टिळक, मी सुधारणांना पाठींबा दिल्यास माझ्या सार्वजनिक कार्यास बाधा येईल असे म्हणत. कधी सुधारणेस संख्येची अट घालत व नंतर त्यास नकार देत. परधर्मीय व विदेशी मॅक्सम्युलरने वेद वाचले ते टिळकांना व त्यांच्या कर्मठ धर्मांधाना कसे चालले? पण तेच वेद आपल्याच ब्राह्मणेत्तर हिंदूनी वाचू नये आणि वेदांद्वारे संस्कार करण्याचा हक्क त्यांनी मागू नये असे म्हणणार्या टिळकांची नीती दोगलेपणाची असून ती आपल्याच हिंदू लोकाविरोधी होती.
कायदेमंडळात जावून कुणब्याने नांगर हाकावयाचे नाहीत किंवा वाण्यांनी तागड्या धरावयाच्या नाहीत असे म्हणनार्या टिळकांनी सदैव तेल्यातांबोळ्याचे व शेतकर्यांचे नुकसान केले. त्यांना अशिक्षित व अज्ञानात ठेवून केवळ आपले पाठीराखे बनविले. पण याच तेलीतांबोळी व शेतकर्यांनी टिळकांच्या अथनीच्या सभेतील असभ्य वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील सभा उधळून लावल्या होत्या. अहोरात्र कष्ट करून व अज्ञानी राहून अन्नधान्य पिकविणार्या शेतकर्यास शूद्र व कुणबट असे कुत्सितपणे संबोधणारे टिळक, गरिबी व शोषणामुळे सावकारांचे कर्ज फेडू न शकणार्या आपल्याच शेतकरी बांधवांना कारावासात पाठवा असे ब्रिटीशास सांगणारी व्यक्ति देशभक्त तरी कशी ठरू शकते? या विवेचनानुसार टिळकांचे स्थान कोठे असावे हे ज्यांनी त्यांनी आपल्या वैचारिक कुवतीनुसारच ठरविलेले बरे.