आषाढी महिन्यामध्ये महाराष्ट्रात वारकरी समुदाय नाचत गाजत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो. दरवर्षी जेव्हा विठ्ठलाच्या वारीचा काळ येतो तेव्हा नेमका विठ्ठल आहे तरी कोण? यावर प्रश्न निर्माण होवून बौद्धिक चर्वण सुरू होते. आता तर सोशल मिडीयाचा जमाना आहे, त्यामुळे वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता सोशल मिडीयावर विस्तारित चर्चा होवू लागली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाबाबत
अनेकांची अनेक मतमतांतरे आहेत. पुराणमतवादी पौराणिक दंतकथासारख्या साहित्याचा आधार
घेवून, स्थापत्यकलावादी मुर्त्यांसाठी वापरलेला दगड व त्याचा काळ लक्षात घेवून, तर बुद्धिवादी व इतिहासकार हे अभिलेख, शिलालेख, कालखंड व इतर पुराव्याचा
आधार घेत विठ्ठल कोण असण्यावर व्यक्त होत असतात. तर काही इतिहासकार नैतिकता,
वास्तवता व सत्यता वेशीवर टांगून जाती वर्चस्ववादी गृहीतकाला धरून इतिहासाची
मांडणी करतात.
विठ्ठलाची एक
दंतकथा आहे, ज्यात एक व्यक्ति आई वडिलांची सेवा करीत असे.
देव (पांडुरंग) त्यास भेटण्यासाठी आले, तेव्हा तो आईवडिलांच्या सेवेत मग्न होता,
त्याने वीट देवून त्यास थांबायला सांगितले. पुंडलिक त्या विटेवर उभे राहिले. अशी
एक कथा सांगितली जाते. ही कथा काहीसी सत्यानारायणातील कलावतीच्या कथेसारखी निर्मित
वाटते. पुंडलिक विटेवर उभा राहिला म्हणून याच पुंडलीकाला पुढे विठ्ठल असे
संबोधल्या गेले.
आता मूळ मुद्याकडे
वळू या. विठ्ठलाच्या मुर्तिकडे ज़रा न्याहरून बघितल्यास, ते भक्ति परंपरेतील देवाचे रूप मानले गेले आहे. विठ्ठल आपल्या कंबरेवर हात
ठेवीत एका विटेवर निरागस भावमुद्रेने उभा आहेत. विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र
व अस्त्र नाही. त्यांच्या डोळ्यात
करुणा व चेहर्यात भयमुक्त आत्मविश्वासाचा अहिर्भाव दिसतो. मानवतेचा संदेश देणारी ही
मूर्ति अवघ्या भारतात एकमेव असावी. महाराष्ट्रातील
सर्व मध्ययुगीन संतकवींचे आध्यात्मिक आकर्षण याच देवतेवर केंद्रीत झाले होते. या
संतानी विठ्ठलाचे गुणगान करताना लिहलेल्या ओव्या व गायिलेल्या भजनामध्ये भारताच्या
एका महान सुपुत्राचे दर्शन पदोपदी उल्लेखित दिसते.
मध्ययुगीन संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानताना
म्हणतात, " हे विठ्ठला तू बुद्धरूप धारण करून कमरेवर हात ठेवून बौद्ध
अवतार घेऊन तू विटेवर उभा आहेस”.
लोक देखानि उन्मत
दारानी आसक्त। न बोले बौद्ध रूप ठेवीले जघनी हात ।। नववा वेसे स्थिर रूप तथा नाम
बौद्धरूप। १ संत तथा दारी। निष्ठताती निरंतरी। पुंडलिकासाठी उभा। धन्यधन्य
विठ्ठलशोभा ।। बौद्ध अवतार घेऊन। विटे समचरण ठेवून। २
एकनाथ पुढे म्हणतात, धर्म लोपला अधर्म जाहला हे
तू न पाहसी।यालागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी ।।४ व्रतभंगासाठी
बौद्ध अवतार। आला दिगंबर अवनिये ।। ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासि। कलंकिया लोक
मारिसी ।।५
नामदेव-तुकोबांनाही बुद्ध मौनच वाटतात,
बौद्ध अवतार माझीया
अदृष्टा।मौन मुखे निष्ठा धारीयेली ।। बौद्ध ते म्हणोनी नांवे रूप ।।३
जो पतित लोकांना
ज्ञान देऊन जवळ करतो तों विठ्ठल भारतीय आध्यात्मिक साधनेच्या इतिहासात बुद्धाशिवाय
दुसरा कोण महापुरुष असू शकतो? दुसरे, बुद्धाने पंचवर्गीय भिक्षूना आषाढ पोर्णिमेला प्रथमोपदेश
दिला. या पोर्णिमेला 'गुरू पोर्णिमा' म्हटल्या जाते. पंढरपूरला वर्षातून एकदा जी प्रमुख यात्रा
भरते ती याच आषाढी पौर्णिमेला आपल्या आवडत्या गुरूच्या दर्शनासाठी भरत असते. या
दृष्टीने विठ्ठल व गुरुमहात्यम्याची बौध्दपरंपरा यांची जवळीक आहे हे लक्षात येते.
मराठी संतसाहित्यात
विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार स्पष्ट शब्दांत प्रकट झालेली आहे, तशीच ती बर्याच
पंचांगामध्ये दशावतारांच्या चित्रात व नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र
छापलेले दिसते. परंपरा व
अवतारकल्पने प्रमाणे गौतम बुध्द हा नववा अवतार असल्याचे मानले जाते. त्यामुळे
पंचागकार हे विठ्ठल व गौतम बुध्द हे एकच असल्याचे समजत असावेत. दशावतारांत
बुद्धाच्या जागी विठ्ठल असलेल्या दोन शिल्पापैकी एक तासगांव जि. सांगली येथील दक्षिणी
शैलीच्या गणेशमंदीराच्या गोपुरावर आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदीराच्या
प्राकारातील एका ओवरीत आहे. राजापूर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदीरात
मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत, त्यातही बुद्ध
म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती झिजून गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातून ती
विठ्ठल मुर्ती असल्याचेच जाणवते." ।। ढेरेः १९८४:
२३१।।.
महाराष्ट्रात बौध्द संस्कृतीचा प्रभाव
महाराष्ट्रात यादव अगोदरील काळापर्यंत पंढरपूर व त्याच्या
आसपास बौध्द धर्माचा प्रभाव होता. वेरूळ, कार्ले,
भाजे,पंढरपूर, नासिक, जुन्नर, कोंकण आणि नागपूर (पवनी) या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बौध्दलेण्या
आढळतात. भीमा नदीच्या तटावर अनेक स्तूप व विहारे आजही अस्तित्वात आहेत. परंतु
सातवाहन, वाकाटक व चालुक्य
साम्राज्यानंतर ब्राम्हणवादाचे पुनरुथ्थान झाले. बौध्द धर्मास पूर्णपणे वैष्णव
पंथात रुपांतरीत करण्यात आले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ११ ते १२ व्या शतकात बांधण्यात आले असे मानले जाते. या मंदिरात
साहजिकच प्रसिध्द व्यक्ती म्हणून बुद्धाची प्रस्थापना झाली असावी. कारण तोपर्यंत
त्याकाळात प्रसिध्द व जनमानसाच्या मनात स्थान निर्माण केलेली अशी दुसरी कोणतीही
महान व्यक्ती नव्हती.
मूर्ती
संरचना व प्रतीके
विठ्ठलाचे मूळ
स्वरूप चित्र आणि शिल्पाच्या माध्यमांतूनही प्रकट झालेली दिसते. विठ्ठलाची मूर्ती ही सरळ उभी असलेली मूर्ती असून चेहऱ्याचा
भाव साधा व विनम्र वाटतो. बुद्धाच्या अनेक उभ्या असलेल्या मुर्त्या विविध लेण्या व
म्युझियम मध्ये बघायला मिळतात. विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र व अस्त्र नाही.
म्हणून शांती व साधनेचा संदेश देणारी विठ्ठलमूर्ती बुद्धा शिवाय दुसरी कोणाची असू
शकते?. अनेक विद्वानाच्या मते "विठ्ठलाच्या भक्तामध्ये सामाजिक
समानता आणि जाती निर्मूलनाची प्रवृत्ती येण्यामागची पाश्र्वभूमी ही बौद्ध धर्माच्या
वारस्याची असू शकते." वारकरी संप्रदायाकडून
आचरणात येत असलेल्या गोष्टी हिंदू देवतेच्या देहबोलीत मिळत नाहीत. तर त्या केवळ
बुद्धमूर्ती व त्याच्या तत्वात मिळतात.
विद्वानाकडून झालेली विठ्ठल मीमांसा
विठोबा हे दैवत
बुद्धच आहे अशी खोल रूजलेली मानसिकता महाराष्ट्रीय जनमाणसात वसलेली आहे याची
पुष्टी श्री. रा. चि. ढेरे यांच्या लिखाणावरून स्पष्ट होते. "मराठी
संतसाहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार स्पष्ट शब्दांत प्रकट
झालेली आहे, तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमांतूनही
प्रकट झाली आहे. महाराष्ट्रात अशी एकही
पर्वतराजी नाही की, जेथे बौध्द गुंफा अस्तित्वात नाहीत. त्याकाळी सह्यांद्रीच्या
कुशीत अहिंसेच्या अन् करूणेच्या महामंत्राचे पडसाद मराठी भूमी व मनुष्याच्या अणुरेणूत
उमटत होते.
ए. आर. कुळकर्णी यांनी
संपादन केलेल्या 'धर्मपद' या ग्रंथाच्या परिशिष्टात ते म्हणतात की, विठ्ठल मंदीराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या
आहेत. ते असे सुद्धा म्हणतात की, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन यांच्या 'मेमॉयर्स ऑन दि
केव्ह टेम्पल' नामक आपल्या ग्रंथात हे मंदीर बुद्धाचे असण्याचे प्रमाण
दिलेले आहे. पुढे ते असेही म्हणतात कि, बुद्धाने आपल्या
शत्रूना प्रेम आणि अहिंसेनी जिंकले, शस्त्रांनी नव्हे. हाच संदेश विठ्ठलाचे दोन्ही हात कटीवर ठेवण्याच्या मुद्रेतून
प्रगट होतो.
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर म्हणतात, ‘पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची
पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. परंतु तो नेमका कोण याचे ते उत्तर
देत नाहीत. पुंडलिक व पांडुरंग हे पाली शब्द असून त्याचा अर्थ कमळ असा आहे. विठ्ठल
हा बुद्धच असल्याचे मी सिद्ध करून देईल असे ते म्हणाले होते.
डॉ. भाऊ लोखंडे
यांनी संपूर्ण मराठी संतांच्या वाङमयाची समिक्षा करून काढलेल्या निष्कर्षानुसार मध्ययुगीन मराठी संतकवींनी आपल्या मनात बसविलेला विठ्ठल हा बुद्धच असल्याचे
म्हटले आहे.
सत्य
सांगण्याची भीती कशाला ?
वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वराला
मुळ पुरूष मानतात. पंढरपूरचे मंदीर तर निश्चितंच ज्ञानेश्वराच्या पूर्वीच्या
काळापासून अस्तित्वात होते. ब्राम्हणांचा वैष्णववाद जेव्हा वाढू लागला त्याच काळात
मंदिरातील मूळ मूर्तीमध्ये बदल होत पांडुरंगाच्या डोक्यावर टोप व कपाळ ते नाकापर्यंतचा
टिळा असा बदल करण्यात आला असावा. पांडुरंग आणि पूंडरीक हे विठ्ठलाचे पूर्वीचे नाव
असून विठ्ठल हे नांव नंतरच्या काळात आले व त्याच काळात विठ्ठलाच्या महात्म्यात्मक कथा लिहील्या गेल्या
असाव्यात. अशा दंतकथांची यादी फार मोठी आहे. अष्टविनायक गणपती पैकी एक असलेले
लेण्याद्री हे स्थळ, लेण्यांद्री पूर्णत: बुद्धाच्या लेण्यांनी वसलेले आहे. गणपती या
देवतेचा तिथे मागमूसही नव्हता. परंतु नंतरच्या काळात बुध्द लेण्यात गणपती बसविण्यात
आला. वैष्णवी ब्राह्मणांचे हे आक्रमण येथेच थांबले नाही तर त्यांनी नाशिक येथील
बौध्द लेण्यांना पांडवलेण्या असल्याच्या दंतकथा
लिहिल्या. भारतातील कोणत्याही इतिहासकाराला, मूर्ती स्थापत्यकारांना
व पुरोगामीकारांना लेण्याद्री व पांडवलेण्या संदर्भात सत्य सांगण्याची हिंमत
आजही होत नाही. याला कशाचे द्योतक समजायचे? दंभपणाचे कि षडयंत्रात
सामील होण्याचे! यावरून पंढरपूरचा विठ्ठल आहे तरी कोण? या प्रश्नाचे उत्तर धर्मांधाच्या षडयंत्रात व पांडुरंगाला नव्या साजात रंगविनार्यांच्या कृतीत दडलेले आहे. तरीही बुध्दाला मिटविण्याची क्षमता कोणत्याही प्रच्छ्न छल कपटकारात नाही याची नोंद घेणे आवश्यक आहे.
लेखक: बापू राऊत
राउत,साहेब ,
ReplyDeleteखूपअभ्यासपूर्ण लेख आपण विठ्ठलाबद्दल दिलेला आहे, खरं म्हणजे बाबासाहेबांनाही रमाईला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराबद्दल बुद्धच आहेत हे मी सिद्ध करीन असे सांगितले होते. तसे पाहिल्यास प्राचीन हिंदूचे जे मंदिर आहेत हे सर्व मंदिरे पूर्वी बुद्धाचीच मंदिरे होते त्याचा बऱ्याच ठिकाणी पुरावा सापडतो थोडेफार त्यामध्ये हिंदू लोकांनी बदल केले आणि ब्राह्मण लोकांनी आपल्या रोजी रोटीचा प्रश्न रोजगार हमी निर्माण केली.
हात कटेवरी हे बोधिसत्वाचेच एक रूप आहे असे समजले जाते आणि बुद्धाची हे हात कटेवर ठेवलेली मूर्ती सांची येथील सरकारी संग्रहालयात आजही पाहायला मिळते हे तर संतांनीही वेळोवेळी विठ्ठल आणि बुद्धाचा संबंध आपल्या अभंगामधून सांगितला आहे त्यामुळे कुठेतरी नक्कीच पाणी मूर्ती असे वाटते यावर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.
एक हजार टक्के तथागत गौतम बुद्धच आहेत...!
ReplyDeleteएक हजार टक्के तथागत गौतम बुद्धच आहेत...
ReplyDelete