Saturday, February 19, 2022

द ग्रेट शिवरायांचा आठवावा प्रताप




आज  देश कधी नव्हे एवढा धोक्याच्या वळणावर उभा आहे. देशाला अनेक समस्यांनी ग्रासले असून 
एक नागरिक दुसर्‍या नागरिकाकडे संशयित भावनेतून बघायला लागला आहे. मोर्चे व आंदोलनानी रस्ते आणि चौक गजबजलेले दिसताहेत. मागण्यांचे फलक हातामध्ये धरूनमार्च निघताहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात, ज्याला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव प्राप्त झाला आहे. त्या देशात धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढाव्यात हे देशास हीन करणार्‍या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्म व जुने स्वनिर्मित इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम यांच्यासोबतच समुदायात दरी निर्माण करण्यात येत आहे.


शिवाजी राजेंचा तथाकथित हटयोगी व धर्मवादी मंडळी दुसर्‍या विरोधात आपल्या भात्यातील विषारी बाणासारखा वापर करू पहाताहेत. अशा लोकांनी खरे तर  शिवरायांचे चरित्र व त्यांच्या कर्तव्याचे वस्तुनिष्ठ भान ठेवले पाहिजे. शिवाजी राजे वाचताना सत्य व वास्तववादी चष्म्यातून त्यांच्या स्वराज्यरोहणाकडे बघितले पाहिजे. शिवाजी राजेकडे पुरंदरेसारख्या विषमता व जाती वर्चस्ववाद्यांच्या खोट्या व काल्पनिक रचनाकडे न बघता राजेंच्या सत्य व वास्तव इतिहासाचे सुवर्णपान लिहणार्‍या इतिहासकार  मा. म. देशमुखाच्या पुस्तकात डोकावून राजेना समजून घेतले पाहिजे. शिवरायांना धर्मश्रध्द ठरवून त्यांच्या विचाराची मोडतोड करणे हा खरा तर त्यांच्या विचारांचा अपमान करणे होय. शिवाजी महाराज की जय अशा  घोषणा करीत दुसर्‍यांना इजा करण्याचा प्रयोग हा त्यांच्या शासन प्रणालीचा पूर्णता अपमान करणे होय.

शिवराय कधीही मुस्लीम विरोधी नव्हते. त्यांनी हा माझ्या जातीचा व धर्माचा म्हणून कोणाही मावळयाकडे बघितले नाही. माझ्या राज्यातील सर्व प्रजा तीच माझी सांगाती हे त्यांचे ब्रीद होते. त्यांच्या विचाराची ही महान व्याप्ती होती. शिवरायांच्या राज्यकारभाराची तर्‍हाच फार न्यारी होती. शिवरायांच्या पदरी मोठमोठ्या हुद्द्यावर अनेक मुसलमान सरदार व वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खान होता. आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता. काजी हैदर हा त्यांचा वकील  होता. अंगरक्षक म्हणून विश्वासू मदारी मेहतर होता. शिवराय मुस्लिमद्रेष्टा असते तर असे घडले असते का? यावर जनतेनी विचार करावयास हवा.  याउलट अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा कुलीन व्यक्ती होता. सिद्दी हिलाल तर आपल्या पुत्रासकट शिवरायासाठी मुसलमानाविरोधात लढला. हिंदू मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाच्या पदरी सरदार पदावर होता. यावरून त्याकाळात संपूर्ण समाजाची फाळणी ही हिंदू विरुध्द मुसलमान अशी नव्हती. धर्म व देव हे त्याकाळात संघर्षाचे मुळात कारणच नव्हते.  शिवरायांचे जे मुस्लीम सैन्य होते ते मोगलाविरुध्द लढायचे तर मुसलमान राजाच्या पदरी असेलेले हिंदू सैनिक शिवरायाविरुध्द लढत असत. त्याकाळात धर्मनिष्ठे पेक्षा स्वामीनिष्ठा श्रेष्ठ होती. यावर राज्यकर्त्यांनीच नव्हे तर सामान्यापासून बुध्दिवंतापर्यंत सर्वांनी चिंतन करून विचाराची रेख आखली पाहिजे.

शिवराय सर्व धर्माचा आदर करीत असत. याविषयी इतिहासकार काफी खान म्हणतो, शिवराय आपल्या सैनिकांना मशीद, कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसत. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यातील मुस्लीम व ख्रिश्चनाना देत असत. महाराजांच्या गुरूंच्या यादीमध्ये तुकाराम महाराजाशिवाय याकुबबाबा हे मुस्लीम संतही होते. खरेतर शिवराय सामाजिक परिवर्तनाचे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनायला हवे होते. परंतु हिंदुत्ववाद्यानी त्यांना आपल्या हातातील मुस्लीम विरोधी हत्यार म्हणून वापरण्यास सुरू केले. शिवरायाच्या नावांनी संस्था निर्माण करून संभाजी भिडे सारख्या मतलबी, खोटी थाप मारणार्‍या आणि अवैज्ञानिक विषवल्लीचे पाढे सांगणार्‍यानी शिवरायांच्या तत्वाचा नेहमीच अनादर केला आहे.

शिवरायांचा कालखंड हा तसा पुरुषप्रधान होता. स्त्रियांना पाहिजे तो मानमरातब मिळत नव्हता. सरंजामदारीत गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला तर काही किंमत नव्हती. सरदार, वतनदार, देशमुख यांच्यासाठी गरिबांच्या लेकीसुना हव्या तेव्हा उपभोगाच्या वस्तु झाल्या होत्या. मात्र शिवरायांचा दृष्टीकोण याहून वेगळा होता. त्यांनी भोगी सरंजाम व वतनदारावर वचक बसविण्यास सुरू केले. रांझ्याच्या पाटलाने जेव्हा शेतकर्‍याच्या मुलीचा उपभोग घेतला व आपली अब्रू गेली म्हणून तिने आपला जीव दिला. ही बातमी शिवरायांना कळली तेव्हा त्या पाटलाला मुसक्या बांधून त्याच्या ज्या हातापायांनी कुकर्म केले त्या हातापायांना तोडण्याचा हुकूम शिवरायांनी दिला होता. सखूजी गायकवाड यांनी बेळवाडीचा किल्ला सर केल्यानंतर सावित्रिबाई देसाई या किल्लेदारीवर बलात्कार केला तेव्हा शिवरायांनी सखूजी गायकवाडाचे डोळे काढून मरेपर्यंत जेल मध्ये ठेवले. त्यांनी आपला सरदार व नातेवाईक म्हणून कोणाचीच गय केली नाही. स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून “आपलीही आई एवढी सुंदर असती तर किती बरे झाले असते” असे उद्गार काढणारे शिवराय चारित्र्यसंपन्न व निरोगी दृष्टीचे होते.  आजचे राज्यकर्ते बलात्कार्‍यांना वाचविण्याचा,  सन्मान देण्याचा जेव्हा प्रयत्न करतात आणि नंतर तेच जय शिवराय अशी घोषणा देतात तेव्हा ते कीती लबाड आहेत याची प्रचिती येते.

शिवरायांनी आपल्या रयतेची फार काळजी घेतल्याचे बघायला मिळते. स्वराज्याचे रक्षण करताना रयतेला त्रास होवू नये म्हणून आणि शेतकर्‍यांच्या संपतीची व शेतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्याच्या त्यांच्या आज्ञापत्रात बघायला मिळतात. गुलामांच्या व्यापारास बंदी घालून त्यांनी भुदासावरील अमर्याद  हुकमत बंद करून प्रत्येकाला कसायला जमीन आणि  प्रत्यक्ष पिकावरच कर आकारणी केली. वतनदाराचे हक्क नष्ट केले होते. शिवरायाचे असे शेतकरीविषयक राज्यधोरण होते. परंतु त्याच शिवरायांचे नाव घेवून राज्यकर्त्यांनी आज शेतकरी विरोधी कायदे आणून दिल्ली बॉर्डरवर ७०० शेतकर्‍यांचा बळी घेतला. रस्त्यावर खिळे ठोकून शेतकर्‍यांना जायबंद केले गेले. आपल्याच शेतकर्‍यांना देशद्रोही व आतंकवादी ठरविण्यात येवून त्यांचेवर शिव्यांची लाखोली वाहण्यात आली.

शिवराय इतर मराठा सरदाराप्रमाने मोगलांचे मांडलिक बनले नाहीत तर बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर त्यांनी राज्य स्थापन केले होते. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते. पण आज शिवरायांबद्दल काही व्यक्ति व संघटना जेम्स लेन  मार्फत खोटा इतिहास सांगून शिवरायाच्या प्रखर बुद्धीला व पराक्रमाला नाकारीत आहेत. शिवरायद्रोह करणारी ही दांभिक माणसे शिवरायाच्या यशाचे श्रेय अध्यात्म, भवानी देवीला देत आहेत. शिवरायाच्या पराक्रमाला नाकारण्याचा हा किती खोटा विपर्यास!

शिवराय कधीही अंधश्रध्दा पाळीत नसत. ते आपल्या मोहिमा अमावश्येच्या रात्रीच काढीत. अंधार्‍या रात्रीचा फायदा घेत ते शत्रूला जेरीस आणून हरवीत असत. राजाराम पालथा जन्मला तेव्हा जवळचे नातेवाईक यास अपशकुन म्हणू लागले होते. परंतु शिवाजी राजे म्हणाले, हा शकुन असून तो संपूर्ण मोगलाईस पालथा घालेल. शिवाजी राजे वास्तववादी व विज्ञानवादी होते. बौध्द तत्वज्ञानाचा त्यांचेवर पगडा होता. शिवाजी राजेच्या अनेक किल्ल्याच्या तटाभोवताल व परिसरात असलेल्या बौध्दलेण्या त्याची आजही साक्ष देतात. शिवराय व जिजाबाईवर असलेल्या बौध्द तत्वज्ञानाच्या प्रभावामुळेच छत्रपती संभाजी राजेचा विवेकवादी बुध्द्भूषन हा ग्रंथ निर्माण होवू शकला. बौध्द विचाराचा आलेला हा वारसा परंपरेने आनुवांशिक होता. नंतरच्या काळात गौतम बुध्दाला विष्णूचा अवतार बनविणार्‍यां वैदिक आर्याच्या वंशजानी आपल्या सोयीसाठी  शिवरायांना हिंदुत्ववादाच्या चक्रव्हयूवात गुरफुटून टाकीत त्यांना आपल्या हातातील अस्त्र बनविले. शिवरायांना गोरक्षक व ब्राह्मण प्रतिपालक बनवून भोळ्या जनतेवर आपला धार्मिक व सांस्कृतिक विशेषाधिकार थोपविणे निर्दयपणा   होता.

राज्यभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी सामाजिक सुधारणांना गती देण्याचे पर्व सुरु केले होते. परंतु या कार्यास सनातनी लोकाकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी “ब्राम्हण म्हणून कोणाचाही मुलाहिजा केल्या जाणार नाही” अशी सक्त ताकीद दिली होती. धर्मरक्षक म्हणून मिरवू पहाणाऱ्या मतलबी लोकांनी विसरू नये की, याच हिंदू शास्त्रांनी व त्यांच्या रक्षकांनी शिवरायांना शुद्र ठरवून त्यांच्या राज्यभिषेकाला कडवा विरोध केला होता.म्हणून सामान्य लोकांनी बेजबाबदार व स्वार्थी लोकांचा कावा ओळखला पाहिजे. केवळ त्यांच्या जयंति दिनी चणेफुटाण्यासारखे तप्त ताव्यावर उड्या मारणे व भगवी टोपी डोक्यावर घालीत मिरविणे योग्य नव्हे तर त्यांचे विचार डोक्यात घालून ३६४ दिवस जागरूक राहून शिवरायांचा विचाराप्रमाणे सामान्य लोकांच्या न्याय व अधिकारासाठी झटले पाहिजे.   

No comments:

Post a Comment