Saturday, March 21, 2015

आम आदमी पक्षातील मनोमिलाप किती दिवस चालणार!

आम आदमी पार्टीचे बिज हे अण्णा आंदोलनातून उगवले. जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणने, भ्रष्टाचाराचा महारोग व कमीशनबाजी नष्ट करण्याची अपेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्याकडून  करने हे मुर्खपनाचे आहे. ज्याला आपण चिखल समजतो त्या चिखलात उतरूनच हवे ते जनकायदे बनविता येतील. त्यासाठी नव्या राजकीय पक्षाची अनिवार्यता का व कशी आहे? हे अरविंद केजरीवाल, योगेन्द्र यादव व प्रशांत भूषण यानी अण्णा हजारेना पटवून सांगितले होते. परंतु राजकरणात सहभागी  न होता राजकारण्यांची जातकुळी कशी असते? हे अण्णा हजारेंना
चांगल्याप्रकारे माहीत होते. म्हणून त्यांनी राजकीय पार्टी काढण्यास स्पष्ट नकार दिला होता. तरीही केजरीवाल अड कंपनीनी आम आदमी पक्ष स्थापनेची घोषणा करीत “तत्व व नीतीमत्ताद्वारे भारतीय राजकारण कसे चालवायचे याचा आदर्श आम्ही देशासमोर घालून देवू” अशी घोषणा करीत दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लढल्या. या देशात नैतिकतेचे राजकारण करून खऱ्या अर्थाने लोकांचे स्वराज स्थापन करू या भूमिकेतून त्यांनी स्वराज नावाचे पुस्तकही लिहिले. दिल्लीच्या मध्यम व कनिष्ठ कामगार वर्ग व झोपडपट्टी धारकांना त्यांची भूमिका पटली. त्यांनी पाहिल्यांदाच २७ जागेवर ‘आप’ ला निवडून देवून सरकार बनविन्याची संधी प्राप्त करून दिली.
परंतु केजरीवाल यांना प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न पडू लागले व त्यांनी जनलोकपालचा मुद्दा उपस्थित करीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून लोकसभा निवडणूक लढण्याचा आपला मार्ग मोकळा केला. केजरीवाल व आम आदमी पक्ष हे दिल्लीच्या जनतेने दिलेल्या कौलाला झिडकारत महत्वाकांक्षेला शरण गेले. तेथेच केजरीवाल यांचे ढोंगी राजकारण उघड झाले. दिल्लीच्या जनतेनेही ‘आप’ चा एकही उमेदवार निवडून न देता केजरीवाल यांना परस्पर उत्तर दिले.
दिल्लीमध्ये निलंबित विधानसभेत परत आपले सरकार स्थापन करण्याचे मनसुबे आप कडून रचण्यात आले. त्यातूनच पक्षांतर्गत असंतोष निर्माण होत गेला. राजकारण घोषणेप्रमाणे ‘तत्व व नितीमत्तेने’ करायचे की इतर पक्षासारखे ‘साम, दाम, दंड व भेद’ नीती वापरून करायचे हा वैचारिक संघर्ष आप मध्ये सुरु झाला. योगेंद्र यादव+प्रशांत भूषण विरुध्द केजरीवाल, बिस्वास व संजय सिह हे सरळ दोन तट पक्षात निर्माण झाले. नरम विरुद्ध गरम असा हा सामना. तत्व व नीतीचे राजकारण हा योगेंद्र यादव यांची राजकीय शैली तर पदाची लालसा निर्माण झालेल्या केजरीवाल यांना साम, दाम, दंड व भेद नीती वापरून राजकारण करण्याची हौस. दिल्ली निवडणुका जिंकेपर्यंत केजरीवाल यांनी आपला हा दुसरा चेहरा कधीच बाहेर येवू दिला नाही.
आम आदमी पक्षाचे मुख्य प्रवर्तक अरविंद केजरीवाल असले तरी पक्ष स्थापनेमागे योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांचा अधिक सहभाग होता. योगेंद्र यादव यांची देशात समाजवादी विचारवंत म्हणून ख्याती आहे तर प्रशांत भूषण हे मानवाधिकारांच्या केसेस लढत असतात. या दोघांचाही देशात एक चाहता वर्ग आहे. अरविंद केजरीवाल यांना पक्षप्रमुख म्हणून एकहाती सत्ता चालवायची होती. म्हणजे पक्ष कमेटी हायकमांड म्हणून नाही तर स्वत:लाच हायकमांड म्हणून स्थापित करायचे होते. आणि हे योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना नको होते. या दोघाकडूनही आपल्याला हवे तसे राजकारण करण्यास विरोध होईल म्हणून पक्षाच्या राजकीय सल्लागार समितीमधूनच त्यांना बाहेर काढण्याचा डाव केजरीवाल यांनी रचला. आपल्या निस्सीम सहकारी असलेल्या मनिष सिसोदिया व कुमार बिश्वास यांच्या माध्यमातून तो तडीस नेला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी उचललेले पाउल होते. राजकारणात नसताना नैतिकतेचे बोध देणारे अधिक असतात. परंतु राजकारणात आल्यानंतर नैतिकतेचा दंभ फार काळ टिकू शकत नाही हे पुन्हा केजरीवालच्या माध्यमातून सिद्ध झाले.

दिल्ली विधानसभा निलंबित असताना केजरीवाल कांग्रेस पक्षाच्या सदस्याच्या साह्याने दिल्लीत सरकार बनवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी काही कांग्रेस सदस्यांना मंत्रीपदे व काही मंडळाचे अध्यक्षपदे देवू केली होती. अशा प्रकारचा आरोप कांग्रेस सदस्यांनी पत्रकार परीषद घेवून केला. म्हणजे केजरीवाल हे  पडद्यामागून घोडेबाजार करीत होते. म्हणजे नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे फुटलेले पहिले बिंग होते. तर आपच्या अल्पसंख्यक सेलचे सरचिटणीस शाहिद आझाद यांनी केजरीवाल यांचा ऑडिओ स्टिंग जाहीर करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती दाखवत अल्पसंख्यक उमेदवारांना तिकीट नाकारल्याचा आरोप केला. त्यात मोदींची लाट रोखण्यासाठी मुस्लिमांना 'आप' शिवाय कोणताच पर्याय नाही, असे केजरीवाल सांगताना दिसतात. मुसलमानांचे व्होटिंग त्यांना मोदीची भीती दाखवून ‘आप’ च्या पदरात पाडून घ्यायचे होते. म्हणजे मुसलमानांना विधानसभेत प्रतिनिधित्व न देता त्यांना व्होटबेंक म्हणून वापरायचे होते. कांग्रेसने आजपर्यंत जे मुस्लीम व दलिता संदर्भात केले तोच वारसा अरविंद केजरीवाल यांनाही पुढे चालवायचा आहे. हे सिद्ध होते. यानिमित्ताने केजरीवाल यांचे दोन चेहरे पुढे आलेत. एक सार्वजनिक आणि दुसरा खासगी.

केजरीवाल यांचा दुसरा खाजगी चेहरा भयानक असू शकतो. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केजरीवाल यांनी पक्षाचे सर्व सिद्धांत डावलले. मनमानी पद्धतीने तिकिटांचे वाटप. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना प्रतिनिधित्व देण्याचे नाकारले. ‘आप’ चे अनेक सिद्ध्दांत अजून ठरायचे आहेत. मंडल आयोग, ओबीसी जनगणना, मुस्लीम आरक्षण, मंदिर-मस्जिद विवाद, अनु.जाती जनजाती आरक्षण, धर्मांतरण, कट्टर तालिबानी हिंदुत्व, आर.एस.एस चा राष्ट्रवाद  असे अनेक मुद्दे अजून आपच्या अजेंड्यावर आले नाहीत. आम आदमी पक्षाचा खरा चेहरा ठरविणारे व आम आदमी नेत्यांना एकत्र राहू देणारे वा ना राहू देणारे असे हे मुद्दे आहेत. या मुद्यावर अरविंद केजरीवाल यांचा कोणता चेहरा समोर येईल हे पाहणेही लोकांसाठी उत्सुकतेचच असेल.

लोकसभेच्या यशानंतर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड या राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये मोदी चौखूर उधळले. त्यामुळे संघ व त्यांच्या पिलावळीमध्ये राणा प्रतापी उत्साह संचारला. लव जिहाद, घरवापसी, मशीद व चर्चवरील हल्ले यांच्यात अधिक भर पडत होती. परंतु मोदी याबाबत “ब्र” ही काढायलाही तयार नव्हते. त्यामुळे दिल्लीत सर्व अल्पसंख्यांकासकट बहुसंख्यांक लोकांनीही मोदी व अमित शहाची दिल्लीच्या मैदानात चांगलीच जिरविली. त्यामुळे पुढच्या पाच वर्षानंतर लोकसभेत मोदी व त्यांच्या भाजपाला कांग्रेसला जेवढ्या जागा लोकसभेत मिळाल्या तेवढ्या तरी मिळतील का? यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभेतील दुसरा विजय तर कोणत्याही जाणत्या राजकीय निरीक्षकाच्या काळजाचा ठोका चुकवेल, इतका भयंकर होता. अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्या महानगरातले सारे खासदार ज्या पक्षाचे येतात, तसेच सतत १५ वर्षे राज्य केलेल्या पक्षाला मतदार साफ गारद करतात, ही दिल्लीकरांची पोक्त राजकीय समज नव्हती तर कमालीच्या अस्वस्थ, उतावीळ, चंचल आणि अधीर पण आशेने काठोकाठ भरलेल्या समूहमनाचे ते प्रतिबिंब होते. लोकांच्या या जनलाटेसमोर केजरीवाल नतमस्तक झाले परंतु ते तरबेज अभिनेत्याचे नाटक होते की काय असे आप मध्ये घडत असलेला घटनाक्रम बघून वाटू लागले आहे.

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या पक्षाच्या मुख्य संस्थापकांना ज्याप्रकारे कार्यकारिणीतून  अपमानास्पद हाकलून देण्यात आले तो प्रकार इतर प्रस्थापित पक्षातही झाला नसावा. त्यामुळे या पक्षाची पुढची वाटचाल यशस्वी होण्याऐवजी त्याला उतरती कळा लागते की काय असी शंका उत्पन्न झाली आहे. पक्षाच्या संस्थापकानाच सन्मान न देणारा हा पक्ष लोकामध्ये कसा विश्वास निर्माण करेल?. आम आदमी पक्षात केजरीवाल यांचे ‘सुप्रीम कल्चर’ निर्माण झाले असे आप चे चिनाय व अनंतकुमार सारखे नेते बोलू लागले आहेत. त्यामुळे भारतीय राजकारणाची 'मैली गंगा' शुद्ध करण्यासाठी सरसावलेला हा 'झाडू'  मध्येच खुडला जाईल की काय? अशी शंका निर्माण होणे रास्त आहे.

तसा आप हा नव्या पिढीचा व तरुणांचा पक्ष आहे. टीव्ही चनेल वर आपच्या तरुण प्रवक्त्यांचा ग्रुप बघून लोकान तसे वाटते. परंतु वादविवाद व अंतर्गत कलहाच्या खडकावर उभा असलेला हा पक्ष कधी उन्मळून पडेल हे सांगता येत नाही. पक्षाच्या राजकीय सल्लागार कमेटीमधून योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना काढण्यासाठी मत विभागनी घेण्यात आली. यात योगेंद्र यादव यांना मिळालेला पाठिंबा बघून केजरीवाल बरोबरच त्यांचे साथीदार मनिष सिशोदिया, आशुतोष, खेतान व संजय सिंग, कुमार विश्वास चक्रावले असावेत. हे करताना त्यांनी देशातील व परदेशातील हितचिंतकाच्या म्हणण्याचाही आदर ठेवला नाही.   पक्षाच्या पीएसी मध्ये योगेंद्र यादव यांना एवढा पाठिंबा असेल तर आपच्या राष्ट्रीय कार्यकारणी व पक्ष कार्यकर्त्यामध्ये  किती पाठिंबा असू शकतो? याचा अंदाज केजरीवाल यांना आलेला दिसतो. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना पक्षातून काढणे म्हणजे पक्षात उभी फुट पाडनेच नव्हे तर तो नष्ट करने होय.  योगेंद्र यादव यांना नागरी समाजातून अधिक पाठिंबा मिळण्याची भीती केजरीवालना वाटत असावी. त्यामुळेच त्यांनी बंगलरुवरून दिल्लीत येताच “तोडो नही जोडो” ची भूमिका घेतली. तरी या पक्षाचे आता आंतरिक कलह सुटण्याची चिन्हे कमीच आहेत. कारण सत्ता व वर्चस्ववादाची चटक लागलेल्या मध्ये सत्तासंघर्ष हा नेहमीच अटळ असतो. त्यामुळे आज होत असलेले यादव, भूषण व केजरीवाल यांचे मनोमिलाप किती काळ टिकेल यात शंकाच आहे.

बापू राऊत

९२२४३४३४६४

No comments:

Post a Comment