वढू बद्रुक हे पुणे जिल्ह्यातील एक गाव. भीमा आणि इंद्रायणी
नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव साधेसुधे नसून त्याला इतिहासाची मोठी झालर आहे. शूरविर
राजे संभाजी व स्वामिनिष्ठ असलेला गणपत गोपाळ गायकवाड या दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांची
समाधीस्थळ असलेल हे गाव. एक राजा तर दूसरा आपल्या राजनिष्ठेवर प्रगाढ विश्वास ठेवणार्या
प्रजेचा घटक. असे हे गाव २०१७ साली अचानक प्रकाशझोतात आले, ते १ जानेवारी २०१७ रोजी भीमा कोरेगावला
झालेल्या हिंसक दंगलीमुळे. त्या आधीच गावातील वातावरण गावाबाहेरच्या लोकांनी येवून
सतत धुमसत ठेवलं होत. केवळ त्याचा विस्फोट व्हायच बाकी होत.
संभाजी राजे यांची औरंगजेब यांचेकडून क्रूरपणे हत्या
करण्यात आली होती. हा सर्वविदित इतिहास आहे. संभाजी राजे यांच्या शरीराचे तुकडे
करून ते भीमा नदीत फेकण्यात आले व लोकांना सक्त ताकीद देण्यात आली होती की, त्या
तुकड्यांना कोणीही जमा करून अग्नि दिल्यास त्यालाही शिक्षा देण्यात येईल. त्यामुळे
संभाजी राजाच्या शरीराच्या तुकड्यांना कोणीही हात लावावयास धजत नव्हता. प्रत्येकाला
आपला जीव प्रिय होता परंतु राजनिष्ठ असलेल्या गणपत गायकवाड यांना ते पाहावल नाही.
हिंमत करून त्यांनी ते तुकडे जमा करून आपल्या आवडत्या राजाच्या देहाला अग्निदाह
दिला. त्याच गणपत गायकवाड यांची समाधी राजे संभाजीच्या समाधीच्या काही अंतरावर
असून त्यावर टिनाचे शेड टाकलेले आहे. परंतु ही समाधी कोणाची आहे व त्यांचे कर्तव्य
काय? या सबंधातील माहिती कुठेही दर्शविण्यात आली नाही. यापूर्वी
गणपत गायकवाड व संभाजी राजे यांच्या सबंधातील माहितीपर फलक लावलेले होते. त्याचे
पुरावेही उपलब्ध्द आहेत. परंतु जाती द्वेषामुळे तो फलक काढून समाधीचीही नासधूस
करण्यात आली होती. गणपत गायकवाड हा महार जातीचा असून त्याचा आणि संभाजी राजेचा काहीही सबंध नाही असे दाखवून या धाडसी ऐतिहासिक
व्यक्तिरेखेचा तो केवळ खालच्या जातीचा असल्यामुळे त्याचा इतिहासच पुसून टाकुन
खोटेपणाचा प्रमाद माजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीचा
यात हात आहे ते बिनधास्त दिसत आहेत. पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणार्या महाराष्ट्राला हे कितपत शोभतेय याची चर्चा होणे
आवश्यक आहे.
दुसरीकडे,
धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान ही एक खाजगी संस्था संभाजी राजेंच्या समाधी स्थळाची
देखभाल करते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत मिलिंद एकबोटे. संभाजी राजाच्या
समाधीच्या बाजूला एक सामाजिक हॉल असून त्यामध्ये विविध प्रसंगाची चित्रे लावलेली
आहेत. ही चित्रे खर्या इतिहासाचा विपर्यास करणारी असून चित्राच्या खाली लिहलेले
मजकूर हे विशिष्ट समाजाबाबत द्वेषभावना पसरविणारी आहेत. हा द्वेष अनंत काळासाठी टिकून
राहावा अशीच या प्रतिष्ठानची मनीषा असावी. राज्यात सतत विद्वेषाचे वातावरण तापत
राहावे म्हणजे आपल्या नेतृत्वाला भरारी मिळत जाईल हा त्यांचा होरा असावा. प्रश्न
पडतो अशा या द्वेषभावना पसरविणार्या समितीकडे या ऐतिहासिक स्थळाची देखभाल
करण्याची अनुमति कशी काय देण्यात आली? सरकारच अशा विद्वेषासाठी खतपाणी घालते काय? अशा शंका अनेकांच्या मनात निर्माण होताहेत. सरकारला या आरोपातून मुक्त
व्हायचे असेल तर मग सरकारच अशा स्थळाची देखभाल का करीत नाही?
हे एक ऐतिहासिक स्थळ असून अशा स्थळाची देखभाल पुरातत्व विभाग करीत असते. मग ते
पुरातत्व विभागाकडे वर्ग का करण्यात येत नाही? विद्वेषाचे, जातीयतेचे व दंगलीचे वातावरण नष्ट करायचे असेल तर या खाजगी ट्रस्टला
बरखास्त करून सरकारने राजे संभाजीचे समाधीस्थळ स्वत:कडे किंवा पुरातत्व विभागाकडे
सुपूर्द करायला पाहिजे हवे होते. यासाठी
सरकारने कोण्या दुसर्या आंदोलनाची वाट का पाहावी?
वढू बद्रुकच्या जवळच काही किलोमीटर अंतरावर भीमा
कोरेगावमध्ये एक स्तंभ उभारलेला आहे. १ जानेवारी १८१८ मध्ये ब्रिटीशांचे महार
सैन्य व पेशव्यांच्या फौजेत झालेल्या लढाईत पराक्रम गाजविलेल्या महार सैनिकांची
नावे या स्तंभात कोरलेली आहेत. पेशव्यांनी लादलेल्या सामाजिक व धार्मिक गुलामीचा
बदला घेण्यासाठी हे सैन्य निकराने लढले होते. अन्यायग्रस्त व स्वाभिमान हरविलेल्या समाजाच्या मनात स्फुल्लिंग
जागविण्यासाठी बाबासाहेब
आंबेडकर या स्तंभाला भेट देण्यासाठी नेहमी एक जानेवारीला भीमा कोरेगावला जात असत. हा
स्तंभ १८१८ साली महार सैनीकाने मिळविलेल्या
विजयाच्या प्रतिकाच्या स्वरुपात उभारण्यात आला होता. या स्तंभात काही बदल केल्याचे
जाणवते. अलीकडील काही प्रसंगात शहीद झालेल्या सैनिकांची नावे सुध्दा त्यात कोरलेली
दिसतात. हा खरे तर १८१८ साली झालेल्या प्रसंगाची ऐतिहासिकता पुसून टाकण्याचा
प्रयत्न आहे. खर्या इतिहासाचा भविष्यकाळात विपर्यास करण्याचा प्रयत्न होईल हे
जाणत्या सरकारने लक्षात घ्यावयास हवे. यासाठी काही नियम केले पाहिजे. कारण काही
चुकीच्या घटनांना वेळीच पायबंद घातला न गेल्यास भविष्यात त्याचे मोठे वाद निर्माण
होतात. हे वढू बद्रुक येथे झालेल्या प्रकरणाकडे उदाहरण सदृश्य म्हणून बघायला
पाहिजे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या सलोख्याला बिघडविण्याचे काम मनोहर
भिडे आणि एकबोटे करीत आहेत. हे दोघेही केवळ मुसलमानविरुध्द धार्मिक द्वेष
पसरविण्याचे कामच नव्हे तर दलित समाजाविरुद्ध जातीद्वेष पसरविण्याची भूमिका वठवीत
आहेत. त्यासाठी बहुजन समाजातल्या, विशेषत: मराठा तरुणांची माथी भडकवून आपला
स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या विरोधात अनेक पुरावे उपलब्ध्द असून सुध्दा कार्यवाही होत नाही. हा
इथल्या वर्चस्ववादी मानसिकतेचा पुरावाच असून मनुस्मृती व्यवस्थेच्या अंमलबाजवणीची
सुरुवातच झाली की काय असे म्हणायची वेळ आल्याचे दिसते.
महाराष्ट्रात आता नवीन सरकार आले असून प्रबोधनाकार ठाकरे यांचेच
नातू असलेले उधद्व ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. प्रबोधनकारांच्या
पुरोगामी विचाराचा वारसा पुढे नेण्याची नामी संधि त्यांच्याकडे चालून आलेली आहे. मात्र
त्यांनी आपल्या निर्णयातून महाराष्ट्राच्या जनतेला ते दाखवून दिले पाहिजे. वढू
बद्रुक येथील गणपत गायकवाड यांची ओसाड पडलेल्या समाधीचे मोठ्या स्मारकात रूपांतर
करण्यात येवून त्याचे सुशोभीकरण करावयास हवे. महाराष्ट्राची एकात्मकता कायम ठेवत व
राज्य तंटामुक्त करण्यासाठी संभाजी
राजेंचे स्मारक सरकारच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया आरंभली पाहिजे. भविष्याचा
वेध घेवून पावले उचलल्यास वढू बद्रुक ते भीमा कोरेगाव सारखे अनेक अनर्थ टाळता येवू
शकतात परंतु त्यासाठी गरज आहे ती दुरदृष्टीची आणि धर्म व वंशाच्या पलीकडे जावून राज्याच्या
प्रगतिचा ध्यास धरण्याची.
बापू राऊत,
No comments:
Post a Comment