एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशात असलेल्या नागरी
समाजाच्या भूमिकेवरुण ठरविता येते असे म्हटले जाते. नागरी समाजाला दुसऱ्या शब्दात
सभ्य समाज असेही म्हणतात. समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी, परंपरा, अत्याचार व विषमता
यावर हल्ला करीत मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना ह्या नेहमी त्यांच्या अजेंड्यावर
असतात. त्यासाठीच ते लढत असतात. परंतु हे जर सत्य असेल तर त्याची प्रचीती यायला
हवी. इतर देशातील नागरी समाज व भारतातील नागरी समाज यांच्यात मात्र फार मोठी तफावत
दिसते. एकंदरीत अभ्यासावरून भारतातील नागरी समाज हा “नपुसकांच्या व भेकड” भूमिकेतच
अधिक दिसतो. मला “नपुसकत्व” या
शब्दाच्या खोल दरीत जावून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा नाही. तर या शब्दाचा
व्यवहारातील साध्या व सोप्या भाषेतील निर्देशकाकडे बघायचे आहे. या अर्थाने नपुसक समाज म्हणजे काय? तर अवतीभवती ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असताना मुकपणे बघणाऱ्या समाजाला
“नपुसक समाज”
म्हणता येईल. जो समाज एखाद्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार होत असताना प्रतिक्रिया
द्यायला घाबरतो असा समाजही “नपुसकच” असतो.
भारतीय नागरी समाजाकडे याच दृष्टीकोनातून बघावे लागते. या समाजाच्या अशा घाबरट
गुणधर्मामुळे हा देश दिवसेनदिवस धर्मांध, जातीयवादी, विषमतावादी, कट्टरवादी,
आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडागर्दीच्या विळख्यात सापडलेला आहे.
निर्भया
कांडावर मेणबत्ती लावून लांगमार्च काढीत सरकारला कायदा बनविण्यास बाध्य करणारे नागरी
समाजाचे प्रतिनीधी म्हणवून घेणाऱ्यांनी खैरलांजी
प्रकरणात मेणबत्त्या लावून आरोपींना शिक्षा करण्यासाठी लांगमार्च का काढला नव्हता? मध्यप्रदेशातील
महोईकाला येथे दलित महिला
सरपंचाची निर्वस्त्र नग्न धिंड काढण्यात आली. कोडीयामकुलम मध्ये थेवास समाजाच्या लोकाकडून दलित समाजाच्या विहिरीतील पाण्यामध्ये
विषारी किटकनाशके टाकण्यात आली. हरियाणातील
सुनपेड गावात दोन निष्पाप दलित बालकांना जिवंत जाळले. मध्य प्रदेश
मध्ये गोरक्षक मारतील या भीतीने दोन दलित युवकांनी नदी मध्ये उडी घेतली. आणि त्यात
त्यांच्या मृत्यू झाला. उत्तर
प्रदेशात दोन बहिणींवर बलात्कार करून झाडावर लटकाविन्यात आले तेव्हा तथाकथित नागरी
(सभ्य) समाज का किंचाळला नाही? त्यांना केवळ दिल्लीतील निर्भयाच का महत्वाची वाटली?
का ती उच्च वर्गाची होती म्हणून? तिच्यावर
अत्याचार करणारे तुम्ही ठरविलेलल्या अल्पसंख्य व खालच्या वर्गाचे होते म्हणून
तुम्ही बोंबलात? असे नसेल तर खालच्या वर्गाची बालके व महिला यांच्यावर अत्याचार
झाल्यास तुम्ही मुग गिळून का बसता? मग काय आहेत तुमच्या सभ्य समाजाची लक्षणे? हे
तुम्ही स्पष्ट केले पाहिजे.
गुजरात
मधील उना येथे (जुलै ११) चर्मकार तरुणांना अमानवी मारहाण होत
असताना मानवतावादी म्हणविनार्यांनी लकवा मारल्यागत चुप्पी का साधली? एरवी रस्त्यावर उतरून मोर्चे काढणारा व टीव्ही वर
येवून आपले ज्ञान पाजळून मोठ्या बोंबा मारणारे नागरी समाजाचे लोक आता कुठे आहेत? काही ठिकाणी दलित व
अल्पसंख्य लोकांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी करनाऱ्या व मानवी
विष्ठा टाकणाऱ्या बदमाश गोरक्षक व बजरंगी विरुध्द तथाकथित सभ्य म्हणविणारे पेटून
का उठले नाहीत? यापेक्षा जगातील भयंकर अत्याचार काय असू शकतात? सरकारने अशा
लोकाविरुध्द का कार्यवाही केली नाही?. तुमच्या अत्याचाराच्या व्याख्या काय आहेत? अनेक
शतकापुर्वीचे रानटी कायदे आणून देशात दुफळी माजवू पाहणाऱ्या संघाच्या
कार्यप्रणालीवर तथाकथित सभ्य माणसे का बोलत नाहीत? संघाची एवढी दहशत वाटत असेल तर स्वत:चा
नागरी (सभ्य) पणाचा बुरखा तुम्ही उतरवून ठेवला पाहिजे.
दादरी मध्ये मोहम्मद अखलाखला हिंदुत्ववादयांनी
घरात गाईचे मास असल्यावरून जिवंत मारले. तो मानवतेवरचा फार मोठा कलंक होता. नागरी समाजाचे
घटक म्हणविनार्यानी निषेध म्हणून आपले पुरस्कार परत केले. परंतु उना येथे घडलेल्या
कांडावर प्रतिक्रिया देणारा कोणताही साहित्यिक, कलाकार भेटला नाही वा कोणीही निषेध
म्हणून आपले पुरस्कारही परत केले नाही. यावरून तथाकथित सभ्य समाज हा जातीमध्येच
अडकून पडलेला असून तो आपल्या सोयीनुसार व्यक्त होत असतो. दलितांच्या जगण्याचे वा
मारण्याचे कोणासही सोयरसुतक नाही. रोहित वेमुला प्रकरणात त्याच्या जातीवरच
प्रश्नचिन्ह निर्माण करून बंडारू दत्तात्रय व स्मुर्ती इराणी यांच्यावरील
कार्यवाही रोखली गेली. यावर नागरी समाजाच्या कोणताही
प्रतिनिधिने अट्रासिटी कायदा अधिक मजबूत करा असे का सांगितले
नाही? यावर संसदेमध्ये झालेल्या सर्व चर्चा वायफळ ठरल्या. यावरून संसद हे केवळ
ढोंगी लोकांचे चर्चास्थान आहे हे सिद्ध होते. जाती
पाहून प्रतिक्रिया द्यायची सवय इथल्या सभ्य म्हनवनार्यांना झाली असेल तर तुम्हाला
सभ्य व मानवतावादी तरी कसे म्हणायचे? असे तुमचे सौजन्य औन्दार्यासारखे असेल
तुमच्या या चांगुलपणाची आम्ही ऐसितैसी का करू नये?
काही टीव्ही चेनेल्सनी दादरीच्या व जेएनयु (कन्हैया
कुमार) प्रकरणात आपल्या टीव्ही स्क्रीन काळ्या करून मोठमोठ्या चर्चा घडवून आणल्या.
परंतु दलितांच्या प्रश्नावर कोणीही चर्चा घडवून आणल्या नाहीत. उना प्रकरणावर चर्चा
करताना टाईम्स नाऊचा अर्णव गोस्वामी असे अत्याचार तर मायावतीच्या काळातही होत होते
असे बेलगामपणे बोलतो तर जनता दल (यू) चे खासदार अजय अलोक टीव्ही वर चर्चा करताना बाळासाहेब
(प्रकाश) आंबेडकर यांना तुम्ही कोणत्या धर्माचे? असा प्रश्न करतो तेव्हा या सभ्य
लोकांची असभ्यता स्पष्ट दिसून येते. दलितांवर अत्याचार झाले तरी चालेल परंतु
त्यावर तुम्ही बोलायचे नाही हा यातील एक गर्भित इशारा आहे.
केवळ गुजरातच नाही तर
संपूर्ण देशामध्ये संघाने दलितांचा वापर मुसलमानाविरुध्द केलेला आहे. गोधरा
नंतरच्या दंगली असो, बाबरीकांडानंतरचा हाहाकार असो वा मुंबई बाम्बस्फोटानंतरचे
प्रकरण असो, दलितांचा शिखंडी म्हणून वापर करण्यात आला. या दलितांना आपल्याला
वापरून घेवून फेकून देण्यात येते
हे तरी केव्हा कळेल?
एवढे दलित निर्बुध्द झाले आहेत काय? आर्थिक विवेंचनेमुळे हे होत असेल मुक्तीचा
मार्ग का शोधला जात नाही? स्वर्ग, नरक व मागच्या जन्माचे पाप अशा बोगस मानसिकतेमधून
बाहेर पडायला पाहिजे. विषमता सांगणाऱ्या धर्माला फेकून द्यायचे असते. अन्याय
कुठपर्यंत सहन करणार आहात? जशास तसे व ठोशास ठोसा दिला तरच अत्याचार करणारा
घाबरेल. आता शोषकाला शोषितानीच अद्दल घडविली पाहिजे. भीमा कोरेगावला केवळ पाचशे
दलित सैनिकांनी पेशव्यांच्या पंचवीस हजार सैनिकांचा पराभव केला होता. तर या
तथाकथित गोरक्षकाना तुम्हीच अद्दल का घडवू नये? सभ्य समाज हा तुमच्या सरक्षणाला
येईल, तो तुमच्या मानवतावादी हक्काचा व शोषणमुक्तीचा एल्गार बनेल ही भाबडी आशा
सोडून दिली पाहिजे. या देशातील सभ्य समाज हा भेकड प्राण्याच्या कळपासारखा आहे.
त्यामुळे आता स्वत:च स्वत:चे रक्षक बनले पाहिजे. स्वत:च्याच प्रयत्नाने गुलामीला
बाजूला सारत स्वातंत्र्याची पहाट निर्माण केली पाहिजे.
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment