Thursday, August 10, 2023

ओबीसी चळवळीचा बौद्धिक आवाज हरपला

काल हरी नरकेंच्या निधनाची बातमी समजली आणि मन हादरून गेले. त्यांच्या धक्कादायक निधनाने एक प्रश्न पडला होता, हरी नरके तर गेले, मग आता प्रतिगाम्यांच्या एखाद्या प्रश्नावर, फुले शाहू आंबेडकर यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या लेखावर ताबडतोब लेखाच्याच माध्यमातून प्रती उत्तर कोण देईल?. तेवढ्याच त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा, तेवढ्या तोलामोलाचा व ताकतीने समोरच्याला निरुत्तर करणाऱ्या हरीची जागा कोण घेईल?. चेहरे शोधू लागलो, परंतु तसा चेहरा मिळेना! परत मन विषण्ण झाले, वाटायला लागले कि, ते पुरोगामी, सत्यशोधक व फुले आंबेडकरी विचारांचे शिलेदार होते, बौद्धिक ताकतीचा एखादा जुनियर शिलेदार बनून पुढील काळात समोर येईलच.

नरकेजींचा शोषितांच्या प्रश्नांवर विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न ते सभा संमेलनातून मांडायचे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यत पोहचविण्याचे काम नरके यांनी केले. देशातच नव्हे विदेशात स्थाईक झालेल्या फुले आंबेडकरी विचारांच्या विविध संस्थांनी त्यांना बोलावून सत्कार केला. खरे तर त्यांच्या कार्याची ती पोच पावतीच होती. म्हणून त्यांच्या निधनामुळे संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व तर हरपलेच त्याही पेक्षा  त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील पुरोगामी विचार चळवळीची मोठी हानी झाली आहे.

बाळ गांगल यांनी सोबत या पत्रातून महात्मा फुले यांचेविरोधात  विषमतावादी लेखांद्वारे गरळ प्रदर्शित केली होती. त्याला सडेतोड उत्तर देण्याचे काम हरी नरकेने केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन हा त्यांचा त्याच काळात आलेला ग्रंथ होय.

विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल कमिशन लागू केल्यानंतर हरी नरके व ईतर बुद्धीवंताची जबाबदारी अधिकच वाढली होती. कारण तोपर्यंत ओबीसी समाज म्हणजे एक कोरी पाटी होती. तेव्हा ओबीसी समाजाचे ते वैचारिक पाठबळ बनले होते. मंडल कमिशन लागू झाल्यानंतर मिळालेले आरक्षण कोणासाठी आहे, हे ओबीसींनाच माहीत नव्हते. त्यामुळे माहिती अभावी ओबीसी तरुण व समाज  मंडल आयोगाच्या विरोधात उभा  ठाकला होता. ओबीसी आरक्षणाच्या   विरोधात गुजरात व देशाच्या इतर भागात झालेल्या दंगली व प्रदर्शनात ओबीसीच प्रामुख्याने रस्त्यावर होते. हे एक आठवे आश्चर्यच म्हणायला हवे, कारण ज्या समुदायाच्या प्रगतीसाठी ते  आरक्षण होते, तोच समुदाय त्या विरोधात उतरला होता. अशा काळात हरी नरकेने मंडल आयोग काय आहे व तो कोणासाठी आहे हे ओबीसींना समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली होती.

हरी नरकेनी केलेल्या कामाची मोठी लंबी यादी होईल, एवढा त्यांचा कार्यभार होता.  महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या  'समग्र महात्मा फुले' या ग्रंथाचे ते संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झाले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ते भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्येही त्यांनी काम केल होत. मराठी भाषा ही अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीमध्ये समन्वयक होते.

खरे तर हरी नरके तरुणासाठी, चळवळीतील कार्यकर्ते व अभ्यासकासाठी  एक उर्जा केंद्र होते. म्हणून हरी नरकेना खरी श्रध्दांजली वाहावयाची असेल तर ओबीसींनी त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या म.फुल्यांचे विचार पूर्णतया स्वीकारले पाहिजे. त्यांच्या संपूर्ण ग्रंथाचे वाचन करून त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि म.फुल्यांचा विचारांचा देश तोडू पाहणाऱ्या प्रतिगामी शक्तींची,  मंडल आयोग व ओबीसी जणगणनेच्या विरोधी संगठनांची साथ सोडली पाहिजे. हरी नरकेना तीच खरी आदरांजली ठरेल.

 बापू राऊत

bapumraut@gmail.com  



 

No comments:

Post a Comment