Tuesday, May 8, 2012

गौतम बुद्धांचे संपूर्ण तत्त्वज्ञान येणार मराठीत

 साऱ्या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्धांचे संपूर्ण तत्त्वज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बुद्धांनी दिलेल्या पाली भाषेतील 84 हजार प्रवचनांचे मराठीत तीन वर्षांत भाषांतर करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हीच ग्रंथसंपदा "त्रिपिटक' म्हणून ओळखली जाते. राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग, पुणे विद्यापीठाचा पाली भाषा विभाग आणि थायलंडमधील थम्मासात विद्यापीठ यांच्या वतीने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. 

कर्मकांडांमध्ये अडकण्यापेक्षा जीवनात मानवी मूल्यांच्या जपवणुकीला सर्वोच्च प्राधान्य द्या. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांना अनुसरून आचरण करा आणि स्वतःच उजेड बना, हे गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. बुद्धांनी त्याचे सखोल विश्‍लेषण प्रवचनांमधून केले आहे. त्यामुळे बौद्ध धर्माकडे धर्म म्हणून नव्हे, तर जीवन जगण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणून पाहिले जाते. वर्तमान परिस्थितीतील हिंसाचार, ताणतणावांमध्ये तर या जीवनप्रणालीचे महत्त्व विशेषत्वाने जाणवून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे संपूर्ण तत्त्वज्ञानच मायबोलीमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक रमेश कटके यांनी दिली. 

प्रकल्पाविषयी माहिती देताना कटके म्हणाले, ""गौतम बुद्धांनी दिलेली प्रवचने 82 हजार गाथांमध्ये मांडण्यात आली आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन बौद्ध भिक्‍खूंनी दिलेली प्रवचने दोन हजार गाथांमध्ये आहेत. हे संपूर्ण 84 हजार गाथांचे ज्ञानभांडार तीन मोठ्या पेटाऱ्यांमध्ये ठेवण्यात आले होते. म्हणून त्यास "त्रिपिटक' म्हटले जाते. त्यांची विभागणी सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक अशा भागांमध्ये करण्यात आली आहे. यातील काही साहित्याचे भाषांतर ख्यातनाम संशोधक प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी मराठीत केले. उर्वरित 95 टक्के साहित्य आजतागायत मराठीत उपलब्ध झाले नाही. ते काम राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन 2010 मध्ये सांस्कृतिक धोरणांतर्गत हाती घेतले आहे. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्रिपिटकांचे भाषांतर झाल्यानंतर महावंस, दीपवंस, नीतिप्रकरण, मिलिंद प्रश्‍न अशा त्रिपिटकेतर साहित्याचे भाषांतर करण्याचे काम हाती घेण्यात येईल.'' 

क्रांतीचे ते साहित्य! 
त्रिपिटकांमधील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे या भाषांतराचे विशेष असे महत्त्व आहे. खुद्द डॉ. आंबेडकर यांनीही, या देशात मानवी मूल्ये रुजवायची असतील, तर बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी केलेल्या क्रांतीची पुनर्स्थापना होणे आवश्‍यक आहे, असे नमूद केले होते. क्रांतीचे ते साहित्य म्हणजे "त्रिपिटक' होय.

No comments:

Post a Comment