Monday, June 4, 2012

लोकपाल विधेयक थंड बस्त्यात

व्यावहारिक दृष्टीने पाहता लोकपाल विधेयक हे थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे असेच दिसत आहे. त्याचा आकार कमी होत आहे, त्याची प्रासंगिकता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. लोकपालाचे पुरस्कर्ते लोकपाल विधेयकाला विश्रांती देण्यात आल्याने अस्वस्थ झाल्याचे अजिबात दिसले नाही. आता २0१४ पर्यंत हे विधेयक काही सादर होत नाही हे दिसून आल्यावर टीम अण्णाच्या सदस्यांनी पंतप्रधानांना आणि कॅबिनेटमधील त्यांच्या सहकार्‍यांना लक्ष्य करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याचा एल्गार करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी लोकपाल विधेयकाला विश्रांती देण्यात आल्याची कल्पनाही करणे अशक्य होते. तसे झाल्यावर वातावरणात साधा तरंगही उठणार नाही अशी कल्पना करणेसुध्दा शक्य नव्हते. या संपूर्ण प्रकरणाचे पुनरावलोकन केले असताना त्यातून कोणते महत्त्वाचे संदेश मिळाले ते पाहणे उद्बोधक ठरेल.
(१) बदल हा प्रकृतीचा धर्म आहे- लोकपाल विधेयक सादर होत नसल्याच्या विरोधाच्या आणि निषेधाच्या काळात असे अनेक प्रसंग आले जेव्हा तडजोड करणे शक्य असल्याचे वाटले होते पण टीम अण्णाच्या हटवादीपणामुळे अशी तडजोड होऊ शकली नाही. कारण आपण म्हणू तसेच झाले पाहिजे या दुराग्रहामुळे तडजोड होऊ शकली नाही. पण काही क्षेत्रांबाबत तडजोड करण्यात आली असती तर लोकपाल विधेयक हे अर्थहीन ठरले असते हेही तितकेच खरे आहे. खरा प्रश्न काल्पनिक जास्त होता. लोकपालाची निर्मिती झाल्यावर त्या आधारे सार्‍या राजकारणाचे शुध्दीकरण होईल अशी कल्पना करणे हेही भ्रामक ठरले असते. तसे गृहित धरणे आदर्शवाद जोपासणे ठरले असते. राजकीय व्यवस्थेची स्वत:ची एक चौकट असते आणि काम करण्याची पध्दत असते. या व्यवस्थेचे निरनिराळे भाग हे भ्रष्टाचाराचे वंगण लाभल्यामुळेच चालत असतात. त्या व्यवस्थेत लोकपालाच्या निर्मितीमुळे आमूलाग्र बदल होईल अशी अपेक्षा करणेही चुकीचे होते. आपल्या व्यवस्थेला निर्माण झालेला धोका फेटाळून लावण्यासाठी ती व्यवस्था कोणत्याही र्मयादेपर्यंत पोचली असती पण या गोष्टीचे भान बाळगण्यात आले नाही. आता नेमके हेच घडले आहे. राजकीय व्यवस्थेतील निरनिराळ्या घटकांनी एकत्र येऊन लोकपालाच्या भुताला बाटलीत बंद करण्यात यश मिळविले आहे. लोकपाल हे काही अंतिम साध्य नाही तर एका दीर्घ प्रवासाचा तो एक टप्पा आहे ही बाब लक्षातच घेण्यात आली नाही. लहानसा बदल घडून आल्यावर अधिक मोठय़ा परिवर्तनाची लोकांनी अपेक्षा केली असती. त्यातून नेत्यांकडून मतदारांच्या ज्या अपेक्षा असतात. त्याच्या स्वरूपातही परिवर्तन झाले असते. तसे घडले असते तर व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणणे शक्य झाले असते. पण ती संधी यावेळी गमावण्यात आली.
(२) अधिक बडबड करणे आणि कामाचा अतिरेक करणे हेही धोकादायक ठरते- लोकपालाच्या आंदोलनाला जे व्यापक स्वरूप आले होते, तशा तर्‍हेच्या व्यापक आंदोलनाला हाताळण्याबाबत लोकपाल आंदोलनातून चांगलाच बोध मिळाला. विधेयकाबाबत निर्णय घेण्याच्या एकाच मुद्यावर टीम अण्णाने लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर टीम अण्णाच्या सदस्यांनी, अण्णा हजारे यांच्यासह जी वक्तव्ये केली आणि ज्या पध्दतीने ते वागले त्यामुळे त्यांनी केलेले सर्व प्रयत्न वाया गेले. उपोषणांचा अतिरेक करण्यात आला, भांडखोरपणाला सीमा उरली नाही, टी.व्ही.च्या कॅमेर्‍यासमोर वारंवार जाण्याचा उत्साह टीम अण्णाच्या सदस्यांकडून दाखविण्यात आला. हे सर्व पचवणे टीम अण्णाच्या सदस्यांना शक्य झाले नाही. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराच्या संबंधातील विचार वगळता अन्य विषयावरील विचार लोक ऐकण्यास तयार नसताना टीम अण्णाच्या सदस्यांनी मौन बाळगणे हेच अधिक श्रेयस्कर ठरले असते.
(३) मीडिया हा धोरणाला नव्हे घटनांना महत्त्व देतो- सरकारच्या होणार्‍या निषेधाला टी.व्ही.वरील घटनेचे स्वरूप प्राप्त झाल्याने या आंदोलनाला सुरुवातीच्या काळात चांगले यश मिळाले. टीम अण्णाच्या सदस्यांच्या वाचाळपणामुळे आणि भर उन्हात उत्साहाने वावरण्याच्या त्यांच्या कृतीने टीम अण्णाने लोकप्रियता मिळवली. सरकारने टीम अण्णातील प्रत्येक सदस्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने या सदस्यांना एक प्रकारचे बळ मिळाले, पण टीम अण्णाच्या काही कृत्यांमुळे मूळ मुद्यावरून लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यात सरकारला यश लाभले. मीडियाचा वापर स्वत:च्या लाभासाठी करण्यासाठी बर्‍याच संयमाची गरज असते. तसेच स्वत:ला किती प्रमाणात टी.व्ही.वर स्थान द्यायला हवे याचेही भान ठेवणे आवश्यक असते. एखाद्या घटनेचा पुरस्कार करणे योग्य नाही हे लक्षात आल्यावर भ्रष्टाचारविरोधी उपायांना स्थान देण्यात टी.व्ही.ने फारसा उत्साह दाखवला नाही हेही दिसून आले आहे. एखाद्या घोटाळ्याबाबत संतापाचा लहानसा उद्रेक होत असतो पण मीडियाच्या दृष्टीने तो उद्रेक लहानशा बेटासारखा असतो, त्याला मुख्य भूमीचे स्वरूप प्राप्त होत नाही.
(४) भांडखोरांचा सामना जिंकणे कठीण असते- कुणावर जेव्हा हल्ला करण्यात येतो तेव्हा आपले म्हणणे कसे योग्य आहे हे सिध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशा भांडणात समोरच्या व्यक्तीला आपल्या पातळीवर आणण्यासाठी आटापिटा करण्यात येतो. ‘‘मला विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही काही माझी बरोबरी करू शकत नाही.’’ असाचा युक्तिवाद करण्यात येत असतो. राजकारण्यांवर ठपका ठेवणे आणि आपण नैतिकदृष्ट्या किती श्रेष्ठ आहोत हे दाखवून देणे यावर सर्व शक्ती खर्च होत असताना दुसर्‍या बाजूनेही तसेच आरोप करण्यात येऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
एकूणच केवळ आशा व्यक्त केल्याने परिवर्तन घडून येत नसते. संपूर्ण व्यवस्थेचा विचार करूनच परिवर्तनाचे स्वरूप ठरविण्यात येत असते. त्यासाठी करण्यात आलेल्या कृतीतून बळ मिळविण्यात येते आणि मग कधीकधी परिस्थितीच्या वार्‍याची दिशा पाहून आपल्या हालचालींचे स्वरूप निश्‍चित करण्यात येत असते. केवळ राजकीय व्यक्तींच्या विरोधात लढा उभारून भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई जिंकता येणार नाही. राजकारणाला दुसरा एखादा लाभदायक मार्ग गवसला तरच ही लढाई जिंकता येईल. लोकपाल विधेयकाने फार मोठय़ा अपेक्षा न बाळगता आणि धमक्यांची भाषा न वापरता प्रवास सुरू केला असता तर तो प्रवास अंतिम टप्प्यापर्यंत पोचला असता. पण तसे होणे विधीलिखित नव्हते. त्यातून मिळालेला महत्त्वाचा धडा असा- परिवर्तन हे केवळ आंदोलनकर्त्यांकडे सोपवून साध्य होत नसते. आंदोलनकर्त्यांविना बदल शक्य नसतो पण केवळ आंदोलनातून चिरस्थायी परिवर्तन साध्य होत नसते. परिवर्तन घडवून आणण्यासाठी थंड डोक्याचे शहाणपण उपयोगी ठरत असते. त्यात तात्पुरत्या यशाची अपेक्षा बाळगण्यापेक्षा दीर्घ काळ टिकणार्‍या परिणामाकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.
-संतोष देसाई


No comments:

Post a Comment