देशात व विशेषत: महाराष्ट्रात
शिवाजी राजेनंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी
राहिली असेल तर ती कोल्हापूर संस्थानाचे “राजश्री शाहू” होत. शिवाजी राजे व शाहू राजे यांचे कार्य व विचार पध्दतीमध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राह्मणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राह्मणी
संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर
या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर या दोन व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट जाणवतो.
ब्राह्मणवर्ग राबवित असलेल्या धर्मसहिंतेवर आघात करणे शिवाजी राजेंना जमले नाही. शाहू राजेंनी मात्र
यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. शिवाजी राजेंनी मुघलाकडून झालेल्या अपमानाचा समाचार
घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्वकीयाकडून झालेला अपमान त्यांनी धर्मसहिंतेच्या नावाखाली पचवून टाकला.
टिळकांच्या जीवनकार्यात आलेले महत्वाचे प्रकरण म्हणजे “वेदोक्त” प्रकरण (१८९९) होय. काय होता हा वेदोक्तवाद? हा वेदोक्तवाद टिळकांशी कसा निगडीत होता? यावर विवेचन
करणे अधिक महत्वाचे ठरेल. शाहू राजेंच्या राजवाड्यातील पुजारी राजोपाध्ये हा त्यांच्या
घरातील कोणतेही धार्मिकविधी हे वेदोक्त मंत्रोपचारानुसार करीत नसून पुराणोक्त
मंत्रांनी करीत असे. राजेंनी या धार्मिक पूजापठणाकडे कधीही विशेष लक्ष दिले नव्हते. राजोपाध्येचे हे कारस्थान राजारामशास्त्री भागवत
यांनी शाहू राजेंच्या लक्षात आणून दिल्यानंतर शाहू राजेंनी राजोपाध्येस राजवाड्यातील
सर्व धार्मिक संस्कार हे वेदोक्त मंत्रानी करण्यास फर्मावले. यावर राजोपाध्येनी उलट
उत्तर दिले. राजोपाध्ये म्हणाला, परंपरा व
शास्त्रानुसार शूद्रांच्या घरची पूजा व धार्मिक संस्कार हे केवळ पुराणोक्त मंत्राद्वारेच
केले जातात. आपला वर्ण शुद्र असल्यामुळे राजवाड्यातील पूजा व धार्मिक संस्कार हे वैदिक
मंत्रोपचारांनी करता येणार नाहीत. वैदिक परंपरेनुसार तो दर्जा केवळ ब्राह्मण व
क्षत्रियांचा आहे. हा खरे तर शाहू राजेंचा अपमान होता. या घटनेनंतरही
शाहू राजेंनी राजोपाध्येस वेदोक्तमंत्राची आज्ञा केली. राजोपाध्येने
शाहू राजेंच्या आदेशाचे पालन करण्यास स्पष्ट नकार दिला.
राजोपाध्येच्या नकारानंतर शाहू राजेंनी त्याचे
राजपुरोहित पद व बक्षिसात दिलेली जमीन जप्त केली. दुसरीकडे नारायण शास्त्री व काही पुरोहित ब्राह्मणांनी शाहू राजेंचे समर्थन करीत वेदोक्तानुसार त्यांच्या
घरील कर्मकांड केले. ह्या प्रसंगानंतर, टिळकांनी नारायण शास्त्री भट्ट यांना शाहूंचा ब्राह्मण
गुलाम असे म्हटले. शुद्रांनी घरचे विधि वेदोक्त मंत्रानी करण्यास विरोध दर्शवून शाहूंच्या वेदोक्त मंत्रानी कर्मकांड करावयाच्या मागणीला
टिळकांनी ‘उन्माद’ असे म्हटले. टिळक एवढ्यावरच थांबले नाहीत तर वेदोक्ताने
शाहूच्या मनाचे “संतुलन बिघडवले आहे” असेही म्हटले. अधिकाराचा गैरवापर करून ब्राह्मणांच्या
कार्यात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप टिळकांनी शाहूराजेवर केला
होता. एवढेच नव्हे तर शाहू राजेनी वर्णाश्रम धर्माचा अभिमान वाटून राज्याच्या भरभराटीसाठी
वंशपरंपरागत कर्तव्य केले पाहिजे असे बजावले होते.
टिळकांनी वेदोक्ताचा प्रश्न कोल्हापुरातील
शंकराचार्यांऐवजी ब्राह्मण समुदायाला मध्यस्थांनी ठेवून वाद मिटविण्याची सूचना केली.
ते म्हणाले, राजोपाध्ये धर्मग्रंथानुसार काम करीत आहेत, त्यांच्या बक्षिसाची
जमीन जप्त करणे अन्यायकारक आहे. इतकेच नव्हे तर टिळकांनी त्यांना धमकी दिली होती की,
“यावरही शाहू मानत नसतील तर ब्रिटिश सरकारकडे तक्रार करून त्यांचे कोल्हापूर संस्थान
बरखास्त करण्यासाठी विनंती करू” अशा प्रकारचा दबाव त्यांनी शाहू राजेंवर आणला होता.
वेदोक्त प्रकरण जेव्हा करवीर पिठाचे
शंकरचार्य म्हणून काशिनाथबुवा ब्रह्मनाळकर यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी शाहू राजेंचे
क्षत्रियत्व नाकारले. याचा आनंद होवून महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मणांनी तो धूमधडाक्यात
साजरा केला होता. कोल्हापूरच्या छत्रपतीचा “शुद्रनृपती” म्हणून धिक्कार करणारा “धर्मवीर” म्हणून काशिनाथबुवा
ब्रह्मनाळकर याचा जयजयकार करण्यात आला. गावागावातून त्याच्या पालख्या व प्रवचने आयोजित
करून त्याला देणग्या देण्यात आल्या. काशिनाथबुवा
ब्रह्मनाळकर यांचेवर टिळकाची खास मर्जी होती. एकप्रकारे टिळकांनी अन्यायी रुढींचे समर्थन
करून समानतेच्या धर्माला मूठमाती दिली. धर्माच्या पोकळ अभिमानाने टिळकांना आपल्या
वर्णाश्रम धर्माच्या उचनिचतेला कायमस्थानी ठेवायचे होते या शंकेला कोणताही वाव उरत
नाही. परिणामी शाहू राजेंनी काशिनाथबुवा ब्रह्मनाळकर यांची शंकराचार्य पदावरील नेमणूक
रद्द करून त्याचे उत्पन्न व इनाम जप्त केले.
सन १९१५ मध्ये संकेश्वरच्या शंकराचार्यांनी
घोषित केले की, कोल्हापूरचे राजे शिवाजीचे वंशज असून त्यांना
वेदोक्तविधीचा हक्क आहे. शंकराचार्याच्या या घोषणेवर टीका करीत टिळक म्हणाले, राजोपाध्ये
यांची जखम व दु:ख याचा यत्किंचितही परिणाम शंकराचार्यांवर झालेला दिसत नाही. टिळकांचे
हे विधान त्यांच्या “जातीयवादी विचारांना व जातीच्या वर्चस्वाला” प्रतिबिंबित करणारे होते. टिळक म्हणतात, वेदोक्ताच्या मागणीचे विचार हे पूर्वपरंपरा
व इतिहास लक्षात घेता अवनतीचे नी अविचारीपणाचे आहेत. शिवाजी राजेंच्या जातकुळीपेक्षा
ज्याची जातकुळी श्रेष्ठ नाही त्यांनी वेदोक्ताचे खूळ माजवून राजपुरोहिताच्या हक्काचा
विनाकारण भंग करावा हे आमच्या मते अगदी गैर आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले
म्हणजे मराठे व ब्राम्हण एकाच जातीचे होतील अशी ज्या कोणाची कल्पना असेल तर ती फिजूल
आहे. मराठ्यांनी आपले क्षात्रतेज व्यक्त करण्याचा मार्ग वेदोक्त मंत्राने श्रावणी
करणे हा नव्हे. त्यांच्या घरच्या क्रिया वेदोक्तांनी झाल्याने त्यांना विशेष महत्ती
प्राप्त होईल, असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. यात काही भूषण नाही. वेदोक्त मंत्रासाठी जर शाहू आपला हेका
कायम ठेवत असतील तर त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसून येवून महाराष्ट्रात मोठी खळबळ
उडून जाईल. त्यासाठी त्यांनी ब्रह्मवृंदाचे म्हणणे ऐकावे व त्याप्रमाणे वागावे असे
म्हटले होते
वेदोक्त कर्माचे खूळ बर्याच दिवसापूर्वी
हे प्रथमत: बडोद्याच्या गायकवाडानी केले व आता त्याचा संसर्ग कोल्हापुरात जावून भिडला
आहे. परंतु ब्राह्मणांनी मराठ्यांचे वेदोक्त संस्कार न करणे यात टिळकांना कोणते राष्ट्रकार्य
व भूषण वाटत होते हे टिळकांनी कधीही सांगितले नाही. ब्राह्मणांच्या स्वनिर्मित
व स्वनिर्णीत सत्तेला धक्का पोहोचताच टिळकांचे रक्त कसे खवळून जात होते? याचे वेदोक्तप्रकरण
हे एक उत्तम उदाहरण होते. टिळक हे आपल्या ब्राह्मण जातीसाठी माती खाणार्या पैकी
होते. म्हणून ब्राह्मणी धर्माच्या कोणत्याही सुधारणेस बेंबीच्या देठापासून विरोध
करीत असत. टिळकांचा विविध प्रकरणात हस्तक्षेप बघता, “टिळकासारखा माणूस जर्मनीत असता, तर त्यास सरळ गोळी घालण्यात आली असती”, असे उद्गार शाहू राजेंनी काढले होते. यावर छत्रपतींनी ब्रिटीशांना
खुश करण्याचे धोरण सोडले नाही, तर त्यांचा ‘जॅक्सन आणि रॅड’ केला जाईल, अशी टिळकांनी धमकी दिल्याचे दिसते.
शाहू राजे इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या
पाठीमागे ब्राह्मणांनी कोल्हापूरला आपले कपटकारस्थान चालू केले होते. राजेंना भीती
दाखविण्यासाठी रक्ताने माखलेल्या हाताची बोटे त्यांच्या घरांच्या भिंतीवर उमटवीत
असत. काही अफवानुरूप गोष्टी जाणूनबुजून पसरविण्यात येत होत्या, त्यापैकी ब्राह्मणांनी
ज्या राजाच्या त्याग केला त्या राजांची राज्ये नष्ट झाली, वेदोक्त पद्धतीचा हट्ट धरल्यामुळे
शिवाजी व त्यांचा मुलगा अकाली मृत्यूमुखी पडले, गागाभट्टाचा मृत्यू शौचकुपात वाईट
पध्द्तीने झाला अशा अनेक गोष्टी ब्राह्मणांकडून पद्धतशीरपणे पेरल्या जात होत्या. असाच प्रकार त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेवर
मारेकरी पाठवून व सावित्रीबाई फुलेवर शेनमाती फेकण्यास प्रोत्साहन देवून केले होते.
सावित्रीबाईच्या शाळेत ज्या मुली शिकायला जातील त्यांच्या घरच्या अन्नाचे अळ्यात रुपांतर
होईल अशी भीती दाखविण्यात येत होती. म्हणून शाहू राजे म्हणत, मरणाची आपत्ती
माझ्यावर किंवा माझ्या मित्रावर ओढविली तरी मी डगमगणार नाही. परंतु आम्हापैकी कोणावर
असी आपत्ती आलीच तर ती आमच्या शापामुळे आली अशी बढाई मारण्याला व लोकांच्या धर्मभोळेपणाचा
फायदा घेण्याची संधी हे ब्राह्मण साधतील याचे मला वाईट वाटते. ब्राह्मणांचे वर्चस्व
नष्ट होईपर्यंत आम्हावर असले प्रसंग येवू नयेत, कारण ते अशा प्रसंगाचा उपयोग आमचे कार्य
हाणून पाडण्याकरिता करतील असे राजेंनी म्हटले होते. नागपूरचे राजे रघुजी रावसाहेब भोसले
१९२२ साली शाहूला भेटले होते. त्या भेटीत शाहू राजे त्यांना म्हणाले कि “ब्राह्मण
हा माझा आश्रित म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला
कधीच वाटले नाही”. वेदोक्तवादाने शाहू राजेंच्या स्वभावधर्मामध्ये बराच
बदल घडून आलेला बघायला मिळतो. त्यांनी नंतर आपला आर्यसमाजी झोला फेकून देवून म.ज्योतिबा
फुलेंच्या ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीचे सूत्र आपल्या हातात घेतले. तो काळ महाराष्ट्रातीलच
नव्हे तर देशातील ब्राह्मणेतर चळवळीच्या भरभराटीचा होता.
लेखक: बापू राऊत
(आगामी प्रकाशित होणार्या "बाळ गंगाधर टिळक - एक चिकित्सा" या पुस्तकातील एक लेख)
No comments:
Post a Comment