Saturday, January 25, 2014

““मादे स्नाना”” या अमानवीय प्रथेचे दहन कधी होईल?


भारत हा परंपरा व धर्माच्या वेडाचारानी पछाडलेला देश आहे. या देशात आजही अमानवीय, रानटी व नीच प्रथांचे समर्थन केले जाते. विज्ञानाने आणलेल्या क्रांतीचा वापर या देशातील कुप्रथाना वाढविण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी महज केला जात आहे. गणपतीचे दुध पिणे व ही बातमी जगभर पसरविणे हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय. या देशावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले
नसते तर हा देश आजही हजारो वर्षाच्या कुप्रथाच्या डबक्यात कुजत पडला असता. महाभयंकर अशा वाईट व अमानवीय प्रथा तशाच कायम राहिल्या असत्या. या देशातील शूद्र व अतिशुद्राला गुलामापेक्षाही अति यातना देण्यात आल्या असत्या. स्त्रिया सती गेल्या असत्या. बहुजन समाज हा अनपढ व गुलामीचे जीवन पुढेही जगत राहिला असता. परंतु ब्रिटिशांमुळे व त्यांच्या आधुनिक विचासरनीमुळे या देशातील बहुजन समाज (शुद्रातीशुद्र) व स्त्रियांना आशेचा व न्यायाचा किरण मिळून आजचे जीवन प्राप्त झाले आहे. त्यामुळेच ब्रिटिशांचे या देशातील बहुजन समाजावर अनंत उपकार आहेत असे म्हणावे लागते.
भारतात सती, बालविवाह, डोक्यावरून मैला वाहने, हुंडा, डाकीण, कन्या वध, जाती प्रथा, श्रेष्ठ–कनिष्ठ व देवदासी यासारख्या अनेक कु-प्रथा अस्तित्वात आहेत. अशाच अनेक कुप्रथापैकी एक अमानवीय, रानटी,  शर्मनाक व लज्जास्पद कु-प्रथा म्हणजे “माडे स्नाना” ही होय. ही कु-प्रथा  मुख्यत: कर्नाटक या राज्यात आढळते. या कु-परंपरे प्रमाणे ब्राम्हणांनी जेवण करायचे व त्यांचे पत्रावळीतील खावून उरलेल्या उष्ट्या जेवणावरून शूद्र, अतिशूद्र व आदिवासी जातीच्या लोकांनी अंगावरचे कपडे काढून सापासारखे सरपटत जायचे असते व पत्रावळीतील उरलेले उष्टे जेवण हुंगायचे वा खायचे असते. ह्या उष्ट्या पत्रावळीवरून सरपटत जाण्यासाठी परंपरेने गुलाम व स्वाभिमानशून्य वृत्तीचे असलेले मागास व आदिवासी जातीतील लोक टपलेलेच असतात. ही हलकट व नीच परंपरा आजही भारतात अस्तित्वात आहे. या परंपरेचे निकृष्ठ ब्राम्हणी व्यवस्थेकडून समर्थन केल्या जाते. ब्राम्हणांच्या वैचारिक दिवाळखोरीचे हे एक मोठे लक्षण आहे.
कर्नाटक सरकार या अमानवीय कु-प्रथेवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याउलट हा मुद्दा लोकांच्या भावनेशी व परंपरेशी निगडीत असल्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही अशी भूमिका सत्तेमध्ये असलेल्या तेव्हाच्या कांग्रेस व भाजपा सरकारांनी वेळोवेळी घेतलेली आहे.माडे स्नाना” ही प्रथा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रमण्य या मंदिरात चालते. धर्मवाद्यांच्या दबावामुळे व विहिप-संघ यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे ही परंपरा बंद करण्यास कर्नाटक सरकार टाळाटाळ करते. कर्नाटक राज्यात परंपरेने कांग्रेसची सरकारे येत राहिली परंतु ह्या अमानुष प्रथेला बंद करण्यास त्यांनी कोणतीही पावले उचलली नाहीत. कांग्रेस सत्तेमध्ये असल्यास भाजपा या कु-प्रथेवर आवाज उठविते  तर भाजपा सत्तेवर आल्यास कांग्रेसचे लोक या कु-प्रथे विरुध्द आवाज उठवून बंदी आणायची मागणी करते. प्रत्यक्षात मात्र सत्तेमध्ये असताना अशा कु प्रथांना बंद करण्याचे धाडस ना भाजप करत ना कांग्रेस. वास्तव मात्र हेच आहे कि, या देशात अनेक कुप्रथा ह्या राजकीय वरदहस्तामुळेच चालू आहेत. भाजपा सरकार हे तर धर्मरूढीचे पालन करणारे सरकार आहे. अशा कुप्रथाना बंद करण्याचे विचार त्यांच्या मनात कधीही येणार नाही कारण धर्मापरन्परा हाच त्यांच्या सत्तेचा पाया आहे.
“माडे स्नाना” या परंपरांचे पालन करण्यासाठी दरवर्षी कुक्के सुब्रमण्य ह्या मंदिरात समारंभ आयोजित केल्या जातो. ह्या परंपरेला अशिक्षित, गरीब व खालच्या जातीतील लोक बळी पडतात. ब्राम्हणांचे उष्टे अन्न खाल्यास पुण्य प्राप्त होते तसेच शरीरावरील रोगराई पूर्णत: बरी होते असे उष्टे अन्न खाना-यांचा विश्वास व धारणा आहे. परंतु शेकडो वर्षापासून चालत आलेल्या ह्या परंपरेने प्रत्यक्षात कोणाचीही रोगराई नष्ट झाली नाही. कोणीही पुण्यवान बनून दुस-यांचे नव्हे तर स्वत:चेही भले करू शकला नाही.
सरकारी आकड्यानुसार दरवर्षी २०० ते ३०० भाविक ह्यात भाग घेत असतात. ब्राम्हणांच्या जेवणाच्या उष्ट्या पत्रावळीवरून सरपटत जाण्याचा व ते खाण्याचा हा जंगी कार्यक्रम तीन दिवस चालत असतो. ब्राम्हण कुटूंबीया साठी जेवणाचा वेगळा हाल असतो तर मागास लोकांना वेगळ्या हाल मध्ये जेवण दिल्या जाते. ब्राम्हण कुटुंबे दुपारी २ वाजता जेवणाच्या पत्रावळी वरुण उठत असतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या वाद्यवृंदाच्या आवाजात मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येतात. त्यानंतर बाहेर वाट पहात बसलेले लोक अंगावरील कपडे काढून ब्राम्हणांच्या जेवणाच्या उष्ट्या पत्रावळीवरून सरपटत जातात व पत्रावळीतील राहिलेले उष्टे अन्न खातात.  
ब्राम्हण समाज हा धर्माच्या नावाने ही प्रथा जिवंत ठेवू पहात आहे. अश्या या कु-प्रथेवर सरकार बंदी का आणीत नाही? मानवतेला काळे फासणा-या या परंपरेवर सरकारकडून कायद्याने बंदी का घालण्यात येत नाही?. जे ह्या प्रथेचे समारंभ घडवून आणतात ति मंदिर कमिटी व  समारंभ कमेटी मेंबरवर अॅट्रासिटी अॅक्टनुसार का कारवाई करण्यात येत नाही? उच्च व सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका आहेत परंतु तेही कारवाई करताना दिसत नाही. यावरून न्यायालये सुध्दा ही कु-प्रथा चालू राहण्याच्या बाजूचे आहेत की काय? अशी शंका निर्माण होते.  या परेपंरेबाबत न्यायालये सनातनी लोकांची भूमिका बजावताना दिसतात.
ह्या अमानुष प्रथेला विरोध करणा-या संघटना व व्यक्तींना पोलिसाकडून अटकाव व मारहाण केली जाते. पोलीस संरक्षणात ह्या प्रथेचे नियोजन करण्यात येते. हे काय दर्शविते?. तथाकथित सरकार कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली या कु-प्रथेला विरोध करू देत नाही. विरोध करणा-यांना मंदिराजवळ जमण्यासही बंदी घातल्या जाते. यावरून सरकारच या अंधश्रध्दाचे पालन करते व त्यास खतपाणी घालते हे सिद्ध होते.
देशाच्या प्रजासत्ताकाला एवढी वर्ष झाली तरी ही प्रथा जिवंत कशी राहू शकते? हा एका समाजावर शासनाकडूनच होणारा अन्याय नाही काय?
शेकडो वर्षापासून ही प्रथा चालू आहे तर आजपर्यंत तेथील सगळ्यांना पुण्य का प्राप्त झाले नाही?. त्यांचे रोग नष्ट का झाले नाही?. ही प्रथा केवळ जाती व्यवस्था जतन करण्याचा व ब्राम्हणाचे वर्चस्व मान्य करून घेण्याचा खेळ आहे. हिन्दू धर्मातील शा अमानवीय प्रथापासून ज्याना फायदा होतोज्यांचे धार्मिक श्रेष्ठत्व अबाधित राहते असे समूह व व्यक्ती ह्या अमानवीय प्रथांचे उद्दात्त समर्थन करीत असतात.  त्यासाठी ते पापपुण्य, देव देविकांचे काल्पनिक संवाद रचून धर्मभीरु व भावूक लोकाना परंपरागत चालीरीती मध्ये अडकावुन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात व त्यांचीच प्रसार माध्यमे या वाईट प्रथांचा प्रचार व प्रसार करीत असतात.

ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनी त्याविरुध्द आवाज उठविणे व अन्याय धुडकावून लावणे हे शोषित वर्गाचे आद्य कर्तव्य असते. परंतु प्रथापरंपरांचे पालन व पुर्वजन्मीचे ते फळ आहे असे सांगून अशिक्षित व गरीब लोकाकडून ब्राम्हनाच्या जेवणाच्या पत्रावळीवरुण सरपटत जाण्यास लावणे व उष्टे अन्न खाण्यास उद्युक्त करने हा गुन्हा असून ते मानवाधिकाराचे उल्लंघन आहे.

माडे स्नाना” परंपरेत बदल करून दलित आदिवासीच्या उष्ट्या पत्रावळीवरून सरपटत जावून त्यांचे उरलेले उष्टे जेवण खावून  ब्राम्हण हि धर्मिक समानता आणण्यास तयार होतील काय?. हि समानतेची प्रक्रिया आहे. ब्राम्हण  दिन-दलितांच्या उष्ट्या पत्रावळीवरून सरपटत गेल्यास ब्राम्हणांची अधिक प्रगती होईल. ब्राम्हणांनी ह्या संधीचा भरपूर फायदा घ्यावा. न की धर्म व परंपरेच्या नावाने केवळ आदिवासी व दलितांवर परंपरेची बळजबरी करावी? अशिक्षित दलित व आदिवासी या प्रथेचे समर्थन करताना दिसतात हा त्यांचा अंधविश्वास आहे व या अंधाविश्वासाला हजारो वर्षापासून ब्राम्हणांनी खतपाणी घातले आहे.
भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ने भरीव प्रगती केली आहे. तर दुसरीकडे अध्यात्म व परंपरेच्या नावाखाली अमानवीय व शर्मनाक प्रथा कायम आहेत. स्वत:ला सारस्वत समजणारा समाज एकीकडे अन्यायी रानटी प्रथांचे समर्थन करून आपला धार्मिक मागासलेपणा दाखवितो तर दुसरीकडे नेल्सन मंडेलावर झालेल्या अन्यायावर भाष्य करतो. भारतातील तथाकथित ब्राम्हणी बुद्धीवाद्यांच्या या दुहेरी नीतीला जगाच्या वेशीवर टांगणे गरजेचे आहे.
“माडे स्नाना” ही प्रथा म्हणजे अमानवीय अत्याचार आहे असे समजून युनो व मानवाधिकार आयोगाने भारत सरकारला दिशानिर्देश दिले पाहिजेत. सरकारने देशात विज्ञानवादी दृष्टीकोन वाढीस लावला पाहीजे. अमानवीय प्रथा नष्ट करने हे सरकारचे काम आहे. यासाठी कोणताही धर्म व जातीच्या विरोधाला बळी पडणे हा सरकारचा पराभूतापणा व राज्य घटनेच्या दिशानिर्देशाची पायमल्ली करने आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ ते १८ नुसार विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनातून केल्या जाना-या सामाजिक सुधारणा धार्मिक स्वातंत्र्यविरोधी मानता येत नाही तसेच धार्मिक स्वातंत्र्याच्या नावावर समाजात भेदाभेद निर्माण करणाच्या प्रवृत्तीस संविधानाने आळा घातला आहे. संविधानाच्या अनुच्छेद १७ नुसार समाजाच्या मागास वर्गास सामाजिक दृष्ट्या कमीपणा येईल अशा स्वरूपातील आचरण वा कार्य करण्यास उद्युक्त करण्याच्या प्रवृत्तीस तसेच कमीपणाचे कार्य लादणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. ‘मादे स्नाना’ ही प्रथा मागासवर्ग समाजास कमीपणा, तुच्छ  वा नीच समजण्याचा/लेखण्याचा प्रकार आहे. समाजातील विशिष्ठ वर्गाला कमी लेखण्याचा समज समाजात सतत तेवत राहावा. हा समज व भावना कधीच नष्ट होवू नये ही त्या मागची  खेळी आहे. हे स्पष्टतया संविधानाच्या अनुच्छेद १७ चा भंग आहे. तरी केंद्र वा राज्य सरकार ही प्रथा बंद करण्यास तयार होत नाही. याचाच अर्थ भारतीय सरकारे ही सामाजिक व धार्मिक समानतेच्या तत्वाचा व सर्वांना समान वागणूक देण्याचा व बरोबरीने समान लेखण्याच्या तत्वावर अंमल करण्यास कचरतात हे सिद्ध होते. म्हणूनच “मादे स्नाना” सारख्या अनेक कुप्रथा नष्ट होत नाहीत उलट अशा नीच प्रथांचे उद्दातीकरण करने चालू आहे. त्यामुळेच मादे स्नाना” या अमानवीय प्रथेचे दहन कधी होईल हे सांगणे फार कठीण आहे.

बापू राऊत
९२२४३४३४६४



1 comment:

  1. TUMHI SWATA SUDDHA ASE SARAPATAT JATA WA LOKANA WIRODH KARATA HE KASHASATHI?

    ReplyDelete