Wednesday, September 5, 2012

भारतात अंधश्रद्धेचा महापूर


पुरातन काळापासूनच या देशात अंधश्रद्धा नांदत आली आहे. ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांचा या व्यवस्थेमध्ये फायदा होता. या व्यवस्थेमधून त्यांना सन्मान, संपत्ती व मानमरातब मिळत होती. त्यामुळेच सोन्याची अंडे देणारी ही व्यवस्था वर्षानुवर्षे टिकुन राहावी हा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. चार्वाकापासून ते बुध्दापर्यंत, बुध्दापासून शाहू महाराज/आंबेडकरापर्यंत सर्वानी या व्यवस्थेला विरोध केला. आज अंधश्रद्धा निर्मुलनासाठी झटणा-या सर्व संघटना या व्यवस्थेला विरोध करून तार्कीकतेवर अधिक भर देण्यास सांगत आहेत. त्यासाठी विविध अंधश्रद्धा निर्मुलन संघटना मार्फत कायदा बनविण्यासाठी एक बिल बनविण्यात येऊन ते सरकारला सादरही करण्यात आले परंतु ते सरकार दरबारी धुळखात पडले आहे. अंधश्रद्धेचे उच्चाटन तर जाऊ द्याच किंबहुना ती या देशाच्या व्यवस्थेचा मुख्य भाग बनली आहे. त्यामुळेच अंधश्रद्धेचा विरोध करणे म्हणजे मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे असे समीकरण झाले आहे. त्यामुळेच भलेभले या व्यवस्थेवर टीका करण्यास धजावत असतात. जे अंधश्रद्धा व धर्मवाद जोपासू पाहात आहेत त्यांच्यालेखी गरिबी, अन्याय व भूख ह्या समस्या तुच्छ आहेत. सामाजिक न्याय हा विषय धर्मावाद्यासाठी  अस्पृश्य असतो. (click below read for more  reading)
भारतात अंधश्रद्धा जपणारी व ती  वाढविणारी अनेक प्रतीके अस्तित्वात होती. आता त्यात खूप मोठी वाढ झाली आहे. मंदिरे, साधू, साध्वी व अनेक बाबा ही ती प्रतीके होत. केरळ मधील सबरीमाला मंदिर हे त्यापैकी एक. भगवान अयप्पावर विश्वास असणारे लोक मकर संक्रातीला येथे जमतात. मंदिरात दर्शनासाठी होणा-या चेंगराचेंगरीत दरवर्षी अनेक लोक मरत असतात. या मंदिरात प्रवेशासाठी स्त्रियांना मज्जाव करण्यात येतो. देशाच्या अनेक भागात अयाप्पाची मोठमोठी मंदिरे उभी राहत आहेत. शिर्डीचे साईबाबा, ते जिवंत होते तेव्हा त्यांनी कसलाही चमत्कार केला नव्हता. त्यांना लोक जेवायलाही देत नसत. साईबाबा घराजवळ येताच दरवाजे बंद होत असत. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने साईलीला लिहिण्यात आल्या. विविध माध्यमाद्वारे साईबाबाच्या काल्पनिक गोष्टी पसरविण्यात आल्या. याच अंधश्रद्धेने गणपतीला दुध पाजले. लाखो लिटर दुध नाल्यात जमा झाले होते तर देशात दुसरीकडे हजारो बालके कुपोषणाने तडफडत होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ब्राम्हनादी संघटनेने देशात अधिकाधीक अंधश्रद्धा वाढविण्याचे काम केले. या संघटनेच्या गोबेल्स तंत्राने सारा देश त्रस्त आहे. आज देशात श्री श्री रवी, रामदेवबाबा, आसाराम बापू, नरेंद्र महाराज, मुरारीबाबा  व  माता अमृतानंदमयी, साध्वी ऋतूंभरा  या बाबांबाबींचा बोलबाला आहे. या बाबांनी देशात कट्टरतावाद व धार्मिकता अधिक वाढविली आहे. या बाबांच्या विरोधात कांग्रेस प्रवक्ता दिगविजयसिंग वगळता कोणताही  राजकीय व सामाजिक नेता आवाज उठविताना दिसत नाही. विवेकवादी आंदोलनाला या देशात मुठमाती मिळाली आहे.
महाराष्ट्रात दोन मोठे मराठी नेते पुटटपुर्तीच्या सत्यसाईबाबाचे मोठे भक्त आहेत. त्यापैकी अशोक चव्हाण यानी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सत्यसाईबाबाला सरकारी निवास्थान असलेल्या वर्षावर आमंत्रीत करून पूजा करून घेतली होती. खरे तर सरकारी घरात कोणत्याही बुवाबाबांच्या हातून पूजा करून घेणे हा धर्मानिरापेक्ष भारतीय संविधानाचा अपमान होय. तर दुसरे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे सत्य साईबाबाचे कडवे भक्त आहेत. या सत्य साईबाबाच्या चमत्काराला सर् यदुनाथ सरकार यांनी आव्हान दिले होते परंतु त्यांनी कधीच हे आव्हान स्वीकारले नव्हते. आपल्याच भविष्यवाणीवर खरे न उतरनारा हा सत्यसाई अत्यंत क्लेशकारक बिमारीने मृत्यू पावला हे सा-या जगाने बघितले. सत्यसाई साईच्या आश्रमात करोडोचा जमा असलेला पैसा हा या देशाचा काळा पैसा होय. उद्योगपती, राजकारणी व टक्सचोरांचा तो पैसा आहे.
प्रत्येक राजकीय नेता कोणत्यातरी बाबाच्या पाया पडत असतो. बुवाबाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागलेली दिसते. राजकीय नेते विविध तीर्थयात्रेचे फुकटात सहलीचे आयोजन करताना दिसतात. जनतेत धर्मश्रद्धा वाढविन्यामागे धार्मिक नेत्यांबरोबरच विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांचा हात असतो. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव व दहीहंड्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात राजकीय नेत्यांचाच अधिक पुढाकार असतो.
तिरुपतीचे बालाजी मंदिर, शिर्डीचे साईबाबा, मुंबईचे सिध्दीविनायक हे आजचे कुबेर आहेत. तिरूअंतपुरातील पद्नाभास्वामी मंदिरात सोने व पैशाचे पहाड आहेत. या पैशाचा देशाच्या विकासात सहभाग नसतो. काही मंदिरांना सरकार जमिनी व दान सुध्दा देते.  एका सर्वेक्षणनुसार धार्मिकता व अंधश्रद्धेचा सर्वाधिक प्रभाव गरीब वर्गावर पडत आहे. मीरा नंदा यांच्या द गाड मार्केट या पुस्तकानुसार भारतात देवस्थानाच्या तीर्थयात्रेत दिवसेनदिवस अधिकाधिक वाढ होत आहे. रोज नवनव्या कर्मकांडाची निर्मिती होत आहे. वैदिक कर्मकांड करून घेणा-याची संख्या अधिक वाढत असून कर्मकांडाची लोकप्रियता वाढत आहे. धार्मिकता वाढविन्यामागे राजकीय नेते व व्यापारी वर्गाची मोठी भूमिका आहे. हिंदू धार्मिक प्रतीके व कर्मकांड हे सरकारी कार्यक्रमाचे भाग बनत चालले असून हिंदू धर्म हा देशाचा व राज्याचा धर्म बनत चालला आहे. हिंदू धर्म हा गर्वाचा विषय बनत चालला असून  देशाची सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, बेंक यांच्या कार्यालयात हिंदू देवदेवतांची फोटो लावणे ही एक फ्याशन झाली आहे. सरकारी इमारते व सरकारी योजना यांचे भूमिपूजन व उद्घाटन ब्राम्हनाच्याहस्ते मंत्रौच्चारात होते. नंदा म्हणतात, हिंदू धर्म दुस-या धर्मावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदू धर्माचा  सहिष्णुतेचा दावा हा पूर्णता पोकळ आहे असून या धर्माचा असमानता हा मुख्य पाया आहे.  
अलीकडेच राजेश सोलंकी या सामाजिक कार्यकर्त्याने गुजरात उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या निर्माण प्रसंगी भूमिपूजन व ब्राह्मणाच्या हस्ते मंत्रोच्चार करण्यास मनाई करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली होती. सोलंकीच्या मते ब्राम्हनाच्या हस्ते मंत्रोच्चाराद्वारे भूमिपूजन करणे हे संविधान विरोधी असून ते संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला काळिमा फासणारे आहे परंतु न्यायालयाने सोलंकीचे मत लक्षात न घेता जनहित याचिका रदबादल ठरवीत सोलंकीला 20 हजार रुपयाचा जुर्मांना ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयात निदेर्शित नोंदीनुसार भूमिपूजन हे  वसुधैव कुटुंम्बकम व सर्वे भवंतू सुखिन या हिंदू धर्माच्या मूल्यानुसारच आहे. एकंदरीत  न्यायालयेच आता संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाची खिल्ली उडवायला लागले आहेत. हिंदू धर्माचे न्यायवस्थेवरील आक्रमण वाढायला सुरुवात झाली होती आता तिचे परिणाम दिसायला लागले आहेत.
भारतात लोकांची मानसिक स्थिति गुलामावस्थेतील आहे. त्यांच्यातील तर्कनिष्ठ विचार करण्याची क्षमताच लोप पावली आहे. धर्मभावनेच्या बाहेर जाऊन विचार करायलाच ते तय्यार नाहीत. मंदिराच्या दानपेट्या फोडणे दिवेगर येथील मंदिरातील गणेशाची सुवर्णमूर्ती दानपेटी सोबतच चोरून नेली. अशा तथाकथित देवांच्याच मुर्त्या चोरून नेण्याचे प्रकार सगळीकडे होत आहेत. देवाच्या यात्रेतील चेंगराचेंगरीत  अनेक भक्तांचा मृत्यू होत असतो.  मंदिराच्या ट्रस्ट मधील सदस्यांच्या लाखो/करोडोच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर येत आहेत. देवाच्या यात्रेला जाताना व यात्रेवरून परत येताना वाहणाचे अपघात होऊन अनेकांचा मृत्यू होतो, अनेक बाबांचे सेक्स रॅकेट/स्कंडल उघडकीस येत आहेत तरी देव या तथाकथित संकल्पने बाबत लोकांचा रोष प्रगट होत नाही. धर्म व धर्माच्या बाजाराने ज्यांचे  व्यापार / धंदे  चालतात ते  विविध माध्यमांच्या द्वारे खोट्या अफवा पसरवून आस्था व अंधश्रध्देला बळकटी आणतात. भारतावरचा हा धार्मिक हल्ला रोखणे अत्यंत गरजेचे आहे.

                                                               लेखक: बापू राऊत

                                                                    922434346


No comments:

Post a Comment