Sunday, September 29, 2013

मा. कांशीराम व आजची आंबेडकरी चळवळ

इतिहासात कोरलेला चाणक्य कसा होता?, कुटनितीज्ञ की संधीसाधू?, त्याचा शिष्य म्हणविल्या गेलेला चंद्रगुप्त मौर्य चाणक्याचा वैदिक धर्म न स्वीकारता वा त्याला राजाश्रय न देता जैन धर्माचा पोशिंदा बनतो, सम्राट अशोक बौध्द धम्माचा स्वीकार करीत त्याला जागतिक महत्व प्राप्त करून देतो तर वज्जींच्या एकजुटते मध्ये अविश्वास निर्माण होताच त्यांचे राज्य लयास जाते. पुष्यमित्र शुंग सत्तेवर येताच वैदिक धर्म भरारी मारतो, चातुरवर्ण्य व्यवस्था लागू होत बहुजन गुलाम होतो, तो आजतागायत गुलामी अवस्थेतच जगतो आहे. गतकालीन इतिहास हा मागच्या चुका पुढे न करण्यासाठी
महत्वाचा ठरत असतो. इतिहासाचा हा संदर्भ आंबेडकरी चळवळीच्या यशस्वितेसाठी फार महत्वाचा आहे. आंबेडकरी चळवळ भूतकाळात कशी होती.?, वर्तमानात तिची अवस्था काय? व भविष्यात तिचे अस्तित्व कसे असणार? याचा वेध घेणे महत्वाचे ठरते. आंबेडकरी चळवळ व तिचे भवितव्य हा भारतातील शिक्षित बुद्धिवादी लोकांच्या व्यासपीठावरील व्याख्यानात मागील अनेक वर्षापासून चर्चेचा  मुख्य असलेला विषय असतो. अनेक वर्षाच्या या विषयावरील चर्चेच्या फलीतासंबंधात समर्पक उत्तर म्हणजे “ प्रभावी भाषणे पण शून्य अंमलबजावणी”. आंबेडकरी चळवळ यशस्वीपणे पुढे नेणारे व संपूर्ण बहुजन समाजाला दिशा देवून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या बदल घडवून आणणा-या व भविष्यात आणू पाहना-या नेत्याची खरी गरज आहे.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीचा उषा:काल हा सुसाट वेगाने सुटणा-या बाणासारखा होता. पण काळाच्या ओघात ते बाण संथ व मिंधे झाले, त्यांना आपली कात आताही टाकून द्यावीशी वाटत नाही. त्यांना आपला पराभूतपणा व अयशस्विता दिसत नाही. केवळ मी - मी असे म्हणण्यात आंबेडकरी चळवळीचा –हास होतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभी केली ती कशासाठी?. आपले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक हक्क मिळवून घेण्यासाठीच ना!. हे हक्क प्राप्त झालेत?. असे हक्क प्राप्त होण्यासाठी तुमचे संघठन व नेता किती मजबूत आहे याची उंची तपासली जात असते व त्यानंतरच लोक नेत्यांभोवती गोलबंद होत असतात.
१९५६ नंतरची रीपब्लीकनादी राजकीय चळवळ व तिचा झालेला –हास व त्यानंतर तरुणाईच्या रूपात झालेला उठाव व त्या उठावातून दलित पथर या चळवळीचा झालेला जन्म परंतू अल्पावधीतच तिची उडालेली शकले हा आंबेडकरी चळवळीच्या अपयशाचा आरंभबिंदू होता. या चळवळीने बाबासाहेब आंबेडकराच्या तत्वज्ञानाला व विचाराला कधीच आपल्या डोक्यात टाकून मेंदू पोक्त करून घेतले नव्हते.  केवळ तात्कालिक कारणासाठी एकत्र येवून लढणे वा चळवळ उभारणे ही चिरकाल चालणारी लढाई नसते.  काही काळासाठी अशी चळवळ चालली तरी तिला तोडण्यासाठी शासक वर्ग त्यांच्यातच फितुरांची फौज निर्माण करीत असते. मग हे फितुरच त्या चळवळीचा चेंदामेंदा करून शासक जातीचे गुलाम बनत असतात.  
केवळ नामकरण व पुतळ्याभोवती फिरणा-या आंबेडकरी चळवळीला नवी दिशा देण्याचे काम मा. कांशीरामजीनी केले. त्यांच्या कार्यशैलीने आंबेडकरी चळवळीची दिशा बदलून ती प्रथमच चळवळीला आर्थिक रसद पुरविना-या शिक्षित कामगारांची झाली. देशात ब्राम्हणवादाविरोधात सामाजिक व सांस्कृतिक जागृतता निर्माण करण्याबरोबरच स्वत:च्या अर्थबळाने राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या वाटचालीमुळे देशातील मुख्य पक्ष कांग्रेस, भाजपा व कम्युनिस्ट यांच्या मनात धडकी भरली होती. कांशीरामाजीनी तात्विक आंबेडकरवादाला व्यवहारात आणण्याचे धाडस करीत राजकारणातील आपला धूर्तपणा सिद्ध केला होता. त्यामुळे कांशीराम यांना आधुनिक चाणक्य म्हटल्या गेले ते यासाठीच. मा.कांशीराम यांनी बहुजनवादाची थेरी मांडताना दलित एकेश्वरवाद निकाली काढला.
जगजीवनराम, रामविलास पासवान व रा.सु.गवई यांनी दलिताना केवळ आपली व्होटबॅक मानली होती. दलितांचा विकास व त्यांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक हक्क मागणे हे त्यांच्या विषयपत्रिकेवर कधीच राहिले नाहीत, स्वत:ला शासक जातीचा गुलाम मानून स्वत:साठी पदे मागून  घेन्यापर्यतच त्यांचे कर्तुत्व होते. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाबाबत बोलताना कांशीराम म्हणाले होते की, ‘लोगो को ऐसे नेता मिल जाते जैसे लोग होते है, और हम ऐसे लोग है जिनके नेता बिक जाते है, यावर कांशीरामच उत्तर देवून जातात, ते म्हणतात, क्यो न हम, न बिकने वाले समाज का निर्माण करे?, क्योकि न बिकनेवाले समाजसेही न बिकनेवाला नेता पैदा होता है.
देशात कांशीराम यांचा उदय हा दलित समाजाला राजकीय सत्तेची दिशा देवून गेला. तळागाळातल्या लोकांनाही या देशाचा राजा बनता येवू शकते हे त्यांनी उत्तर प्रदेश सारख्या आर्यावर्ताच्या भूमीत दाखवून दिले. कांशीराम यांना उत्तरप्रदेशचा राजकीय खेळ सर्वप्रथम महाराष्ट्रातच घडवून आणायचा होता. महाराष्ट्राची भूमी ही फुले शाहू आंबेडकराच्या जन्माने सजली होती. परतू ही जमीन विचाराने पावलेली नाही हे जेव्हा कांशीराम यांना कळून चुकले तेव्हा त्यांनी आपला मोर्चा उत्तर भारताकडे वळविला व उत्तर प्रदेशमध्ये राजकीय सत्ता मिळवून नवा इतिहास रचला. कांशीरामजींच्या ज्या आंबेडकरी विचाराने उत्तर प्रदेश मध्ये क्रांती केली त्याच विचारावर महाराष्ट्रात क्रांती का होवू शकली नाही?. याचे चिंतन नेते व कार्यकर्ते करायला तयारच दिसत नाही. महाराष्ट्रातील दलितांच्या मानसिकते मध्येच फार मोठा दोष दिसतो. महाराष्ट्रातील दलित भीमा कोरेगावच्या महारानी गाजविलेल्या शौर्याच्या कथा मोठ्या चविष्ठपणे वर्तमानपत्रातील लेखाद्वारे व भाषणाद्वारे सांगतात परंतु तसेच शौर्य करण्याचा गुण आता त्यांच्या रक्तातूनच लोप पावलेला दिसतो.
कांशीराम यांनी मात्र ‘हे होवूच शकत नाही’ या रीपब्लीकनांच्या संकल्पनेला छेदुन आंबेडकरवादाला नवा आयाम देत शूद्र व अतिशूद्र यांना एकत्रित करून बहुजन समाज संकल्पना निर्माण केली. विस्कळीत समाजाला एकत्र आणण्यासाठी नवे डावपेच व नवी व्युव्ह्रचना केली. महाराष्ट्रातील पुण्यातून आंबेडकरी चळवळ व विचाराचे धडे घेत देशातील बहुजन समाजाचा (शूद्र-अतिशुद्राचा) सांस्कृतिक इतिहास व त्यांच्यातील समानतेचे धागे यावर त्यांनी संशोधन केले. शूद्र-अतिशूद्र यांच्या एकत्र येण्याच्या कारणांचा शोध कांशीराम यांना लागला. शूद्र-अतिशुद्रामधील समान धागे शोधत त्यांच्या मागासलेपनास कोणकोणते घटक जबाबदार आहेत हे शूद्र अतिशुद्रास समजावून सांगितले. बहुजनांच्या मागासलेपणाची कारणे व त्यावरील उपाय यावर कांशीराम यांचा अधिकाधिक भर होता.
दलितांना सत्ताधारी बनविण्यासाठी कांशीराम यांचे काही रोखठोक ताळे होते. देशात केवळ १६ टक्के असलेल्या दलित समाजाने या देशाचा सत्ताधारी बनणे (मुख्यमंत्री/प्रधानमंत्री/प्रशासनिक उच्चाधीकारी) ही बाब उच्च्वार्नियासाठी हास्यास्पद असली तर मा.कांशिराम यांच्यासाठी ते स्वप्न होते. उत्तरप्रदेश मध्ये भाजपासोबत युती करताना कांशीराम म्हणाले होते, मला माझ्या समाजाला सत्ताधारी बनविण्यासाठी ज्या ज्या संधी प्राप्त होतील त्या त्या संधीचा मी पुरेपूर वापर करीन, त्यासाठी मला कोणी संधीसाधू म्हटले तरी मी त्याची मुळीच गय करणार नाही. ते म्हणत  “जर या देशातील ब्राम्हण (कांग्रेस/भाजपा) सत्ताधारी बनून राहण्यासाठी देशातील जनतेला खोटे आश्वासन देवून संधीसाधूपणा करीत असतील तर दलीताना सत्ताधारी बनण्यासाठी मी संधीसाधूपणा का करू नये?”
कांशीराम यांना “जातीविरहित समाजरचना हवी होती परंतु जातीविरहित समाजनिर्मिती पर्यंत दलितांनी जातीचा वापर डावपेचात्मक केला पाहिजे” असे ते म्हणायचे. ब्राम्हणवादाला नेस्तनाबूत होईपर्यंत जातीचा वापर अपरिहार्य असला पाहिजे असे कांशिरामजी मानत असत. कांशीरामजींची ही नीती बाबासाहेबांच्या जातीविरहित समाज निर्मितीच्या तत्वविरोधी नसून जाती नष्ट करण्यासाठी ‘जातीचाच’ वापर एक शस्त्र म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. भारतात जात ही एक दुधारी तलवार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हे या दुधारी तलवारीचा वापर करीत असतात. कांशीरामजींच्या मते जातीचा वापर दुहेरी तंत्राने केला पाहिजे, प्रथम सर्व क्षेत्रातून ब्राम्हणी वर्चस्व नष्ट करण्याकरिता ब्राम्हणवादाविरोधात बहुजनाला जागृत करने व दुसरे बहुजन समाजाच्या एकतेतून राजकीय सत्ता प्रस्थापित करीत जातीविहीन समाज रचनेचा पाया घालणे हा होता. दलित व मागास समाजाने एकमेकांच्या हातात हात घेवून आपला विकास साधला पाहिजे व दलित समाजाला भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर आदर सन्मान प्राप्त झाला पाहिजे. एकूणच समतामुलक समाज निर्मिती  हे कांशीराम यांचे स्वप्न होते. समता मुलक समाज व जातीविहीन समाज व्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत.   
मा. कांशीराम यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी बाबासाहेबांच्या “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे” या तत्वाला संपूर्णता: डोक्यात घातले होते व ही गुरुकिल्ली आपल्या हातात आणण्यासाठी त्यांनी अनेक डावपेच रचले. उत्तर प्रदेश ही आंबेडकरी विचारधारा अंमलात आणण्याची प्रयोगशाळा होती. देशाच्या इतर राज्यातील दलित जनतेने बहुजन समाजाला जोडण्याचे व त्या आधारे सत्तेत जाण्याचे प्रयोग राबविले पाहिजेत.
कांशीराम हे बाबासाहेब आंबेडकरासारखे तत्वज्ञानी नव्हते परंतु बाबासाहेबांचे तत्वज्ञान व्यवहारात आणून ते यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा होता. चातुरवर्ण्य व्यवस्था समजावून सांगताना ते पेन्सिल (पेन) ला उभे पकडीत, पेन्सिलचे वरील टोक हे ब्राम्हण, त्या खालील भाग म्हणजे क्षत्रिय, मधला भाग म्हणजे वैश्य, त्या खाली शूद्र तर शेवटचा व तळाचा भाग म्हणजे अतिशूद्र. या व्यवस्थेला ब्राम्हणवादी चातुरवर्ण्य व्यवस्था असे संबोधित असत. त्याच पेनला ते आडवी करीत पेनची ही अवस्था म्हणजे ‘समतामुलक समाजव्यवस्था’ असे सांगीत असत.  ज्या ज्या समाजाला तथाकथित पक्षांनी झिडकारले त्या त्या समाजाला कांशीराम यांनी बहुजन समाज या सदराखाली जोडण्याचे कार्य केले. 
दलित चळवळ आज संकटाच्या खाईत सापडली आहे. हे संकट विचारधारा व राजकीय परीक्षेपाच्या क्षेत्रासी निगडीत आहे. आजची दलित चळवळ ही एकसंघीय दिसत नसून विभाजित दिसते. ही विभाजकता गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत, राज्यपातळी पासून राष्ट्रीय स्तरापर्यंत झालेली आहे. या गटातटात केवळ एकच समानता आहे व ती म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकराचे नाव. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासी त्यांचे काहीही देणेघेणे नसते परंतु त्यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना समोर जाताच  येत नाही हे एक सत्य आहे.  केवळ आंबेडकरांच्या नावाचा धंदा करायचा आहे. आपण स्वतंत्रपणे उभे राहू शकतो हा आत्मविश्वास व आत्मभान आंबेडकरी समाज विसरला आहे. 
आजच्या सर्वच आंबेडकरी चळवळीमध्ये अहंभागीवादाने विकृत स्वरूप घेतले आहे. त्यामुळे या चळवळीकडे सत्ताधारी लोकांबरोबरच आंबेडकरी जनताही अजिबात लक्ष देईनासी झाली आहे. एकवाक्यता नसेल तर हेतू साध्य न होता पराभवालाच सामोरे जावे लागत असते हे वज्जी गणराज्यात घडलेल्या घटनेवरून समजले पाहिजे. “बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी वज्जीप्रसंगावर विश्लेषण केलेले आहे. तर दुसरे उदाहरण म्हणून पुढील घटनेकडे बघितले पाहिजे, अहमदशहा अब्दाली व पेशवे जेव्हा पानिपतावर युध्दासाठी एकमेकासमोर आले तेव्हा पेशव्याचे सैनिक जातीनिहाय विभाजित होते. कोणाला कोणाचा स्पर्श नको म्हणून आपापल्या जातीचे स्वतंत्र समूह करून लढायचे, त्यातही उच्च व खालच्या जातीच्या सैनिकांनी एकमेकाला स्पर्श न करता लढायचे, लढताना मुसलमान सैनिकाचा स्पर्श झाला तर आपल्याच धर्मातून धर्मबहिष्कृत होण्याची भीती सैनिकात होती. ही बाब अहमदशहा अब्दालीला कळली, तो म्हणाला पेशव्यांना पराभूत करून त्यांचे राज्य हस्तगत करने सहज शक्य आहे, कारण जे युध्दातही एकत्र येवून आपला एकजिनसीपणा दाखवून लढू शकत नाही असे लोक युध्द कसे जिंकणार?. त्यांना  गुलाम बनविणे सहज शक्य आहे. आणि पानिपतच्या युध्दात पेशव्यांची धूळधाण झाली. हाच निकष आंबेडकरी चळवळीवर लागू होतो. निवडणुकांच्या राजकारणात विविध आंबेडकरी राजकीय गट एका मतदारसंघात आपापले उमेदवार उभे करीत असतात, त्यानी उभे केलेले सर्व उमेदवार पराभूत होवून त्यांचे डीपाझीटही जब्त होणार हे माहीत असतानाही ते आपले उमेदवार उभे करीत असतात. असे हे नेते का वागतात?, ते एकत्र येवून निवडणुका का लढवू शकत नाही?, ते असे वागून सत्ताधारी पक्षाचेच काम करीत नाही का?. आता तर सत्ताधारी लोकांनी नेत्यापेक्षा आंबेडकरी जनतेलाच लाच देणे सुरु केले आहे. कुठे आहे आंबेडकरवाद व स्वाभिमान?. यावरही ते आम्हीच आंबेडकरवादी म्हणून फुशारक्या मारणार! या आंधळ्या व सोंग घेतलेल्या गटाधीपतीचे काय करणार?. ह्या बुजगावन्यांना कुठपर्यंत सहन करणार?. हे आपापल्या गटामार्फत बाबासाहेबांचे स्वप्न साकार करणार आहेत काय?. नक्कीच नाही. यांच्याविरुध्द आता एल्गारच पुकारला पाहिजे. २०१४ मध्ये देशात निवडणुका आहेत, आंबेडकरी जनतेने ही आपली घटकचाचणी समजून या गटाधीपतीच्या मुसक्या बांधून एकत्रितपने आंबेडकरवादी भावी दिशा ठरविली पाहिजे. अन्यथा  बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न हे दिवास्वप्नच बनून राहील.


बापू राऊत
९२२४३४३४६४
Blog:bmraut@blogspot.com         

No comments:

Post a Comment