आज देश कधी नव्हे एवढ्या धर्म असहिष्णूतेच्या
गर्तेत सापडला आहे. धर्म व परंपरांच्या नावाने मत्सर भावना वाढीस लावल्या जात आहे.
राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून देशात दंगली घडवून आणताहेत. हे
सारे करताना मात्र शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करण्यात येत आहेत. हे फारच
क्लेशदायक आहे. शिवरायांना कट्टर धर्मश्रध्द ठरवून त्यांच्या विचाराची मोडतोड करून
समाजात विष पेरून ही धर्म व धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. मात्र त्याउलट शिवाजी
महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे केवळ नायकच नव्हे तर महानायक होते. हे सनातन्यांना
सांगण्याची गरज आहे. आज ब्राम्हण्यवाद्याकडून शिवरायांच्या राजवटीला धार्मिक
परिमाण दिले जात आहे. ते हिंदू धर्म रक्षक व मुस्लीम विरोधी होते असा
त्यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.
शिवराय सर्व धर्माचा आदर
करीत असत. याविषयी इतिहासकार काफी खान म्हणतो, शिवराय आपल्या सैनिकांना मशीद, कुराण
व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसत. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले
तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यातील मुस्लीम व ख्रिश्चनाना देत असत.
फ्रेंच प्रवासी बर्नियर याने म्हटले आहे की, शिवरायांनी कांपूचीयन मिशनरी फादर
अम्ब्रोस याच्या घराचे व इतर वस्तूचे मोठ्या आदराने जतन केले. शिवराय म्हणत,
फ्रेंच पादरी हे चांगली माणसे असतात. त्यांना उपसर्ग होता कामा नये. परंतु आज
त्यांच्या नावाचा उद्घोष करणारे ख्रिश्चन मिशनर्यावर हल्ले करतात व त्यांना जाळतात.
महाराजांच्या गुरूंच्या यादीमध्ये याकुबबाबा हे मुस्लीम संतही होते. हे पाहता खरे तर आज शिवराय आज सामाजिक परिवर्तनाचे
प्रतिक बनायला हवे होते. परंतु त्यांना हिंदुत्ववादाच्या हातातील मुस्लीम विरोधी
अमोघ हत्यार म्हणून वापरण्यात येत आहे. शिवरायावरील केवढा मोठा हा अन्याय? मुस्लीम
धर्माविरुध्द आपली मते प्रस्थापित करण्यासाठी जे महाराजाच्या नावाचा वापर करतात,
त्यांना सामान्य लोकांनी सुनावले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेत राजा
म्हणून कधीही व कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. आपल्या धर्माइतकाच दुसर्याचा
धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे असे त्यांचे मत होते.
शिवराय इतर मराठा
सरदाराप्रमाने मोगल सेनेचे कधीही मांडलिक बनले नाहीत. ते परकीय सत्तेच्या विरोधात
संघर्षरत राहिले. वारसा हक्काने ते राजे बनले नव्हते तर बुद्धीच्या व तलवारीच्या
जोरावर राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते. पण आज
शिवरायांबद्दल काही संघटना खोटा इतिहास लोकांना सांगून शिवरायाच्या प्रखर बुद्धीला
व पराक्रमाला नाकारीत आहेत. शिवरायद्रोह करणारी ही दांभिक माणसे शिवरायाच्या यशाचे
श्रेय अध्यात्म, तथाकथित भवानी देवी व भवानी तलवारीला देत आहेत. शिवाजी महाराजाना
भवानी प्रसन्न झाली म्हणून ते यशस्वी झाले. असे भोळ्याभाबड्या लोकांना सांगण्यात
येते. शिवरायाबद्दलचा हा किती खोटा विपर्यास? वस्तुस्थिती अशी आहे की, भवानी तलवार
म्हणून जिचा गाजावाजा करतात ती तलवार परदेशी व पोर्तुगीज बनावटीची होती.
युध्दाचे सावट ओसरून
राज्यभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती देण्याचे पर्व सुरु केले
होते. पण त्यालाही ब्राम्हणाकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी “ब्राम्हण म्हणोनी
कोण मुलाहिजा करणार नाही “ अशी त्यांना सक्त ताकीद दिली होती. हिंदू धर्मरक्षक
म्हणून शिवरायांना मिरवू पहाणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की, याच हिंदू धर्माने
व त्यांच्या रक्षकांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. ४४ व्या
वर्षी मुंज व एकदा झालेला विवाह दुसऱ्यांदा करावयास लावला होता. महाराजांना वठणीवर आणण्यासाठी औरंगजेबाने
जयसिंगाला महाराष्ट्रात स्वारीवर पाठविले होते. शिवरायांवर विजय कसा मिळवावा? या चिंतेत
जयसिंग असताना इथल्या शिवराज्यद्रोही ब्राम्हणांनी त्याला देवीप्रयोगी अनुष्ठाने व कोटचंडी यज्ञ
करण्याचा सल्ला दिला होता. एकीकडे शिवराय मोगल साम्राज्यशाहीची मृत्यूघंटा वाजवीत
होते तर दुसरीकडे महाराष्ट्रातील ब्राम्हणशाही शिवरायांना बेजार करून मोगलशाहीचे
मरण लांबणीवर टाकण्यास षडयंत्र रचित असत.
शिवरायांच्या संघर्ष
काळामध्ये त्यांचे सर्व सैनिक मावळे होते. त्यात सर्व जाती, जमाती व मुस्लीम होते.
या सर्व मावळ्यांना त्यांनी मराठा बनविले. असे ग्रंट डफ यांनी आपल्या ग्रंथात नमूद
केले आहे. शिवरायांनी स्त्रियांचा मान राखून त्यांना सन्मान दिला होता.
शिवरायाच्या काळी गोर गरीबांच्या लेकीसुना ह्या पाटील वतनदाराच्या उपभोगवस्तू
होत्या. परंतु शिवरायांचा दृष्टीकोन वेगळा होता. १६७८ साली सकुजी गायकवाड या सेनापतीने
सावित्रीबाई देसाई या किल्लेदार बाईस हरवून विजयाच्या उन्मादात बलात्कार केला. हे
शिवरायाना समजताच त्यांनी सखुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावून जन्मभर तुरुंगात
टाकले होते. एकदा राझ्यांच्या पाटलाने
गरीब शेतकऱ्यांच्या मुलीला सर्वासमक्ष उचलून नेली व उपभोगली. तेव्हा शरमेने तिने
जीव दिला. महाराजांना हे कळताच पाटलाला मुसक्या बांधून पुण्यात आणून त्याचे हातपाय
तोडण्यात आले. शिवरायाचा हा आदर्श आजच्या कायद्याच्या चौकटीत वापरता येतो. परंतु, आदर्श
सोडाच ते स्वत:च अशा प्रकरणात सामील होत अत्याचार्यांना वाचविण्यास हात पुढे करीत
असतात.
आज संघ परिवार शिवाजी
महाराजांना आपल्या विचाराचे शस्त्र म्हणून वापरण्यास सज्ज झाले आहे. पुणे येथे
झालेल्या शिवशक्ती संगम या संघाच्या कार्यक्रमात संघाने त्यांच्या स्टेजवरील
पोस्टर मध्ये पराक्रमी व शूर शिवराय न दाखविता आशीर्वाद देणाऱ्या महाराजाच्या
स्वरुपात दाखविले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची ही चालबाजी शिवरायांच्या
मावळ्यांनी वेळीच ओळखुन त्याची दखल घेतली पाहिजे. अन्यथा शिवरायांच्या पराक्रमांची
शिडा काढून त्यांना आशीर्वाद देणारे महाराज कधी बनवतील याचा पत्ताही लागणार नाही!
बापू राऊत
९२२४३४३४६४
E mail: bapumraut@gmail.com
No comments:
Post a Comment