Wednesday, May 4, 2022

डॉ. आंबेडकराच्या पुतळ्यांचा द्वेष हि एक रोगट मानसिकता



आपल्या भारतात ज्याचे देशाच्या सार्वभौम उभारणीमध्ये मोठे योगदान आहे, ज्यांनी या देशाला सूत्रबध्द ठेवण्यासाठी राज्यघटना लिहिली, ज्यानेमी प्रथमत: भारतीय व अंतिमत: भारतीयचअशी घोषणा करून या मातीत जन्मास आलेला बौध्द धर्म स्वीकारला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याच्या घटना घडत असल्याचे दृष्टीपथास येते. डॉ. आंबेडकरांचे पुतळे हे सरकार, सामाजिक संस्था आणि मागासवर्गीय वंचित समाजाकडून उभारले जातात. स्वातंत्र्यानंतर हा भारत मुलत: प्रोग्रेसिव्ह विचाराचा देश म्हणून उदयास आला असला तरी त्याने ३००० वर्षापासून आर्य वैदिक ते  ब्रिटीशकालीन पाश्च्यात्य संस्कृतींना आपल्यात सामावून घेतले आहे. भारताच्या या सर्वगामी संस्कार संस्कृतीमुळे त्याला जगात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. असे असताना सुध्दा भारताला कट्टर धर्मांधता व व्यक्ती द्वेषाच्या शापाने कवटाळलेले दिसते. भारताच्या मानगुटीवर बसलेल्या या शापांचा पराभव करणे हे प्रत्येक भारतीयांचे नैतिक कर्तव्य बनले आहे. 


भारतात मूर्तीशिल्प बनविण्याची परंपरा फार जुनी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या उत्खननात गौतम बुध्द व महाविराचे शिल्प अनेक ठिकाणी मिळताहेत. या मूर्तीशिल्पाचा पुढचा अविष्कार म्हणजे पुतळ्यांची निर्मिती होय. म.गांधी, म. ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, भगतसिंग व सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे अनेक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील भावना हि त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आदर व्यक्त करीत त्यांच्या आदर्श विचारांचा संदेश घेवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याची असते. परंतु असंतुलित विचाराच्या काही लोकांकडून इतरांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घाट घातल्या गेला आहे. यामागे निश्चितच एका विचारधारेचा प्रभाव व समाजव्यवस्थेतील आपल्या अढळ स्थानाला पोहोचत असलेली असुरक्षित भावना आहे. 

खरे तर स्वाभिमान, मानवी हक्क व समानतेचे प्रतिक म्हणून बाबासाहेब आंबेडकराकडे बघितले जाते. हाच  प्रतीकात्मक संदेश बाबासाहेबांच्या पुतळ्यातून मिळत असतो. बाबासाहेबांचे अनेक पुतळे हे आकर्षक, नजरेत भ रणारे व संदेश देणारे असतात. त्यापैकी सर्वात आकर्षक पुतळा म्हणजे  डाव्या हातामध्ये पकडलेले भारतीय संविधान तर उजवा  हात समोर करून बोटाने आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याचा निर्देश देणारी त्यांची धीरगंभीर मुद्रा प्रतीकात्मक अर्थाने राष्ट्राला लोकशाही आणि बंधुत्वाच्या शिकवणुकीची जाणीव करून देतात. त्यांनी संविधान राष्ट्राला समर्पित करून देशातील सर्व जनतेला न्यायाच्या एका सूत्रात बांधले. देशात कोणीही मोठा व लहान नसून सर्वांना सारखीच प्रतिष्ठा व समान हक्क असतात याची जाणीव संविधान करून देते. 

परंतु अलीकडील काळात पुतळ्यांच्या माध्यमातून जातीय द्वेष उफाळून येत त्याचे रूपांतरण दंगलीमध्ये झालेले दिसते. पुतळ्यांची तोडफोड हि मुख्यत: उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड व तामिळनाडू या राज्यात अधिक संख्येने झालेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपुर जवळील शब्बीरपूर येथे ठाकूर व दलित यांच्यात २०१७ मध्ये संघर्ष झाला. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंतीला उत्सवाचा भाग म्हणून शब्बीरपूर येथे आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापणा करण्यात आली होती. यावर ठाकूर समाजाच्या व्यक्तींनी प्रशासकीय परवानगी नसल्याचा आक्षेप घेतला. त्यानंतर ठाकुरांनी जेव्हा राणा प्रताप यांची मिरवणूक काढली त्यावर वंचित जातींनीही समान आक्षेप घेतला. यातून दंगे होत ठाकूरानी दलिता विरोधात हिंसाचार केला. त्यांची घरे जाळण्यात येवून हत्याही करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दंगलीतून उत्तर प्रदेश पोलिसांची दलितविरोधी मानसिकता दिसून आली. पोलिसांनी दलितांच्या वाहनाची व घरांची नासधूस केल्याच्या चित्रफिती बघावयास मिळाल्या.

देशात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांना दगड मारणे, काळे फासणे व उखडून फेकणे यासारख्या घटना घडत आहेत. त्यापैकी काही ठळक घटनामध्ये गुजरात येथील भावनगर जिल्ह्यातील सिहोर गावात पुतळ्याला बादलीने झाकण्यात येवून भोवताल दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या. महाराष्ट्रात मोर्शी तालुक्यातील रीद्दपूर गावात व त्रिपुरातील विधानसभेच्या विजयानंतर उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील मवाना गावामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तामिळनाडूमध्ये नागाय वेदरम्यण येथे भर दिवसा अनेकांच्या उपस्थितीमध्ये झुंडीने चक्क तलवारीने आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली गेली. देशात पुतळा विटंबनेच्या अनेक अज्ञात घटना घडताहेत कि ज्यांची कधीच रिपोर्टिंग होत नाही किंवा उच्च जातींच्या भीतीमुळे वंचित गटाकडून तक्रारी करण्यात येत नाहीत. यास भूमिहीनतेतून आलेले आर्थिक परावलंबित्व कारणीभूत असून भूदान व पडीक जमिनीच्या  पट्टेवाटपाची थांबलेली प्रक्रिया हि विकासातील सरकारी उदासीनता आहे. जी आता कोलमडली दिसते.  

आंबेडकरांचे पुतळे हे मूर्तीपूजेचे स्तोम नसून ते कार्यकारण भाव दाखवीत आपली कार्यतत्परता व  स्वाभिमान जागृत ठेवण्याची जाणीव करून देतात. राजकारणात आपली दृष्यता शोधणे आणि सामाजिक व धार्मिक अधिकाराप्रती सजग राहण्याची दृष्टी देत असतात. त्यातून हिंसा व द्वेषाचा भाव प्रगट होत नाही. याउलट बहुसंख्यांक त्यात आपला उत्कर्ष, अधिकार, सन्मान व विकासाची गुरुकिल्ली शोधत असतात. असे असले तरी सवर्णांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची सतत भीती वाटत आलेली आहे. त्या भीतीपोटीच आंबेडकरी विचारांना कवटाळणार्या सोबत ते सतत संघर्षरत  दिसतात. खरे तर डॉ. आंबेडकरांचे विचार हे समता व वर्चस्वहीन समाजव्यवस्थेची शिकवण देतात. जन्माने, जातकुळीने व धर्मानुशंगाने कोणीही कोणापेक्षा मोठा नसतो. त्यांच्या शिकवणुकीमुळे ज्या जातींनी वर्षानुवर्षे धर्मनियमांच्या आडोशाने इतर समाज घटकावर वर्चस्व गाजविले, त्या जातीमध्ये न्यूनगंड पसरून आपल्या सांस्कृतिक व सामाजिक वर्चस्वाला धक्का पोहोचत असल्याची भीती निर्माण झाली आहे. हि भीती केवळ ब्राम्हण वर्गालाच नाही तर या वर्गाने उच्चनीच जातीच्या ज्या शिड्या निर्माण केल्या, त्या जातशिडयाना सुध्दा आपल्या स्थानाची प्रतिष्ठा जाईल कि काय? याची भीती वाटू लागली आहे. त्यातूनच द्वेषभावनेचे प्रसूतीकरण होत असल्याचा कयास होतो.

संविधानातील वंचित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाची तरतूद किंवा जातीव्यवस्थेतील उच-नीचता यामुळे डॉ. आंबेडकरांचा विरोध करीत पुतळ्यांची तोडफोड करीत असतील तर ते रोगट व क्रूर   मानसिकतेचे बळी आहेत असेच म्हणता येईल. कारण इतिहास व समाजाच्या वास्तव आरस्याकडे त्यांनी डोळेझाक केलेली असते. जाती लोकसंख्यानुसार सरकारी नोकऱ्यातील प्रमाण, धर्माच्या क्षेत्रात एकाचे शंभर टक्के प्राबल्य, खाजगी व उद्योग क्षेत्रात सवर्णांची मक्तेदारी, त्यांना मिळत असलेल्या सवलती व वंचित वर्गाची सामाजिक व आर्थिक स्थिती तपासली तर त्यांचा हा विरोध नपुसकच ठरतो. या संदर्भात शाहू महाराजांनी सांगितलेली घोड्यांची कैफियत फार प्रसिध्द आहे. विरोधाचे निराकरण करण्यासाठी ती आवर्जून वाचली पाहिजे.

डॉ. आंबेडकरांचे पुतळे वैचारिक मंथनातून व मानवी हक्काचे प्रतिक म्हणून स्वयंस्फूर्तीतून उभे केले जात आहेत. आपले अधिकार व समतेचा विचार करणार्यांची संख्या आता एका जातीपुरती मर्यादित राहिली नसून ती अमर्याद होत आहे. अशिक्षित वंचित घटकांना वाचता येत नसले तरी मानवी हक्क व सत्य ऐकून घेण्याची श्रवणशक्ती निश्चितच त्यांच्यात असते. आणि आंबेडकरी विचाराचा सत्संग हा काल्पनिक पोथ्यांचा नसून वास्तवतेवर आधारित आकलनाचा असतो. म्हणूनच मार्गदात्याचे पुतळे फोडण्याची कृती सामाजिक विस्फोट घडविणारी ठरू शकते. त्यामुळे पुतळ्यांच्या रक्षणासोबतच समता व मानवी हक्क विरोधी व्यक्ती व संस्थांचे रोगट मन बदलविण्याचे  काम नैतिक जबाबदारी समजून केली पाहिजे. 


लेखक: बापू राऊत

No comments:

Post a Comment