Saturday, November 23, 2013

बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार


बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान सुपुत्र होते. भारतीय नेत्यांतील त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे असून देशातील आज पर्यंतच्या कोणत्याही नेत्यामध्ये त्यांचीच अधिक चर्चा होते. समाजकारण, अर्थकारण, राजकारण व धर्मकारण ह्या क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पुढे जाताच येत नाही. खरे तर बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. आणि विशिष्ट जातीचा कोणताही निकष आंबेडकरांना लागू होत नाही. त्यांचे अखिल भारतीय नेतेपद हे वादातीत आहे. जर देशात संख्येने अल्पसंख्य असलेल्या जातीचे मोहनदास गांधी व जवाहरलाल नेहरू हे देशाचे नेते म्हणून प्रस्थापित होतात त्याच न्यायाने संख्येने बहुसंख्य असलेल्या समाजाचे
डाक्टर आंबेडकर हे देशाचे अग्रणी नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकराने देशाची राज्यघटना लिहिताना सगळ्याच घटकांना न्याय दिला. प्र.के.अत्रे व जातीयवादी प्रसारमाध्यमांनी बाबासाहेबांना जातीजमाती पुरते सीमित करण्याचा प्रयत्न परंतु तो फोल ठरला असून संपूर्ण बहुजन समाज त्यांना आदरास्थानी मानतो.
बाबासाहेबाचे विचार आजच्या पिढीला जसे मार्गदर्शक आहेत तसेच ते पुढच्या अनेक पिढ्यासाठी मार्गदर्शक राहतील. सत्य वस्तुस्थिती व मानवतावाद हा बाबासाहेबांचा विचाराचा मुख्य गाभा असून प्रगत समाजाबरोबरच विषमतेने पिछाडलेल्या समुहाला आपल्या गर्तेतून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रावर बाबासाहेबांनी प्रभुत्व गाजविले आहे.
विषमताधारीत हिंदू धर्मातील वाईट चालीरीती कायमच्या नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रयत्न केले. परंतु हिंदूतील कट्टरवाद्यांनी त्यांचे सारे प्रयत्न विफल केले. जातीव्यवस्थेमुळे संपूर्ण हिंदू समाजाचे विघटन होत देशाचा कसा पराभव झाला? हे खंबीरपणे निक्षून सांगताना बाबासाहेब, “यावरही हिंदू धर्मात सुधारना न झाल्यास देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल” असा इशारा देतात. “तुम्ही जातीचे उच्चाटन केलेच पाहिजे. माझ्या मार्गाने करावयाचे नसेल तर तुमच्या स्वत:चा मार्गाने करा”.
हिंदू धर्माशास्त्रामुळे हजारो वर्षापासून स्त्रियांना मानसन्मान मिळत नव्हता तो सन्मान आंबेडकरांनी कायद्याने  प्राप्त करून दिला. आज देशात लहानमोठ्या पदावर ज्या स्त्रिया सन्मान उपभोगत आहेत त्याचे सारे श्रेय बाबासाहेबाकडे जाते. परंतु इतिहासाचे अज्ञान व त्यांच्या मन आणि मेंदूवर जातीश्रेष्ठत्वाची परंपरा मानणा-या हिंदू धर्माचा अधिक पगडा असल्यामुळे भारतीय स्त्रिया आपल्या उपकारकर्त्याचे नाव घेण्यास व त्यांना योग्य सन्मान देण्यास धजावत नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या समाजव्यवस्थेचा समग्र वारसा जतन करावयाचा, की समाजाला जे उपकारक आहे ते पुढील पिढीला द्यायचे?...जगात काहीही स्थिर, अचल व सनातन नाही हे अजमावण्याची वेळ आली आहे.!” जे उपकारक ते घ्यावे आणि जे कालबाह्य आहे त्याचा त्याग करावा. बहुजनांचा पैसा व श्रमातून आज देशात हजारो मंदिरे उभी करण्यात येत आहेत. त्या मंदिरात मात्र पुजारी केवळ ब्राह्मणच असतात. धर्माच्या ठेकेदारांनी देशात धर्मांधता वाढविली आहे. “बाबासाहेबांच्या घणाघाती भाषणांचा या देशातील कांग्रेस व नकली सुधारकावर चांगलाच परिणाम झाला होता. बाबासाहेबांच्या या घणाघातामुळेच मंदिर प्रवेश, सहभोजन व गांधीची हरिजन चळवळ सुरु झाली”. सुधारकांच्या सुधारणा ह्या वरवरच्या होत्या. बाबासाहेब म्हणत, आंतरजातीय विवाह व सहभोजने हा जाती नष्ट करण्याचा मार्ग नसून ज्या धर्मश्रध्दावर जातीयता आधारली आहे ती श्रद्धास्थानेच नष्ट करावयास पाहिजे. परंतु सनातन धर्मशास्त्रावरील श्रद्धा नष्ट करण्यास कोणीच धजावताना दिसत नव्हते. हे बघून बाबासाहेबांना म्हणावे लागले, “सवर्ण हिंदू सुधारक सनातनी लोकांना व परंपरांना दूर सारू इच्छित नाही आणि अस्पृश्यांना सुधारणा घडवून आणण्याशिवाय पर्याय नाही”.   
भारतातील समाजवादी युरोपातील समाजवाद्यांच्या पावलावर पाउल टाकून भारतातील परिस्थितीला युरोपियन लावण्याचा प्रयत्न करतात. मनुष्याच्या कृती, आशा आकांक्षा ह्या आर्थिक परिस्थितीवर निर्भर करतात. सामाजिक सुधारणा हे मोठे ढोंग व थोतांड आहे असे भारतीय समाजवादी मानतात. बाबासाहेबांना सर्व क्षेत्राचा विकास महत्वाचा वाटतो. विकासाच्या मार्गात अडथळे आणणा-या धर्मपरंपरा व धर्मशास्त्राचा ते धिक्कार करतात. भारतात सर्वसामान्य व्यक्तीवर न्यायाधीशापेक्षाही पुरोहित वर्गाचा जबरदस्त पगडा आहे. निवडणुका, संप याच्या सारख्या चळवळीत धार्मिक स्वरूप लवकर प्राप्त होते. भारतातील निवडणुका ह्या मुख्यत: जाती व धर्मावर लढल्या जातात. यावरून धर्माचा माणसावर किती जबरदस्त प्रभाव आहे याची जाणीव होते. बाबासाहेब म्हणतात, धर्म, संपत्ती व सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही बाबी सत्ताग्रहनास मदत करतात व त्याद्वारे इतरावर बंधने टाकता येतात. एकावेळी एक बाब प्रभावी ठरते तर दुस-या वेळेस दुसरी बाब हाच काय तो फरक असतो.
देशात आजही जातीवादाचे पुरस्कर्ते आहेत. मनुने निर्माण केलेल्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला ते मान्यता देतात. जातीभेद व जाती ह्याना ते  श्रमविभाजनाचे दुसरे नाव आहे असे म्हणतात. जाती विभाजनाचे शल्य त्यांना कधीच बोचत नाही. कारण जातिव्यवस्थेच्या कचाट्यात ते कधी अडकले नाहीत. जातीव्यवस्था ही केवळ श्रमविभागणी नाही तर ती श्रमिकाची विभागणी आहे. ती केवळ श्रमिकांची विभागणी नाही तर श्रमिकांच्या जातीची उतरंड आहे. बाबासाहेब म्हणतात, श्रमविभाजन म्हणजे जातीभेद, परंतु तोही प्रश्न जातीयता सोडवीत नाही. जातिव्यवस्थेतील श्रमविभाजन हे ऐच्छिक नाही. वैयक्तिक भाव भावना, आवडीनिवडी ह्यांना जातिव्यवस्थेत स्थान नाही. ‘पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ’ या सिद्धांतावर ते आधारलेले आहे.
बाबासाहेब म्हणतात, क्रुरतेपेक्षा नीच मनोवृत्ती कधीही तिरस्करणीय असते. आज हिंदू लोक मुसलमानानी तलवारीच्या बळावर धर्मप्रसार केला म्हणून दुषणे देतात तर ख्रिश्चनांनी दंडसत्तेच्या बळावर धर्मप्रसार केला म्हणून नावे ठेवतात, अशांना बाबासाहेब प्रश्न विचारतात की, स्वत:ला मुक्तीचा मार्ग माहीत नसलेल्या लोकांना आपल्या दृष्टीने मुक्तीचा समजला गेलेला मार्ग त्यांच्या इच्छेविरुध्द गळी उतरविणारे मुसलमान व ख्रिश्चन श्रेष्ठ की जे ज्ञानाचा प्रकाश रोखून ठेवतात, जे इतरांना अंधकारात ठेवू इच्छितात, जे बुद्धिमत्तेला केवळ आपली जागीरदारी  समजतात व इतरावर बंधने लावतात असे हिंदू लोक श्रेष्ठ? यापैकी श्रेष्ठ म्हणून कोणाची निवड करावयाची असल्यास, नीच मनोवृत्तीच्या हिंदूला कधीही श्रेष्ठ मानता येणार नाही.
बाबासाहेब म्हणतात, मला चातुर्वर्ण्याची अत्यंत घृणा आहे आणि माझा समग्र समाज त्याविरुध्द क्रांती करण्यास उभा ठाकलेला आहे. हिंदू धर्माधारित ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही नामश्रुन्खला चुकीची आहे. कारण ही नावे एका विशिष्ठ उचनीच भावनेचे द्योतक झाले आहे. जन्मताच उच्च स्थान  प्राप्त झालेल्या व्यक्तीस कर्मानुसार त्याच्या पदावरुन दूर सारता येईल काय? नीच श्रेणीत जन्मास आलेल्या व्यक्तीस त्याच्या उच्च कर्मामुळे त्याला उच्च समाजात स्थान मिळेल काय? हिंदू समाजात असे घडणे कधीही शक्य नाही. सोदाहरण स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात, शंबुकाला रामाने क्रूरपणे ठार मारले म्हणून काही लोक रामाला दोष देतात. वास्तविकता रामाचे राज्य हे चातुर्वर्ण्यावर आधारित होते. ‘राजा कालस्य कारणम्’ या न्यायाने चातुर्वर्ण्याची अंमलबजावणी करने हे त्याचे कर्तव्य होते. शंबूक सारख्या शूद्राने आपला वर्ण सोडून ब्राम्हण होण्याचा प्रयत्न केला. हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरचा आघात होता त्यामुळे त्याला मारून टाकणे रामाला भाग होते. रामाने शंबुकाला कमी प्रतीची शिक्षा देणे हे शक्य होते. परंतु ब्राम्हणत्वाला व चातुर्वर्ण्य व्यवस्थेला कोणीही हात लावण्याची हिंमत करू नये त्यासाठी तो मृत्यूदंड होता. एवढी वर्णव्यवस्था घातक होती.
बाबासाहेब म्हणतात, जगाच्या अनेक देशात सामाजिक क्रांत्या झाल्या, परंतु भारत हाच एक केवळ अपवाद आहे. याला कारण म्हणजे घृणास्पद वर्णव्यवस्थेने खालच्या जातीतील सर्व शक्ती हिरावून घेतल्या. ते नि:शस्त्र असल्यामुळे क्रांती करू शकत नव्हते.  त्यांच्याकडे कोणतेही साधने नसल्यामुळे त्यांच्या नशिबी कायमचे दास्यत्व आले व दैवी शक्ती सारखे सर्वानी ते स्वीकारले. चातुरवर्ण्यासारखी नीच व हलकट व्यवस्था जगात कोठेही सापडणार नाही. ह्या व्यवस्थेमध्ये लोकांची परस्पर मदतीची वृत्ती नष्ट होते. त्यामुळेच या देशावरची परकीय आक्रमणे यशस्वी झालीत.
संतांच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात, संतांची वचने अंतरात्म्याला सुखावणारी असली तरी त्यांची शिकवण पूर्णत: निरुपयोगी ठरलेली आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले, कोणत्याही संताने जातीव्यवस्थेवर हल्ला केलेला नाही. याउलट ते जातिव्यवस्थेचे समर्थक होते. संत ज्ञानेश्वर हा सुध्दा इतका जातीभिमानी होता की जेव्हा पैठणच्या ब्राम्हणांनी त्याचेवर बहिष्कार टाकला त्यावेळी त्याने ब्राम्हण जातीची प्रतिष्ठा मिळावी म्हणून आकाशपाताळ एक केले होते. संतांनी कधीही जातीयता व अस्पृश्यतेविरुध्द मोहीम काढली नाही. संताना मानवामानावातील संघर्षाची पर्वा नव्हती. केवळ ईश्वराच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत ही त्यांची शिकवण होती. संतांची ही भूमिका धक्का देणारी होती. संताची वचने निष्प्रभ ठरण्याचे दुसरे कारण असे की, लोकांना असे शिकविण्यात आले की, संतांनी जातीचे उल्लंघन केले तरी चालेल परंतु सामान्य माणसाने जात मोडता कामा नये. या शिकवणुकीमुळे संताच्या पावलावर पावले पाउल टाकावे असे कुणालाही वाटले नाही. संत केवळ पुज्यनीय ठरले आहेत. त्यांच्या विचाराचा सामान्य जनतेवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे संत हे सामाजिक सुधारणा घडवून आणू शकतात हे एक थोतांड आहे. धर्मशास्त्रे यांचाच त्याचेवर अधिक प्रभाव आहे. हिंदूचे धार्मिक आदर्श हेच मुळात विकृत प्रवृत्तीचे आहेत. या विकृत आदर्शामुळेच बहुसंख्य जनतेस ते कुमार्गाकडे नेत असतात. विषमतावादी धर्मशास्त्राला जोपर्यंत ठोकारनार तोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाहीत.
गांधीजीं सांगत असलेल्या कर्मसिद्धांतावर बाबासाहेब कडाडून हल्ला करतात, ते म्हणतात, चातुर्वर्ण्यव्यवस्था मानणारे गांधीजी स्वत:च त्या व्यवस्थेचा भंग करतात. गांधी हे बनिया जातीचे आहेत. वर्णव्यवस्थेप्रमाणे त्यांनी आपल्या पूर्वजांचा “व्यापार” हा व्यवसाय करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी कधीच व्यापार केला नाही. त्याच्या मुलाने वैश्य मुलीशी लग्न न करता ब्राम्हण मुलीशी विवाह केला. तेव्हा मुलांनी वर्णव्यवस्था मोडली म्हणून गांधीनी त्यांना कधीही दुषणे दिली नाहीत. राजा बनणे हे क्षत्रियांचे काम परंतु त्यांनी एका ब्राम्हणाला प्रधानमंत्री बनविले. गांधीजीनी स्वत:च वर्णव्यवस्था मोडली परंतु दुस-यांनी ति तंतोतंत पाळावी असा ते आग्रह करतात. गांधीजीचा आदर्श हा निश्चितच अव्यवहार्य व मानवी व्यवहार्य प्रवृतीसी न जुळणारा आहे. आपल्या पूर्वजांचाच धंदा आपण करावा असे म्हणने म्हणजे भडवेगिरी करणा-यांच्या वारसांनी भडवेगिरी व वेश्यांच्या मुलीनी वेश्याव्यवसाय करायलाच हवा असे सांगणे होय. गांधीजीच्या कर्मसिद्धांताचे हेच अनुमान निघते. बाबासाहेबांच्या मते, “आनुवांशिक धंद्याचा सिद्धांत निव्वळ अशक्य व अव्यवहार्यच आहे असे नाही तर नैतिक दृष्टीनेही त्याचे समर्थन करता येत नाही”. ‘ही व्यवस्था सर्वोत्कृष्ठ तर नाहीच परंतु इतकी निकृष्ठ स्वरूपाची आहे की सामाजिक विकासाच्या मुलभूत सिद्धांतावरच म्हणजे समता व तिच्या प्रवाहीपनावर आघात करणारी आहे.
गांधीजींचा आनुवांशिक ब्राम्हण हाही श्रद्धाहीन व स्वार्थ याचे निदर्शक असतो. ते ‘भिक्षुकीच्या फुकट मिळालेल्या दानावर जे जगतात व फुकटचा आशीर्वाद वाटत फिरतात’ व अशा ब्राह्मणाचा गांधीला मोठा अभिमान वाटत असतो. परंतु त्याचे दुसरे स्वरूपही बघायला मिळते. ब्राम्हण हा विष्णू या दयेच्या देवतेचा पुजारीपणा करतो तसाच तो संहारक असा शंकराचाही पुजारी असतो. तो करुणेचा संदेश देना-या बुध्दगयेच्या बुध्दमूर्तीचा पुजारी बनतो तर दुसरीकडे प्राण्याचे बळी मागना-या कालीचाही तो पुजारी असतो. ब्राम्हण हा राम या क्षत्रिय देवाचा पुजारी बनतो तर दुसरीकडे क्षत्रियाचा नाश करणा-या परशुरामाचाही पुजारी असतो. कोणताही प्रामाणिक माणूस अशा दोन परस्परविरोधी तत्वाची प्रतीके असलेल्या देवतांची भक्ती व पुजारीपणा स्वीकार करणार नाही. परंतु ब्राम्हणाला हे स्वीकार्य असते. तो स्वार्थासाठी कोणत्याही देवाची पूजा करतो. हे कोणत्याही सहिष्णुतेचे लक्षण नसून तो निव्वळ अप्रामाणिकपणा होय. बाबासाहेब म्हणतात, धर्माची सेवा करण्याचा हा पवित्र उद्योग ब्राम्हणांनी वेश्येसारखा करून टाकला आहे.
उच्चभ्रू सामाज गांधीची वाहवा करतो कारण त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक व धार्मिक स्थान कायम ठेवण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले आहे. परंतु त्याबरोबरच शोषित समाजासाठी मात्र तुरुंगात त्यांना कायमचे बंदिस्त करणारे आहेत. बाबासाहेब म्हणतात, गांधीजी हे आपल्या बुद्धीचा व्यवसाय करतात. कारण त्यात ते हिंदुच्या जातीव्यवस्थेकरिता समर्थन शोधण्याचा प्रयत्न करतात. ते जातीयतेचे समर्थन करणारे सर्वात प्रभावशाली पुरस्कर्ते आहेत. म्हणूनच हिंदू समाजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.

                                                    बापू राऊत

                                                     ९२२४३४३४६४ 

1 comment: