Saturday, February 18, 2023

शिवाजी राजेच्या सत्यनिष्ठ प्रतिमेस तडे देवून काय साधणार ?

देशात शिवाजी राजेंना मानाचे स्थान आहे. त्यांचे हे स्थान राजेनी केलेल्या कर्तुत्वामुळे निर्माण झाले. सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्रातील मावळ्यांची त्यांना जीवापाड साथ होती. त्यांचे मावळे म्हणजे अठरापगड जातीची माणसे होती. नीती, नियमन, एकवाक्यता, आत्मविश्वास, निष्ठा व जिद्द या गुणामुळे त्यांना आपले अधिपत्य स्थापन करण्यात यश प्राप्त झाले. त्यांच्या यशाची पध्दत म्हणजे गनिमी कावा व सर्वांना सामावून घेण्याचे कौशल्य यात होती.

काही धर्मांध संस्था त्यांना केवळ एका धर्माचे व विचारधारेचे प्रतिक म्हणून उभे करीत आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातज्याला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव प्राप्त झाला आहे. त्या देशात धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढावा हे देशास हीन करणार्‍या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्म व जुने स्वनिर्मित इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात शिवाजी राजेंचे नाव घेत द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम समुदायात दरी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी राजेना समजून घेण्याची खरी गरज आहे.

शिवाजी राजे समजून घेताना सत्य व वास्तववादी चष्म्यातून त्यांच्या स्वराज्यरोहणाकडे बघितले पाहिजे. काही इतिहासकारांनी निर्माण केलेल्या विषमता व वर्चस्ववाद्यांच्या काल्पनिक रचनाकडे न बघता राजेंच्या सत्य व वास्तव इतिहासाचे सुवर्णपान लिहणार्‍या इतिहासकारांच्या साहित्याकडे बघितले पाहिजे. शिवरायांच्या विचाराची मोडतोड करणे हा खरा तर त्यांच्या विचारांचा अपमान करणे होय. शिवाजी महाराज की जय अशा  घोषणा करीत दुसर्‍यांना इजा करण्याचा प्रयोग हा शिवाजी राजेंच्या शासन प्रणालीचा पूर्णता अपमान करणे होय.

धर्मनिरपेक्षवादी शिवाजी महाराज

शिवाजी राजेंनी कधीही परधर्माचा द्वेष केला नव्हता. उलट प्रत्येकाना आपापल्या धर्माप्रमाणे जगण्यास सहकार्य केले. त्यांनी धर्माला केवळ जीवन जगण्याचा मार्ग एवढ्याच पुरते महत्व दिले. ते मुस्लीम विरोधी नव्हते. माझ्या राज्यातील सर्व प्रजा तीच माझी सांगाती हे त्यांचे ब्रीद होते. त्यांच्या विचाराची ही महान व्याप्ती होती. शिवरायांच्या राज्यकारभाराची तर्‍हाच फार न्यारी होती. शिवरायांच्या पदरी मोठमोठ्या हुद्द्यावर अनेक मुसलमान सरदार व वतनदार होते. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहीम खान होता. आरमाराचा प्रमुख दर्यासारंग दौलत खान होता. काजी हैदर हा त्यांचा वकील  होता. अंगरक्षक म्हणून विश्वासू मदारी मेहतर होता. शिवराय मुस्लीम विरोधी  असते तर त्यांनी मुस्लीमाना महत्वाचे पद बहाल केले असते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याउलट अफझलखानाचा अंगरक्षक व वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा व्यक्ती होता. सिद्दी हिलाल तर आपल्या पुत्रासकट शिवरायासाठी मुसलमानाविरोधात लढला. हिंदू असलेला मिर्झा राजे जयसिंग  औरंगजेबाच्या वतीने शिवाजी राजे विरुध्द लढण्यास महाराष्ट्रात आला होता. यावरून त्याकाळात संपूर्ण समाजाची फाळणी ही हिंदू विरुध्द मुसलमान अशी नव्हती.  शिवरायांचे जे मुस्लीम सैन्य होते ते मोगलाविरुध्द लढायचे तर मुसलमान राजाच्या पदरी असेलेले हिंदू सैनिक शिवरायाविरुध्द लढत असत. त्याकाळात धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठा श्रेष्ठ होती.  यावर राज्यकर्त्यांनीच नव्हे तर सामान्यापासून बुध्दिवंतापर्यंत सर्वांनी चिंतन करून विचाराची रेख आखली पाहिजे.

शिवराय सर्व धर्माचा आदर करीत असत. याविषयी इतिहासकार काफी खान म्हणतो, शिवराय आपल्या सैनिकांना मशीद, कुराण व बायबल यांचा कधीही अपमान करू देत नसत. स्वारीवर असताना बायबल किंवा कुराण आढळले तर ते मोठ्या आदरपूर्वक जवळ घेत व सैन्यातील मुस्लीम व ख्रिश्चनाना देत असत. महाराजांच्या गुरूंच्या यादीमध्ये तुकाराम महाराजाशिवाय याकुबबाबा हे मुस्लीम संतही होते. खरेतर शिवराय सामाजिक परिवर्तनाचे व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनायला हवे होते. परंतु देशविरोधक काही घटक  त्यांना आपल्या हातातील मुस्लीम विरोधी हत्यार म्हणून वापरत आहेत. संभाजी भिडे सारख्या मतलबीखोटी थाप मारणार्‍या आणि अवैज्ञानिक विषवल्लीचे पाढे सांगणार्‍यानी शिवरायांच्या तत्वाचा नेहमीच अनादर केला आहे.

स्त्रियांना सन्मान प्रदान केला

शिवरायांचा कालखंड हा तसा पुरुषप्रधान होता. स्त्रियांना पाहिजे तो सन्मान  मिळत नव्हता. सरंजामदारीत गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला तर काही किंमत नव्हती. मात्र शिवरायांचा दृष्टीकोण याहून वेगळा होता. त्यांनी आपल्या आईस जीजाबाईस सती जाण्यापासून रोखले होते. त्यांनी स्त्रीलंपट सरंजाम व वतनदारावर वचक बसविला. रांझ्याच्या पाटलाने जेव्हा कुणबी शेतकर्‍याच्या मुलीचा उपभोग घेतला व आपली अब्रू गेली म्हणून तिने आत्महत्या केल्याची बातमी जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा त्या पाटलाला मुसक्या बांधून ज्या हातापायांनी कुकर्म केले त्या हातापायांना तोडण्याचा हुकूम दिला होता. सखूजी गायकवाड यांनी बेळवाडीचा किल्ला सर केल्यानंतर सावित्रिबाई देसाई या किल्लेदारीवर बलात्कार केला. तेव्हा  सखूजी गायकवाडाचे डोळे काढून मरेपर्यंत जेल मध्ये ठेवले गेले. गोळेवाडी येथील गोळ्याची सून ब्राम्हण सुभेदाराने शिवरायांना नजर केली होती. तेव्हा शिवाजी राजे संतापून म्हणाले, “तुम्ही आपल्या ब्राम्हण कुटुंबासह कायमचे काशीस निघून जा, जर परत आलात तर तुमचे पारपत्य करण्यात येईल.” स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी  तो आपला सरदार व नातेवाईक असला तरी त्याची गय केली नाही.

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघून आपलीही आई एवढी सुंदर असती तर किती बरे झाले असतेअसे उद्गार काढणारे शिवराय चारित्र्यसंपन्न व निरोगी दृष्टीचे होते.  आजचे राज्यकर्ते बलात्कार्‍यांना वाचविण्याचा जेव्हा प्रयत्न करतात आणि नंतर तेच जय शिवराय अशी घोषणा देतात तेव्हा ते कीती लबाड आहेत याची प्रचिती येते.

शेतकऱ्यांचे तारणहार

शिवरायांनी आपल्या रयतेची फार काळजी घेतल्याचे बघायला मिळते. स्वराज्याचे रक्षण करताना रयतेला त्रास होवू नये याची खबरदारी घेतली होती. त्यांनी शेतकर्‍यांच्या संपतीची व शेतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या हे त्यांच्या आज्ञापत्रात बघायला मिळते. गुलामांच्या व्यापारास बंदी घालून त्यांनी प्रत्येक भूमिहीनास कसायला जमीन देत वतनदाराचे हक्क नष्ट केले होते. शिवरायाचे असे शेतकरीविषयक राज्यधोरण होते. परंतु त्याच शिवरायांचे नाव घेत देशात शेतकरी विरोधी कायदे आणून ७०० शेतकर्‍यांचा बळी घेतला. रस्त्यावर खिळे ठोकून शेतकर्‍यांना जायबंद केले गेले. आपल्याच शेतकर्‍यांना देशद्रोही व आतंकवादी ठरविण्यात आले. हे शिवाजी राजेंच्या विचाराविरोधी होते.

शिवराय कधीही मांडलिक बनले नाहीत

शिवराय इतर मराठा सरदाराप्रमाने कधीही मोगलांचे मांडलिक बनले नाहीत. तर बुद्धी व तलवारीच्या जोरावर त्यांनी स्वराज्य स्थापन केले. ते शूर लढवय्ये व कुशल संघटक होते. परंतु शिवरायांबद्दल विदेशी लेखकाच्या माध्यमातून खोटा इतिहास सांगून त्यांची प्रखर बुद्धी व पराक्रमाला नाकारण्यात आले होते. शिवरायद्रोह करणारे त्यांच्या  यशाचे श्रेय अध्यात्म, भवानी देवीला देतात. शिवरायाच्या पराक्रमाला नाकारण्याचा हा फार मोठा कट आहे. शिवाजीचे महात्म्य कमी करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे.

तर्कबुद्धी जपत अंधश्रद्धेला नाकारले

शिवराय कधीही अंधश्रध्दा पाळीत नसत. ते तर्क व ध्येयाला महत्व देत असत. त्यांनी सतीप्रथा नाकारली हती. ते मुहर्त बघत नसत. त्यांच्या युध्द मोहिमा अमावश्येच्या रात्रीच निघत. राजाराम पालथा जन्मला तेव्हा नातेवाईक अपशकुन मानू लागले होते. परंतु शांती करणे नाकारत त्यांनी हा  राजाराम संपूर्ण मोगलाई उलथवून टाकेल असे म्हटले होते. शिवाजी राजेच्या अंगी आलेली वास्तव व विज्ञानवादी तर्कबुद्धी हि बौध्द तत्वज्ञानातून आली होती. शिवाजी राजेच्या अनेक किल्ल्याच्या तटाभोवताल असलेल्या बौध्दलेण्या त्याची साक्ष देतात.

नंतरच्या काळात गौतम बुध्दाला विष्णूचा अवतार बनविणार्‍यां वैदिक आर्यांनी आपल्या सोयीसाठी शिवरायांना गोरक्षक व ब्राह्मण प्रतिपालक बनवून टाकले. एवढ्यावरच न थांबता तैलचित्राच्या माध्यमातून त्यांनी रामदासाला शिवरायाचे गुरु म्हणून दाखविले. वैदिकांची हि बनवाबनवी मराठी जनतेची शुध्द फसवणूक आहे. भोळ्या जनतेवर आपला सांस्कृतिक विशेषाधिकार थोपविणे हा खरे तर  निर्दयपणा आहे.

शिवरायांचा राज्याभिषेक व सामाजिक जबाबदारी

शिवरायांच्या राज्यभिषेकाला विरोध करीत  त्यांना राजा म्हणून स्वीकारण्यास पुण्यातील ब्राम्हण व काही वतनदारांनी नकार दिला होता. वर्णव्यवस्थेनुसार शुद्र व्यक्ती हा आमचा राजा होवू शकत नाही हि त्यांची भूमिका होती. राजेही इरेस पेटले होते. त्यांनी काशीच्या गागाभट यास मोठी रक्कम देवून आपला राज्याभिषेक करवून घेतला. या राज्यभिषेकानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांना गती देण्याचे पर्व सुरु केले. परंतु या कार्यास सनातनी लोकाकडून विरोध झाला. तेव्हा महाराजांनी “ब्राम्हण म्हणून कोणाचाही मुलाहिजा केल्या जाणार नाही” अशी सक्त ताकीद दिली होती.  म्हणून सामान्य लोकांनी बेजबाबदार व स्वार्थी लोकांचा कावा ओळखला पाहिजे. केवळ राजेच्या जयंती दिनी भगवी टोपी डोक्यावर घालीत मिरविणे योग्य नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून ३६४ दिवस जागरूक राहून शिवरायांचा विचाराप्रमाणे लोकांच्या न्याय व अधिकारासाठी झटले पाहिजे. शिवरायाचे नाव घेताच बहुजन समाज एकत्र येतो, हे येथील  सनातनी लोकांना पक्के माहित आहे. त्यामुळेच आपले मनसुबे साध्य करण्यासाठी शिवाजी राजेचा ते वापर करु पाहताहेत. शिवाजी राजेच्या सत्यनिष्ठ प्रतिमेला तडे देवून देश प्रगतीपथावर जाणार नाही हे लक्षात घेत शिवाजी प्रेमींनी देशी आतंकी भक्ताचे  मनसुबे  हाणून पडले पाहिजे.

लेखक: बापू राऊत 

4 comments:

  1. खरं तर महाराजां विषयी या व अशा लेखांची हिंदी व इतर भाषांत ही गरज आहे. सध्या सत्ताधीश विडंबन करतात ते अक्षम्य.
    भारतीय सेक्युलरीजम, घटना यावर महाराजांच्या स्वराज्य धोरणाची गडद सावली आहे. त्यावर ही खल व्हावा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. हा लेख हिंदी मध्ये फारवर्ड प्रेस द्वारे प्रकाशित होत आहे.खरे शिवाजी लोकांना काळाने फार महत्वाचे आहे.

      Delete
  2. आज शिवरायांचे नाव घेऊन सनातनी लोक , मिडीयाचा वापर करून केंद्र सरकारची सत्ता तसेच सर्व राज्ये ताब्यात घेऊन देशात पुन्हा मनुस्मृती आणण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. निद्रिस्त बहुजन जागे झाले पाहिजे. त्यांच्यासाठी हा लेख पुस्तक स्वरूपात सर्वसामान्यांसाठी प्रकाशीत झाला तर उत्तम.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. बहुजन समाजाला जागते करण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. परंतु मनुवादी त्याही पेक्षा अधिक गतीने सक्रीय आहे. सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. सदर लेख काही मासिकांना पाठवीत आहे. धन्यवाद.

      Delete