Saturday, May 7, 2022

शाहू राजेंच्या वेदोक्तास टिळकांचा विरोध (भाग २)


सन १९१५ मध्ये संकेश्वरच्या शंकराचार्यांनी घोषित केले की, कोल्हापूरचे राजे शिवाजीचे वंशज असून त्यांना वेदोक्तविधीचा हक्क आहे. शंकराचार्याच्या या घोषणेवर टीका करीत टिळक म्हणाले, राजोपाध्ये यांची जखम व दु:ख याचा यत्किंचितही परिणाम शंकराचार्यांवर झालेला दिसत नाही. टिळकांचे हे विधान त्यांच्या जातीयवादी विचारांना व जातीच्या वर्चस्वाला प्रतिबिंबित करणारे होते. टिळक म्हणतात, वेदोक्ताच्या मागणीचे विचार हे पूर्वपरंपरा व इतिहास लक्षात घेता अवनतीचे नी अविचारीपणाचे आहेत. शिवाजी राजेंच्या जातकुळीपेक्षा ज्यांची जातकुळी श्रेष्ठ नाही त्यांनी वेदोक्ताचे खूळ माजवून राजपुरोहिताच्या हक्काचा विनाकारण भंग करावा हे आमच्या मते अगदी गैर आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे व ब्राम्हण एकाच जातीचे होतील अशी ज्या कोणाची कल्पना असेल तर ती फिजूल आहे. मराठ्यांनी आपले क्षात्रतेज व्यक्त करण्याचा मार्ग वेदोक्त मंत्राने श्रावणी करणे हा नव्हे. त्यांच्या घरच्या क्रिया वेदोक्तांनी झाल्याने त्यांना विशेष महत्ती प्राप्त होईल, असे म्हणणे अगदी चुकीचे आहे. यात काही भूषण नाही.  वेदोक्त मंत्रासाठी जर शाहू आपला हेका कायम ठेवत असतील तर त्याचे भयंकर दुष्परिणाम दिसून येऊन महाराष्ट्रात मोठी खळबळ उडून जाईल. त्यासाठी  शाहूनी ब्रह्मवृंदाचे म्हणणे ऐकावे व त्याप्रमाणे वागावे असे म्हटले. 

वेदोक्त कर्माचे खूळ बर्‍याच दिवसापूर्वी हे प्रथमत: बडोद्याच्या गायकवाडानी केले व आता त्याचा संसर्ग कोल्हापुरात जाऊन भिडला आहे. परंतु ब्राह्मणांनी मराठ्यांचे वेदोक्त संस्कार न करणे यात टिळकांना कोणते महान राष्ट्रकार्य व भूषण वाटत होते ? हे टिळकांनी कधीही सांगितले नाही. ब्राह्मणांच्या स्वनिर्मित व स्वनिर्णीत सत्तेला धक्का पोहोचताच टिळकांचे रक्त कसे खवळून जात होते ? याचे वेदोक्त प्रकरण हे एक उत्तम उदाहरण होते. टिळक हे आपल्या ब्राह्मण जातीसाठी माती खाणार्‍या पैकी होते. म्हणून ब्राह्मणी धर्माच्या कोणत्याही सुधारणेस बेंबीच्या देठापासून विरोध करीत असत. टिळकांचा विविध प्रकरणात हस्तक्षेप बघता, टिळकासारखा माणूस जर्मनीत असता, तर त्यास सरळ गोळी घालण्यात आली असती असे उदगार शाहू राजेंनी काढले. यावर छत्रपतींनी ब्रिटीशांना खुश करण्याचे धोरण सोडले नाही, तर त्यांचा जॅक्सन आणि रॅड केला जाईल, अशी टिळकांनी उलटी धमकी दिली.

शाहू राजे इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या पाठीमागे ब्राह्मणांनी कोल्हापूरला आपले कपटकारस्थान चालू केले होते. राजेंना भीती दाखविण्यासाठी रक्ताने माखलेल्या हाताची बोटे त्यांच्या घरांच्या भिंतीवर उमटवीत असत. काही अफवानुरूप गोष्टी जाणूनबुजून पसरविण्यात येत होत्या, त्यापैकी ब्राह्मणांनी ज्या राजाच्या त्याग केला त्या राजांची राज्ये नष्ट झाली, वेदोक्त पध्दतीचा हट्ट धरल्यामुळे शिवाजी व त्यांचा मुलगा अकाली मृत्यूमुखी पडले, गागाभट्टाचा मृत्यू शौचकुपात वाईट पध्द्तीने झाला अशा अनेक गोष्टी ब्राह्मणांकडून पद्धतशीरपणे पेरल्या जात  होत्या. असाच प्रकार त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेवर मारेकरी पाठवून व सावित्रीबाई फुलेवर शेणमाती फेकण्यास प्रोत्साहन देऊन केले होते. सावित्रीबाईच्या शाळेत ज्या मुली शिकायला जातील त्यांच्या घरच्या अन्नाचे अळ्यात रुपांतर होईल अशी भीती दाखविण्यात आली होती. म्हणून शाहू राजे म्हणत, मरणाची आपत्ती माझ्यावर किंवा माझ्या मित्रावर ओढविली तरी मी डगमगणार नाही. परंतु आम्हापैकी कोणावर अशी आपत्ती आलीच तर ती आमच्या शापामुळे आली अशी बढाई मारण्याला व लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेण्याची नामी संधी हे ब्राह्मण साधतील याचे मला वाईट वाटते. ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट होईपर्यंत आम्हावर असले प्रसंग येवू नयेत, कारण ते अशा प्रसंगाचा उपयोग आमचे कार्य हाणून पाडण्याकरिता करतील असे राजेंनी म्हटले होते. नागपूरचे राजे रघुजी भोसले १९२२ साली शाहूला भेटले होते. त्या भेटीत शाहू राजे त्यांना म्हणाले कि, ब्राह्मण हा माझा आश्रित म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला कधीच वाटले नाही. वेदोक्तवादाने शाहू राजेंच्या स्वभावामध्ये बराच बदल घडून आलेला बघायला मिळतो. त्यांनी नंतर आपला आर्यसमाजी झोला फेकून देऊन ज्योतिराव फुलेंच्या ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीचे सूत्र आपल्या हातात घेतले. तो काळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ब्राह्मणेत्तर चळवळीच्या भरभराटीचा होता.

वेदोक्त प्रकरणाबाबत स्टॅन्ले एजरली या मुंबईच्या गृहसचिवाने ब्राह्मण ही कारस्थानी व उपद्रवकारक जात आहे असी टिप्पणी केली होती. वेदोक्त प्रकरणी रेसिडेंट पासून व्हाईसरॉयच्या सल्लागारापर्यंतच्या इंग्रज अंमलदारांनी दिलेला अभिप्राय पहा.:  शाहू राजे मराठ्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करीत असल्यामुळे ब्राह्मण दुखावले आहेत. मुंबई सरकारचा निर्णय केंद्र सरकारने फिरवला तर महाराजांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसेल. वेदोक्त प्रकरण म्हणजे कुविख्यात टिळकांच्या पाठिंब्याने ब्राह्मणांनी महाराजाविरुध्द चालविलेली लढत आहे. शाहू राजेनी मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवलेल्या नोकर्‍या पुढारलेल्या वर्गाच्या डोळ्यात सलू लागल्या होत्या. वस्तूत: संस्थानात मागासलेल्या लोकांची संख्या शेकडा ९० टक्के होती. मग त्यांच्यासाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात गैर काय, हा खरा सवाल होता. १८९४ साली कोल्हापूर संस्थानात पाच शाळा होत्या. ही संख्या शाहू राजेनी १९१२-१३ पर्यंत १७ वर नेली. १९११ साली दलित मुलांना मोफत शालेय शिक्षण देण्याची तजवीज केली. १९१७ पासूनच्या काळात आपले खाजगी उत्पन्न व दरबाराच्या तिजोरीतून दलित मुलासाठी सात वसतिगृहे चालविली. त्याच वर्षापासून त्यांनी पोलिस, कारकून व तलाठी या पदासाठी दलितांना पसंती  देण्याचे धोरण स्वीकारले. तसेच शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी दलितांना समान वागणूक देण्याचे धोरण स्वीकारले.  आरक्षणापूर्वी सरकारी सेवामध्ये त्यांचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के होते. शिवाय राजेनी प्रेमापोटी सुध्दा कोणत्याही अपात्र जणांना नेमले नव्हते

लेखक:बापू राऊत 

(बाळ गंगाधर टिळक:एक चिकित्सा या प्रस्तावित पुस्तकातील भाग , लेखक -बापू राऊत)

1 comment: