग ति व्यक्ती कोणीही असो. शिक्षा व्यक्ती बघून नव्हे तर गुन्हे बघून ठरत असते. परंतु न्याय हा पाखंडी लोकांचा दास झालेला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे यांनी दलित समाजाविरोधात मराठा तरुणांच्या मनात द्वेषाची पेरणी केली होती. त्यातूनच भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांवर हल्ले करण्यात आले. या प्रकरणामध्ये संभाजी भिडे आरोपी होते तर मिलिंद एकबोटे सहआरोपी होते. यात मिलिंद एकबोटेवर  कारवाई झाली परंतु संभाजी भिडेवर कोणतीही कारवाई न करता गोंजारल्या गेले. तेव्हाही संपूर्ण ब्रम्हांड त्यांच्या पाठीशी उभे राहिले. महात्मा ज्योतिबा फुले व गांधीजी बाबत भिडे ऐवजी कोणत्याही दुसर्या हिंदूने असे वक्तव्य केले असते तरी त्याला केव्हाच अटक करण्यात आली असती. हिंदुत्वाची दुसरी बाजू हि अशी असते! ते समजायला वेळ लागेल.

धर्म आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसांचे रक्त सगळ्यात अधिक सांडले आहे. भारतात नागरिकांमध्ये भांडणे लावून देणारे  राज्यकर्ते व धर्मवेडे निर्माण झाले आहेत. त्यांच्याच कलुषित धार्मिक व राज कलहातून येथे नरसंहार घडत आहेत. जगातल्या काही देशांनी निकोप लोकशाही निर्माण करण्यासाठी धर्म,लिंग व जात या संकल्पना गाळून टाकल्या. परंतु भारतात कट्टर धर्मांधता निर्माण होवून अतिरेकी विचारांच्या व्यक्तीना गुरुस्थानी मानले जात आहे. राष्ट्रपित्याचा अपमान होत असताना लोकमत ढम्म झालेले बघायला मिळते. लोकमताच्या अशा चिडीचूपीतूनच बेताल व अवमानकारक  बोलणाऱ्यांचे फावत असून त्यातून नागरीअतिरेकी निर्माण होत आहेत. समाजात द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्यात संभाजी भिडे हे एक गोंजारलेले नागरी अतिरेकी आहेत  लक्षात घ्यायला पाहिजे. . 

 

बापू राऊत 

लेखक व विश्लेषक 

 

No comments:

Post a Comment