Friday, January 22, 2016

रोहित वेमूला, आम्हाला माफ कर !

रोहित वेमूला, एक तडफदार उदयोन्मुख शास्त्रज्ञ, भारदस्त लेखक बनू पाहण्याची स्वप्ने बघणारा, वादविवादामध्ये आपली मते ठासून मांडणारा. आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचा एक विद्यार्थी नेता म्हणून कोणालाही न भिता सामोरे जाणारा. तुझा तो कणखर बाणेदारपणा त्याच विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून विसावतानाही दिसला. तुझ्या एका हातात क्रांतीचे विचार सांगत असलेला बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचा फोटो सतत दिसत होता. तर बाजूलाच स्त्रियाना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेचा फोटो. जीवनातील आदर्श पुरुष म्हणून बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टीकोन हा आजच्या आंबेडकरी युवकांच्या मनात
सदैव रेखाटून राहील. तुझ्या जाण्याने आजचा आंबेडकरी तरुण जाम भडकलाय, तुझे असे अवेळी जाणे त्यांच्या जिव्हारी लागले म्हणूनच कि काय तुला न्याय देण्यासाठी ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. सरकार व विद्यापीठ प्रशासना विरोधात त्यांनी एल्गार पुकारलाय.
१८ डिसेंबर २०१५ ला तु कुलगुरूना पत्र लिहिलेस. त्यात कुलगुरुला उद्देशून स्पष्ट लिहितोस, “आम्हाला विष दया किंवा स्वत:ला लटकविन्यासाठी दोर तरी दया, मी अशा सोसायटी (जाती) मध्ये का जन्मलो? की ज्यात जन्मताच अत्याचारास सुरुवात होते”. हि खरी वस्तुस्थिती तू जगासमोर मांडलायस. परंतु जाती व्यवस्थेच्या खेकड्यांनी आपला उर्मटपणा दाखविलाच. म्हणून तुझ्या आत्महत्येला आम्ही आत्महत्या मानीत नसून तो संस्थात्मक खूण आहे असेच समजतोय.
रोहित, आम्ही फार विसराळू आहोत. तुझ्यासारखाच एक प्रसंग कर्नाटक मधील  पत्रकारितेचा विद्यार्थी असलेल्या हुचान्गु प्रसाद या दलित युवकावर ओढवला. हिंदुत्ववाद्यांनी त्याला होस्टेल मध्ये जावून धमक्या देत तोंडाला काळे फासले. त्याच्या “वडालु किच्चू” या पुस्तकावर बंदी आणली. प्रसारमाध्यमांनी टीव्ही वर खूप चर्चा केली. परंतु त्याला न्याय कुठे मिळालाय? जातीवादी करंट्याना शिक्षा तर झाली नाहीच उलट बहिष्कार व त्रासामुळे होस्टेल सोडावे लागले. आता क्लासला हजर राहण्यासाठी रोज ८० किलोमीटर वरुण बसने प्रवास करावा लागतो. राजकारण व समाजकारण करणाऱ्या आमच्या नेत्यांना याच्याशी काही देणे घेणे उरल्यासारखे वाटत नाही. ते दिवसाढवळ्या कधी कांग्रेस, कधी भाजपा यांच्यासोबत शय्यासोबत करतात. आमदार, खासदार व मंत्रिपदासाठी लुच्चेगिरी करीत गुलाम झालेत. राजकीय सवलतीचा फायदा घेत संसदेत १२५ खासदार जावून बसलेत् खरे पण त्यांनी तुझ्या व हुचान्गु प्रसादवर झालेल्या अन्यायाविरोधात साधे तोंड उघडले नाही. त्यामुळे तुला खरच न्याय मिळेल काय याबाबत शंकाच आहे.
प्रसारमाध्यमे तर या ब्राम्हणी व्यवस्थेचे रखवालदार आहेत. केवळ एक दिवस त्यांनी तुझा संदर्भातला सौम्य आक्रोश दाखविला. तुला, खरे सांगायचे म्हणजे हि प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब वगैरे काहीही नसून ते भांडवली मालकांचे दास व जुनाट अशा खुळचट काल्पनिक व्यवस्थेचे समर्थक आहेत. त्यांनी तर तुझ्या जातीवरच चर्चा घडवीत जात चोरल्याचा आरोप केलाय. गरीबाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन केवळ दयेचा आहे. न्याय तर फार दूरची गोष्ट आहे.

रोहित, माझाही प्रश्न तुला आहेच. तुझ्यावर अन्याय झालाय हे खरेच! मोदीच्या केंद्रीय मंत्र्याच्या दबावातून तुला वैताग आला असेल. तुझी स्कालरशीप रोकण्यात आली. तुला अभाविपच्या लोकांनी त्रासही दिला. अभाविपचा तो सुशील कुमार अपेंडिक्सच्या आजारासाठी हास्पिटल मध्ये भरती झाला. परंतु तुम्ही केलेल्या मारहाणीमुळे भरती व्हावे लागले असा खोटा आरोप लावला. हे पितळ आता उघड झाले आहे. त्यांनी तुम्हा तरुणाविरुद्ध मोठा कट रचला होता. आधुनिक जातीयवादी द्रोणाचार्याच्या रुपात आलेल्या त्या कुलगुरूने तुमचा अंगठा न कापता सरळ हत्या केली. शिक्षण क्षेत्रातील असे अनेक द्रोणाचार्य आज दलित विद्यार्थ्यांचा बळी घेत आहेत. तरीही तु आत्महत्या करावयास नको होतीस. शेवटपर्यंत लढला असतास तर योद्धा म्हणून तुझ्या आंबेडकर विद्यार्थी असोसिएशनने तुला डोक्यावर घेतले असते.
रोहीत, नेहमीच जसे होत असते त्याप्रमाणेच तु गेल्यानंतर अनेक संघटना व पक्ष तुझ्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी झेंडे घेवून रस्त्यावर उतरले. तुझ्यासाठी न्यायाची मागणी करू लागले. तुझ्या जाण्यामुळे त्यांनाही आपले अस्तित्व दाखविण्याची संधी मिळाली. हे असे गटातटाच्या संघटनाचे मोर्चे कदाचित आठवडाभर चालतील. नेते म्हणून स्वत:ला मिरवून घेतील. त्यानंतर तुझ्या प्रकरणाचे काय झाले? याची साधी चौकशीही करणार नाहीत. त्यांचे डोळे परत एका रोहितची हत्या होण्याकडे लागलेले असतील.
रोहित, याकुब मेमनला फाशी देवू नये यासाठी उठलेला तुमचा आवाज कसल्याही प्रकारे देशद्रोह नव्हता. तू खरा देशप्रेमीच होतास. देशद्रोही तर ते होते ज्यांनी पाचशे वर्षाची बाबरी मस्जिद पाडून देशातील शांततेचे वातावरण भंग केले. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून देशात व मुंबईमध्ये दंगे झाले. परंतु दुर्दव्याने ज्यांच्यामुळे देशात असहिष्णुता वाढली ते आज मोकाट फिरत आहेत. देशप्रेमी व देशद्रोही कोण? हे ठरविणारे आरएसएस (संघ), भाजप वा अभाविप हे कोण रुस्तमखान?. जाती व धर्मामध्ये भांडणे लावणारे, वर्णव्यवस्था, परंपरा व स्वत:चे देव दुसर्यावर लादणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत. गरिबांना अधिक गरिबीत ढकलतात ते राष्ट्रद्रोही आहेत. देशाच्या शांततेला व एकात्मकतेला धोका पोहोचविणारे राष्ट्रद्रोही आहेत. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नाहीत तर राष्ट्र म्हणजे समाज व सर्व जनता. अशा राष्ट्राला अशांत करू पाहणारे हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आरएसएस (संघ) वा अभाविप यापेक्षा दुसरे काय करते?.
आज देश असहिष्णुतेच्या वाटेवर आहे.  संघीय संघटना देशात “दंगल सेना व धर्म सेना” तयार करीत आहेत. कोणाविरुध्द लढण्यासाठी आहेत ह्या सेना? याच सेनानी देशाच्या विविध भागात दंगली घडविल्या.  त्यापैकी  मुझ्झफरनगर” येथे घडवून आणण्यात आलेली मोठी दंगल होती. यात मोठी जीवितहानी झाली होती. मन हेलावणार्या त्या घटना होत्या. देशातील असंख्य लोकांना याबाबत बोलावेसे वाटते परंतु सनातनी लोकांच्या भीतीमुळे मौन धारण करतात. परंतु तू व तुझ्या आंबेडकर स्टुडंट असोसिएशननेमुझ्झफरनगर अभी बाकी है ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन करून एक प्रकारे डरपोकाना व जातियवाद्याना आपल्या कनखरपणाचा संदेश दिला. जातीयवादी संघ व तिची शाखा असलेल्या एबिविपीला ह्या माहितीपटाचे प्रदर्शन नको होते तर, देशात ते शांतता का नांदू देत नाहीत. बहुजनाणी काय संघाच्या दगाबाज नीतीला बळी पडून दंगल सादृष्यच जीवन जगायचे आणि त्यांनी काय मजा लुटायची?. या माहिती पटाने आपली अब्रू जगाच्या वेशीवर टांगल्या जाते असे संघीय शाखांना वाटत असेल तर त्यांनी देशाला अफगानिस्तानच्या वाटेवर घेवून जाणाऱ्या आपल्या विद्वेषी कुकृत्याना रोखले पाहिजे.
रोहित, तू  व तुझ्या आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने कुणालाही न भिता तो माहितीपट दाखविला. हाच तुमचा आंबेडकरी बाणा इथल्या आंबेडकरी म्हणवून घेणाऱ्या नेत्यांमध्ये दिसत नाही. दीड दमडी व एखाद्या पदासाठी तुझी हत्या करणाऱ्या प्रवूर्त्ती सोबत सौदे करतात. तेव्हा तू दाखविलेल्या स्वाभिमानाची ते हत्याच करीत नाहीत काय?. रोहित, तू ज्याला आपला समाज समझतोस, त्या समाजाचे 39 खासदार भाजपा नावाच्या पक्षात आहेत. तुझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ते काहीच बोलायला तैय्यार नाहीत.  स्मुर्ती इराणी हिच्या खोटेपणाबद्दल, बंडारू दत्तात्रय यांनी पाठविलेल्या पत्राबद्दल व कुलगुरूनी तुम्हाला होस्टेलमधून बाहेर काढल्याबद्दल ते मुग गिळून चूप बसले आहेत. अश्या मुक्याचा समाजाला उपयोग तरी काय.
रोहित, तु पाठीमागे सोडलेल्या पत्रात एक सुप्त आशय आहे. तो आशय म्हणजे, या “देशात लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे बहुसंख्यांकांची दादागिरी नव्हे. पण येथील ब्राम्हणी व्यवस्थाधारक स्वत:ला हिंदुत्वाच्या पापुद्र्याखाली बहुसंख्यांक समजून आपली संस्कृती दुसर्यावर लादीत आहेत. त्यांच्या बहुसंख्याकत्वाचा पापुद्रा फोडण्याची जबाबदारी ज्या आश्रित ओबीसी घटकावर आहे ते आज कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये आहेत”. तुझ्या पत्रात अन्याय करणाऱ्या शत्रूलाही माफ करण्याचे औन्दार्य तू दाखविलेस. पण आम्हाला माफ कर, तुझ्या संस्थात्मक हत्येमुळे एक उमेदी समाज संशोधक, वैज्ञानिक व लेखकाला मारणाऱ्या संघटनेचे व तिच्या कार्यपद्धतीचे लक्तरे जगाच्या वेशीवर टांगले नाही तर तुझ्यासारख्या अनेक रोहित वेपुलाला तुझ्याच मार्गाने जावे लागेल. तुझ्या संस्थात्मक हत्यारांना शिक्षा होणे हे आज फार गरजेचे आहे.

लेखक: बापू राऊत

९२२४३४३४६४

 



1 comment: