Friday, February 12, 2016

महिला विरुध्द पुरोहित व धर्मशास्त्रे

आपल्या देशात अनेक माणसे स्वत:ला समाजसुधारक म्हणवून घेतात परंतु समाजसुधारणा करने तर दूरच, अनिष्ट नीतीच्या विरोधात साध्या प्रतीक्रीयेलाही ते घाबरत असल्याचे बघायला मिळते. सवर्ण हिंदू सुधारक सनातनी लोकांच्या विरोधात द्रोह करून समानतेच्या सुधारणा आणू इच्छित नाही. भारतात  सुधारणावाद्यापेक्षा विषमतावादी व्यवस्थेला कवटाळनारे व चुप्पी साधनारेच लोक अधिक दिसतात. शनी शिंगणापुर मध्ये भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून हे उघड झाले आहे. बहुसंख्य हिंदु सामाजिक सुधारणा व महिलांच्या समान हक्काच्या संदर्भात उदासीन असलेले दिसतात. किंवा पारंपारिक धर्म व्यवस्थेविरोधात बोलल्यास आपला पानसरे वा दाभोळकर तर होणार नाही ना! एवढी  भीती वाटावी
इतका मोठा दहशहतवाद आरएसएस, सनातन संस्था, बजरंग दल व हिंदू जनजागरण   सारख्या धर्मठेकेदारी संस्थांनी निर्माण केला आहे. संघाला धार्मिक कट्टरतेच्या बळावर हिंदू राज्य निर्माण करावयाचे आहे. हे त्यांच्या नेत्यांच्या वक्त्यव्यातून अनेकदा दिसून आले आहे.  
भारतात चातुर्वर्ण्याच्या रखवालदारांनी स्त्रियांचे स्थान दुय्यम बनवून ठेवले आहे. याचा प्रत्यय समानतेच्या व एकदिलाच्या शपथा घेणाऱ्या लग्नजोडप्या मध्येही दिसतो. लग्नात एकमेकाची साथ घेण्यादेण्याची  शपथ घेणारे जोडपे जेव्हा शनीशिंगणापूरच्या दर्शनास जातात तेव्हा मात्र समानतेची शपथ घेणारा नवरा बायकोला मागेच ठेवून एकटाच चबुतऱ्यावर जावून तेल टाकतो. म्हणजेच मंदिरे व चबुतरे ही समानतेची शपथ तोडण्याची केंद्रे झाली असून विषमतेचा जोगवा जागवण्याचे प्रतिबिंब बणली आहेत.
स्त्रीला मासिक पाळी येणे हे धर्ममार्तंडाच्या हाताचे कोलीत झालेले आहे. मासिक पाळी हा स्त्रीच्या शरीर रचनेचा भाग आहे. परंतु स्त्रीयोनीतून बाहेर पडणारा पुरुष तिलाच अस्पृश्य व कुल्टा समजून तिचे हक्क नाकारतो. ह्याला भंपकतेचा मोठा कळसच म्हटला पाहिजे. धर्माच्या ठेकेदारांचा एक मोठा विचित्र व विनोदी दावा असतो. तो म्हणजे “ह्या प्रथा शेकडो वर्षापासून चालत आलेल्या आहेत”,  “असे म्हटल्या जाते”, “असी मान्यता आहे” वगैरे वगैरे परंतु याचा त्यांच्याकडे कोणताच पुरावा नसतो. केवळ थाप मारून व खोटे बोलून आपला धंदा चालविण्याचा त्यांचा तो एककलमी कार्यक्रम असतो. अशा अनेक थापा त्यांनी मारलेल्या आहेत. त्याचे अनेक पुरावेही आहेत. सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिकवायला लागल्या तेव्हा, स्त्रियांनी शिक्षण संपादन केल्यास धर्मबुडी होवून जेवणात भाताच्या अळ्या बनतील अशा थापा पुण्याच्या ब्राम्हणांनी मारल्या होत्या. शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात, महाराज आपल्या हट्टास कायम आहेत असे दिसताच त्यांना भिवविण्यासाठी रक्ताने माखलेल्या हाताची बोटे त्यांच्या घराच्या भिंतीवर उमटवील्या होत्या. शिवाजीं महाराजांच्या राज्यभिषेकानंतर जिजाबाई, प्रतापराव गुर्जर व काशीबाई यांचे अकाली निधन झाले तेव्हा गागाभट्टाने राज्यभिषेकामध्ये चुका केल्या, उपदेवताना संतुष्ट केले नव्हते, त्यांना दान दिले नव्हते म्हणून हे सगळे मृत्यु ओढवले अशा थापा निश्चलपुरी यांनी मारल्या होत्या.
धर्मशास्त्रे व ब्राम्हणांच्या अविवेकी कृतीवर स्वामी विवेकानंदांनी कडाडून टीका केली होती. १८९५ मध्ये ब्रम्हानंद या मित्राला उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, विवक्षित वर्गातील ब्राम्हणानी देशाला विपत्तीच्या खाईत लोटले आहे. दुष्टकर्तेपणात हे लोक मग्न असतात. अष्टवर्षा कन्येचा तीस वर्षाच्या घोडनवर्यासी विवाह होतो, या विवाहाबद्दल कोणी विरोध केला तर आमचा धर्म तुम्ही बुडवत आहात अशी ओरड केली जाते. ज्यांना आपल्या मुली वयात येण्यापूर्वीच आई झालेली बघण्याची घाई झालेली आहे आणि यासाठी जे शास्त्रीय स्पष्टीकरण देतात, त्यांना कसला आला आहे धर्म? केवळ धर्मग्रंथावर विश्वास ठेवायचा असेल तर आपल्याला तर्कबुद्धी कशाला मिळाली आहे? असा प्रश्न ते विचारतात. २० सप्टेंबर १८९२ रोजी शंकरलाल शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ब्राम्हणांनी स्वत:लाच संपूर्ण जमिनीचे मालक ठरविले आहे. केवळ सामान्य स्त्रियाच नव्हे तर राजवंशातील स्त्रिया देखील ब्राम्हणांची उपपत्नी होवून राहण्यात मोठा सन्मान समजतात, हा पुरोहितांचा अत्याचार भारतात सर्वापेक्षा जास्त आढळतो. याचाच परिणाम म्हणून त्रावणकोर प्रांतात एक चतुर्तांश लोक ख्रिस्ती बनलेले आहेत.
आजच्या पुढारलेल्या जगात अशा बुरसट विचाराचे मूळ धर्मशास्त्रात असल्याचे धर्माच्या ठेकेदाराकडून सांगितले जाते. स्त्रिया ह्या त्यांच्या बळी ठरत असतात. बुरसट विचाराना श्रद्धेचे स्थान देतात आणि तेथेच फसगत होते. लोकांच्या श्रद्धा व त्यांच्या मताची जडण घडण हे शास्त्रे करीत असतात. या धर्मशास्त्रांचा लोकावर फार मोठा पगडा असतो. म्हणून म्हणून बरोबरीच्या हक्कासाठी विषमता सांगणारी  धर्मशास्त्रेच ठोकरून दिली पाहिजेत. स्त्रियांनी धर्मशास्त्रे व त्याच्या प्रामाण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करून त्यातील गोष्टीना प्रयोगातून सिद्ध करण्याचे आवाहन धर्माच्या ठेकेदारांना दिले पाहिजे.
धर्मातील दुष्ट प्रथा कशा नष्ट होतील? असमानता हा सनातन वैदिक धर्माचा कणा आहे. वेद व स्मुर्त्याचा हा धर्म दुसरे तिसरे काही नसून कर्मकांडे, सोवळ्या आवळ्याचे नियम व बंधने ह्या साऱ्यांचे कडबोळे आहे. हे करा, ते करू नका याच्या आज्ञाचे गाठोडे असलेल्या धर्मशास्त्राना आता खरे तर पाण्यात डूबविन्याची पाळी आली आहे असा सरळ इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. मनुस्मृती ही हिंदू स्त्री दास्याचा पाया होता. भारतातील जातीव्यवस्था व स्त्रीदास्य बळकट करण्यात ज्या मनुस्मृतीचा हात होता. त्या मनुस्मृतीचे बाबासाहेब  आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला दहन केले होते. अशीच हिंमत भारतातील समस्त स्त्रियांनी दाखवून ८ मार्च या महिला दिनी संघटीत होवून “पुरुष प्रधान संस्कृतीची मुखवटे असलेली सर्व धर्मशास्त्रे नाकारीत आहोत” असा जाहीरनामा जगासमोर मांडून समानतेच्या मुक्तीचे स्वत:च भागीदार व्हावे.

बापू राऊत

९२२४३४३४६४

1 comment: