Saturday, January 2, 2016

रामदास आठवले यांची हिंदुत्वाकडे वाटचाल ?

रामदास आठवले हे राज्यात अनेकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत. आठवलेंच्या चर्चेत राहण्याचे मुद्दे हे कधीच गंभीर नसतात. समाजाचे मुख्य प्रश्न त्यांच्यासाठी अनभिज्ञच असतात. मुख्यत: त्यांचा पेहराव, त्यांची बोलण्याची स्टाईल व संसदेमधील त्यांचे चुटकुले आणि शेरोशायरी हेच त्यांच्या चर्चेत राहण्याचे विषय आहेत. त्यांच्या राजकीय चळवळीतील सहभाग बघितला तर त्यांचे आंबेडकरी विचारासी काही देणेघेणे होते का? आणि आता तरी आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. श्रीपाल सबनीस यांनी प्रधानमंत्री मोदी यांचेवर टीका केल्यामुळे सबनिसांनी माफी न मागितल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याची भाषा करून पुन्हा आठवले पुन्हा चर्चेत आले आहेत. परंतु रामदास आठवलेंच्या या नव्या भूमिकेमुळे ते हिंदुत्वाकडे वाटचाल तर करीत नाही ना! यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण तुटण्यामागील मुख्य कारण हे रामदास आठवले व त्यांचे संधीसाधू डावपेच हेच आहेत. आंबेडकरी चळवळीला त्यांनी ३६० डिग्रीत फिरविले आहे. आंबेडकरी विचार व कार्यकर्ता हा स्वप्नात कधीही राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजपा व शिवसेना यांच्या सभोवताल फिरकणार नाही ही एक काळ्या दगडावरची रेघ होती. परंतु रामदास आठवले यांनी कोणतेही साधर्म्य व विचारशुचितेची तारतण्यमता न बाळगता संघाच्या व शिवसेनेच्या मांडीवर बसण्याचे काम केले. खरे तर, तेव्हाच ते आंबेडकरी विचार व आंबेडकरवादी जनतेच्या सहानुभूतीच्या वर्तुळाच्या बाहेर फेकल्या गेले होते. आज कोणताही सुज्ञ आंबेडकरी माणूस आठवलेच्या पाठीमागे नसून केवळ स्वार्थ व संधीसाधूपणाची वाळवी लागलेले लोकच त्यांच्या पुढे मागे फिरताना दिसतात.  

आता तर रामदास आठवले हे भाजपाचे व संघाचे प्रवक्ते व कार्यकर्ता असल्यासारखेच वागताना दिसतात. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी देशात निर्माण झालेल्या असहिष्णू परिस्थितीला मोदी यांना जबाबधार धरत त्यांच्यावर टीका केली. मोदींचे काबुल वरुण सरळ लाहोर मध्ये प्रयाण यावर सबनीस यांचे वक्तव्य याचे समर्थन करने वा न करने हा वेगळा भाग आहे. परंतु श्रीपाल सबनीस यांनी मोदी यांच्याबद्दल पुन्हा अपशब्द काढल्यास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. भाजपाच्या व संघाच्या नेत्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हे सुरक्षा कवच बनतील. आठवलेचे हे वक्तव्य म्हणजे आंबेडकरवादी विचाराचा पराभव व संघिय विचाराचा विजय नाही काय?  गोध्रा हत्याकांड व गुजरात दंगल ही देशातील फार मोठी विघातक घटना होती. परंतु भाजपाच्या प्रवक्त्या सारखे आठवले म्हणतात, या दंगली बद्दल नरेंद्र मोदी हे दोषी नसून ते पक्के धर्मनिरपेक्षवादी असल्याचे प्रशास्तीपत्र  देतात. येथेच ते थांबत नाहीत तर “यापुढे कोणीही मोदीविरुध्द बोलल्यास आरपीआयचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. त्यामुळे आरपीआय चे कार्यकर्ते म्हणजे रामदास आठवलेच्या गोठ्यातील बैल आहेत, असे समजायचे काय? पुढचा काळात याचे उत्तर मिळेलच.
रामदास आठवले यांच्या एकूण वर्तनुकीवरून ते आता सरळ हिंदुत्ववादाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसते. मंदिरात जाण्यापासून ते पूजापाठातील त्यांचा सहभाग व संसदेमधील भाजपा व त्यांच्या नेत्यांसाठी आठवलेचे चापलुसीकारक स्तुतीसुमने वाहणारे भाषन हे त्याचेच द्योतक आहे. आंबेडकरी समाजात आपले स्थान डळमळीत झाल्याचे ओळखून तिरपी चाल चालत आठवले यांची आपले भविष्य भाजपात व हिंदुत्ववादात शोधण्याची धडपड ही केविलवाणीच आहे असे म्हटले पाहिजे.  

बापू राऊत
मो.न.९२२४३४३४६४

ई मेल: bapumraut@gmail.com

No comments:

Post a Comment